@ मयूर लांबे
मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणजे हजारो हिंदूंच्या बलिदानांनंतर मिळालेले यश आहे. हैदराबाद संस्थानातील शहरापासून खेड्यापर्यंत निजामाच्या निमलष्करी संघटनेचे म्हणजेच रझाकार संघटनेचे जाळे पसरले होते. गावागावात हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी रझाकार अत्याचार करत. तेव्हा वर्षानुवर्षे सोशिक व सहिष्णू असलेक्या हिंदू समाजाला ही प्रतिकाराचे हत्यार उपसने गरजेचे झाले होते. ह्या प्रतिकाराच्या मराठवाड्यातील गावागावात चीर स्मृती दडल्या आहेत. त्यातीलच एक आठवण पैठण तालुक्यातील 'विहामांडवा' येथील सीताराम मामांची.
निजामाच्या आणि रझाकारांच्या जुलमी राजवटीला जशास तसे प्रत्युत्तर देणारे विहामांडवा येथील स्वातंत्र्यसैनिक म्हणून सीताराम मामा यांचे नाव ओळखले जाते. गोरगरिबांना, गरजूंना मदत करणारे, तसेच प्रत्येक कार्य हे समर्पण भावनेने करणारे असे मामा होते. गावातील सर्व लहान-मोठे त्यांना प्रेमाने मामा असे म्हणत.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा सीताराम मामांवर प्रभाव होता. पैठण येथील स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब पाटील यांच्यासोबत मामांचे काम चालत असे. बबनराव कुलकर्णी, बाळासाहेब पाटील या स्वातंत्र्यसैनिकांना निरोपाचे पत्रक देणे किंवा त्यांच्याकडून आलेले निरोप स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत पोहचवणे असे ते काम करत होते. तसेच गावात किंवा परिसरात काय परिस्थिती आहे याची सर्व इत्थंभूत माहिती सीताराम मामा त्याकाळी स्वातंत्र्यसेनानींना देत असत. स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक रुपाने किंवा इतर रुपाने मदत करत असत.
त्याकाळी रोहिले (रझाकार) गावात गावकऱ्यांना धमकी देत. तेव्हा सीताराम मामा आणि त्यांचे बंधू एकनाथ त्या रोहिल्यांना जशास तसे प्रत्युत्तर देत. एकट्या दुकट्या स्त्रीवर किंवा शेतामध्ये जाणार्या महिलांना त्याकाळी रोहिले छेडायचे, त्रास द्यायचे किंवा अत्याचार करायचे.
त्याकाळी अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील काशिनाथ आणि पांडुरंग ह्या दोन भावांनी महिलांवर वाईट नजर ठेवणाऱ्या रझाकाराला एका ओढ्यामध्ये जीवे मारले होते. तेव्हा सिताराम मामांनी त्यांच्या शेतामध्ये एका गुहेसारख्या खड्ड्यांमध्ये पाच महिने या दोन्ही बंधूंना आश्रय दिला आणि त्यांना सर्व मदत केली. तसेच इतर स्वातंत्र्यसैनिकांना देखील ते आपल्या घरामध्ये किंवा शेतातील घरांमध्ये आश्रय देत आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत असत.
रझाकार त्याकाळी जे निजामी राजवटीच्या विरोधात काम करत त्यांना धमकीचा लखोटा पाठवत. अशा पत्रात त्यांच्यावर आणि त्यांच्या घरावर हल्ला करण्याचे आणि संपूर्ण संपत्ती लुटण्याची धमकी रझाकार देत. असे पत्र एके दिवशी गावाच्या वेशीवर जाहीरपणे रझाकारांनी सीताराम मामा आणि त्यांचे बंधु एकनाथ यांच्या नावाने लिहिले. सीताराम मामांनी रझाकारांच्या या धमकीला भीक घातली नाही. त्यांचे बंधू एकनाथ यांनी त्या रझाकारांना काही सहकाऱ्यांच्या मदतीने जशास तसे प्रत्युत्तर देऊन पिटाळून लावले.
सीताराम मामा यांच्या कामामुळे रझाकारांनी एके दिवशी त्यांच्या वसंत नावाच्या मोठ्या मुलाला मारून टाकण्याची देखील धमकी दिली होती. तरीही सीताराम मामांनी आपले देश कार्य तसेच पुढे चालू ठेवले पण रझाकारांच्या धमकीला ते घाबरले नाहीत.
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यांच्यावरील प्रेमामुळे गावाने त्यांना सलग पंचवीस वर्ष सरपंच केले होते. त्यांच्या या काळामध्ये गावात विकासकामांची गंगा त्यांनी आणली. त्यांनी गावांमध्ये शाळा बांधली, पाण्याची टाकी बांधली, जल योजना, विद्युत योजना या देखील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणल्या. गावातून तालुक्याला जोडणारा रस्ता त्यांनी तयार करून घेतला.
अशाप्रकारे देशकार्य आणि समाजकार्य ह्याच्यावर अखंड निष्ठा ठेवणारे असे विहामांडव्यातील रत्न म्हणजेच सीताराम मामा यांचे निधन ५ जानेवारी २००३ रोजी झाले. ते आज हयात नाहीत पण त्यांनी केलेले कार्य आजही विहामांडवा मध्ये आठवले जाते.
(लेखक स्वतः सीताराम मामा यांचे पणतू आहेत.)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या