नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती...
आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन.आदर्श शिक्षकाला फोन करून शिक्षकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असा विचार करून मी श्री.रघुजी राराविकर यांना फोन केला.फोनवर अनौपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी माझे"नाही चिरा नाही पणती" मधील लिखाणाची चौकशी केली.मी त्यांना तात्या देसाई यांचे व्यक्तीचित्रण करायचे आहे,मला मदत करा.असे आमचे बोलणे होते न होते तोच रघुजी भावनावश होऊन तात्या देसाईंच्या आठवणी सांगू लागले.मी देखील त्यांनी सांगितलेल्या सर्व आठवणी लक्षपूर्वक मनात साठवत होतो.आज योगायोग असा होता की 'शिक्षक दिनी एका शिक्षकाने(रघुजी राराविकर) आपल्या सहकारी शिक्षकाचा (तात्या देसाई)केलेला गौरव ऐकण्याचे भाग्य मला मिळाले.
तात्यांचे पूर्ण नांव कमलाकर वामन देसाई.तात्यांना पाच भाऊ व दोन बहिणी. त्यांचं बालपण दादरच्या हिंदू कॉलनी मध्ये गेले.तरुण वयात संघाशी सबंध आला.तात्या दादरच्या शिवाजीपार्क शाखेत जात असत.शिवाजीपार्क शाखा ही प्रभावी शाखा समजली जाई,या शाखेतून बरेच कार्यकर्ते संघाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी प्रचारक निघाले.या शाखेमध्ये कै.आबाजी थत्ते,कै.बापुसाहेब ना.बा. लेले,कै.प्रल्हादजी अभ्यंकर,कै. ब.ना.जोग व इतर अनेक स्वयंसेवक शिवाजीपार्क शाखेमध्ये येत असत.कै.बापुसाहेब ना.बा.लेले यांनी त्याकाळात शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर वर्तमानपत्र वाटप करणे इ. लहान सहान कामे करुन शिक्षण पूर्ण केले.वर्तमानपत्र वाटप करतांना ब-याच व्यक्तींशी त्यांचा स॔पर्क येतअसे.त्यांना बापुसाहेब शाखेत आणत.या माध्यमातून आबाजी थत्ते व दादासाहेब आपटे यांना बापुसाहेबांनी संघात आणले.
त्या काळात अनेक स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते व यापुढील आयुष्य संघासाठी जगायचे अशी प्रतिज्ञा अनेकांनी घेतली होती.त्या स्वयंसेवकापैकी कांही मराठवाड्यात गेले.कै.मा.प्रल्हादजी अभ्यंकर,त्यांनी मराठवाडा आपली कर्मभुमी ठरवली.त्याचप्रमाणे कै.आबाजी थत्ते व कै.बापुसाहेब ना.बा लेले ह्यांनी पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्र निवडले.तेथे प्रचारक म्हणून गेले.तात्यांनी खान्देश कार्यक्षेत्र निवडले व ते जळगांवला स्थायिक झाले.
त्या काळात शिक्षकाच्या नोकरीसाठी स्वयंसेवक पहिली पसंती देत असत. शिक्षक म्हटला की विद्यार्थी आले आणि विद्यार्थी हे संघाच्या शाखेमध्ये यावेत असा प्रयत्न शिक्षक करत असे. हा विषय डोक्यात ठेवून तात्या देसाईंनी देखील जळगाव ला आल्यावर शिक्षकाच्या नोकरीसाठी प्रयत्न केले आणि त्यांना भगीरथ इंग्लिश स्कूल यामध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. ते गणिताचे शिक्षक होते जळगाव जिल्ह्यामध्ये नावाजलेल्या गणित शिक्षकांपैकी तात्या देसाई हे होते.शाळेमधे तात्यांचा दरारा होता.भगिरथ शाळेत तात्यांच्या हातचा मार खाल्ला नाही असे विद्यार्थी क्वचितच भेटायचे.असे जरी असले तरी,तात्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर होता.
