'कठीण समय येता पुन्हा संघच कामासी येतो'....



@मिलिंद वेरलेकर

करोना अजून संपलाच नाहीये तरी लगेचच  पुढच्या आ वासून उभ्या ठाकलेल्या महाप्रलयंकारी पूर'संकटात सुद्धा पुन्हा एकदा केरळ प्रांतात संघ स्वयंसेवकांनी कंबर कसून चहूबाजूंनी पुरामुळे उध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी गावोगावी वेगवान मदतकार्य सुरु केले आहे.

'चरैवेती चरैवेती' हा मंत्र पुनःप्रत्ययास आणून देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी  केरळमध्ये होत असलेल्याअतीवृष्टीमुळे गावागावात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भीषण नैसर्गिक आपदेमध्ये उडी घेतली आहे.

गावागावात अडकलेल्या नागरिकांना छोट्या मोठ्या बोटींच्या वापराने सुरक्षित ठिकाणी करोना संदर्भात असणाऱ्या अडचणींची काळजी घेत हलवणे, पुरात सापडलेल्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अन्न, औषधे आणि निवार्याची तातडीने व्यवस्था करणे, स्थानिक प्रशासनाला लागणारी सर्व प्रकारची अत्यावश्यक मदत उभी करणे आणि इतकंच नव्हे तर या पुरात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करणे अश्या प्रकारची सर्वच कामे रा. स्व. संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांनी केरळात जागोजागी सुरु केली आहेत.

मार्च महिन्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यात करोनामुळे निर्माण झालेल्या लॉक डाऊन मध्ये लागेल ती तातडीची मदत उपलब्ध करणे आणि नंतर करोना संदर्भातली स्क्रीनिंग आणि क्वारंटाईन सेंटर्स आणि मेडिकल फॅसिलिटीज चालवणे अश्या स्वरूपांच्या कामात लाखो स्वयंसेवकांनी आपले स्वयंस्वीकृत योगदान दिले आहे आणि आजही हजारो संघ स्वयंसेवक या कामात कटिबद्ध आहेत.

केरळात सुद्धा करोना संदर्भातली संघाची सेवाकार्ये आत्ता सुद्धा सुरु असतानाच अतीवृष्टीमुळे अचानकच निर्माण झालेल्या जागोजागच्या पुरांमुळे कोसळून गेलेल्या नागरिकांच्या साहाय्याला संघसंस्थांनी आणि स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून धाव घेतली आहे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या