श्रीराम जन्मभूमी मंदिर सामाजिक समरसतेचे अनुपम केंद्र होईल – मिलिंद परांडे

नवी दिल्ली, दि. ३० जुलै २०२० – डॉ. हेडगेवार यांची संघ गंगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमीतील समता गंगा यांचा जिथे उगम झाला त्या पवित्र स्थळी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जन्मभूमीसंबंधीची पत्रकार परिषद होत आहे, याबद्दल आनंद वाटतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी स्वतःच्या जीवनातून सामाजिक समरसता आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला. त्यांच्या मंदिराच्या पूजनात वापरले जाणारे पवित्र नद्यांचे पाणी, पावन तीर्थस्थळांची माती यातून संपूर्ण भारत एकरूप होईल व सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवेल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. श्रीराम जन्मभूमी मंदिर शिलान्यासाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले की, भगवान श्रीराम यांचा अहल्या उद्धार, शबरीशी असलेला स्नेह आणि निषादराज यांच्याशी असणारी मैत्री ही सामाजिक समरसतेची अनुपमेय उदाहरणे आहेत. १९८९ मध्ये पूजनीय संतांच्या उपस्थितीत अनुसूचित जातीच्या कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते शिलान्यास संपन्न झाला होता. चौपाल हे श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्तही आहेत. 

ते म्हणाले, देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान नागपूर, संत रविदास यांचे काशी येथील जन्मस्थान, सीतामढी येथील वाल्मिकी आश्रम, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातले कचारगड, झारखंड येथील रामरेखाधाम, मध्यप्रदेशातील तंट्या भिल्लाची पुण्यभूमी, श्री हरमंदिर साहिब अमृतसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू, दिल्ली येथील जैन लाल मंदिर त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी जिथे ७२ दिवस वास्तव्य केले ते वाल्मिकी मंदिर ही त्यातील काही पवित्र स्थळांची उदाहरणे आहेत. 

सर्व रामभक्तांनी ५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरी, मठ मंदिरांमध्ये, आश्रमांमध्ये सकाळी १०:३० वाजता सामुहिक स्वरूपात आपल्या आराध्य दैवताची पूजा करावी, फुले वाहावीत, आरती करावी आणि प्रसाद वाटावा. अयोध्येतील कार्यक्रम समाजाला लाइव दाखविण्याची व्यवस्था करावी. घरांमध्ये, वस्त्यांमध्ये, गावांमध्ये, बाजार, मठमंदिरे, गुरुद्वारा, आश्रमांमध्ये सजावट करून सायंकाळी दिवे लावावेत. मंदिर निर्मितीसाठी यथाशक्ती दान करण्याचा संकल्प करावा. प्रचाराच्या सर्व साधनांचा उपयोग करून हा कार्यक्रम समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा. या सर्व कार्यक्रमांच्या दरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व साधने वापरून काळजी घ्यावी आणि सरकारी तसेच प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विहिंप केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे.  

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या