तात्या संघाचे स्वयंसेवक तर होतेच,परंतु व्यवहारात संघ जीवन जगत होते.शाळेतील बहुतेक शिक्षक एक तारखेचे (पगाराचे) बांधिलकी असलेले शिक्षक बघायला मिळतात, परंतु थोडे शिक्षक, शिक्षकी पेशाशी प्रामाणिक असतात.त्या शिक्षकात तात्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे.तात्यांनी ज्या काळात शिक्षक म्हणून नोकरी स्विकारली तो काळ संघ विचारास अनुकूल नव्हता. जातीयवादी,प्रतिगामी,महात्मा गांधीचे हत्यारे असे अर्थहीन आरोप संघावर लावले जात.अशा वातावरणात शिक्षकीपेशाची नोकरी करणे तारेवरील कसरत असे.
शाळेचे व्यवस्थापक मंडळ देखील संघ विचाराला अनुकूल असे नव्हते. त्यामुळे तात्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थापक मंडळ सहिष्णुपणे वागत नसे. कठोरपणे संघ विचाराला विरोध करत असत. त्यामुळे शाळेत कुठलेही काम करताना तात्यांना अडचणी येत असत. तरीसुद्धा त्या परिस्थितीतही तात्यांनी संघ काम कदापि सोडले नाही.त्या काळात संघ परिवारात तीन तात्या प्रसिद्ध होते 1)तात्या बापट (जिल्हा प्रचारक) 2)तात्या देसाई 3)तात्या भागवत.या तिन्ही तात्यांचे जळगांव जिल्ह्याच्या संघ कार्यात मोठे योगदान आहे.
काही काळानंतर तात्यांना शिक्षक संघटनेची जबाबदारी देण्यात आली त्यासाठी विविध गावांमध्ये त्यांना प्रवास करावा लागे. संघ परिवारात शिक्षक संघटना नवीनच असल्यामुळे त्यासाठी तात्या बरेच परिश्रम करीत.विधान परिषदेत शिक्षक प्रतिनिधी निवडून जात असल्यामुळे शिक्षक मतदार संघात संघाचा प्रतिनिधी असावा,असे त्यांना मनापासून वाटे.1966 मधे शिक्षक मतदार संघातून त्यांना निवडणूकीत उभे राहण्याची संधी मिळाली.आणि तात्या चांगल्या मतांनी निवडून आले.
तात्या शिक्षक मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांच्यात आमदार असल्याचा अहंभाव नव्हता.त्यांची वागणूक सर्व सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे होती. आमदार झाल्यानंतरचा एक प्रसंग त्यांची मोठी मुलगी सौ.रेखाने कथन केला," ते आमदार झाल्यानंतर सौ.रेखाने नेहमीपेक्षा थोडीशी जास्त किंमतीची साडी विकत घेतली ती जेव्हा साडी घरी घेऊन आली तेव्हा तात्यांनी सांगीतले की आमदारकी हे सेवेचे पद आहे.तात्या आमदार झाले म्हणून घरामध्ये कुठल्याही प्रकारचा चंगळवाद मला खपणार नाही.यापुढे सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे घरातील सर्वांचे आचरण असले पाहिजे."तात्यांनी आमदारकीच्या काळात शिक्षकांची बरीच कामे केली.
तात्यांना कबड्डी खेळाची विशेष आवड होती.ते स्वतः उत्तम कबड्डीपटू होते.अनेक सामन्यात त्यांना अंपायर म्हणून सन्मानाने बोलावत असत.
तात्यांचा शाळेत शिस्तीच्या बाबतीत दरारा होता.शाळेच्या गणवेशात सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर शाळेत यावे असा त्यांचा आग्रह असे.यात कोणी नियम मोजल्यावर ते शिक्षा करत.शिक्षा करतांना आपपर भाव करत नसत.एकदा त्यांचा मुलगा महेश गणवेशातील शर्टाचे वरील बटन तुटल्याने ते न लावताच शाळेत आला.तात्यांनी महेशला घरी पाठवून बटन लावून च शाळेत येण्यास सांगितले. 1975 मधे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली.ब-याच संघ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.अटक झालेल्या अनेक कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली होती.अशा परिस्थितीत तात्यांनी आणीबाणीत अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम केले.काही ठिकाणी आर्थिक मदतही द्यावी लागली.
