#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या
३० ऑक्टोबर १९९०,
हाच तो ठरलेला दिवस, पहिल्या कारसेवेचा...
@मिलिंद वेर्लेकर, पुणे
या सगळ्याची सुरुवात होते साधारणपणे १९८४ साली, जेव्हा मी दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात नववीत होतो आणि मला आठवतंय तेव्हा विश्व हिंदू परिषदेने संपूर्ण भारतभर गंगापूजन एकात्मता यात्रा काढली होती आणि ‘हिंदू सारा एक’चा धुरळा देशभरातील साधारण एक लाख गावांपर्यंत उडवून दिला होता. शब्दशः भारताच्या कोपऱ्याकोपऱ्यात फिरलेल्या या गंगा कलश पूजन रथयात्रांनी भारतभर चैतन्यदायी हिंदूभावनांचा उद्घोष जागवला होता.
याचा पुढील भाग होता १९८९ साली जेव्हा विश्व हिंदू परिषदेने शिलापूजन कार्यक्रम आखला. “श्रीराम’ लिहिलेल्या आणि अयोध्येत तयार झालेल्या हज्जारो विटा संपूर्ण भारतात अक्षरशः गावागावात निरनिराळ्या रथात घालून फिरवण्यात आल्या.
गावोगावच्या रामभक्तांनी म्हणजेच जागोजागच्या भावूक हिंदूंनी अक्षरशः रस्त्यारस्त्यात या रथाची आणि या रथातल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या या विटांची म्हणजेच शिलांची भक्तिभावाने पूजा केली.
“मी पूजन करताना प्रत्यक्ष माझा स्पर्श झालेली विट अयोध्येत माझ्या श्रीरामचंद्राच्या मंदिराच्या उभारणीत थेट त्या मंदिरात वापरली जाणार आहे“ या अदभूत रोमांचक भावनेने प्रेरित झालेला तमाम हिंदूबंधू या आंदोलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक होऊन रस्त्यावर उतरला आणि ‘जय श्रीराम’ या घोषणेने भारतातले रस्तेरस्ते पहिल्यांदाच मोकळेपणे उच्चरवात न्हाऊन निघाले.
१९९० साली नुकतच कॉमर्सचं शिक्षण संपवून मी दादरच्या रुपारेल कॅम्पसमध्ये लॉ’चं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचं कॉलेज कॅम्पसमध्ये काम करायचो , पण वडील स्वतः संघचालक असल्याने आणि वक्ता म्हणून मी संघाच्या सुद्धा अनेक उत्सवांना जात असल्याने घरच्या कार्यक्षेत्रात चेंबूरला मात्र संघाच्या काही बौद्धिक विभागांची वक्ता म्हणून जबाबदारी माझ्यावर होतीच.
त्यातच साधारणपणे कुठल्याही कार्यक्रमाची परिपूर्ण अशी पद्धतशीर आखणी करायची या संघपरिवाराच्या काटेकोर शिस्तीतल्या शिरस्त्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या रामजन्मभूमी आंदोलनासाठी कारसेवक नोंदणी अभियान जून महिन्यात सुरु करण्यात आलं आणि या अभियानाच्या कारसेवक नोंदणीसाठी चेंबूर भागात जागोजागी भाषणे देण्यासाठी आणि रामजन्मभूमीचा इतिहास आणि हे सगळं आंदोलन, ऑक्टोबरमध्ये होणारी कारसेवा आणि त्यासाठी करावयाची नोंदणी हा विषय मांडायला आम्हां ठराविक संघ स्वयंसेवकांना संघ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
जागोजागी वस्तीवस्तीमध्ये या विषयातली भाषणे करायला जाताना रामजन्मभूमी या पूर्ण विषयाचा सखोल अभ्यास होऊन आता हा विषय चांगलाच तयार झाला होता आणि त्यामुळे “रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे” ही घोषणा जणू अंतरात्म्याचा भाग झाली होती.
कारसेवक नोंदणी करत दरमजल करत करत एकदाचा २५ ऑक्टोबर उजाडला आणि मुंबईवरून आमचा पन्नासएक जणांचा चेंबूर भागाचा कारसेवकांचा गट रेल्वेने अलाहाबादला जायला निघाला जिथून पुढे अयोध्येत कारसेवेसाठी पोचायचा आमचा प्रयत्न होता.
