"माझा अयोध्या अध्याय" - भाग ३

#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या

दिनांक ३ ते ७ नोव्हेंबर १९९० – ऑन अवर वे टू अयोध्या 

@मिलिंद वेर्लेकर, पुणे

आदल्या दिवशी संध्याकाळी जवळपास तीस किलोमीटर चालल्यामुळे आणि तो पहिलाच दिवस असल्यामुळे पाय जबरदस्त दुखले होते पण  उत्तर प्रदेशातल्या रामभक्त स्थानिकांनी मात्र केलेल्या अभूतपूर्व आणि  विलक्षण आदरातिथ्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या खूप छान झोप लागली होती आणि त्यामुळे आज उठल्यावर एकदम तरतरीत वाटत होतं. 

महाराष्ट्रापासून दूरवर उत्तरेला खेड्यातली एक सुंदर थंड पहाट, पूर्वेला कुठेतरी दूरवर उगवणारे सूर्यनारायण, आजूबाजूला गुरावासरांचा आवाज, घराघरातल्या स्त्रियांची सकाळच्या कामाची आणि शेतात जायची धावपळ, परंतु गावातले सर्व पुरुष मात्र एकत्र येऊन रामाचे मंदिर बांधण्यासाठी निघालेल्या कारसेवकांसाठी न्याहारीच्या तयारीत......

दोन पाच मिनिटातच आम्ही सर्व कारसेवक उठलो सकाळची आन्हिकं केली आणि कालच्या आम्हाला त्या तिथं वस्तीवर घेऊन आलेल्या माणसाला भेटलो.

“जय सियाराम, सब ठीक ना भाई?.” हसून नमस्कार करून त्याने विचारलं. आम्ही सुद्धा वाकून त्यांना नमस्कार केला. 

“अगर किसीको अभी ही स्नान करना है तो हमारे गाव के मुखिया है उनके खेतमे प्रबन्ध किया है, आप वहा जा सकते है, बिल्कुल पासही है, वहा हो आइए फिर नाश्तेका प्रबन्ध करते है.” तो म्हणाला.

छान कल्पना होती. आम्ही काही जण त्याच्या सोबत अंघोळीसाठी गेलो. एका शेतातल्या प्रचंड मोठ्या विहिरीवर मोठाले चार पंप बसवले होते. सधन होता मुखिया बहुधा. 

आम्ही जवळपास तीस एक जण आंघोळीला पोचलो होतो. मुखीयाने स्वतः स्वागत केले आणि चारही पंप पूर्ण वेगात सोडून दिले, कसला साबण आणि कसलं काय? आम्ही उघड्यावरच त्या थंड पाण्याच्या जोरदार फवाऱ्याखाली घुसलो आणि दोन चार मिनिटांतच फ्रेश होऊन बाहेर ही पडलो इतका त्या थंडगार पाण्याचा प्रवाह जोरदार prहोता. 

अंग वगैरे पुसलं , पुढं निघण्याचे कपडे घातले आणि डोकं पुसतोय न पुसतोय इतक्यात तो माणूस आला ,”नाष्टा क़र लीजिए आप , बाकि लोगोंकी व्यवस्था गावमे ही कर दी है.’ तो म्हणाला.

शेतातल्या तिथंच असलेल्या एका छोट्याश्या खोलीच्या बाहेर आम्ही आलो आणि काय आला असेल नाश्ता?

कढईतून नुकतेच उतरवलेले गरमागरम समोसे आणि जिलबी आणि दुधाचा ग्लास. 
स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच ना भाऊ. श्रीरामाची कृपा 

त्या पाच दिवसात असाच नाश्ता आम्हाला मिळायचा रोज. पुरी छोले, कधी आलू पुरी, कधी राजमा चावल, एका दिवशी नुसती बिस्किटे. पण गावकरी विलक्षण प्रेमाने करायचे. त्या घराची कदाचित परिस्थिती नसावी असं जाणवायचं पण काहीनकाही करून आमची ही व्यवस्था आणि ती सुद्धा,”आगे खाने के लिए कुछ मिले ना मिले भाई.”असं म्हणत म्हणत आग्रहाने हे खायला दिलं जायचं. 

हे सगळ फुकट घ्यायचं म्हणून आमच्यातल्या एक दोघांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला आणि त्या घरातल्या पुरुषाने डोळ्यात पाणी आणून नमस्कार करून तो म्हणाला,”पाप करवाएँगे क्या भय्या हमसे, रामजी के सेना हो आप, हम अजोध्या नहीं जा सकते रामजीका मन्दिर बाँधने, आप जा रहे है तो आपकी सेवा कर रहे है बास.”  