1979 मधे तात्या शाळेतून निवृत्त झाले.तात्यांना डायबिटीसचा त्रास वाढला होता.त्यामुळे इच्छा असूनही तात्या फारसे काम करु शकत नव्हते.1980च्या एप्रिल मधे तात्यांची तब्येत खुपच गंभीर झाली,त्यातच 17 एप्रिल ला त्यांना देवाज्ञा झाली.
आदर्श शिक्षक आमदार,संघाचा निष्ठावान स्वयंसेवक,शिस्तप्रिय,विद्यार्थीप्रिय तात्या देसाई कायम लक्षात राहतील.
दीपक गजानन घाणेकर
(9423187480)
----------
कै. तात्यांच्या कुटुंबीयांचे मनोगत.....
श्री.दिनेश देसाई ( तात्यांचा पुतण्या)
आमचे तात्याकाका....
हो, खरच, माजी आमदार कै. क. वा. देसाई म्हणजेच तात्या देसाई आमचे सख्खे काका होत....
त्यांच्याविषयी लिहायचे तेही त्यांचा पुतण्या म्हणून हे मी माझे भाग्य समजतो, त्यांच्या आठवणी आम्ही खूपच जपल्या आहेत, आज त्यांच्याविषयी एक देसाई कुटुंब म्हणून आठवण आपल्या समोर मांडायचा प्रयत्न....
● सन १९७४, माझे वडील कै अप्पा देसाई, तात्या देसाई यांचे बंधु, दोघेही संघ स्वयंसेवक, तात्या जळगाव ला तर अप्पा भुसावळ ला...
८ मे ७४ ला फार मोठा रेल्वे चा संप झाला, त्या मध्ये अप्पा खूपच सक्रीय होते, आणि त्यांना व अनेक भुसावळ च्या कार्यकर्त्यांना २ मे १९७४ रोजी स्थानबद्ध केले, आणि ह्या प्रसंगात आम्हाला धीर देण्यासाठी तात्याकाका धावून आले...
त्या वेळेस आमच्या घरात आजोबा, आजी, अप्पा, माझी आई, सुषमा, मी आणि संध्या एवढेजण होतो, पण अप्पांना अटक झाल्यावर आम्ही चिंतेत होतोच कारण रोज सकाळी आजोबा एकदा तरी विचारायचे अप्पा कुठे आहे....त्यांना आम्ही कळु दिले नव्हते काय परिस्थिती आहे ते...
त्या वेळेस आमचे तात्याकाका रोज सकाळी जळगाव हुन भुसावळ ला घरी यायचे व आम्हा सगळ्यांना धीर द्यायचे, तसेंच आजोबांच्या आजुबाजुला वावरत असायचे, म्हणजे अप्पा कुठे आहे ह्या प्रश्णाचे उत्तर आपोआप आजोबांना मिळायचे, पूर्ण महिनाभर तात्याकाकांचा हा कार्यक्रम सुरू होता, आम्हा भावंडांना पण तात्याकाकांमुळे अप्पांची अनुपस्थिती जाणवली नाही, एवढेच नव्हे तर घरामध्ये एवढ्या कठीण प्रसंगात सुध्दा तात्याकाकांनी वातावरण आनंददायी ठेवले, आणि ही त्यांची आठवण आम्हा भावडांमध्ये आहेच, अर्थातच त्या महिन्यात आम्हाला काहीच कमी पडु दिले नाही...
नंतर ३१ मे ला संप मिटला अप्पांची सुटका झाली...
दिनेश देसाई
श्री चंदु देसाई, ( चिंतामण वामन देसाई ) , तात्यांचे सख्खे लहान भाऊ, वय ९० वर्षे, यांच्याशी बोलणे झाले, त्यांच्या शब्दात तात्यांच्या आठवणी....
जन्म : ८ किंवा ९ फेब्रुवारी १९२१,
शिक्षण : B.Sc., BT, मुंबई.
विवाह : १९५०, मुंबई.
