मराठवाडा मुक्तिसंग्राम किंवा हैदराबाद स्वातंत्र्य लढा हा भारताच्या अखंडेतेच्या दृष्टीने व भारताच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा लढा होता. या लढ्यामुळे हैद्राबाद प्रांत भारताला जोडला गेलाच शिवाय आणखी एका सरंजामशाहीला आळा घातला गेला. त्यामध्ये कित्येकांनी बलिदान दिले तर कित्येकांनी तुरुंगवास भोगले. निजामाच्या धर्मांध जाचाला कंटाळून कित्येक लोकांनी धर्मांतरण केले.
निजामाच्या निमलष्करी संघटना रझाकार व इत्तेहादूल हिंदूंना बळजबरीने धर्म बदलायला भाग पाडत. लोकांना प्रलोभने दाखवत. निजामविरुद्ध उठणारा हर एक आवाज आपल्या शक्तीबळाने बंद करण्याचा ते प्रयत्न करत. निजामाच्या या जाचाला दलित समाजही मोठ्या प्रमाणात बळी पडत होता. दलितांना विविध प्रलोभने दाखवून निजाम आपल्याकडे वळवून घेत होता. हैद्राबाद मुक्ती साठी जो लढा सुरू होता त्यामध्ये दलित उतरणार नाहीत याची पुरेपूर काळजी तो घेत होता.
बाबासाहेबांना सुद्धा निजामाने २५ कोटी रुपयांचे प्रलोभन दाखवून इस्लाम स्वीकारण्याबाबत सांगितले होते. परंतु, बाबासाहेबानी निजमाच्या या प्रस्तावास केराची टोपली दाखवली. "दलित आर्थिक दृष्टया मागास असतील परंतु त्यांचे मन मागासलेले नाही. मेरे जमीर को खरीदने की ताकत किसी में भी नही है." अश्या शब्दात बाबासाहेबानी निजामाला प्रत्युत्तर दिले होते. बाबासाहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी बी. एस. वेंकटराव मात्र निजामाच्या या धोरणाला बळी पडले.
बी. एस. वेंकटराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले विश्वासू सहकारी होते. 'मराठवाड्याचे बाबासाहेब' म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रयत्नांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. नंतर त्याचे नाव बदलून हैद्राबाद डिप्रेस्ट क्लास असोसिएशन केले गेले. वेंकटराव यांनी अचानक आपली भूमिका बदलली व ते निजामाच्या बाजूने झाले. बाबासाहेबांना हे आवडले नाही. त्यांनी वेंकटराव यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आत आणि अश्या अनेक वेंकटरावांचा जन्म होण्याच्या आत बाबासाहेबांनी नवीन नेतृत्व जे. सुबय्या यांना दिले आणि हैदराबाद शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. बाबासाहेबांच्या नावाखाली वेंकटराव व श्यामसुंदर सारखी माणसं भोळ्या भाबड्या दलितांना फसवू लागली होती. तेव्हा बाबासाहेबानी संस्थानातील आपल्या समाज बांधवांना उद्देशुन पत्र लिहिले.
बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या मोरे यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात,"मी हैद्राबाद संस्थानातील अस्पृश्य बंधूंना असा इशारा देतो की, त्यांनी कशीही परिस्थिती ओढवली तरी आणि कितीही संकटे आली तरी इत्तेहादूल मुसलमान ला साथ देता कामा नये. सर्वत्र हिंदू आपल्यावर अन्याय करत आहेत पण हा आपला अंतर्गत विषय आहे तो आपण सोडवू, आपण आपली बुद्धी बहकु देता कामा नये आणि आपली जात सोडून आपल्या शत्रूला सामील होता कामा नये. अस्पृश्य जातीचा झगडा स्वातंत्र्यासाठी आहे. त्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे म्हणून ते आज झगडत आहेत.
निजाम हा स्वातंत्र्याचा शत्रू आहे. त्या स्वातंत्र्याच्या शत्रू बरोबर जर अस्पृश्यांनी संगनमत केले तर त्यांचा घात होईल. निजाम हा हिंदुस्तानचा आपल्या मातृभूमीच्या शत्रू आहे, ही गोष्ट अस्पृश्यांच्या लक्षात घेतली पाहिजे.
हैद्राबाद संस्थानात हिंदी संघराज्यात सामील झालेच पाहिजे आणि सामील होण्याबद्दल आपण आग्रह धरला पाहिजे. कारण हिंदुस्थानची भौगोलिक एकता आणि अखंडता बिघडू देण्याचा कोणत्याही संस्थानाला अधिकार नाही.
हिंदी संघराज्याला जो विरोध निजामाने चालविला आहे त्याबद्दल यत्किंचितही करता कामा नये निजामाला हे कळले पाहिजे की हिंदी संघराज्यात सामील झाला आणि हिंदी राज्यघटनेने जर त्यांच्या घराण्याला अभय वचन दिले तर त्याचे राजपद सुरक्षित होईल.
इत्तेहादुल मुसलमीन वर विश्वास टाकण्यापेक्षा हिंदूंचा विश्वास संपादन करण्यात त्याला जास्त सुरक्षितता आहे. तथापि, त्याने कसे वागावे हा त्याचा प्रश्न आहे. आज मला फक्त एवढेच तळमळ लागली आहे की माझ्या बांधवांनी त्याला साथ देऊन आपल्या जातीच्या इमानदारीला काळीमा फासू नये. त्यांनी हे लक्षात ठेवावे की निजाम हा त्यांचा आणि त्यांच्या मातृभूमीचा शत्रू आहे."
डॉ. बाबासाहेबांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले होते. दलित उद्धारासाठी रात्रंदिवस संघर्ष चालवलेला सर्व समाज पहात होता त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम आज्ञा मानून दलित समाजाने त्यांच्या आदेशाचे पालन केले. इत्तेहादुलचे धर्मांध डावपेच नंतर अयशस्वी ठरले. कारण डॉ. बाबासाहेब अखंड भारताचे स्वप्न पाहणारे होते. त्यामुळे हैद्राबाद संस्थान भारतास जोडण्यात बाबासाहेबांचा सिहांचा वाटा राहिला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हैद्राबाद संस्थांच्या मुक्तीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. हैद्राबाद संस्थान मुक्त करण्याची कारवाई ही खऱ्या अर्थाने सैनिकी कारवाई होती. परंतु त्यास 'सैनिकी कारवाई' न म्हणता 'पोलीस कारवाई' म्हणावे असा मोलाचा सल्लाही कॅबिनेट चर्चेत बाबासाहेबांनी दिला होता. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पेच प्रसंग उभे राहिले नाही व निजामाचा संयुक्त राष्ट्रांना (UNO) ला मध्यस्ती करण्याचा डाव धुळीस मिळाला. त्यामुळे भारत देश अखंडेतेच्या अतूट धाग्यात जोडण्याचे अनमोल कार्य डॉ.बाबासाहेबांनी केले.
- प्रा. डॉ. सोमीनाथ सारंगधर खाडे, जालना
मो- ८२७५५१५९३८
संदर्भ-
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सहकारी मोरे यांनी पाठवलेले पत्र
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र- धनंजय किर
३) मराठवाडा मुक्तिसंग्राम एक मागोवा या पुस्तकातील श्री सुधीर देशपांडे यांचा लेख.
४) Thought on pakisthan -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या