एकाच ठिकाणी नसायची नाश्त्याची व्यवस्था सगळ्यांची, वेगवेगळ्या घरांत झोपायची सोय व्हायची आमची आणि मग ज्या घरात आमची रात्री रहायची सोय व्हायची साधारणपणे त्याचं घरात आमची सकाळची न्याहारी व्हायची.

भरपेट न्याहारी करून पुढं निघायचो. परत तसच लपून छपून जंगलातून प्रवास , पोलिसांना चुकवत , कधी झाडांचा आडोसा असला तर बेफाम चालत, कधी रुक्ष रस्ते असले तर डोक्यावर तळपणार्या सूर्याच्या उन्हातान्हात रडतखडत पण रामाच्या दर्शनासाठी उत्साह मात्र कायम .

असंच चालता चालता एका ठिकाणी अचानक एका वळणावर आमच्या सारखेच भारताच्या कुठून तरी कोपऱ्यातून अयोध्येला निघालेली दोनएकशे कारसेवकांची टोळी भेटली, बहुधा भारताच्या दक्षिणेकडले असावेत कारण काही जणांनी लुंग्या लावल्या होत्या , काय कमाल आहे बघा, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावाचा महिमा. आसेतुहिमालय भारत ढवळून काढला आणि सामर्थ्याची जाणीव करून देत आल्या पायावर ताठ मानेने उभा केला हा संपूर्ण भूप्रदेश त्या रामाने.  

एकदा चालता चालता अचानक एकाला एक जोडलेला लांबच्या लांब जोड ट्रॅक्टर समोर आला आणि आमच्याकडे बघून जय श्रीराम वगैरे झाल्यावर तो ट्रॅक्टर  चालक म्हणाला, “बैठीये भाई आप लोग, ज़रा दुरतक इसी रास्तेसे जा रहे है हम हमारे ग़ाव खेतमें, जितने लोग जा सकते है उन्को छोड़ देते है, उतनाही आप लोगोंका चलना बच जावेगा.” आमच्यापैकी बरेच जण बसले, चारेक किलोमीटरवर असलेल्या त्याच्या गावात या गावकर्याने या लोकांना सोडलं आणि बाकीच्यांना का नाही असं सुख मिळावं म्हणून हा त्याच्या शेतात निघालेला रामभक्त गावकरी त्याचं हातातलं काम सोडून उरलेल्यांना सोडायला दोन चार फेर्या करून नंतर आम्हाला नमस्कार करून त्याच्या कामाला हसत हसत निघून गेला.     

पण हे नेहमीच इतकं सेफ नसायचं. असाच एकदा एक ट्रॅक्टर आमच्या सोबत असलेल्या काही राजस्थानी कारसेवकांना घेऊन पुढे गेला आणि परत येतो इतरांना न्यायला म्हणणारा तो परत आलाच नाही. 

थोड्या वेळाने जेवताना आम्हाला कळलं कि तो त्राक्टार पोलिसांनी पकडला आणि सगळ्यांची रवानगी रेल्वे स्टेशनवर केली पोलिसांनी म्हणून त्या कारसेवकांना राजस्थानात परत पाठवायला. सगळा साप शिडीचा खेळ जणू. 

आदल्या दिवशी झालेली तशीच भन्नाट सोय असायची आमची जेवण्याची दुपारी सुद्धा. असंच कुठलीतरी गाव व बऱ्यापैकी मोठी वस्ती असायची. ती वस्ती येण्याआधीच आम्हांला कुणीतरी आमची वाट बघत थांबलेलं असायचं ते माणूस भेटायचं , पुढे जेवण आहे गावात असं सांगायचं, आम्ही तिथं पोचायचो आणि मग झाडांच्या सावलीत, घरांच्या ओसरीत, कधी गावाच्या सामाईक मंदिरात तर एकदा नदीच्या किनारी आमची जेवणाची सोय केली जायची. एका गावात तर एकत्र जेवण करण्याची सोय नव्हती तर ग्रामस्थांनी आपापल्या घरून काही काही त्यांना जमतील ते सर्व पदार्थ करून आणले होते यथाशक्ती आणि एकत्र काला करून आम्हांला वाढलं होतं.

