श्रीमंत शंकरदेव आसाममधील प्रसिद्ध वैष्णव संत आहेत, ज्यांनी शंकरगीतेची रचना केली. त्यांचा जन्म आसामच्या नौगाव जिल्ह्याजवळच्या अलिपूखुरी गावात झाला. तसेच श्रीमंत शंकरदेव आसाममधील एक महान समाज सुधारक, नाटककार, संगीताचे जाणकार आणि लेखक म्हणून ओळखले जातात. गुरु महिंद्रा कंदली यांनी असामान्य प्रतिभेच्या श्रीमंत शंकरदेव यांना विद्यार्थ्यांचे नेतेपद बहाल केले आणि तेंव्हापासून त्यांच्या नावाला 'देव' हे उपपद जोडले गेले व सर्वजण त्यांना 'शंकरदेव' म्हणून ओळखू लागले.
श्रीमंत शंकरदेव म्हणतातं "मनुष्याने पूर्ण एकांतात जाऊन व आपले सर्वस्व पणाला लावून भगवंताची भक्ती केली तर तो नक्कीच संसारातील सर्व तापापासुन मुक्त होईल. त्यांनी चारही वेद, चौदा शास्त्र आणि अठरा पुराणे यांचे अध्ययन पूर्ण करून त्यावर प्रभुत्व प्राप्त केले होते. आसाममध्ये मठांची स्थापना करून त्यांनी सनातन हिंदू धर्माची पताका फडकावली व आपली मातृभमी हीच आपली खरी माता आहे असा संदेश सर्व जनमानसात रुजवला. तसेच पूर्वोत्तर भारत व उर्वरित भारत जोडून ठेवण्यात श्रीमंत शंकरदेव यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय संस्कृतीचा प्रवाह पूर्वोत्तर भारतात अखंड ठेवण्यात व पूर्वोत्तर भारत उर्वरित भारताशी धार्मिक दृष्ट्या जोडून ठेवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.
माजुली हे फक्त ब्रह्मपुत्रा नदीतील आशियामधला नदीद्वीप नसून हे एक वैष्णवांचे परंपरागत 500 वर्ष जुने श्रद्धास्थान आहे. माजुली ही आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित आहे. श्रीमंत शंकरदेव यांनी मार्कंडेय पुराणावर आधारित 615 श्लोकांचे हरिश्चंद्र उपाख्यान लिहिले. हरिवंश आणि भागवत पुराणावर आधारित 'रुक्मिणीहरण' या काव्याची रचना केली. त्यांच्या कीर्तनांमध्ये ब्रह्मपुराण, पद्मपुराण आणि भागवतपुराणातील विविध प्रसंगाचे वर्णन आहे. त्यांनी 426 श्लोकांचे अजामिलोपाख्यानाचीही रचना केली आहे.
विप्रपत्नीप्रसाद, क्लिंडामान्यता, केळीगोपाल, रुक्मिणीहरण, पारिजातहरण आणि रामविजय हि नाटके लिहिली. त्याचप्रमाणे उत्तरकांड रामायणाचा छंदोबद्ध अनुवादही करून वामनपुराण व भागवतवर आधारित 'अनादीपतन' या काव्याची रचना केली. 'आदीदशम' ही श्रीमंत शंकरदेव यांची अत्यंत लोकप्रिय रचना आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले आहे. कुरूक्षेत्र, निमीमानसिद्धसंवाद व गुणमला ह्या त्यांच्या अन्य रचना आहेत. असमिया वैष्णवांचा पवित्र ग्रंथ भक्तिरत्नाकर श्रीमंत शंकरदेव यांनी संस्कृतमध्ये लिहिला आहे. यामध्ये वैष्णवांच्या धार्मिक सूत्रांचे निरूपण केले आहे.
आसाम मधील सर्व समुदायांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी श्रीमंत शंकरदेव यांनी मठांची स्थापना केली. भक्ती आणि प्रार्थना यावर त्यांचा विश्वास होता. आत्मोन्नती बरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक समरसतेवर त्यांचा जास्त विश्वास होता. डॉ. पितांबर देव गोस्वामी यांच्या मतानुसार "राष्ट्रीय अखंडता कायम ठेवण्यात आसामच्या मठ परंपरेचे खूप मोठे योगदान आहे. आसामचे लोक सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी इतके घट्ट जोडले गेले आहेत की कोणतीही राजकीय शक्ती त्यांना भारतापासून तोडू शकत नाही." यावरून महापुरुष शंकरदेव यांनी भारतीयांच्या मनात सांस्कृतिक एकतेचे बीजारोपण केले आहे व त्यामुळेच पूर्वोत्तर भारत आणि उर्वरित भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक दृढ संबंध एकमेकांना अलग होऊन देत नाहीत, हे आपल्या लक्षात येते.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या