@ डॉ. मनमोहन वैद्य
देशाच्या संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरणात गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांमुळे भारतीय सैन्याचे बल आणि मनोबल वाढले आहे. त्यामुळे आज भारत आणि संपूर्ण जग एका नव्या भारताचा अनुभव घेत आहे. जगभरात भारताला प्रसिद्धी मिळाली आहे. अधिकाधिक दश आज देशाचे समर्थन करीत असून सहकार्य करण्यास उत्सुक आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनण्यासाठी १९३ पैकी १८४ सदस्यांनी भारताला समर्थन दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या भारताच्या प्रस्तावास संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्व सदस्यांनी स्वीकृती दिली. सौर उर्जेसारख्या अनेक विषयांबाबत जगभरातील अनेक देशांची एकजूट करण्यात भारताने महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारताची ही वाढ, त्याचे बलशाली होणे आणि समृद्ध होणे हे संपूर्ण मानवी जगाला आणि पर्यावरणाला फलदायी सिद्ध होईल. याचे मुख्य कारण म्हणजे भारताची जागतिक दृष्टी ही स्पर्धा नाही तर संवाद, संघर्ष नाही तर समन्वय असा आणि केवळ मानवी जगापुरता नव्हे नाही तर जगातील चराचरांचा एकात्म आणि सर्वांगीण विचार करणारी आहे. फक्त आपलाच विचार न करणारा भारत हा जगभरातील आगळावेगळा देश आहे. आपली सांकृतिक दृष्टी आपल्याला तसा विचार करू देत नाही.
आर्थिक धोरणात परिवर्तनाची आवश्यकता आहे. परंतु देशाचे आर्थिक चाक असे वेगात फिरत असताना असे परिवर्तन करणे शक्य नाही. वर्तमान काळात कोरोनामुळे हे आर्थिक चाक थांबल्यासारखे झाले आहे. या संधीचा फायदा घेत आर्थिक धोरणात सुधारणा करण्याची मनीषा भारत सरकारने दर्शविली आहे. परंतु ७० वर्षांच्या या अर्थव्यवस्थेचे पुनरायोजन करायचे तर त्यासाठी साहस, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमतेसह धीराने आणि सातत्याने केल्या जाणाऱ्या सामुहिक प्रयत्नांचीही आवश्यकता आहे. हे प्रयत्न करताना आपल्या एकात्म, सर्वांगीण आणि सर्वसमावेशक मूलभूत जागतिक दृष्टीतून वर्तमान संदर्भाचा विचार करून युगानुकूल बदलांचा स्वीकार करत योजना आखाव्या लागतील. भारताने या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे. आता भारत हा भारत म्हणूनच व्यक्त होत आहे, दृढपणे पावले टाकत आहे. जग हे पाहत आहे आणि त्याचा अनुभवही घेत आहे. हे परिवर्तन भारताला आपलेसे आणि जगाला नवे वाटत आहे.
हे परिवर्तन दशकांपासून सुरु असलेल्या राष्ट्र जागृतीच्या प्रयत्नाचे यश आहे. या जागरणाच्या सामाजिक चेतनेला डावे आणि डाव्या विचारांनी प्रेरित-पोषित पत्रकारांनी तसेच लिबरल्स-इंटलेक्चुअल्सनी ‘राष्ट्रवादी’ म्हणून तिला विरोध दर्शविला आहे. वास्तवात हे ‘राष्ट्रवादी’ नाही तर ‘राष्ट्रीय’ आंदोलन आहे. ‘राष्ट्रवादी’ हा शब्द भारतीय नाही आणि त्या मागील संकल्पनाही भारतीय नाही. हा शब्द राज्याधारित राष्ट्र अर्थात nation- state वरून तयार झाला आहे. म्हणूनच त्या राष्ट्रांमध्ये ‘nationalism’ अर्थात राष्ट्रवाद अस्तित्वात आहे. याच पाश्चिमात्य राष्ट्रवादाने जगाला दोन महायुद्धांचा अनुभव दिला आहे. राष्ट्रवाद ही भांडवलशाहीची देणगी आहे. आणि सुपर राष्ट्रवाद (super-nationalism) साम्यवादाच्या प्रकारात मोडतो. प्रदीर्घ अनुभवांची पुंजी नसतानाही रशियाने आपले साम्यवादी विचार मध्य आशिया आणि पूर्व युरोपी देशांवर थोपविण्याचा कसा प्रयत्न केला, हे सर्वांना ज्ञात आहे. चीनने आपल्या विस्तारवादी वृत्तीला अनुसरून हॉंगकॉंग आणि दक्षिण आशियातील काही देशांवर ताबा मिळवला आणि आपल्या साम्राज्यवादी धोरणाचा अनुभव दिला हे ही संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. सहा देशांच्या ४१ लाख चौरस किमी क्षेत्रावर चीनचा ताबा आहे आणि २७ देशांशी त्यांची भांडणे सुरु आहेत असा अंदाज बांधला जात आहे. म्हणूनच जगातील अनेक देश चीनच्या साम्राज्यवाद किंवा सुपर राष्ट्रवादाविरोधात एकत्र येताना दिसत आहेत.