देशभरात अश्या प्रकारे कुठेही अगदी विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनासाठी वा आंदोलनासाठी वा संघाच्या बैठकांसाठी वा कार्यक्रमांसाठी जरी संघ परिवारातल्या कार्यकर्त्यांना प्रवास करायचा असला तरी सर्व आवश्यक ती तिकिटे स्वखर्चाने काढूनच हा प्रवास करण्याची संघ परिवाराची कडक शिस्त असल्याने आमची मुंबई ते अयोध्या या प्रवासाची पूर्ण तिकिटे काढून झाली होती. अश्या रीतीने श्रीरामाच्या जयघोषात आम्ही पहिल्या कारसेवेसाठी अयोध्येसाठी निघालो.
तेव्हा खरतरं ही फक्त कारसेवा म्हणून निश्चित होती,
ही ९० सालची कारसेवा पहिली कारसेवा तेव्हा म्हटली जाऊ लागली जेव्हा अत्याचारी मुलायम सरकारने कारसेवा करू इच्छिणाऱ्या निशस्त्र रामभक्तांवर गोळीबार करून त्यांना नृशंसपणे ठार मारून ही कारसेवा अर्धवट रोखली आणि म्हणून परत १९९२ साली दुसरी आणि निर्णायक कारसेवा करायला लागली.
आमचा प्रवास सुरु झाला , संपूर्ण डबा रामभक्तांच्या घोषणांनी दुमदुमून निघू लागला. जसजशी रेल्वे महाराष्ट्र ओलांडून मध्य प्रदेशातून उत्तरेच्या दिशेने जाऊ लागली तसतशी स्टेशनांवर रामभक्त कारसेवकांचे जत्थे रेल्वेत येऊन मिळू लागले. पुढे पुढे जाणारी रेल्वे हळू हळू पूर्ण भगवी व्हायला लागली. भारत माता कि जय आणि जय श्रीरामच्या घोषणांनी येणारी स्टेशने अखंड अहोरात्र दुमदुमून निघू लागली.
साहजिकच या कारसेवकांनी भरून अयोध्येकडे निघालेल्या रेल्वेची माहिती जागोजागच्या पोलिसांनी केंद्रसरकारकडे पोहोचवली असणार. आम्हांला सुद्धा आता हळूहळू अयोध्येत कारसेवक जमू लागल्याच्या बातम्या रेडीओ टीव्हीवर कळू लागल्या होत्या.
या सगळ्यांनी व्यथित झालेल्या आणि ‘अगर मै ना चाहु तो परिंदाभी अयोध्यामे पर नही मार सकता.” अशी दर्पोक्ती करणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या तेव्हाच्या हिंदू विरोधी मुलायम सरकारने देशभरातून अयोध्येत पोचू पाहणाऱ्या कारसेवकांना अटकाव करायला उत्तर प्रदेशाच्या सीमेवर महाभयंकर पोलीस बंदोबस्त ठेऊन रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक बंद करायला सुरुवात केली होती.
कारसेवकांनी अयोध्येत तर सोडाच उत्तर प्रदेशातच पोहोचू नये म्हणून उत्तर प्रदेशात सुद्द्धा दडपशाही करत पोलिसांनी कारसेवकांना अटक करायला सुरुवात केल्याची बातमी आम्हांला मध्य प्रदेशातल्या सतना जवळ रेल्वेत समजली आणि म्हणून ताबडतोब आम्ही सर्वजणांनी तिथं उतरावं आणि तिथून पुढे उत्तर प्रदेशातल्या चित्रकुटला पोचून तिथून अयोध्येत पोचण्याची रचना आमच्यासोबतच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केली.
त्यानुसार आम्ही चित्रकूटला पोचल्यावर तिथे त्याकाळच्या विश्व हिंदू परिषदेच्या उपाध्यक्षा राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्या सोबत आता आम्ही या आंदोलन करत अयोध्येत जावयाचे निश्चित झाले.
परंतु तोवर हा आमचा प्लान उत्तर प्रदेश पोलिसांच्या लक्षात आला होता म्हणून आम्हाला तिथे अटक न करता आता तिथून पुढे आम्हा सर्व शेकडो कारसेवक मंडळींना बसमधून उत्तर प्रदेशातल्याच बांदा नावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आलं आणि आता इथून पुढे तुम्हाला आता जाता येणार नाही असं म्हणून राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्या सोबत आम्हाला तिथं एका महाविद्यालयात बंदी करून ठेवण्यात आलं.
हा दिवस होता २७ ऑक्टोबर म्हणजेच कारसेवा आता तीन दिवसांवर आली होती.
दोन दिवस त्या स्थानबद्धतेत राहिल्यावर आता उजाडला ३० ऑक्टोबर , प्रत्यक्ष कारसेवेचा दिवस.
सकाळीच उठून मंगल स्नान करून आम्ही हजारो कारसेवकांनी त्या जेलमध्येच रामनामाचा गजर करायला सुरुवात केली होती. जय श्रीरामच्या अखंड घोषणांनी कारागृह दुमदुमून जात होतं. तो त्या घोषणांचा तसाच तो प्रचंड दुमदुमणारा आवाज आत्ताही माझ्या कानात ताजा आहे.
