आज रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक कै.माननीय मोरोपंत पिंगळे यांचा बौद्धिक वर्ग आठवत आहे.त्या बौद्धिक वर्गात त्यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले.१) सरस्वती नदीचा इतिहास २) इतिहासाचे पुनर्लेखन ३) परकीयांची भारतीय संस्कृतीवरील आक्रमणे. परकीयांनी आक्रमण करुन आपली अनेक सांस्कृतिक स्थळे उध्वस्त करुन परकीय संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. त्या प्राचीन संस्कृती मधील अयोध्येचे राम मंदिर एक आहे. तेथे परकीय आक्रमक बाबर याने राम मंदिर उध्वस्त करुन मशिद बांधली.
विश्व हिंदू परिषदेने संकल्प केला की,"राम मंदिर बाबरी ढाच्या पासून मुक्त करुन भव्य राम मंदिराची उभारणी करु."आज हे स्वप्न पूर्ण होत आहे.राम भक्त पंतप्रधान श्री.नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते भूमी पूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे.
आपल्या देशात अनेक काळ काँग्रेस सत्तेवर असूनही रामजन्मभूमीचा प्रश्न वादग्रस्त ठेवून राजकीय लाभ काँग्रेस घेत होती.खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा त्यांना या राजकीय खेळी साठी उपयोगी पडत होता. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर काँग्रेसने नकारात्मक भूमिका घेतली.विश्वहिंदू परिषदेने सकारात्मक भूमिका घेऊन हिंदू समाजाच्या जनजागृतीवर भर दिला. शिला पूजनाच्या कार्यक्रमाद्वारे समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत अयोध्येत राम मंदिर झालेच पाहिजे या भूमिकेपर्यंत हिंदू समाजास आणून ठेवले.या जनजागृती मोहिमेत आडवाणी यांची रथयात्रा सहाय्यक झाली.१९९० मधे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार होते. मुलायमसिंह मुख्यमंत्री होते.
१९९० मधे नोव्हेंबर महिन्यात पारंपारिक परिक्रमेस मुलायमसिंह सरकारने बंदी घातली.याचा रोष हिंदू समाजात होता.विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत कारसेवेचे आयोजन केले.सर्व कारसेवकांनी अयोध्येत येऊन कारसेवा करावी.१९९० मधे पहिली कारसेवा झाली.या कारसेवेत सामिल होण्याचे भाग्य मला मिळाले.
विश्व हिंदू परिषदेने आवाहन केल्या प्रमाणे जळगांवहून मोठ्या संखेने रामभक्त अयोध्येसाठी जाण्यास निघाले .अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर ( प्रयागराज ) उतरल्यावर आम्हांला मुलायमसिंहच्या राज्यात आल्याची जाणीव झाली.स्टेशनवरच अनेक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली.आम्ही पोलिसांना हुलकावणी देत निवासस्थानी पोहोचलो.दुसऱ्या दिवशी प्रयागराज येथे सरकारच्या दडपशाही विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन विश्वहिंदू परिषदेने केले होते.मोर्चात आम्ही सहभागी झालो.आम्हांला अटक होऊन प्रतापगढ येथील इंजिनियरिंग कॉलेज मधे ठेवण्यात आले.
अटक ही फारशी गंभीर नव्हती. आम्ही इंजिनियरिंग कॉलेजच्या मागील दरवाजाने पसार झालो.अयोध्येत जाणारी वाहने बंद असल्याने आम्ही पायी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला.
प्रतापगढ ते अयोध्या साधारणपणे १३५ किलोमीटर आहे.इतक्या लांब अयोध्येला पायी चालत जावे लागेल,हा मनात आलेला विचार पाय मागे खेचत होता.परंतु माझ्या बरोबर आलेल्या कारसेवकांनी "जय श्रीराम" म्हणून अयोध्येकडे टाकलेले पाऊल परत मागे फिरले नाही. मी देखील त्या कारसेवकांबरोबर चालत राहिलो.या चालत राहण्यात मला जी रामाबद्दलची अनुभूती मिळाली ती विलक्षण होती.
