“माझा अयोध्या अध्याय” - भाग २

#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या

दिनांक २ नोव्हेंबर १९९० – अलाहाबाद 

@मिलिंद वेर्लेकर


दुपारी चारच्या सुमारास संघ कार्यालयातून बाहेर पडलो. आता आम्ही गटांमध्ये नव्हतो तर एकदोन जण असे वेगवेगळे चालत होतो. अश्या पद्धतीने मागेपुढे होतो कि पुढच्याला मागचा आणि मागच्याला पुढचा कारसेवक कसाबसा दिसेल. 

मला आठवतंय त्या वेळी बहुधा सहावीत असलेल्या माझ्या मामेभावाचे पाठीला लावायचे शाळेचे खाकी दप्तर ज्याला बेल्ट्स असतात तसलं होत माझ्या पाठीला मी आणलेलं मुंबईहून, ज्यात रोजचे कपडे, रामाचं दर्शन घेताना घालण्यासाठी एकदोन सदरे , एक जास्तीची जीन्स आणि एक हाफ pant, पटकन वाळू शकतो असा राजापुरी पंचा, खोबरेल तेलाची आईने घरून दिलेली एक बाटली आणि कदाचित लागलीच तर जुजबी औषधे, एक जाडी सतरंजी आणि एक पांघरूण असलं सामान होतं. पाठीवरचं दप्तर असल्याने चालताना वा काहीही करताना हात मोकळे ठेवणं सोयीचं होतं आणि लांब पल्ला चालायला लागू शकतो हे लक्षात ठेऊनच मुंबईहून येताना मुद्दामून असंच दप्तर आणलं होतं. 

हळूहळू अलाहाबाद सोडून पुढं निघालो, वस्ती विरळ होऊ लागली तसं तसं आम्हां कारसेवकांमधलं अंतर आता साहजिक वाढवावं लागलं अन्यथा एक साधारणपणे कमी अधिक फरकाने सारखाच दिसणारा लोकांचा मोठा जत्था विरळ विरळ अंतरावरून चालत कुठेतरी एकंच दिशेने निघालाय हे ओळखणं पोलिसांनाच काय हुशार आणि अनुभवी स्थानिकांना सुद्धा अवघड नव्हतं. 

चालता चालता संध्याकाळी सातच्या सुमारास अलाहाबाद सोडून काही किलोमीटरवर जवळ असलेलं पहिले गाव लागलं जे बऱ्यापैकी मोठे होते. 

अयोध्येपर्यंत नेमकं कसं पोचायचं, मध्ये कुठकुठली गावे लागणार, मध्ये कुठे कुठे पोलीस चौक्या आहेत, कुठे अडथळे असणार आहेत, कुठे मोठी शहरे किंवा जिल्ह्यांची ठिकाणे आहेत जी चुकवून आडमार्गाने, रानावनातून पुढ सरकायच आहे, जंगलात मार्ग चुकला तर काय, कुणाला विचारायचं, अचानक पोलीस समोर आले तर काय करायचं, आमच्यातलं कुणी पकडलं गेलं तर काय करायचं, जो पकडला गेला आहे त्याच्याशी संबंध न दाखवता पुढे कसं सटकायचं, चालताना खाण्यापिण्याची व्यवस्था काय, झोपायचं कुठं आणि कधी, इतर लोक झोपले असताना बाकीच्यांनी पोलिसांना कळणार नाही असा पहारा कसा द्यायचा, सकाळच्या आन्हीकांची सोय काय, दिवसभर उन्हातान्हात चालून तहान लागेल तेव्हा स्थानिकांकडून मिळणारं पाणी प्यायचं का नाही, स्थानिकांशी कुणी बोलायचं, कुणी प्रश्न विचारलाच तर काय आणि कसं उत्तर द्यायचं....एक ना हजार प्रश्न डोक्यात होते ज्यांची उत्तरे आमच्या कुणाकडेच नव्हती...उत्तरं सोडा हे प्रश्न सुद्धा डोक्यात तेव्हा होते कि नाही माहित नाही...

शेकडो वर्ष ज्या रामचंद्राला अत्याचारी आक्रमकांनी त्याच्या जन्मभूमीपासूनच दूर ठेवलं गेलं त्या प्रभू श्रीरामचंद्राला त्याची जन्मभूमी पुन: मिळवून देणं आणि त्यासाठी अयोध्येत काहीही करून पकडलं न जाता पोहोचणे, ब्बास इतकंच काय ते आम्हांला सर्वांना माहित होतं. 