भारताच्या विचारांमध्ये राष्ट्रवाद नाही राष्ट्रीयतेची भावना आहे. आपण राष्ट्रवादी नव्हे तर राष्ट्रीय आहोत. म्हणूनच संघाचे नाव राष्ट्रवादी सेवक संघ नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आम्हाला कोणताही राष्ट्रवाद येथे आणायचा नाही. भारताची राष्ट्राची संकल्पना ही भारतीय जीवन दृष्टीवर आधारित आहे. इथे राज्य नव्हे तर लॉक ही राष्ट्राची व्याख्या आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणार, विविध जातींच्या नावानी ओळखले जाणारे, विविध देवदेवतांची उपासना करणारे भारतातील लॉक हे अध्यात्माधारित एकात्म, सर्वांगीण जीवन दृष्टीस आपली मानतात आणि याच माध्यमातून संपूर्ण समाजशी आणि या भूमीशी जोडलेले राहतात. आपल्या प्राचीन दृष्टीने सत्याकडे पाहताना त्यास वर्तमान परीप्रेक्ष्याच्या चौकटीत बसवून त्यानुसार आचरण करणे म्हणजेच भारताच्या राष्ट्रीयतेचे प्रकटीकरण आहे. आपली ही ओळख आणि परस्परांतील बंधुत्वाचे नाते समाजासोबत आपुलकीने निभावण्याचा संस्कार म्हणजे म्हणजे राष्ट्रीय भाव जागृत करणे होय. समाजजीवनातील प्रत्येक क्षेत्रात हे राष्ट्रत्व प्रकटणे, अभिव्यक्त होणे हे राष्ट्रीय पुनर्निर्माण आहे. हेच राष्ट्राच्या स्वत्वाची जागृती आणि प्रकटीकरण आहे. राष्ट्राचे स्वत्व प्रकटणे म्हणजे राष्ट्रवाद नक्कीच नाही.
चीनच्या विस्तारवादी, आक्रमक पवित्र्याला भारताने दिलेले उत्तर पाहून डाव्यांनी ‘हा भारताचा सुपर राष्ट्रवाद आहे’ असा प्रचार सुरु केला. वास्तविक डाव्यांनी भारताचे ‘स्वत्व’ कधी ओळखलेच नाही. आता प्रकट होत असलेला राष्ट्रवाद नसून ते भारताचे आजवर नाकारले गेलेले भारताचे ‘स्वत्व’ आहे. “वसुधैव कुटुम्बकम” आणि “सर्वेपि सुखिनः सन्तु” हा भारताचा विचार राहिला आहे. म्हणूनच भारताच्या स्वत्वाला येणारी जागृती आणि त्याच्या आत्मानिर्भरतेवर शक्तीसंपन्न होण्याची योजना याने कोणाला घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा भारत आहे, तो आता जागा होत आहे.
भारताच्या स्वत्वाच्या प्रकटीकरणाला भारतातच विरोध होणे यात नवीन काही नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जुनागढ संस्थानाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल हे सोमनाथ येथे गेले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराची जीर्णावस्था पाहून त्यांच्या मानस अत्यंत वेदना झाल्या. देश स्वतंत्र झाला होता. भारताच्या या गौरवस्थानाच्या पुनर्स्थापनेचा संकल्प त्यांच्या मनात जागृत झाला. याची जबाबदारी त्यांनी पं नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री श्री कन्हैयालाल मुन्शी यांच्यावर सोपविली. सरदार पटेल यांनी ही सर्व माहिती महात्मा गांधी यांना सांगितली. तेव्हा गांधीजी यांनी त्यांचे समर्थन केले. मात्र यासाठी लागणारा पैसा सरकारी तिजोरीतून न देता जनसहभागातून घ्यावा अशी सूचना केली. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेन्द्रप्रसाद आले होते. त्या कार्यक्रमात राजेन्द्रप्रसाद यांनी केलेले भाषण विशेष उल्लेखनीय आहे.
