... तेव्हा 'शैव' आणि 'वैष्णव' एकच असल्याचा अनुभव संत नरहरी महाराजांना आला.

- गजानन जगदाळे

आज श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच वारकरी संप्रदायातील थोर संत नरहरी सोनार यांची जयंती. शिव आणि विष्णू म्हणजे हरिहर हे वेगळे नसून एकच आहेत याचा साक्षात्कार झालेले संत म्हणजे नरहरी सोनार. त्यांचे मूळ गाव पंढरपूर हे आहे. तेथे त्यांचा वडीलोपार्जित सोनारकीचा व्यवसाय होता. संत नरहरी यांचे मूळ आडनाव महामुनी असे होते. गंगा ही त्यांची पत्नी आणि नारायण व मालू ही दोन त्यांची मुले.

संत नरहरी हे मोठे शिवभक्त होते. त्यांच्या शिवभक्तीची चर्चा अख्ख्या पंढरपूरात होत असे. शंकरावरील आत्यंतिक भक्तीमुळे इतर देवांवर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. मात्र विठ्ठलाच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

एकदा एका विठ्ठलभक्ताने विठ्ठलमुर्तीला सोन्याचा अलंकार घालण्याचे ठरवले आणि त्यानुसार विठ्ठलमुर्तीचे माप घेऊन तो नरहरींकडे गेला. नरहरींनी त्यानुसार सोन्याचा दागिना बनवून दिला पण जेव्हा तो दागिना पांडूरंगाच्या मुर्तीला घालण्यात आला तेव्हा तो मोठा झाला. म्हणून त्या भक्ताने पुन्हा माप घेऊन दागिना नवीन घडवायला सांगितला. ह्यावेळेस तो दागिना कमी पडला. असे खूप वेळेस घडले. शेवटी स्वतः नरहरी विठ्ठलमुर्तीचे माप घेण्यासाठी विठ्ठलमंदिरात गेले. 

शंकराशिवाय इतर कोणताही देव त्यांना आवडत नसल्याने त्यांनी विठ्ठलाला न पाहण्याचे ठरवले आणि डोळ्यावर पट्टी बांधून ते माप घेऊ लागले. माप घेताना त्यांना विठ्ठलाची मुर्ती हाताला न लागता शंकराच्या मुर्तीचा स्पर्श होऊ लागला. त्यांनी झर्रकन पट्टी काढून पाहिले तर समोर विठ्ठलच होता. त्यांनी पुन्हा पट्टी बांधली तर त्यांच्या हाताला व्याघ्रचर्म, वासुकी नाग अशा गोष्टी लागू लागल्या. यावेळेस त्यांना साक्षात्कार झाला की, पांडूरंग आणि महादेव वेगवेगळे नाहीत. ते एकच असून दोन भिन्न रुपात नटलेले आहेत. यानंतर नरहरी पांडूरंगाचे भक्त बनले आणि त्यांनी पांडूरंगावर भक्तीपर अनेक अभंग रचले.

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।। हा त्यांचा अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे. संत सावता माळी, संत तुकाराम यांच्याप्रमाणेच संत नरहरी यांच्या अभंगातही त्यांच्या व्यवसायातील शब्दांची रुपके वापरलेली आढळतात.

संत नररही हे हरिहराचा साक्षात्कार झालेले एक थोर संत होते. त्यांचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता.

नव्हे ते सगूण नव्हे ते निर्गूण ।
जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ।।
आहे ते अंबर निःशब्द निराळ ।
अद्वय केवळ जैसे तैसे ।।
म्हणे नरहरि सोनार तै ना क्षर ना अक्षर ।
परेहुनी परात्पर ब्रह्म जैसे ।।

ह्या अभंगातून त्यांच्या अध्यात्मिक अनुभूतीचे स्पष्ट दर्शन होते. संत नरहरींचे आडनाव महामुनी असले तरी पुढे सोनारकीच्या व्यवसायामुळे ते सोनार ह्या आडनावानेच प्रसिद्ध झाले. पंढरपूरात त्यांची समाधी विठ्ठल मंदिरासमोर आहे. माघ वद्य तृतीयेला त्यांनी विठ्ठलासमोर समाधी घेतली.

विठ्ठलासोबतच त्यांनी शंकरावरही अभंगरचना केली आहे. भस्म उटी रूंडमाळा । हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ।।हा त्यांचा शंकरावरील अभंग अत्यंत लोकप्रिय आहे.

अशा ह्या थोर संतास आज जयंतीनिमित्त शतकोटी दंडवत

देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा वेव्हार ।।
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।।
त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस ।।
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ।।
विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केले चूर्ण ।।
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी ।।
ज्ञान ताजवा घेऊनी हाती । दोन्ही अक्षरे जोखिती ।।
खांद्या वाहोनि पोतडी । उतरला पैलथडी ।।
नरहरी सोनार हरिचा दास । भजन करी रात्रंदिवस ।।

।राम कृष्ण हरि।

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या