अलाहाबाद पासून अयोध्येपर्यंत अंतर होतं साधारणपणे १७० किलोमीटर पण आडमार्गाने पोलिसांना चुकवत चुकवत, शब्दशः दाट जंगलातून मार्ग शोधत शोधत जायचं, बरं मार्ग चुकला आहे का हे सुद्धा जिथं कळणार नव्हतं तिथं तर सगळीच पंचाईत होती आणि त्यामुळे अयोध्येपर्यंत अंतर साधारण २०० वा त्यापेक्षा खूप अधिक किलोमीटर होणार होतं. 

साधारणपणे जेव्हा जंगलातून बाहेर पडून मोठा रस्ता लागायचा आणि किलोमीटरचे दगड दिसायला सुरु व्हायचे तेव्हा त्यावरून आम्ही अंदाज बांधला कि साधारण तश्या सरळ रस्त्यांवर आमचा चालायचा स्पीड ताशी अंदाजे ६ किलोमीटर म्हणजे दहा मिनिटाला एक किलोमीटर इतका व्हायचा आणि जेव्हा अचानक पुढे पोलीस आहेत असं चालता चालता एखाद्या स्थानिकाने सांगितलं समजा तर तो रस्ता सोडून जेव्हा परत एकदा दाट जंगलात शिरायचो तेव्हा मात्र तो स्पीड कमी होऊन तासाला जास्तीत जास्त ४ एक किलोमिटरच व्हायचा. 

आम्हा सर्व कारसेवकांना कुणी एक नेमकं असं लीड करणारं सुद्धा नव्हतं खरतरं कारण एक तर आम्ही सर्व मुंबईकर, त्यात शेकडो किलोमीटरवरुन आल्यामुळे आणि स्थानिक गावांची मुळीच कसलीच माहितीच नसल्यामुळे आम्ही तसे सगळेच बऱ्यापैकी चाचपडत होतो. पुढं पुढं चालत राहायचं इतकंच काय ते आम्हाला माहिती होतं.

त्यामुळे जेव्हा अलाहाबाद सोडून पहिलं गाव लागलं तेव्हा नेमकं काय करायचंय हे नीट असं माहिती नव्हतं परंतु श्रीरामाचं नाव मनात घेऊन तसेच पुढे चालत राहिलो. ना आजूबाजूला कोणाशी बोललो ना कुणाकडे पाहिलं, एक गोष्ट मात्र नक्की होती आता आम्हाला एकमेकांच्या फार जवळून चालणं शक्य नव्हतं कारण आजूबाजूला चुकूनच दिसणाऱ्या गावकर्यांपैकी कोण आपलं आणि कोण शत्रू हेच माहित नव्हतं. 

बर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारसेवकांची धरपकड करून त्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठवायचा सपाटा लावला आहे आणि त्यांच्यापासून लांब राहून पोलिसांना चुकवत अनेक कारसेवक जंगलाच्या मार्गाने अयोध्येत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत हे आतापर्यंत सगळ्या जगाला माहित झालं होतं आणि त्यामुळे आमच्या पाठीवरच्या बॅगा पाहून आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कारसेवक आहोतच हे ओळखू येत असल्याने कुणी आम्हांला पाहून आम्ही असं अयोध्येच्या दिशेने चाललोय असं चुकून जरी पोलिसांना सांगितलं असतं तर आम्ही सगळेच पकडलो गेलो असतो आणि कारसेवेच्या त्या ऐतिहासिकदृष्ट्या विलक्षण महत्वाच्या असलेल्या पर्वावर रामललाच्या दर्शनाची आमच्या मनातली आस अर्धवट राहिली असती आणि केलेल्या इतक्या सगळ्या अपरिमित कष्टांवर अकारण पाणी फिरवलं गेलं असतं. 

आणि त्यामुळे आजूबाजूच्या चालणाऱ्या कारसेवकांच्या दोन तीन जोड्या सोडल्या तर फार पुढचं फार मागचं कुणीच दिसणार नाही म्हणजे साधारण आम्हां दोन चालणाऱ्या कारसेवकांमध्ये साधारण पंचवीसेक फुटांच अंतर सोडून आम्ही चालत होतो. 