परंतु पंडीत नेहरू यांना हे पसंत नव्हते. सरदार पटेल, कन्हैयालाल मुन्शी, महात्मा गांधी आणि राजेन्द्रप्रसाद यांच्यासारखे मोठे नेते या घटनेकडे भारताच्या गौरवाची पुनर्स्थापना म्हणून पाहत असताना त्या घटनेला पंतप्रधान नेहरू यांनी हिंदू पुनरुत्थानवाद(Hindu revivalism) असे म्हणून विरोध केला. भारताचे स्वत्व नाकारणे, त्याच्या प्रकटीकरणास विरोध करणे हे तेव्हापासून होते हे आपल्या लक्षात येते. परंतु तेव्हा कॉंग्रेसमध्येही राष्ट्रीय विचारांची मंडळी अधिक होती. म्हणून हे कार्य तडीस गेले. पुढे योजनापूर्वक रीतीने राष्ट्रीय विचाराच्या नेतृत्वास मागे ढकलले गेले आणि साम्यवादाचा प्रभाव कॉंग्रेसमध्ये वाढत गेला. साम्यवाद अध्यात्मिकता मनात नाही, इतकेच नव्हते तर तो राष्ट्रवाद ही संकल्पनाही मनात नाही. भांडवलवादी मानसिकतेचे तो प्रतिनिधित्व करतो. आधी सोव्हिएत संघ आणि आता चीन त्याच विस्तारवादी आणि हुकुमशाहीवादी मानसिकता दर्शवितो. म्हणूनच भारताच्या बाबत स्वत्व ही संकल्पना समजून घेण्यास तो असमर्थ आहे. अथवा हा देश एका सूत्रात जोडलेला राहू नये, तो तुकड्यांमध्ये विखुरलेला राहावा म्हणून ते जाणीवपूर्वक विरोध करीत आहेत.
या परिस्थितीत आपले कर्तव्य काय आहे ? याचे स्पष्ट आणि सटीक उत्तर गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या १९०४ साली प्रकशित झालेल्या ‘स्वदेशी समाज’ मध्ये देण्यात आले आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांनी राष्ट्रावादास विरोध केला हे सत्य आहे. ते वसाहतवाद(colonialism) आणि जागतिक युद्धाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर पश्चिमेच्या नेशन स्टेट आधारित राष्ट्रवादाच्या विरोधात होते. भारताचे राष्ट्रीयत्व अर्थात स्वत्व याचा ते कशा प्रकारे पक्ष घेत असत याचे उदाहरण आपल्याला स्वदेशी समाज निबंधात मिळते. ते म्हणतात –
“पांघरूण घेऊन एका कोपऱ्यात पडून राहण्याला आत्मरक्षण म्हटले जात नाही, हे आपण समजून चुकलो आहोत. आपली अंतर्निहित शक्ती जागृत तसेच कार्यान्वित करणे हाच आत्मरक्षणाचा योग्य उपाय आहे. याच विधात्याचा नियम आहे. जडतेचा त्याग करण्यासाठी आपण जोवर उद्यमशक्तीचा त्याग करत नाही तोवर इंग्रज आपल्या मानस पराभूत करत राहतील. प्रत्येक गोष्टीत इंग्रजांचे अनुकरण करून, सोंग घेऊन स्वतःचा बचाव करणे म्हणजे आपलीच फसवणूक करण्यासारखे आहे. आपण खरे इंग्रज बनू शकत नाही आणि खोटे इंग्रज म्हणून इंग्रजांना धोकाही देऊ शकत नाही. आपली बुद्धी, अभिरुची, हृद्य हे सर्व कवडीमोलाने विकले जात आहे. याचं प्रतिकार करण्याचा एकमेव उपाय आहे. आपण मुळात जे आहोत तसे होऊया . ज्ञानपूर्वक, सरळ आणि सजीवपणे आपल्याला ‘आपलेपण’ पूर्णपणे प्राप्त करावे लागेल.
