असिमीत राखी पोर्णिमा

@रोहिणी महाजन, पुणे

बहिणीनं भावाला राखी बांधून त्याच्या सुखी, समृध्द, आनंदी नि उत्तम आरोग्याची मनोकामना करायची तसंच भावानंही बहिणीचं रक्षण करायचं आणि यातूनच दोघांनी दोघांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, आपुलकी वाढवायची ही भावना , सर्वसाधारणपणे  या सणामागची आहे. आज भावाला अगदी प्रत्यक्ष असं बहिणीचं रक्षण  करावं लागतंच असं नाही. पण संकटात तिला आधार देणं नि तिला सर्व प्रकारे  मदत करणं, या गोष्टी सर्वधारणपणे भावाकडून गृहीत धरल्या जातात.

परंतु हा पवित्र सण केवळ बहीण भावासाठी सीमित नाही. मोठ्या उदात्त हेतूने हा सण आपल्या भारतीय परंपरेत आला आहे. राखी पौर्णिमा साजरी करायला  बहिण-भाऊ एकाच गावात असले तर ठीक. पण आजकाल ते वेगवेगळ्या गावी तर कधी दोघंही परदेशी तेही वेगवेगळ्या ठिकाणी असतात. अशावेळी बहिण इतर मार्गाने आवर्जून राखी पाठवते. पण तिला जर कधी ताबडतोब मदतीची गरज लागली तरी मनात असूनही, अंतराच्या कारणानं भाऊ जाऊ शकत नाही. अशावेळी या बहिणीचे जवळचे मित्र/मैत्रीणी तिच्या मागे खंबीरपणे उभे रहातात नि तिला आधार देतात. त्यामुळे मग अशावेळी  या मित्र/मैत्रिणींना राखी बांधली जाते. कारण तिथे विश्वास व जिव्हाळा निर्माण झालेला असतो.   

कधी कधी बहिण-भाऊ हे आजारी, व्याधीग्रस्त असतात. एका  शहरात  राहूनही, घरं लांब असल्यानं एकमेकांकडे जाणं येणं ही शक्य  होत नाही. अशावेळी मग फोनवरूनच राखी पोर्णिमा साजरी करावी लागते. काही वेळा मात्र भाऊ आजारी असतो, पण बहिण वयस्कर असली तरी सक्षम असते. ती भावाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता उलट, ती त्याचाच आधार बनते नि त्याला सर्वतोपरी  मदत करते. अशावेळी मग, भावानंच या आधार देणाऱ्या बहिणीला  राखी बांधली तर काय हरकत आहे? 

काही वेळा हे वृध्द  लोक  घरात एकटे रहात असतात. त्यांच्याकडे घरकाम करण्यास, त्यांची सेवा-शुश्रूषा  करण्यास सेवक /सेविका असतात. याशिवाय बिल्डींग मधले वाॅचमन, शेजारी  हेही  अडीअडचणीला मदत करीत असतात. मग अशावेळी या ज्येष्ठ मंडळींनी या सर्वांना राखी बांधावी. आपल्या रक्षणासाठी कर्तव्यपूर्ती करणाऱ्याविषयी इथे कृतज्ञता व्यक्त होत असते.

सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या जवानांना जशा राख्या पाठवत असतो तशाच राख्या या काही महिन्यांत करोनाशी लढणाऱ्या  डॉक्टर्स, नर्सेस, सेवकवर्ग, पोलीसदल या योध्यांना आपण  बांधत आलो आहोत. एकंदरीत पहाता, मला वाटतं की, या बदललेल्या  काळात, राखी पोर्णिमेचा सण हा केवळ 'बहिण-भाऊ' या नात्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर जी व्यक्ती आपल्याला अडीअडचणीत मदत करते, आधार देते, जिच्याशी आपण आपलं मन मोकळं करतो अशा व्यक्तीलाही राखी बांधावी.

समाजातील सर्व भेदाभेद विसरून समरस होऊन राखीपौर्णिमा साजरी झाली पाहिजे. कारण, आपल्याशी त्या व्यक्तीचं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं, आपण कुठेना कुठे एकमेकांची काळजी करत असतो. कोरोना संकटात तर ते प्रकर्षानं जाणवलं. संसर्ग झालेल्या व्यक्तीविषयी आपल्या मनात त्याच्याशी कसलीही ओळख नसताना दुःखाची भावना निर्माण झाली ती केवळ बंधुत्वाच्या नात्यामुळे. आपण सर्व भारतीय बंधुत्वाच्या नात्यात गुंफलो गेलो आहोत. ते नातं सदैव तसंच रहावं म्हणून या राखीच्या  रेशमी धाग्यानं ते घट्ट बांधलं जाईल.  रक्षाबंधन असा असीमित सण आहे. ज्याला कसलं बंधन नाही. हा सण केवळ मनामनाला बंधुत्वाच्या धाग्यात जोडणारा सण आहे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या