आता त्या पहिल्या गावातल्या लोकांना पंधरा वीस लोक एकत्र चाललेत आणि कुठेतरी एकाच बाजूने चाललेत असं कळलं किंवा कळत असल्याचा आम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलं आणि त्यामुळे ते गाव सोडून शेवटचं घर गेल्यानंतर जेव्हा आम्ही पुढे आलो तेव्हा आमच्यातल्याच एका ट्रेक वगैरे करणाऱ्या त्यातल्या त्यात अनुभवी तरुणाने पुढे येऊन आमच्या जोड्या बदलल्या आणि आता कपड्यांचे वेगवेगळे रंग, वेगवेगळे कपडे, वेगवेगळ्या बॅगा आणि दोन जोड्यांमध्ये किमान पंचवीस फुटांचं अंतर इतक्या काळजी घेऊन आता आम्ही चालायला लागलो

मी स्वतः पुढून पाचव्या-सहाव्या जोडीवर होतो आणि त्यामुळे साधारण पुढे काय चाललंय याचा अंदाज येत होता. त्या पहिल्या गावात पोलीस चौकी दिसली नाही आणि त्यामुळे पोलिसांना चुकवायचा प्रश्न आला नाही पण जेव्हा गाव सोडून पुढे आलो तेव्हा मात्र त्या ट्रेकिंग करणाऱ्या तरुणाने हातातला होकायंत्र काढलं आणि पुढच्या गावची दिशा निश्चित केली. 

त्याचवेळी चालत चालत आम्हांला दूरवर जंगलात एक स्थानिक गावकरी डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन पुढे चाललेला दिसला. आमच्या ट्रेकर म्होरक्याने आपण बरोबर चाललो आहोत न हे निश्चित करायला हळूच त्याच्या कानात जाऊन विचारलं,” ये अयोध्या किस तरफ़ है बाबा?”

केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतातलं वातावरण ३० ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला अयोध्येत कारसेवकांवर झालेल्या अमानुष  गोळीबारामुळे ठार झालेल्या कारसेवकांच्या बातम्यांनी विदीर्ण झालं होतं,  जे काही झालं ते ऐकून प्रचंड तापलं होतं आणि त्यामुळे गावातला नेहमीचा नसलेला कुणीतरी एक तरुण ‘अयोध्या किस तरफ़ बाबा’ म्हणून विचारतोय तेव्हा त्या स्थानिक गावकऱ्याने साहजिकच डोक्यावरच्या मोळीसकट मान हळूच वळवली, आमच्या त्या म्होरक्याकडे थांबून नीट बघितलं आणि डोक्यावरचा एक हात खाली काढून,’एक चौराहा लगेगा आगे दुई फर्लान्ग्पे, वहा से दैने चलेजाव भाई,’ असा हात दाखवत त्याच्या त्या अस्खलित हिंदीत म्हणाला. 

अश्या स्थानिकांना आपल्याला ओळखायची संधी मिळूच नये म्हणून थांबायचं तर नव्हतंच आणि त्यामुळे एका क्षणात आमचा म्होरक्या आणि त्यापाठोपाठ आम्ही तिथून सर्रकन चालतच पुढे निघालो आणि आम्हाला ‘तो’ विलक्षण अनुभव आला.

उत्तर प्रदेशच्या, प्रभू श्रीरामचंद्रावर अतोनात प्रेम करणाऱ्या आणि रामललाचं काम करायला निघालेल्या कारसेवकांना लागेल ती सर्व मदत करणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा त्या गरीब स्थानिकाच्या एका कृतीवरून आम्ही अगदी आतून डोळे भरून येईल इतका अनुभवला.

तो आम्हाला कारसेवक म्हणून ओळखेल आणि कदाचित दगाफटका होण्याची शक्यता असल्याची भीती वाटून आम्ही तिथून पुढे निघालो खरं पण ज्या गरीब गावकऱ्याला मागे टाकून आम्ही झपाट्याने पुढं निघालो होतो त्याने मात्र आम्हांला मनोमन ओळखलं होतं.

डोक्यावरची मोळी तिथंच बाजूला भिरकावून देऊन “जय सियाराम’ अशी प्रचंड मोठी आरोळी त्या गावकर्याने आम्हांला बघून, हात डोक्यावर नमस्काराच्या स्थितीत नेत नेत फोडली आणि आमच्या पुढे चालणाऱ्या त्या तरुणाकडे तो जवळपास धावत धावतच जाऊन पोहोचला. आमच्या भुवया उंचावल्या.