आमदार : १९६६ ते १९७२,
जळगाव च्या आधी काही वर्षे भुसावळ येथील कन्या शाळेत शिक्षक, नंतर जळगाव येथील भगिरथ शाळेत शेवटपर्यंत कार्यरत.
निधन : १९८०,जळगाव.
१९४८ च्या सत्याग्रहात दुखापत, त्या वेळी त्यांच्याबरोबर प्रचारक विष्णुपंत महाजन यांनाही खुप मोठी दुखापत झाली होती,
नंतर डॉ. माधवराव गोखले हे प्रचारक होते,
आणि त्या नंतर चा काळ तात्या बापट यांच्याबरोबर तात्या देसाई यांनी खुप संघकाम जळगाव मध्ये वाढवले, नगर कार्यवाह होते.
तसेच तात्यांचा संघप्रवास मुंबईहुनच सुरु झाला, त्या काळी १९३८-३९, संचलन एखाद्या मैदानावर होत असे, तर मुंबईतील गोवालिया टँक या मैदानावर होते तेव्हा तात्यांबरोबर शिशु स्वयंसेवक चंदु देसाई पण होते,
आमदार असतांना नागपूर च्या अधिवेशनात आमची सख्खी आत्या ताई जामदार यांच्या वाड्यात भजे पार्टी होत असे व तात्याबरोबर त्या वेळचे जनसंघाचे बरेच आमदार असत...
आणखी खुप आठवणी त्यांनी सांगितल्या...
धन्यवाद.
दिनेश देसाई
( 9823936333 )
तात्यांची ज्येष्ठ कन्या
सौ.निशा नाखरे यांचे मनोगत...
माझे तात्या
शिक्षण : B.Sc.B.T.(म्हणजेच B.Ed.)
जन्म: 8 फेब्रुवारी 1921 घोटी येथे झाला.
लग्न: 11 जून 1950 वडाळा येथे झाले.
मृत्यू: 17 एप्रिल 1980 अक्षयतृतिया,जळगांव येथे
तात्यांचे B.T. चे वर्ष म्हणजे 1948, गांधी वधाचे वर्ष ! त्या वेळेच्या लाठीमारात त्यांच्या कपाळावर जखमा झाल्या होत्या, त्याचे व्रण पुढे आयुष्यभर त्यांच्या कपाळावर होते. याचा परिणाम म्हणजे ते 1948 ला परीक्षा हॉल वर गेलेच नाहीत. 1949 साली त्यांनी B.T. ची परीक्षा दिली. आणि मुंबईत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून शिक्षण क्षेत्र निवडले. शिक्षक म्हणून जळगाव येथेच कामास सुरुवात केली. तिथे
मनोभावे सेवा केली. शिक्षक आमदार म्हणूनही ते मोठी लढत देऊन जिंकून आले. अखेर मुख्याध्यापक पदावरून भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव येथून सेवानिवृत्त झाले. पत्नी मंदाकिनी कमलाकर देसाई त्याकाळची मॅट्रिक, पूर्वाश्रमीची सुशिला जयराम देव. लग्नाआधी रेल्वेत नोकरी करीत होती. तिचे वडील त्याकाळचे काँग्रेस कार्यकर्ते. तिच्या सातव्या वर्षीच वडिलांचे काँग्रेस भवनात हार्ट अटॅकने निधन झाले. त्यामुळे लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी तिने जनसंघाचा प्रचार केला तात्यांबरोबर पण मत मात्र काँग्रेसला दिले असे ती सांगायची. पूर्णपणे संघमय वातावरण असलेल्या घरात संसार करायचा म्हणून तिने लग्नानंतर नोकरी सोडली.
माझ्या आठवणीत तात्या कातरलेली सुपारी खायचे कधी आई तर कधी ते स्वतः कातरायचे आणि एकमेकांना द्यायचे. एकदा एका परगावातून आलेल्या व्यक्तीने हे पाहिले आणि पटकन त्यांनी विचारले तुम्ही बायकोला सुपारी कातरून हातावर ठेवता? आम्ही पायातील वहाण पायातच ठेवतो. तात्यांने तात्काळ उत्तर दिले की आम्ही बायकोला पायातली वहाण आहे असे कधीच समजत नाही. स्त्री-पुरुष समानता हे संस्कार नकळत आमच्या मनावर या कृतीतून झाले.
