सामाजिक समरसतेचे उत्तुंग आदर्श - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

- गुणवंत क्षीरसागर 

/ वारणेच्या खोऱ्यात सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील १ ऑगस्ट १९२० ला भाऊराव सिधोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी एक नररत्न जन्माला आले. संत तुकाराम महाराजांच्या नावावरून मुलाचे नाव दिले तुकाराम... आणि काय आश्चर्य, संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणेच हाही मोठा साहित्यिक झाला. हाच तुकाराम पुढे महाराष्ट्राचा ख्यातनाम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे झाला.

तुकारामला वडिलांनी शाळेत घातलं, पण त्याला शाळेत काही येईना. त्याचे मन रमेना. मास्तर वैतागलेल्या अवस्थेत म्हणाले तू माणूस आहे की जनावर ? तसा तुकाराम ही गुरुजींना म्हणाला तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही गुरुजी. मास्तर म्हणजे जमदग्नीचा अवतार. त्याने तुकारामाच्या उजव्या हाताच्या बोटावर रूळ चालवला, बोटं पार चेचली. बापानेही कधी मारलं नव्हतं, एवढं गुरुजीने मारलं. अन राग अनावर झाला होता म्हणून मास्तरांच्या छातीत दगड घालून तुकाराम शाळा सोडुन निघाला तो कायमचाच.

पुढं दुष्काळ पडला. खायचे वांधे झाले. सगळे पुण्याकडे निघाले. तिथं एक कंत्राटी काम मिळाले, पण थोडे दिवसच. पुढं त्या कंत्राटदारने कल्याणला आणून सोडले होते. कामाच्या शोधात फिरता फिरता तुकारामला वरळीत राहत असलेला चुलत भाऊ ज्ञानेश्वर भेटला आणि येथूनच जीवनाला कलाटणी मिळाली. तुकाराम-ज्ञानेश्वर भेट झाली.

ज्ञानदेवाला वाचनाची फार आवड होती. ज्ञानेश्वर वाचन करी. तुकाराम ऐकून पाठ करुन ठेवी. एका वर्षात त्याचे रामायण, हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ मुखोद्गत झाले.

पुढे १९४२ चे युद्ध सुरू झालं. गरीब श्रीमंत असे तट पडले. दुसऱ्या महायुद्धात रशिया जर्मनिविरुद्ध मोठ्या जिद्दीने लढला. तेव्हा अण्णांनी रशियावर पोवाडा रचला. त्याला चाल मात्र धाकट्या शंकरने लावली. 

लिहिण्याची सातारी तर्हा, प्रभावी वर्णन, कणखरपणा, कल्पनाभरारी, सोपी भाषा या सगळ्या गोष्टी काव्यात होत्या. मुंबईच्या लाखो कामगारात अण्णाभाऊ दलितांचे शाहीर झाले. स्वतःच्या ऐहिक सुखाकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. दरम्यान श्री गव्हाणकर, शाहीर अमर शेख, अण्णा त्रिकूट जमून कलापथक उदयास आले. भाऊंचे गीत चालू झाले. अमर शेख म्हणत होते- 
"एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, 
बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार".

राज्यकर्ते आणि मंत्री यावर टीका करणारे आण्णाभाऊंचे 'लोकमंत्री' हे लोकनाट्य गाजले. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी यांनी यावर बंदी घातली. कलापथकाच्या कामाबरोबरच लेखनकार्य सुरू झाले. अक्षरशत्रू असलेला हा मुलगा, पण अनुभवाने सिद्ध होऊन 'फकीरा' जन्माला घालायला तयार झाला होता. समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे "वाढता वाढता वाढे भेदीले शून्य मंडळा" असेच या लेखनाबद्दल म्हणता येईल.

उपेक्षित आणि वंचित असलेले रामोशी, बेरड, मांग, चांभार, ढोर, भिल्ल अशा समाजाकडे अण्णांचे लक्ष गेले. त्यावर साहित्य तयार होऊ लागले होते.
याच काळात रशियातील लेनिन वर अण्णांनी पोवाडा रचून दोन लाखांचा निधी साम्यवादी पक्षाला मिळवून दिला होता. चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत अनुवादित झाली व ती प्रचंड गाजली. सोबतच सुलतान, गुलाम, बरबाद्या  कंजारी या पोलीश भाषेत अवतरल्या होत्या. 