“भाई ऐसे थोड़ी जाने देंगे आपकों, मेहेमान हों हमारे आपलोग , रामललाके मन्दिरके लिए दूरसे आये हों , सियारामके दर्शन करने जा रहे हो , हम ग़रीबकी चाय तो आपकों पीनी ही पडेगी भाई.” आमच्या त्या पुढे चालाणार्याचा हात धरून त्याने त्याला जागच्या जागी थांबवलंच आता. 

कोण आहे हा इसम याचा नेमका अंदाज आम्हाला कुणालाच लागतं नव्हता पण रामाचं नाव घेऊन आम्हीं पुढ जाऊन थांबलो. आता जवळच्याच त्याच्या वस्तीवर हा माणूस आम्हाला घेऊन गेला आणि झोपडीवजा असणाऱ्या त्याच्या घराच्या बाहेर बसवून त्याने आता  आजूबाजूच्या गावकर्यांना जमवून चहा टाकायला सांगितला. 

अलाहाबाद वरून चालत चालत इतक्या लांब आल्यावर पहिल्यांदाच जरा निवांत थांबलो होतो, खाली जमिनीवर बसलो होतो आणि त्यामुळे पुढे किती चालायचं आणि जेवण कुठे मिळणार आहे हे अजिबातच माहिती नसल्याने आणि त्या गावकऱ्याबद्दल नेमका अंदाज सुद्धा येत नसल्याने तिथे थांबायची रिस्क आमच्या म्होरक्याने घ्यायची ठरवली. 

जिथे जिथे होतो तिथेच जवळपास आम्ही सगळे आता जरा पाठ टेकवायला आसरा शोधत खाली जमिनीवर बसलो. आता स्वच्छ धुतलेल्या स्टीलच्या बादल्यांमधून आणि पाण्याच्या तांब्यामधून, दूरवर पसरून बसलेल्या आम्हां कारसेवकांच्या समोर पाणी आणलं गेलं. ते पाणी पिऊन थोडसं आम्ही जरा विसावतो आहोत तेवढ्यात काही काचेच्या, काही स्टिल फुल्पात्रांमध्ये, काही प्लास्टिकच्या ग्लासमध्ये आणि मिळेल त्या कशाकशात ओतून आम्हां सगळ्यांसमोर गावकरी चहा घेऊन यायला लागले, आपुलकीने आम्हाला द्यायला लागले, ना ओळख न पाळख अश्या त्याचं ते निरागस प्रेम पाहून गेले तीन तास चालत असलेला आमचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. गरमागरम चहा पोटात गेल्यावर तरतरी आलीच होती , फार थांबायचं नव्हतं त्यामुळे तरतरी आणणारा तो चहा घेतला आणि पुढचा म्होरक्या निघाल्यावर आम्ही सगळेजण पटापट आवरून त्याच्यापाठी निघायला म्हणून उठलो. 

शेवटी मात्र आमच्या डोळ्यात आलेलं पाणी एकमेकांना न दाखवायचा प्रयत्न करत प्रचंड भारावलेल्या अवस्थेत आम्ही पुढे निघालो कारण जेव्हा आम्हाला चहा पाजलेल्या त्या गरीब वस्तीवरच्या त्या अनोळखी गावकऱ्यांनी आम्हाला निघालेलं पाहिल्यावर त्यांच्या त्यांच्या घराबाहेर एकत्र येऊन हात उंचावून ‘जय सियाराम’ ‘जय जय सियाराम’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि ‘मंदिर बांधकर आईयेगा सहाब, खाना खिलाएंगे आप लोगनको,’ असं डोळ्याला गमछा लावत लावत म्हणत आम्हाला निरोप दिला. 

भारावलेल्या अवस्थेत चालत चालत आता अंधारलेल्या त्या रात्री तसच त्या वस्तीवरून लागलेल्या जंगलातून अंदाजाने पुढे निघालो. चहा तर घेतला होता पण रात्री आता जेवायची व्यवस्था कुठे असणार, कोण करणार, केलेली आपल्याला कसं सांगणार, सांगणारा माणूस विश्वासार्ह आहे का हे आपण कसं ठरवणार, जेवण कसं असणार, जेवायला काय मिळणार, ओळख नसणाऱ्या माणसांनी दिलेलं जेवण सुरक्षित असेल का नसेल परत एकदा हजारो प्रश्न मनात होते, काही काही म्हणजे काहीच कल्पना नव्हती.  