इकडे त्यावेळी मुलायम सिंगने अयोध्या जवळपास पोलिसांची छावणीचं करून टाकली होती. अयोध्येत कारसेवक कमी, हिंदू साधू संन्यासी कमी पण त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त हत्यारबंद पोलीस पावलापावलावर असा प्रकार दिसत असल्याचे कानावर आले होते.
जेलमध्ये आम्ही सगळेचं प्रचंड अस्वस्थ होतो. शेवटी दुपारी बाराच्या सुमारास बातम्या आल्या की अयोध्येत मोठी गडबड झाली. आम्हाला बाहेरचे काहीच कळत नव्हते. रेडिओवर काही नीट समजत नव्हतं. गोळीबार झालाय , अनेक लोक हुतात्मे झालेत इतकंच कळत होतं.
तो पूर्ण दिवस आम्ही तिथेच विलक्षण अस्वस्थतेत काढला. शेवटी रात्री उत्तर प्रदेश पोलिसांना सूचना आल्या आणि आता आम्हाला आपापल्या गावी परत जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रेल्वे सोडण्यात येतील असं आम्हाला सांगितलं गेलं.
आमच्यातल्या एका शंभरेक जणांच्या तरुण आणि रग असणाऱ्या कारसेवकांच्या मोठ्या गटाने अयोध्येत न जाता, रामललाचं दर्शन न घेता मुंबईत परत जायचंचं नाही असं ठामपणे ठरवलं.
सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या महाविद्यालयाच्या दरवाजावर असलेल्या पोलिसांच्या नजरा चुकवून एखाद्या देमार इंग्रजी चित्रपटात शोभेल अश्या पद्धतीने एकदोन करत आम्ही शंभरेक जण कारसेवक तिथून सुखरूपपणे निसटलो आणि रस्त्यावर असलेल्या पोलीस छावण्यांची नजर चुकवत लपतछपत बांदा स्टेशनवर पोचलो.
स्टेशनवर तर शहरापेक्षाही प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. तिथेही उत्तर प्रदेशातले स्थानिक नागरिक दिसू अशी वेशभूषा करत , गमछे तोंडावर झाकून, शक्यतो स्थानिक हिंदी भाषा बोलायचा प्रयत्न करत करत , पोलिसांना चुकवत आम्ही बरोब्बर उलट दिशेला म्हणजे अलाहाबादला जाणाऱ्या एका लोकल रेल्वेत चढून लपून बसलो. ही रेल्वे जनरल रेल्वे असल्यने काही जण बाकड्याखाली, काही जण संडासात , काही जण दोन बोगींच्या मध्ये कप्लीन्ग्जवर आणि काही जण तर चक्क धाडसाने टपावर असे लपून बसलो.
मी स्वतः हा पूर्ण प्रवास दोन डब्बे जोडणाऱ्या मधल्या कप्लीन्ग्जवर बसून केला. एखादे स्टेशन आले रे आले कि पोलिसांना कळू नये म्हणून चालत्या गाडीतून उडी मारून पलीकडल्या बाजूला रेल्वे रुळावर उतरायचं आणि गाडी तिथून सुटली रे सुटली कि परत पोलिसांना चुकवून आपल्या जागेवर बसायचं असं करत करत आम्ही मजल दरमजल करत अलाहाबादला पोचलो आणि स्टेशनवरून थेट एकदोन जण वैयक्तिकरित्या संघाच्या कार्यालयात पोचलो आणि रात्री तिथेच मुक्काम केला.
३० ऑक्टोबरला पोलिसी आणि लष्करी छावणीत परावर्तीत झालेल्या अयोध्येत झालेल्या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष काही कारसेवक मंदिरापर्यंत पोचले. प्रत्यक्ष घटनास्थळी प्रचंड संख्येने असलेल्या पोलिसी बळाला आणि इंडो तिब्बत पुलिस फोर्सच्या जवानांच्या दबावाला भिक न घालता पोचलेल्या हजारो कारसेवकांनी जीवाची बाजी लावून त्या वादग्रस्त इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला.