जंगलातून चालत जायचं तर महादिव्य असायचं. पुढच्या गावी जायचं आहे इतकंच आधीच्या गावी सांगितलं जायचं आणि जंगलाच्या सुरुवातीला त्या गावातले लोक सोडायचे आणि परत जायचे. आम्ही चालत पुढे निघायचो. कधी कधी सगळी झाडे एकसारखी दिसायची , रस्ते, पायवाटा दिसता दिसता गायब व्हायचे, मध्येच रस्ते वळायचे , फाटे फुटायचे, एक न हजार भानगडी समोर यायच्या असल्या अचानक, पण अनेकदा ग्रामस्थांनी जंगलात सुद्धा वाट दाखवणाऱ्या खुणा ठेवलेल्या असायच्या, झाडांवर साध्याश्या पांढर्या कागदांवर जय श्रीराम लिहिलेलं असायचं आणि ज्या दिशेने जायचं त्या दिशेला बाण दाखवलेला असायचा, आता ती रिस्क घेण्याची जबाबदारी आमची असायची, कारण समजा बाणाचे टोक जंगलातल्या वार्याने फिरले असेल तर....बापरे 

पण असं कधी झालंच नाही, कुठतरी चुकतोय असं वाटलं रे वाटलं कि गावकर्यांनी पुढे जायचा मार्ग दर्शवणारी काही न काही खूण करून ठेवलेली दिसायची, मग ती कागदावर असो व झाडांच्या खोडांवर असो....

एकदा असंच जंगलातून रस्त्यावर येताना एका वळणावर आलो आणि समोर अचानक आडोश्याला कोपर्यावर उभ्या असलेल्या पोलीस जीपसमोरच अवतीर्ण झालो....कारसेवकांना बघून सुद्धा जीपमधले गप्पा मारणारे चार पाच पोलीस शांत बसून होते...आम्ही मात्र पोलिसांना घाबरून पाळण्याच्या बेतात होतोचं....तितक्यात डोक्याला उभं गंध लावलेल्या एका गणवेशातल्या पोलिसानेच हात उंचावून “जय सियाराम’ केलं हसून...आणि घाबरू नका चालत रहा असा इशारा केला....आम्ही पुढ निघालो ‘जय श्रीराम’ म्हणत म्हणत......  

एकदा एका दिवशी दिवसभर जवळपास साठेक किलोमीटर चालून आलो होतो...नेमका त्या दिवशीचा टप्पा फार भीषण वरखाली असलेल्या रस्त्यांचा आणि जंगलांचा होता...खूप बेक्कार चालावं लागलं होतं खालीवर...डोक्यावर सूर्याचा तडाखा सुद्धा भयंकर होता....पायांचे शब्दशः शेकडो तुकडे पडले होते अगदी....कधी एकदा रात्री पायांना तेल चोळून झोपून जातोय असं झालं होतं...अश्याच एका गावात जेवण्याची आणि झोपायची सोय केली होती...नेहमीसारख आतीथ्य्शाली भरपेट जेवण केलं....पाठीला दप्तर तसच अडकवून ज्या घरात झोपायची व्यवस्था होती तिथं गेलो...खाली बसलो....जरासा लवंडलो....पाठीला दप्तर तसचं ठेवून पाठीवर पडलो...जरा वेळाने पाठीवरून दप्तर काढून पायांना तेल लावून दप्तर उशाशी घेऊन झोपूया असं म्हणून जरा बसलो....पाठीवर दप्तर लावलेल्या अवस्थेतच जरा आडवा झालो.... जेवण अंगावर आलं होतं पाय ठणकत होते....मरणाचा थकल्याने किंचित डोळा लागला.....जाग आली तर सकाळ झाली होती....रात्री पायांना तेल न लावताच, पाठीवरचं दप्तर न काढताच.... आडवा न होताच.....तसाच बसल्या बसल्याचं पाठीवरचं मी झोपी गेलो होतो रात्रभर...

.....या दिवशी मात्र नंतर दिवसभर चालताना मुखी फक्त रामरायाचा अखंड जप चालला होता...पाय तुटून हातात आले होते.....श्रीराम    

एकदा दुपारी असंच जेवण होऊन पुढे निघालो आम्ही जंगलातल्या रस्त्यावरून आणि साधारण दोन वाजता सायकलवरून छाती फोडत धापा टाकत मागून आलेल्या एका गावकऱ्याने पुढं येऊन सांगितलं कि मागच्या त्याच्या गावात पोलीस आलेत आणि काही कारसेवकांना त्यांनी अटक केलीये...

झालं.... जीव जाईपर्यंत पाठीवरल्या बॅग्ज  सांभाळत पळत सुटलो आम्ही पुढील रस्त्याने आणि ते ही तब्बल पाच एक किलोमीटर आणि ते ही जेवण झालेल्या अवस्थेत...तश्यात काही जणांच्या चपला तुटल्या, काही जण अडखळून पडले, काही जणांच्या पोटात दुखायला लागलं कारण नुकतंच जेवण झालेलं होतं....
पण कुणीच थांबल नाही....

