राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे?

राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे? 

@ कल्पेश जोशी

५ ऑगस्ट रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन संपन्न झाले. कित्येक आनंदाश्रू या सोहळ्याचे साक्षी बनले. परंतु, देशातील काही तथाकथित पुरोगामी सेक्युलरांना मात्र जणू सुतक पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संविधानिक पद्धतीने सगळे झालेले असताना ते दुःखी झाले आहेत. हिंदुत्ववादी या दुःखी आत्म्यांची फार टर उडवीत आहेत, पण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे रडणे स्वाभाविक आहे, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळत आहेत व खरा भारत निर्माण होत आहे. या नवभारत निर्मितीत कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थविना कुणी इतकी यशस्वी आणि मोठं होऊ शकतं का, याचं सकारात्मक उत्तर पचवणे त्यांना कठीण झाले आहे. असो. 

राम मंदिर बांधून देशाला काय फायदा होणार आहे? देशाच्या विकासात काय भर पडणार आहे? गरीबाच्या थाळीत काय पडणार आहे. देशाला शाळा, हॉस्पिटलची गरज आहे. राममंदिरामुळे कोरोना जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न कथित लिब्रांडूना पडली. मंदिरांची तुलना हॉस्पिटल आणि शाळांशी जशी केली जात आहे तशी देशभरात बेगुमानपणे वाढत चाललेल्या मशिदी, मदरसे याबाबद्दल केली आहे का? या कथित सेक्युलर पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्या विरोधात जाणे म्हणजे आजवर सेक्युलॅरीजम वाटत आले आहे. त्यामुळे यावेळी ते विशेष नव्हते. ते यापूर्वीही घडत आले आहे. 

देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात भव्य पुतळा उभारण्याची वेळ आली तेव्हाही या लोकांना असे प्रश्न पडले आहेत. पुतळा उभारण्यापेक्षा गडकिल्ले नीट करा असे सल्ले दिले गेले. देशात सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा राहत होता तेव्हाही असे प्रश्न पडले. देशाच्या विकासात काय भर पडेल असे विचारले गेले. देशात मेट्रो, बुलेट ट्रेन सुरू करण्याची तयारी झाली तेव्हाही असेच प्रश्न उभे करून आडकाठी आणली गेली. रामसेतूला तर गुपचूप उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. रामायण म्हणजे कपोलकल्पित कहाणी आहे असे बिंबवण्याचा प्रयत्न झाला आहे. काही गोष्टींमागे राजकीय सुडबुद्धी होती, तर काही गोष्टींमागे धार्मिक अनास्था. राम मंदिरालाही काही जण केवळ एकाच कारणामुळे विरोध करत आहेत, कारण त्याचे श्रेय नाही म्हंटले तरी निर्विवाद मोदी सरकारला मिळणार आहे. परंतु, काँग्रेसचे या प्रकरणात मंदिराला न्याय देण्यापासून हात कोणी बांधले होते? काँग्रेसने तर हा वाद सुरू कसा राहील आणि मंदिराच्या विरोधात कसा जाईल याचाच विचार केला आहे. 

काही हिंदू धर्म द्वेषाने पछाडलेले लोक राम मंदिराला विरोध करतात, कारण त्यांना मंदिरातील पुजाऱ्याचे पोट दिसते. मंदिर म्हणजे फक्त एकाच विशिष्ट जातीच्या व्यक्तीचे पोट भरण्याचे साधन असते का? आज बऱ्याच मंदिरात विविध जातीचे पुजारी दिसून येतात. ह्या लोकांना मंदिरातील ब्राह्मण पुजारी दिसतो, पण मंदिराबाहेरील फुले विकणारा माळी , नारळ विकणारा वाणी, देवपुजा साहित्य विकणारा कासार, पेढे विकणारा गवळी, तर काही ठिकाणी धार्मिक पुस्तके विकणारा ब्राह्मणेतर माणूस का दिसत नाही? बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्ह्णुन 'गुरव' या इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गात मोडणारया पुजाऱ्यांची नेमणुक केलेली असते. तुळजापुर येथील भवानी देवीचे पुजारी हे वंशपरंपरागत 'मराठा' समाजाचे आहेत. बिरोबा देवाचे पुजारी 'धनगर' समाजाचे आहेत. मरीमाता देवीचे पुजारी मातंग समाजाचे असतात. खडोबाचे गोंधळी हे 'गोंधळी' समाजाचे असतात. नवनाथांचे पुजारी 'गोसावी' समाजाचे असतात. म्हणजे हिंदु धर्मात सर्व जातींचे लोक विविध देवतांचे पुजारी म्हणुन हजारो वर्षांपासुन आनंदाने कर्तव्य बजावत आहे. मग हिंदू मंदिरांमध्ये समस्त हिंदू समाजाचे समरस दर्शन होत असताना 'पुजारी' डोळ्यात खुपण्याचे कारण काय?