...देशातील तपस्वींनी केलेला शक्तीसंचय बहुमूल्य आहे. विधाता तो निष्फळ होऊ देणार नाही. त्यामुळेच योग्य वेळी निश्चेष्ट भारतास त्याने कठोर वेदना देऊन जागृत केले आहे. अनेक्तात एकतेची प्राप्ती आणि विविधतेत ऐक्याची स्थापना हाच भारताचा अंतर्निहित धर्म आहे. विविधता म्हणजे विरोध असे भारताने कधी मानले नाही. परदेशी म्हणजे शत्रू असेही कधी मानले नाही. जे आपले आहे त्याचा त्याग केल्याशिवाय, कोणाचाही विनाश न करता, एका व्यापक व्यवस्थेत सर्वांना स्थान देण्याची त्याची इच्छा आहे. सर्व पंथांचा त्याने स्वीकार केला आहे. आपल्या आपल्या स्थानाचे महत्व तो पाहू शकतो. हाच भारताचा गुण आहे. म्हणूनच कोणत्याही समाजास विरोधक मानून आपण कधी घाबरणार नाही. उलट नव्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या विस्ताराचाच विचार करू. हिंदू, बौद्ध, मुसलमान तसेच ख्रिश्चन भारताच्या भूमीत परस्परांशी युद्ध करून मारणार नाहीत. इथे त्यांना सामंजस्यच आढळून येईल. हे सामंजस्य अहिंदू नसेल तर विशेष रूपाने हिंदू असेल. त्याचे अंग प्रत्यंग भलेही देश-विदेशातील असेल परंतु त्याचा प्राण, आत्मा भारतीयच असेल.
भारताच्या विधात्याने सांगितलेल्या या आदेशाचे स्मरण करायला हवे तरच आपली लज्जा दूर होईल, लक्ष्य स्थिर होईल. भारतात असलेल्या अमर शक्तीशी आपला परिचय होईल. युरोपीय ज्ञान-विज्ञान आपल्याला दरवेळी विद्यार्थी म्हणून ग्रहण करायचे नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ज्ञान विज्ञानाच्या सर्व पंथांचा भारताची सरस्वती एकाच शतदल कमळामध्ये विकास करेल, त्याची खंडितावस्था दूर करेल. डॉ. जगदीशचंद्र बसू यांनी वस्तुत्व, वनस्पतीत्व तसेच जंतूत्व याला एकाच क्षेत्राच्या सीमेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित एका मनस्तत्वालाही ते याच रांगेत आणतील. हे ऐक्य साधनच भारतीय प्रतिभेचे मुख्य कार्य आहे. भारत कशाचाही त्याग करण्याचा वा कशास दूर करण्याच्या बाजूचा नाही. एक दिवस सगळ्याचा स्वीकार करून, सर्व ग्रहण करून, विवाद आणि व्यवधानांनी ग्रस्त पृथ्वीला एका विराट एकतेत आपली प्रतिष्ठा उपलब्ध करण्याचा एकतेचा मार्ग देईल.
तो विलक्षण क्षण येण्यापूर्वी आपण सर्वांनी त्याला ‘आई’ म्हणून हाक मारावी. सर्वांना आपल्यापासी बोलावण्यात, अनेकता नष्ट करण्यात, सर्वांचे रक्षण करण्यात भारतमाता सतत व्यस्त आहे. आपले चिरसंचित ज्ञान, धर्माच्या विविध रूपांतून, विविध निमित्ताने आपल्या अंतकरणात संचारित केले आहे. आपले मन पारतंत्र्याच्या काळोख्या रात्रीदेखील विनाशापासून वाचविले आहे. आपल्या मुलाबाळांनी भरलेल्या या यज्ञशाळेत, देशाच्या मध्यस्थानात मातेला प्राप्त करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवा.”(स्वदेशी समाज)
भारताचा आत्मा जागवून, भारताचे स्वत्व प्रकट करण्याची वेळ आता आली आहे. ही प्रक्रिया ईश्वराच्या योजनेने आणि आशीर्वादाने सुरु झाली आहे. भारताचा हा अंत नाकारणारी तत्त्वे कितीही विरोध करोत, भारतविरोधी विदेशी शक्ती कितीही प्रयत्न करोत, भारताच्या जनतेचा संकल्प आता प्रकट झाला आहे. भारताच्या राष्ट्रीयतेस जागृत करण्याचे जागतिक कार्य कित्येक दशकांपासून निरलसपणे, प्रसिद्धीपासून दूर राहून, पिढ्यानपिढ्या करणाऱ्यांचे वर्णन “विश्व मंगल साधना के हम हैं मौन पुजारी” असे करण्यात आले आहे. विश्वमंगल साधनेच्या पुजाऱ्यांची ही तपस्या आणि परिश्रम नक्की यशस्वी होतील.
भारताच्या स्वत्वास शक्ती आणि गौरवसह पुनर्स्थापित करण्याच्या या ऐतिहासिक समयी भारतातील सर्वांनी आपले राजकारण आणि स्वार्थ सूर सारून एकतेचा परिचय द्यावा आणि स्वाभिमानपूर्ण आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीच्या यात्रेत सहभागी व्हावे हीच अपेक्षा.
(लेखक रा.स्व.संघाचे मा. सहसरकार्यवाह आहेत)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या