वादग्रस्त ढाच्याकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर अंतरावर पोलिसांनी प्रचंड मोठे अडथळे निर्माण करून ठेवले होते आणि कारसेवक त्या अडथळ्यांना पार करून वादग्रस्त ढाच्यात पोहोचूच शकणार नाहीत अशी स्थिती होती. परंतु याच वेळी सकाळी अकराच्या सुमारास तिथे जमलेल्या हिंदू साधूंना अटक करून घेऊन जाणाऱ्या एका पोलिसी बसचे बसमध्येच अटक करून ठेवलेल्या एका भगव्या वस्त्रधारी साधूने संधी साधून अपहरण केले आणि ती बस रस्त्यावरचे सर्व अडथळे बसने ठोकर मारत मारत वादग्रस्त ढाच्याच्या अगदी जवळ नेण्यात यश मिळवले. काय होतंय हे कळायच्या आतच समोरील रस्ता साफ झाल्याने अयोध्येत जमलेल्या हजारो कारसेवकांनी त्या साधूने बेफाम घुसवलेल्या बसच्या मागोमाग मोठ्या त्वेषाने झेप घेतली. यातले अनेक जण प्रत्यक्ष वादग्रस्त ढाच्यावर पोचले सुद्धा आणि ज्यावेळी कोलकात्याच्या निडर कोठारी बंधूंनी वर चढून भगवा झेंडा वादग्रस्त ढाच्यावर फडकवला. परंतु पोलिसांनी त्यावेळी कारसेवकांना मागे ढकललं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला कारसेवकांनी विश्रांती घेतली कारण मोठ्या प्रमाणावर कारसेवक जखमी झाले होते.
२ नोव्हेंबरला कारसेवकांनी परत मुसंडी मारायचा प्रयत्न केला. तेव्हा अयोध्येतल्या हुतात्मा गल्ली असे नंतर नाव ठेवल्या गेलेल्या गल्लीत पोलिसांनी घर घरात असलेल्या कारसेवकांना बाहेर काढून गोळ्यांनी अनेक कारसेवकांना रस्त्यावरच खेचून गोळ्या घालायला सुरुवात केली.
या सगळ्या प्रकारात काही पोलिसांनी एका घरात दोन्ही कोठारी बंधूंना पाहिलं ज्यांनी ३० ऑक्टोबरला वादग्रस्त ढाच्यावर भगवा झेंडा फडकवला होता. या दोघांनाही बाहेर खेचून थेट डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या आणि हे दोन्ही बंधू रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.
हे सगळ होत असताना जोरदार धाव घेतलेल्या कारसेवकांवर मुलायम सिंगच्या आदेशाने पोलिसांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केला. शरयू तीरावरल्या रामललाच्या अयोध्येच्या गल्यांमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अनेक हिंदूंनी रामासाठी हौतात्म्य पत्करले, बेछूट गोळीबार होत असल्याने आणि कारसेवकांना निवडून निवडून पोलीस गोळ्या घालून मारत असल्याने हजारो कारसेवक शरयू नदीवरच्या पुलावरून पलीकडे जायचा प्रयत्न करत राहिले आणि या वेळी उडालेल्या प्रचंड चेंगराचेंगरीत देखील अनेक कारसेवक पुलावरून शरयुत पडून मारले गेले, वाहून गेले.
अनेक कारसेवकांनी या वेळी इथं हौतात्म्य पत्करलं पण प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी ठरेलेली प्रतिकात्मक कारसेवा मात्र आपले प्राण देऊन घडवून आणली.
हा सगळा प्रकार अयोध्येत घडल्याने, संपूर्ण उत्तर प्रदेशात भारताच्या कानाकोपऱ्यातून जमा झालेल्या कारसेवकांना, आता यांनी तिथे अजून काही गडबड करू नये म्हणून, पोलिसांनी अटक करून त्यांना त्यांच्या त्यांच्या गावांकडे पाठवायला सुरुवात केली. अलाहाबादमध्ये सुद्धा आता कारसेवकांना आपापल्या गावी पाठवून देण्याचा धडाका उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरु केला होता.
या सगळ्या घडामोडींमध्ये आपण बाहेरगावचे परप्रांतीय लोक दिसणार नाही अश्या प्रकारची स्थानिक वेशभूषा करून, नेमकं अयोध्येत कसं पोहोचू शकतो याची लपतछपत माहिती घेऊन आम्ही छोट्या छोट्या गटांनी परंतु मागेपुढेच रहात, २ नोव्हेंबरला संघ कार्यालयाबाहेर पडलो आणि अलाहाबादवरून थेट गावागावातून, जंगलातून पायी चालत, पोलिसांना चुकवत, तिथून तब्बलं १७० किलोमीटरवर असलेल्या अयोध्येकडे रामललाच्या दर्शनाकरिता कूच केलं.
आता आम्हां शंभरेक जणांच्या अयोध्येत पोहोचण्यासाठीचा, आयुष्यातला पुढील चार दिवसांचा एक विलक्षण थरारक भाग सुरु झाला.
पुढील प्रवास पुढच्या भागात.. भाग 2 मध्ये
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या