देवगिरी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये कुठेही कल्पना निरंजन लिखाण केले नाही तर त्यांचे लिखाण म्हणजे वास्तवाला धरून आहे. त्यांनी जे अनुभवले ते लिहिले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील पात्र, कलाकार आपल्याला जगायला शिकवतात. त्यांनी संघर्ष केला आहे. त्यामुळे ज्याने अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं तो अविचार करूच शकत नाही असे प्रतिपादन समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. ईश्वर तुकारामजी नंदपुरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त देवगिरी विश्व संवाद केंद्र आयोजित वेबसंवाद दरम्यान केले.
डॉ. नंदपुरे म्हणाले, अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ग्रामीण समाज ज्याप्रमाणे दिसून येतो, त्याचप्रमाणे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा शोषित वंचित समाजही दिसून येतो. 32 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिणारे, शाहिरी, पोवाडे रचणारे अण्णाभाऊ केवळ दिड दिवसाची शाळा शिकले होते. रस्त्यावरच्या पाट्या वाचून ज्या माणसाला अक्षर ओळख झाली तो माणूस इतकी भव्य साहित्यनिर्मिती करतो हे त्यांना प्रतिभा लाभली म्हणून शक्य झालं. अण्णा भाऊ आपल्या फकीरा कादंबरीतून सांगतात की येथील शोषित समाज आपल्या भुकेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, परंतु तो माणसाचा जीव घेऊ शकत नाही. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य बदल्याच्या भूमिकेतून, प्रतिशोधाच्या भावनेतून येत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा साहित्य प्रतिकार करण्यासाठी आहे. ज्यांनी शोषण केलं आहे, त्यांना धडा शिकवण्यासाठी व समाज प्रबोधन होण्यासाठी त्यांचे साहित्य आहे.
डॉ. नंदपुरे पुढे म्हणाले, हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. परंतु, त्यांच्या जन्माला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचे कार्याचे महत्त्व संपतं, असं नाही. अण्णाभाऊ चिरंजीव आहेत. अण्णाभाऊ क्रांतीचे प्रतीक आहेत. ते क्रांतिकारक आहेत. त्यांनी जे प्रश्न मांडले ते सनातन आहेत. ते अजुनही मिटलेले नाहीत. हे वर्ष आपल्याला मोठे दुर्दैवाचा जात आहे अण्णाभाऊंच्या साहित्य समोर येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठी तयारी केली होती परंतु ती कोरोना संकटामुळे होऊ पूर्ण होऊ शकली नाही. तथापि, असे कित्येक कोरोना येतील आणि जातील परंतु अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य चिरंजीव राहील. अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे 'मानवतावादाचे प्रवक्ते' असे आपल्याला सांगता येईल.
स्वतंत्र महाराष्ट्राच्या आंदोलनांमध्ये अण्णाभाऊंनी सक्रिय सहभाग घेतला होता. कामगारांच्या हक्कासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून अण्णाभाऊ लढले होते. अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते. ज्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडले. लोकांच्या वेदनांना वाचा फोडली. मनोरंजन करता करता प्रबोधन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होतं. प्रत्येक घरात स्त्री ही गुलाम आहे तिच्यावर अन्याय होत आहे आता तिने उठले पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असे अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून मांडणी करतात. बंधुभाव जोपासण्याची क्षमता अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आहे असेही डॉ. नंदपुरे म्हणाले.
कामगारांच्या चळवळीत काम करत असताना अण्णाभाऊना लोकांनी कम्युनिस्ट म्हटलं. परंतु, जेव्हा नानाभाऊ पाटलांसोबत अण्णाभाऊ राष्ट्रीय कार्यामध्ये उतरले तेव्हा कम्युनिस्टांना शंका येऊ लागली की अण्णाभाऊ नेमके कोणाचे? तरीही त्यांना कोणी 'कॉम्रेड' म्हणतात. त्यांच्याविषयी वेगवेगळे विषय छापून येऊ लागले, परंतु वास्तविक पाहता कोणताही थोर पुरुष मृत्यूनंतर महान होतो व त्यांच्या जातीचा समाज उठतो व म्हणतो की हे आमचे आहेत. परंतु अण्णाभाऊ केवळ मातंग समाजाचे नाहीत ते संपूर्ण समाजाचे आहेत. कारण त्यांनी सर्व समाजाचे प्रश्न आपल्या साहित्यात मांडले आहे. लेखक कलावंत कलाकार यांना जाती-धर्माच्या चौकटी नसतात.
आपल्या व्याख्यानाचा शेवट करताना डॉ. नंदपुरे म्हणाले, आपण पाहतो केवळ काही लोकांनी कोरोना पॉझिटिव्ह निघाले म्हणून आत्महत्या केल्या आहेत. परंतु, अण्णाभाऊंच्या साहित्यातील व्यक्तिचित्रे आत्महत्या करत नाहीत. ते जगणं शिकवतात. मृत्यूच्या नजरेत नजर मिळवून मृत्यूला सामोरे जाण्याची ते शक्ती देतात. अण्णाभाऊंचे साहित्य वाचणारा कुठलाही व्यक्ती असे अविचार आपल्या डोक्यात येऊ देणार नाही. अण्णाभाऊंना खरोखर श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर माणसं मरणार नाहीत, तर ती कशा पद्धतीने जगतील असा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या