कारण एकंच दुर्दम्य इच्छाशक्ती होती मनात...ज्या रामचंद्राच्या मंदिर उभारणीसाठी आलोय इथवर त्या रामललाचे दर्शन मात्र निश्चित घ्यायचे....काहीही झालं तरी त्याच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय परत जायचं नाही...हे तर ठरलेलं होतंच...तीच होती आमची उर्जा...तीच होती आमच्या पायातली शक्ती आणि तीच होती आमची प्रचंड ध्येयासक्ती...ब्बास  

मजल दरमजल करत करत आम्ही तब्बल १७० किलोमीटर अंतर कापलं होतं,
आता मात्र रामरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती......

अयोध्या दहा किलोमीटर...... बोर्ड पाहिला रस्त्याकडेला आणि साक्षात हनुमंतानेचं पायात प्रचंड शक्ती ओतल्यासारखे पल्लवित होऊन आम्ही सुसाट सुटलो...चालतच होतो जणू....पण जवळपास पळतचं....

आता फक्त रामाची मूर्ती डोळ्यांसमोर दिसत होती, राममंदिर दिसतं होतं...अयोध्या दहा किलोमीटरचा बोर्ड पाहिल्यावर अंगात जणू काही संचारलं होतं....आता खायची प्यायची शुध्द नव्हती...आमच्या सामानाची पर्वा नव्हती...वर डोक्यावर सूर्य तळपतोय याचं भान जाणवतं  नव्हतं...आता डोळ्यात फक्त आणि फक्त कधी एकदा राम दिसतोय असं झालं होतं

म्हणता म्हणता अयोध्येत शिरलो....शरयू तीरावर वसलेल्या अयोध्येत शिरताना एक गोष्ट मात्र केली नक्की....लक्षात ठेवून....क्षणभर थांबलो.....खाली वाकलो....प्रभू रामचंद्राच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या अयोध्येतली ती पांढुरकी माती हातात घेतली आणि कपाळी लावली...डोळ्यात पाणी आलं....वाहू लागलं.....शेवटी आम्ही जीवाचं रान करत करत अयोध्येत पोहोचलो होतो....

खायचं भान नाही...पाणी पिण्याचं भान नाही..पाठीवरचं ओझ उतरवून ठेवण्याचं भान नव्हतं....आजूबाजूला असलेल्या हजारो बंदूकधारी पोलीस आणि इंडो तिबेट पुलिस फोर्सच्या जवानांचे भान नव्हतं......आणि....

....आणि समोर ती वास्तू दृष्टीस पडली...

तीन गुम्मजवाली वादग्रस्त वास्तू....प्रभू श्रीरामाच्या जन्माने पावन झालेल्या जागी बाबराने बांधलेली ती वास्तू....करोडो करोडो हिंदूंच्या आस्थेचे प्रतिक असलेली ती जागा.....आसेतु हिमालय पसरलेल्या या विशाल राष्ट्राला मुळापासून हलवून एकत्र बांधणारी आणि आपल्या ताकतीची जाणीव करून देणारी ती वास्तू....आणि इतिहासाच्या करंट्या कालौघात आक्रमक बाबराने उध्वस्त राममंदिर उध्वस्त करून बांधलेली ती वादग्रस्त वास्तू.... 

पोलिसांच्या प्रचंड बंदुकी बंदोबस्तात बाहेर पसरलेल्या शेकडो चपलांच्या गोंधळात चपला काढल्या....चपला काढू नका पोलीस सांगत होते पण त्यांच्या बडबडीकडे लक्ष देण्याचे भान कुणाला होते...चपला बाहेर काढल्या...हात जोडले....डोळ्यांतून संततधार लागली होती....संगीनिंच्या गराड्यात पुढे पुढे सरकत होतो....बाहेरचे भरभक्कम कुंपण ओलांडून आत गेलो....पहिला गुम्मज पार करून अंतर्गृहात पोचलो...उजवीकडे बांबू बांधलेल्या दरवाज्यातून आज जायचं होतं जिथे मधल्या गुम्मजाखाली रामलला विराजमान होते....पोलीस पुढे पुढे ढकलत होते.....कशाचेच भान नव्हते.....कधी एकदा ते बांबू पार करतोय असं झालं होतं.... 

सरकत सरकत उजवीकडे वळलो.......

काय होतंय कळायच्या आतच अश्रूंनी भरलेल्या आणि बांध फुटून वाहणाऱ्या डोळ्यांकडे सहज हात गेले...कारण आता गत्यंतरच नव्हतं....आपसूक डोळे पुसले गेले....स्वच्छ केले गेले....आतुर नयनांचे पारणे क्षणार्धात फिटले होते....हात जोडले गेले होते....पायांतले त्राण जगाच्या जागी थिजून गेल्यागत झाले होते......

समोर परमकृपाळू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, सीतामय्या, बंधू लखन आणि वीर हनुमानासमवेत शांत चित्ताने प्रसन्न उभे होते......


©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या