असंच पुढं चालत चालत वस्त्यावस्त्यांमधून, मागे पाडणाऱ्या लहान लहान गावागावांमधून चालत चालत पुढे निघालो, अंधारात रस्त्यांचा अंदाज बांधत बांधत रात्री नऊच्या सुमारास असंच एका दूरवर दिसणाऱ्या मिणमिणत्या रॉकेलच्या दिव्यांच्या  वस्तीजवळ पोचलो. 

त्या वस्तीच्या सुरुवातीलाच एक पांढरा सदरा घातलेला आणि हातात भगवा झेंडा घेतलेला माणूस आम्हाला बघून पटकन पुढे आला, ‘जय सियाराम’ म्हणला,  ‘खानेका प्रबन्ध इसी गावमे है आपका’ म्हणाला. 

या सगळ्या अयोध्या वारीतला अश्या प्रकारचा हा पहिलाच दिवस असल्याने पटकन विश्वास ठेवायचा का नाही नेमकं कळत नव्हतं पण संध्याकाळचा चहाचा अनुभव मात्र चांगला होता आम्हा सगळ्यांना आणि त्यामुळे रामाचं नाव घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवायचा ठरलं. 

आम्हांला काही बोलायची संधीही न देता तो गावकरी आम्हाला घेऊन अंधार्‍या रात्री आता त्या मिणमिणत्या दिव्यांच्या वस्तीवर गेला. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यामागे चालत चालत आम्ही तिथे पोचलो. 

बऱ्यापैकी मातीच्या भिंती असलेली आणि गाई गुरं असलेली ती वस्ती होती. घराघरातून लाकडाच्या चुलीवर अन्न शिजवल्याचा वास येत होता.  एका छोट्या मैदानावर कोळशाच्या चुलींवर मध्यम आकारांच्या पातेल्यांवर जेवण रटारटा शिजत होतं. आम्ही तिथे पोचल्यावर तिथल्या सगळ्या जेवण करणाऱ्या गावकर्यांनी ‘जय सियाराम’च्या घोषणा दिल्या आम्ही सुद्धा ‘जय जय सियाराम’ म्हणत उत्तर दिलं. 

आम्हाला एव्हाना कळलं होतं, कारसेवकांसाठी उत्तर प्रदेशातल्या रामभक्त हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने केलेली ती व्यवस्था होती. तेवढ्यात तो सुरुवातीचा माणूस म्हणाला, ‘आपको यहाँसे अब आगे अभी चलना नही है, आपको यही पर रातके लिए रुकना है, आगे घना जंगल है और वहा रातको चलना खतरा हो सकता है.’ असं म्हणून जेवण तयार होत असतानाच आमच्यातल्या काही जणांना घेउन त्या साध्याश्याच वस्तीवर केलेली झोपायची व्यवस्था कुठे कुठे कशी कशी आहे ते दाखवत तो त्या वस्तीवर फिरला. 

परत येईपर्यंत इथल्या गावकर्यांनी कसल्यातरी हिरव्या पानांच्या पत्रावळी स्वच्छ धुऊन त्या छोट्याश्या वस्तीतल्या घराघरासमोर मांडल्या होत्या.  त्या  काळ्या अंधार्‍या रात्री, उत्तर प्रदेशातल्या त्या एका छोट्याश्या वस्तीतल्या मिणमिणत्या कंदिलांच्या उजेडात, आमच्या घरादारापासून शेकडो किलोमीटरवर, आम्हाला पूर्ण अनोळखी लोकांच्या आदरतिथ्यात आम्ही सगळेजण मिळेल त्या पत्रावळीच्या समोर बसलो, शेजारीच तांब्याच्या पाण्यात हात धुतले , आणि आम्हाला जेवण वाढलं गेलं. 

काय होतं जेवण? 
गरमागरम वाफाळलेला लालसर गावरान पण जाडसर भात, त्याच्यावर कांदा बटाट्याची बऱ्यापैकी तिखट रस्सा भाजी, सोबत कसलंतरी जाडभरलं लोणचं, हाताने बुक्की घालून फोडलेला प्याज आणि एक गुळाचा खडा. 

‘आरामसे खाइए भाई, भरपेट खाइए, बहोत चलके आए है आपलोग, यहीपर अभी सोना है.’ आम्हाला नमस्कार करून जेवायची विनंती करून त्यांच्या प्राणप्रिय रामललाच्या नावाचा जयघोष करून आता या गरीब गावकऱ्यांनी आम्हाला वाढायला सुरुवात केली. 