वारकरी पंढरपूरला जात असतांना ज्या प्रमाणे भजन म्हणत जातात "बोलावा विठ्ठल,पाहावा विठ्ठल,करावा विठ्ठल जीवे भावे" त्याप्रमाणे प्रवासात येणाऱ्या प्रत्येक गावात भेटणा-या स्त्री पुरुषास "जय श्रीराम" म्हणून बोलण्यास सुरूवात केली की,ते आस्थेने आमची विचारपूस करत,जेवू घालत व सतत चालत राहणाऱ्या पायांना स्त्रियाही तेल लावत असत.हे सर्व रामाबद्दलच्या आस्थेमुळे करत असत."सत्य संकल्प के साथ भगवान होता है" याची अनुभूती आम्ही सर्व कारसेवक घेत होतो.
उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील गावागावातील जनतेचा अनुभव घेत आम्ही अयोध्येकडे वाटचाल करत असतांना सर्व जातीचे,गरीब,श्रीमंत लोक भेटले,परंतु सर्वांच्या हृदयात "राम" दिसला.आम्ही तिस-या दिवशी अयोध्येत पोहोचलो.
अयोध्येत कारसेवक हजारोच्या संख्येने एकत्र येत होते,कारसेवेस सर्व तयार असतांना आम्हांला धक्कादायक बातमी समजली.कारसेवा चालू असतांना पोलिसांनी कारसेवकांवर गोळीबार केला व बरेच कारसेवक मृत्यूमुखी पडले.कारसेवा स्थगित झाली असल्याने कारसेवकांनी परत माघारी फिरावे.दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सविस्तर वृत्त वाचले,त्यात कोठारी बंधूचा गोळीबारात दुःखद मृत्यू झाल्याचे समजले.या वृत्तामुळे देशात खळबळ उडाली,मुलायमसिंह सरकार बद्दल असंतोष वाढला. राजकारणात उलथापालथ झाली.नंतरच्या उत्तर प्रदेशातील निवडणूकी मधे मुलायमसिंहचे सरकार पडून कल्याणसिंहचे (भा.ज.पा) सरकार आले.
१९९२ला विश्व हिंदू परीषदे तर्फे ६ डिसेंबरला अयोध्येत पुन्हा कारसेवेचे आयोजन करण्यात आले.या कारसेवेत संघर्ष होण्याची शक्यता नव्हती.उत्तर प्रदेशात भा.ज.पा.चे सरकार होते,आणि भा.ज.पा चा राममंदिराला पाठींबा असल्यामुळे कारसेवा निश्चित होणार असल्याने यावेळी पत्नीलाही अयोध्येला घेऊन गेलो.
उत्तर प्रदेशात भा.ज.पा सरकार असले तरी केन्द्रात काँग्रेसचे सरकार होते.नरसिंहराव प्रधानमंत्री होते. त्यांचे वर अयोध्येत केन्द्रीय राखीव पोलिस दल पाठवावे असे प्रेशर वाढत होते. कारसेवकांच्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती. यावेळी कारसेवा करुन घरी परतायचे,असा निर्णय करुन कारसेवक अयोध्येत आले होते.
कारसेवेसाठी रामजन्मभूमीच्या मंदिरा जवळ पोचण्याअगोदरच बाबरी ढाचा पाडला गेल्याची बातमी समजली. आम्ही बाबरी ढाचा पाडला गेल्याचे,या ऐतिहासिक घटनेचे अयोध्येतील साक्षीदार होतो.रामलल्लांचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो.
आज हिंदू समाजाचे श्रीराम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून आनंद व अभिमानाने मन भरून आले आहे.
@दीपक गजानन घाणेकर
(९४२३१८७४८०)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या