श्रीराम मंदीर आंदोलन : एक प्रवास

५  ऑगस्टला एक अध्याय पूर्ण झाला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा कलियुगातला वनवास संपला आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली. ज्यांचे वय आज २५ वर्षाचे आहे अशा तरुण तरुणींना ह्या जन्मस्थानासाठी केलेला ५०० वर्षांचा संघर्ष कोरोनाच्या या कठीण काळामूळे सोशल मिडीयाद्वारे विस्तृतपणे समजला. प्रसार भारतीच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल १६ कोटी पेक्षा अधिक लोकांनी हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला असे म्हटले आहे. जर कोरोनाचे वातावरण नसते तर अवधपुरीत सा-या भारतवर्षाचे विहंगम दृश्य दिसले असते.

प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णांनी एका सूत्रात बांधलेला हा भारत हजारो वर्षांनी सुध्दा प्रत्येक पिढीत हिच ऊर्जा स्वाभाविकपणे संक्रमित करतो आहे. कन्याकुमारीपासून क्षीरभवानी पर्यंत आणि कच्छपासून कामाख्ये पर्यंतचे हे भारतवर्ष या क्षणाने रोमांचित झाले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात सारे विश्व चिंतेने ग्रासले असताना आपला भारत रामायण-महाभारत दूरदर्शनवर बघून राम-कृष्णाच्या कथांना पुढील पिढीत सांगून चैतन्याची अनुभूती घेत होता. ज्या लाखो रामभक्तांनी अयोध्येत १९९०-१९९२ या काळात कारसेवेसाठी हजेरी लावली होती आणि काही कोटी पर्यटकांनी़ पर्णकुटीतल्या रामललाचे दर्शन घेतले होते, त्या सा-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामूळेच सा-या विश्वाने हा क्षण साजरा केला. 

प्रसार माध्यमांवर बातम्या ऐकताना प्राजक्ताचा जणू वर्षाव वाटत होता.१९९० ते १९९२ मध्ये रामजन्मभूमीचे भडक चित्रण करणा-या माध्यमांचे 'राममय' झालेले स्वर ऐकायलाही छान वाटत होते. १९८४ पासून राम-जानकी रथयात्रा, एकात्मता रथयात्रा, शिलापूजन, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवा आणि ६ डिसेंबरला रामललाचे पूजन, त्यानंतरचे राजकारण, क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रीया, समाजाचा विलक्षण संयम, आधी उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि मंदीर निर्माणाचा शुभारंभ अशा या ३५ वर्षाच्या जागरणाचा हा प्रवास भारताला एका नव्या पर्वाकडे नेणाारा ठरला.

एखादे जन आंदोलन उभे राहते आणि ३५ वर्षाच्या प्रवासात समाज जीवन समृध्द करत ज्या पिढीने सहभाग घेतला त्याच पिढीला स्वप्नपूर्तीचा आनंद देणारे ठरते. यामूळेच हे आंदोलन रोमहर्षक आहे, प्रेरणा देणारे, इतिहास घडविणारे, संघटीत शक्तीचे दर्शन घडविणारे आहे.

संपूर्ण भारतातील प्रत्येक गावात शिलापूजनाने पाठविलेली श्रीरामशीला या मंदीराच्या निर्मितीत असणार आहे. कारसेवेच्या वेळेस "परिंदा भी पर नहीं मार सकता" या दर्पोक्तीला लाखोंच्या संख्येने दिलेले उत्तर यामूळे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीचे हे आंदोलन सा-या भारताचे झाले. ही जनभावना ज्यांनी व्यवस्थेच्या आधाराने तुडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनता जनार्दनाने काळाच्या जागृत प्रवाहात सहभागी करण्याची किमया केली. 

अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात असतात यावर विश्वास दृढ करणारे हे आंदोलन होते. १९८९-९० पासून बैठकीत नेहमी प्रश्न विचारला जायचा, मंदीर केव्हा होईल ? तेव्हा सांगितले जायचे जेंव्हा सारा समाज जागा होईल तेव्हाच राममंदीर होईल, त्याला जितके वर्ष लागतील तेवढे लागतील. आज ते किती योग्य व सत्य होते ते लक्षात येते, आणि शीर्ष नेतृत्वही किती द्रष्टे होते याची जाणिव होते. प्रत्येक गावात शीलापूजनाच्या कार्यक्रमाची योजना किती दूरदृष्टीची होती, सर्वांना जोडणारी होती, जागृत करणारी होती हे लक्षात येते. 

आज अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय नेतृत्व आपण पाहतो ते या आंदोलनाची उपलब्धी आहे. भारतीय समाज सर्व जाती, संप्रदाय सगळे भेदाभेद विसरुन या आंदोलनात सहभागी झाला होता. समरस समाजाचे हे दर्शन भारताचे उज्ज्वल भवितव्य ठरविणारे होते आणि यापुढे राहिल.

अशा या रामजन्मभूमी आंदोलनाचा  ५ ऑगस्टला शेवट गोड झाला, सा-या विश्वाला सामर्थ्य संपन्न, एकात्म नव भारताची ओळख करुन देणारा झाला...

सियावर प्रभु श्रीरामचंद्र की जय...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या