१९४८ मध्ये जागतिक परिषदेत जाण्यासाठी तत्कालीन प्रसिध्द सिने अभिनेते बलराज साहनी यांनी अण्णांचे पैसे भरले. पण केवळ पारपत्र न मिळाल्याने जाता आले नाही. लवकरच १२ सप्टेंबर १९६२ ला अण्णा परदेशी निघाले ते रशियन सरकारचे पाहुणे म्हणून. एखाद्या मंत्र्यांपेक्षाही त्यांचे जोरदार स्वागत मॉस्कोत झाले. साम्यवादी रशिया त्यांना दाखवला गेला. मॉस्कोतील भाषण ऐतिहासिक ठरले. "माझा 'भारत' देश असून त्यात 'महाराष्ट्र' एक प्रांत आहे चार कोटी भाषिकांचा. तेथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या - औरंगजेब - मोगलांच्या तावडीतून गुलामगिरीतुन मराठी भाषिकांना मुक्त केले". पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकर्यांच्या तळहातावर तरली आहे' हे प्रसिद्ध वचन याच ठिकाणचे.

पुढे ताशकंद विद्यापीठात भाषण गाजले.
अण्णा परतले. दरम्यान 'फकिरा'ला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. त्या फकिरवर १९१० मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा देणारा तरुण त्यांनी चित्रपटात साकारला. चित्रपटात सबकुछ म्हणजे पटकथा, संवाद, लोकगीत, थोडे दिग्दर्शन सर्व अण्णांचं होतं. पण प्रसिद्धीचा मोह नसणाऱ्या अण्णांना विचारले, चित्रपटात तुमचं नाव कुठे कुठे द्यायचं? त्यावर अण्णा म्हणाले, कसंही करा.. माझी तक्रार नाही. ही निस्पृहता, निरलोभीपणा सध्याच्या काळात अवघडच.

सातारी तरुणीची कहाणी 'मंगला', अर्थात वारणेच्या खोऱ्यात फकिरा - सर्वोत्कृष्ट कादंबरी. परंतु उपेक्षितांच्या अंतरंगातील लढाऊपणा, क्रांतिकारकता, बंडखोरपणा, प्रसंगी जीव देण्याचा जोश, पिळदार अहंकारी मने, हटवाद, ध्येयवाद यांचे जीवनस्पर्शी चित्रण, देशभक्त क्रांतिकारी शिक्षकाची कथा, 'मास्तर', 'वारणेचा वाघ-सत्तू भोसले, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा
'अग्निदिव्य ही वीर सेनानी प्रतापराव गुजर यांची शौर्यकथा अश्या अनेक कादंबऱ्या अण्णांनी लिहिल्या व गाजल्या. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश प्रत्यक्षात आणावा, समाजाचं परिवर्तन व्हावं, महार, मांग, ढोर, चांभार, साळी, माळी, तांबोळी, अठरापगड जातींचे गुलामीचे जोखड तुटावे व दलित बंधमुक्त व्हावा म्हणून अण्णाची तळमळ होती.

अण्णाभाऊंच्या लेखणीत प्रचंड शक्ती होती. साम्यवादी विचारसरणीत अण्णा वावरले. तरीही कॉम्रेड क्षेत्र झुगारून स्वतंत्र अस्तित्वाची साहित्यकृती निर्माण करुन दलितांची स्वतंत्र संघटना करण्याचा त्यांनी निश्चय केला.

चीन ने भारतावर आक्रमण केलं आणि दुसऱ्या क्षणी अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट पक्षाचे राजीनामा दिला. या देशात जातीयता नष्ट करण्यासाठी साम्यवाद कमी पडतोय, याची जाणीव त्यांना झाली होती. कम्युनिस्टांची साथ सोडुन महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी कर्वे यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संगीलेला मानवमुक्तिचा विचार समोर ठेवला.

१८ जुलै १९६९ चा तो काळा दिवस, सर्वांसाठी. मानव मुक्तीच्या लढ्यासाठी एक आघात ठरला. पुढील पिढ्यासाठी अखंड स्फूर्तीचा वारसा देत, प्रेरणेची ठेव ठेवत हा वीर काळाच्या पडद्याआड गेला. असे हे मृत्युंजयी वीर कोण्या एका जातीचे नसतात. ते साऱ्या मानव जातीचे असतात. मानवमुक्ति, शोषणमुक्ती जातीयतामुक्ती, दुष्ट रूढी मुक्ती, स्वातंत्र्य हे त्यांचे महामंत्र असतात.

१९६९ पासून अण्णा जे जीवन जगत होते ते त्यांना मृत्यू समान वाटत होते. म्हणून त्यांनी आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली होती 'मृत्यूकडून जीवनाकडे'... नियतीच्या मनात हे होणे नव्हते शेवटी म्रुत्युने डाव साधलाच
आणि... अर्ध्यावरती डाव मोडला..

सामाजिक समरसतेचे आदर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त शत शत नमन..
---------------
(लेखक सामाजिक समरसता मंचाचे, जिल्हा संयोजक आहेत) 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या