माझे लग्न ठरले होते आणि त्यांच्या भावी जावयाने D.E.E. ही पदविका संपादन केली होती. माजी आमदार म्हणून कोठेही ही शब्द टाकून जावयाला सरकारी नोकरीत रुजू करून घेऊ शकले असते तात्या. पण त्यांच्या तत्वात ते बसले नाही.निस्पृहतेचे बाळकडू आम्हाला तेव्हापासूनच मिळाले. आमदार असताना खूप जण त्यांच्याकडे अॅटेस्टेशन साठी येत असत,जेवण अर्धे टाकूनही ते सह्या करीत असत. समोरच्याचा खोळंबा कधी होऊ देत नसत.माझा मुलगा बाळ असतांना एकदा सह्या घ्यायला आलेल्या व्यक्तीने बाळाच्या हातात पैसे ठेवले ते त्यांनी ताबडतोब परत केले आणि म्हणाले आज तुम्ही माझ्याकडे सह्या घ्यायला आलात पण बाळाच्या हातात पैसे द्यायचे नाहीत. पैसे घेऊन कोणाचे काम करायचे नाही, हे नकळत झालेले संस्कार.
शाळा कॉलेजचे अनेक विद्यार्थी आमच्या घरी वक्तृत्व स्पर्धेसाठी असणारे विविध विषय घेऊन येत असत कोणत्याही विषयासाठी चे मुद्दे ते त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना सुसंबद्ध मांडण्यास प्रवृत्त करीत असत. कोणालाही तयार भाषण लिहून दिले आणि तो तिथे जाऊन भाषण करून आला असे कधी झाले नाही. हा त्यांचा उत्स्फूर्त वक्तृत्व गुण माझ्या बहिणीने माधुरीने उर्फ माधवी किशोर पुरंदरे हिने तंतोतंत उचलला होता. वाचनाची आवड असल्यामुळे उत्स्फूर्त वक्तृत्व या क्षेत्रात ती आघाडीवर असायची.
ते आर. एस. एस च्या घोषात आनक आणि ढोल वाजवायचे. आनकासाठीच्या
ऋचा त्यांना शिकून आत्मसात कराव्या लागल्या. माझ्या भावाला म्हणजे महेशला त्या उपजतच येतात असे त्यांचे मत होते. तसेच त्रिकोणमिती ची उदाहरणे सोडवायला आम्ही जर एकत्र बसलो आणि माझे आधी झाले तर ते लागलीच म्हणायचे," अरे माझ्यापेक्षाही लवकर येतय तुला." आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला आपल्यापेक्षा चांगलं येत आहे हे मान्य करणे यासाठी मन मोठेच असावे लागते जे त्यांच्याकडे होते. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या मुलाला म्हणजे महेशला कॉलेजमध्ये शिकवणी लावावी असे त्याला वाटत होते पण स्वअध्ययनास प्राधान्य देणाऱ्या तात्यांनी ते मान्य केले नाही. आमच्या घराण्यात आमच्या पिढीत
मुलींची संख्या जास्त होती. पण प्रत्येक कन्यारत्न जन्माचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. पुढे सुद्धा मुलगा, मुलगी हा भेद कधीही त्यांच्या वागणुकीतून दिसला नाही. किंबहुना थोडे झुकते माप आम्हा मुलींकडेच असायचे. शेवटी पक्षाघातामुळे त्यांच्या शारिरीक हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. पण दोन्ही जावई, जळगाव चे सोनार कुटुंब आणि आम्हा सर्व देसाई कुटुंबातील सदस्य त्याच बरोबर R.S.S. परिवारातील सर्व आप्तेष्ट,इतर मित्रपरिवार यांच्या मुळे त्यांना सांभाळणे माझ्या आईला सोपे गेले. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते पुनर्जन्म असेल तर पिता म्हणून तात्याच लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
सौ. निशा नाखरे ( रेखा ताई )
( 9730110488 )
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या