हिंदूंच्या प्रत्येक लहान मोठ्या मंदिराचे ट्रस्ट स्थापन जाऊन सरकारला दर महिन्याला हिशेब देण्याची व्यवस्था आहे, त्यामुळेच मंदिराचा पुजारी कोणाला किती प्रसाद देतोय अगदी इथून सीसीटीव्हीचे लक्ष असते. अगदी क्षुल्लक पगारावर कंत्राटी पुजारी ठेवलेले असतात, याबद्दल कोणाला माहितीच नसते. दान पेटीतील सर्व पैसा आणि मंदिरातील साधन संपत्ती सर्व पुजाऱ्याचीच, अशी भावना सर्वत्र झाली आहे. पण ती अवास्तव आहे. 

राम मंदिराने देशाला काय फायदा होणार आहे, असा प्रश्न विचारणाऱ्यांना विवादित बाबरी मशिदीचा काय फायदा होत होता, हे सांगता येईल का? या भग्न जागेच्या रक्षणार्थ व अयोध्येत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारचा आजवर खूप पैसा खर्च झाला आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक जात असत. परंतु, पर्यटन विकास म्हणून सरकारला तेथील जमिनीचा विवाद न्यायालयात सुरू असल्यामुळे काहीही करता आले नाही. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक झाले आहे. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर सरकारी पैसे खर्च होत होता. आज समस्त हिंदू समाजाच्या आर्थिक सहकार्यातून भव्य दिव्य राम मंदिर उभे राहत आहे त्याचा स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या पुरोगाम्यांना पोटशूळ होत आहे.

कालपरवा सरदार पटेलांच्या पुतळ्यावरून काहींना प्रश्न पडत होते तेच आता राम मंदिराविषयी पडत आहेत. सरदार पटेलांच्या पुतळ्यामुळे काय फायदा होईल, असा प्रश्न करण्यात येत होता. पण सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्यानंतर पर्यटन म्हणून तिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येऊ लागले तेव्हा वर्षभरात तब्बल ८० कोटी ६५ लाख रुपयांची कमाई झाली होती, जी ताजमहलच्या मागील तीन वर्षाच्या सरासरीपेक्षाही (६१ कोटी ४ लाख) अधिक होती. हा सर्व पैसा कोणाचा असतो? भाजपचा की मोदींचा? देशाच्या विकास कामात व आपत्ती व्यवस्थापनात हा पैसा खर्च करण्यात येतो ना? देशातील हिंदू मंदिरांवर अश्याच प्रकारे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु, हिंदूंची सर्व लहान मोठी मंदिरे आज सरकारी ताब्यात आहेत असे म्हंटले जाते. मंदिरांवर ट्रस्टचे नियंत्रण असते. मंदिराचा मालक पुजारी नसतो. जेव्हा देशाला, राज्याला किंवा त्या प्रदेशाला गरज असते तेव्हा हेच हिंदू मंदिरे मदतीसाठी उभी राहतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मंदिराच्या दानपेट्या महापूर, भूकंप, महामारी अश्या संकटांच्या काळात खुल्या होतात. 'मशिदी' व 'चर्च' येथून अश्या प्रकारचा किती निधी आजवर सरकारच्या मदतीसाठी दिला गेला, हा तर एक संशोधनाचा भाग आहे. त्यावर हे कथित पुरोगामी व सेक्युलर एक अवाक्षर काढत नाही.

कोरोना काळात हिंदू मंदिरांनी केलेली मदत, काही उदाहरणे:

👉शिर्डी साईबाबा संस्थान - मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ कोटी

👉महावीर हनुमान मंदिर, पटना - बिहारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत १ कोटी

👉आरासुरी अंबाजी माता मंदिर -  १ कोटी

👉स्वामीनारायण मंदिर व गुरुकुल, गुजरात - गुजरात मधील विविध स्वामीनारायण ट्रस्ट ने मिळून १.८८ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले व कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ ५०० बेड्स ची व्यवस्था केली.

👉महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर- २ कोटी रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केली. त्यापैकी ५० लाख रुपये जिल्हाधिकारी कोषात देण्यात आले. 