पहिल्याच दिवशी दुपारी चारपासून चालून रात्री तब्बल नऊ वाजेपर्यंत चालत चालत पोटात भुकेचा जबरदस्त आगडोंब उसळला होता. जवळपास तीसेक किलोमीटरचा टप्पा आम्ही पहिल्याच दिवशी उत्साहाने चालून संपवला होता. आता इथून पुढे जायचं नाही, इथेच झोपायचं आहे ही कल्पनाच खरतरं जबरदस्त होती. 

थकलेल्या आमच्यासमोर वाढलं गेलेलं ते गरमागरम भारतीय स्टेपल अन्न त्यावेळी आम्हाला देवदेवतांना मिळणाऱ्या अन्नपूर्णेच्या ताटातलं सुग्रास जेवण वाटलं होतं. 

गरीब गावकर्यांनी सुद्धा अजिबात हातचं न राखता आग्रह करून करून खायला घातलं होतं. 

कोणाला काही कमी तर पडत नाहीये ना, आमच्यापैकी कुणी लाजत तर नाहीये न या सगळ्याकडे गावातले काही बुजुर्ग गावकरी लक्ष ठेऊन होते. 

जमिनीवर बसून थकलेल्या आमच्या पोटात जाणारे अन्नाचे ते दोन घास म्हणजे नुसतं जेवण नव्हतं तर प्रभू रामावर भारतीयांच्या असणाऱ्या निस्सीम प्रेमाचे ते वास्तविक खरखुर स्वरूप होतं.  

अक्षरशः भरपेट जेवण झाल्यावर आमच्या समोरच्या पत्रावळ्या आम्ही जेव्हा उचलायला लागलो तेव्हा ‘रामललाका काम कर रहे हो भाई , हमे शर्मिंदा मत किजीये.’ असं म्हणत त्या पत्रावळी गावकऱ्यांनी स्वतः जबरदस्तीने उचलल्या आणि आम्ही जिथे जिथे जमिनीवर जेवायला बसलो होतो त्या त्या घरासमोरच्या लोकांनी आमच्या हातावर विलक्षण  नम्रतेने पाणी घालून आमचे हात धुवायला सुरुवात केली. 

आजकालच्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये सुद्धा असा आत्मीय अनुभव येणं अवघड असतं खरतरं जो आम्हाला त्या भारतातल्या एका दूरवरच्या खेडेगावात येत होता...प्रभू रामाची कृपा ...दुसर काय ....   

आता जिथे जिथे जवळपासच आमची झोपायची व्यवस्था होती त्या त्या सगळ्या घरांमध्ये आम्ही गेलो, जाड्याभरड्या गवताचे का होईना आमच्यासाठी गावकर्यांनी त्यांच्या त्यांच्या ओसरीत बिछाने अंथरून ठेवले होते. 

एका अश्याच साध्याश्या मातीच्या घराच्या ओसरीत माझी व्यवस्था झाली. ‘ठीकठाक हुआ ना खाना भाई?’ घराच्या फाटक्या सदऱ्याच्या मालकाने मनापासून विचारलं ‘अब सो जाइए भाई आरामसे, कल सुबह उठाते है, फिर कुछ चायपानी करके निकल जाइये अजोध्या.’ तो निष्पाप जीव म्हणाला. थकल्या भागल्या मी माझं दप्तर उशाखाली घेतलं , सोबतची सतरंजी गवतावर खाली अंथरली, बदलायला कपडे आणले होते खरं पण कसलं काय आणि कसलं काय? थकलेला जीव मी. 

त्या घराच्या पडवी मध्ये खाली बसलो, पाय दुखणार होते दुसऱ्या दिवशी म्हणून ‘चाललास तर रात्री न चुकता खोबरेल तेल पायाच्या तळव्यांना लावून झोप म्हणजे दुसऱ्या दिवशी पाय दुखणार नाहीत आणि हवं तितकं चालता येईल’ असं म्हणून आईने सोबत दिलेल्या खोबरेल तेलाची बाटली बाहेर काढली, तळहातावर तेल घेतलं अन तळपायांना लावलं....

सोबतचे थकलेले कारसेवक एव्हाना निद्राधीन होत होते. 

किर्रर्र अंधार्या रात्री, तार्‍यांनी भरभरून लकाकलेल्या आभाळाखाली जमिनीवर पडलो आणि प्रभू रामाच्या कृपाप्रसादावर विश्वास ठेऊन कसलीच शुद्ध न राहता निद्रेच्या अधीन झालो.

अजून असे अनेक थरारक अनुभव... पुढील भाग 3 मध्ये. क्रमश:

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या