👉सोमनाथ मंदिर ट्रस्ट- १ कोटी

👉माता वैष्णोदेवी मंदिर- राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपले दोन दिवसाचा पगार, तर अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी १ दिवसाचा पगार समर्पित केला. तसेच, किराणा सामान किट्स वितरित केल्या व श्राईन बोर्डने आशीर्वाद कॉम्प्लेक्स मधील ६०० बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिले. 

👉महाकालेश्वर मंदिर उज्जैन - ५ लाख रुपये

👉माता महामाया मंदिर, छत्तीसगड- मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख तर, रेडक्रॉस सोसायटीला १.११ लाख रुपये दिले.

👉नित्य चिंताहरण गणपती मंदिर, रतलाम- अन्नदानासाठी १.११ लाख 

👉सिद्धिविनायक मंदिर, मुंबई- रक्त संकलन केले. 

केवळ कोरोना काळात मदत करणारी ही काहीच उदाहरणे आहेत. ही यादी न संपणारी आहे. हिंदू मंदिरे देश जेव्हा जेव्हा संकटात आला तेव्हा तेव्हा मदतीला धावून आली आहेत. त्यामुळे केवळ राममंदिरच नव्हे, तर देशातील प्रत्येक मंदिरामुळे देशाला फायदाच होत आलेला आहे. कॅप्टन स्मिता गायकवाड आपल्या लेखात मांडतात, "कोरोना सारख्या काळात मंदिरांनी करोडो रूपये दानासाठी दिले. दगडुशेठ हलवाई, शेगाव, अक्षरधाम, इस्कॉन, इशा योगा ध्यांनलिंग मंदिर, सिद्धिविनायक अशी किती नावं आहेत जिथे रोज हजारो नागरिक रोज विनामूल्य जेवतात किंवा जे सामाजिक कार्याला करोडो रुपये देतात, शाळा चालवतात, वृद्धाश्रमात मदत करतात, शिक्षण साहित्य वाटतात. किती ग्रंथालयांनी किंवा हाॉस्पिटलनी हे केलं? मी ग्रंथालयांच्या विरोधात मुळीच नाही पण जर कोणाला तुलना करायचीच असेल तर ह्याचं पण उत्तर द्यावे लागेल. 'ग्रंथालयं' विरूद्ध 'मंदिरं' किंवा 'हॉस्पिटल' विरुद्ध 'मंदिरं' असा असमावेशक आणि व्देष वाढवणारा प्रचार करण्याऐवजी दोन्हीच्या एकत्र अस्तित्वाचा आणि परिणामी दोन्हींच्या उन्नतीचा विचार केला पाहिजे" असा उच्च विचार त्या मांडतात. राममंदिरामुळे  दुःखी झालेल्या तमाम सेक्युलरवाद्यांनी याचा विचार केला पाहिजे. 

अयोध्येतील विवादित जागा कालपर्यंत पडीक होती. श्रीरामाच्या मुर्त्या मागील कित्येक वर्षांपासून झोपडीत ठेवलेल्या होत्या. सर्व ऐतिहासिक पुरावे मंदिराच्या बाजूने असताना रामलला झोपडीत होते. देशातील बहुसंख्य समाजाला याचे प्रचंड दुःख व यातना होत होत्या. आपले आराध्य त्यांच्याच जन्मस्थानी अश्या अवस्थेत पाहिल्यावर कोणत्याही रामभक्ताला वेदना होणे स्वाभाविक होते.  तरीही लोकशाही मार्गाने व संविधानिक प्रक्रियेने या प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला हा या बहुसंख्य समाजाचा आनंद आहे. यात स्वतःला संविधानाचे रक्षक म्हणवणारे सहभागी व्हायला तयार नाही, हे मोठे आश्चर्य आहे!

अयोध्या उद्या भारतातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र होणार आहे. उद्या तिथे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर देशाला संकटात हक्काने मिळणारी एक अजून मोठी 'दानपेटी' मिळणार यात शंकाच नाही. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या नवीन विकास मॉडेल साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मेडिकल कॉलेज व एअरपोर्ट साठी योजना तयार केल्या आहेत. या माध्यमातून अयोध्येत होणारा विकास हॉटेल्स, दुकाने, मॉल्स, पार्क, गार्डन, हॉस्पिटलपासून ते फुल विकणाऱ्या आणि शेंगदाणे फुटाणे विकणाऱ्या पर्यंतच्या व्यक्तींकडे पाहिल्यावर स्पष्टपणे दिसेल. 

अयोध्येसोबत उत्तर प्रदेश व पर्यायाने देशाचाच विकास होणार आहे. हिंदू मंदिरे व तीर्थस्थळे केवळ ठराविक लोकांचा किंवा धर्माचा फायदा करत नाहीत तर देशाच्या अर्थ व्यवस्थेला बळकट करतात. आज देशात कोरोनामुळे सर्व मंदिरे व तिर्थस्थळे बंद आहेत, त्यामुळे देशाला मोठे नुकसान होणार आहे. उत्तर प्रदेशात पर्यटन क्षेत्रात मोलाची भर घालणारे एक नवीन केंद्र अयोध्येच्या रूपाने समोर येणार आहे. कालपर्यंत अयोध्यावासी राममंदीराच्या प्रलंबित प्रश्नामुळे वंचित राहिले होते. अयोध्या शहराचा काडीचाही विकास झालेला नव्हता. मी अयोध्येत गेलो होतो तेव्हा तेथील एका नागरिकाशी झालेल्या चर्चेत त्याने सांगितले होते की, "राममंदिर निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत आम्ही घर सुद्धा बांधू शकत नाही." अयोध्येत आज आपल्याला जी जुनी पुरानी घरे व वाडे दिसतात, त्याचे कारण हेच आहे. कोणता वाडा कधी कोसळेल याचा भरवसाच नाही. त्याची साधी डागडुजी करायची तर शासकीय परवानगी घ्यावी लागते. राम मंदिर निर्माण मुळे अश्या सर्व नागरिकांना किती मोठा आनंद झाला असेल, याचा विचारही आपण करू शकत नाही. 

राम मंदिर हे केवळ हिंदुधर्मीयांसाठी गर्वाची बाब नसून समस्त भारतीयांच्या अस्मिता या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. राम मंदिर भूमीपूजन होत असताना काशीत मुस्लिम महिलांनी श्रीरामाची आरती ओवाळली. शिया मुस्लिम वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष असलेल्या वसीम रिझवी यांनी राम मंदिराचे समर्थन केले आहे. मंदिर निर्माण आंदोलनात अग्रभागी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व हिंदुत्व विचारधारा मानणाऱ्या राजकीय पक्ष भाजपने ठरवले असते तर मंदिराला हिंदूंच्याच चाकोरीत बद्ध केले असते. परंतु, मंदिर भूमीपूजनचे पाहिले आमंत्रण इकबाल अन्सारी यांना दिले गेले. एक मुस्लिम रामभक्त दक्षिण भारतातून राम मंदिर निर्माणसाठी वीट घेऊन येतो काय आणि निजामाचे वंशज राम मंदिराला सोन्याची वीट प्रदान करतात काय, हे सगळं पुरोगामी व सेक्युलरांसाठी अपचणीय आहे. एवढंच काय तर प्रसादाचा पहिला मान उत्तरप्रदेशातील एका दलित कुटुंबाला दिला गेला. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये सुद्धा कामेश्वर चौपाल या दलित परिवारात जन्मलेल्या महानुभवास आवर्जून कायमस्वरूपी स्थान दिले गेले आहे. 

विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापला विचार मांडताना राममंदिर हे भारताच्या सामाजिक सद्भाव व समरसतेचं प्रतीक होईल असे म्हंटले. एका विशिष्ट धर्माचा न्यायालयीन पराभव केल्याची कोणतीही भावना कोणाच्याही वक्तव्यात दिसली नाही.  त्यामुळे कालपर्यंत भारतीय समाजाला कालपर्यंत आपण ज्या पद्धतीने फोडत आलो आहोत ते प्रयत्न या राममंदिरामुळे धुळीस मिळतात की काय अशी भीती तमाम पुरोगामी व सेक्युलर गटात निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांना मंदिर निर्माण होताना हॉस्पिटल, शाळा, कॉलेज व विकास दिसू लागला आहे, जो मागील सत्तर वर्षात कधी दिसला नाही. 

कुठेतरी खूप छान विचार वाचण्यात आला. "बाबर मंदिर पाडू शकला, कारण तत्कालीन हिंदू समाजाला मरगळ आली होती. आज मंदिर निर्माण होत आहे, कारण आजचा समाज ताठ मानेने व स्वाभिमानाने उभा आहे." राममंदिर भूमीपूजन सोहळा सुरू असताना तब्बल २०० वृत्तवाहिन्यांवर १६ कोटी लोक हा कार्यक्रम टीव्हीवर लाईव्ह बघत होते. हे त्याचेच प्रमाण आहे. भविष्यात आजचे विरोधकही यात सामील झालेले असतील, यात शंका नाही. पूर्वग्रहदूषित, द्वेषमूलक व अहंकार बाजूला ठेऊन प्रामाणिक विचार केल्यास जे आज रडताय त्यांनाही आनंदच होईल. 

kavesh37@yahoo.com

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या