जेष्ठ संघ प्रचारक बाळकृष्ण (बाळासाहेब) नाईक यांच गोरखपूर येथे १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ला निधन झाल्याची बातमी कानावर पडली. मन सुन्न झालं.
साल १९६४-६५ असावं. बाळासाहेब नुकतेच अमेरीकेतुन एम.एस ची पदवी घेऊन परतले आणि थेट संघ प्रचारक म्हणून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व जिंतूर तालुक्यात व परभणी शहर प्रचारक म्हणून आलेले होते. मी त्या वेळी जिंतूरला असे. स्थानिक शाखेत मुख्य शिक्षक होतो. घरी संघ कामाला विरोध असल्याने कुणी प्रचारक, जिल्हा कार्यकर्ते आले की त्यांच्याशी वाद होत असत. हे बाळासाहेबांनी सहन केलं. पण त्यांचं लौकीक शिक्षण कळल्यानंतर मात्र संवाद घडू लागला.
असेच एकदा बाळासाहेब प्रवासात आले. शिरस्त्याप्रमाणे त्यांनी माझ्या काकांना नमस्कार केला. माझ्या चुलत आजोबांचं निधन झालं असल्याने व काका कर्मठ असल्याने "तुमचा नमस्कार आम्हाला स्विकारायचा नाही," असं म्हणाले. हे वाक्य ऐकताच बाळासाहेबांच्या डोळ्यात पाणी तरळले व ते नम्रपणे म्हणाले, "काका, माझं कांहीं चुकलं का?" हे वाक्य ऐकताच नेमका काय घोटाळा झाला हे काकांच्या ध्यानी आल्याबरोबर त्यांनी कारण सांगितलं... अन् बाळासाहेबांना हायसं वाटलं. पुढे बाळासाहेब जिंतूरला आले की जेवणाचा आग्रह होत असे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत परभणीला एकदा जाणं झालं. ऐन उन्हात बाळासाहेब एका स्वयंसेवकाच्या घरी जेवण करून कार्यालयाकडे निघाले. रखरख ऊन्ह छत्री पण नाही, डोईला पंचा गुंडाळलेला. नानलपेठ ते शिवाजी चौक दरम्यान एक मुलगा सायकलच्या हॅंडलला गव्हाची पिशवी अडकवून येत होता. अचानक बंद तुटला रस्त्यावर गव्हाची रास सडकेवर पडली. पायात चप्पल नाही. इतर वाहनांनी गहू भरडले जाऊ नयेत म्हणून तळमळीने सांडलेले गहू तो मुलगा गहू गोळा करत होता. हे बाळासाहेबांनी पाहिले. त्या मुलाला सावलीत बाजुच्या ओट्यावर बसवलं व डोईवरील पंचाने भरभर गहू पिशवीत त्यांनी भरून दिले. त्याच पंचाने पिशवी सायकलला बांधली, आपल्या पायातली चप्पल त्या मुलाच्या पायात घातली व सायकल घेऊन जायला सांगितलं. स्वत: मात्र सिमेंटच्या रस्त्यावर अनवाणी पायाने कोमटी गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या कार्यालयाकडे निघाले.
गंगाखेडसाठी त्या काळी रेल्वे शिवाय पर्याय नव्हता. सकाळी ३.४० व सायंकाळी ४.३० अशा दोनच गाड्या असत. त्या ही वेळेवर न येण्याबद्दल प्रसिद्ध. पण आपण वेळापत्रकानुसार स्टेशनवर असलं पाहिजे ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. एकदा चुकुन गाडी वेळेवर आली. सोबतच्या स्वयंसेवकांने बाळासाहेबांना तुम्ही गाडीत बसा मी तिकीट घेऊन आलोच असं सांगत बाळासाहेबांना रेल्वेच्या डब्यात बसायला सांगितलं व तो तिकिटासाठी रांगेला लागला. हा तिकिट घेऊन फलाटावर येईपर्यंत गाडी निघाली. दोघे वेगवेगळ्या डब्यात. एका जवळ तिकीट नाही, तर दुसऱ्याजवळ दोन तिकिटे. गाडीने सिंगणापूर स्टेशन सोडता सोडता तिकिट तपासणीस डब्यात आला. बाळासाहेबांच्या जवळ तिकीट नाही. दुटांगी धोतर, बिना ईस्रीचा सदरा, जाड भिंगाचा चष्मा, भरीस भर नम्र व मृदु भाषा. नेमकं काय झालंय ते मृदू स्वरात सांगण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न पाहून तेलगु भाषिक तपासणीस आद्वा तद्वा भाषेत बोलत सुटला. एवढ्यात गंगाखेड आलं. तपासणीसाने जवळ जवळ बकोटीला धरत बाळासाहेबांना फलाटावर आणलं तेवढ्यात स्वयंसेवक बाळासाहेबांना शोधत आला. तिकिट दाखवलं तेंव्हा सुटका झाली. स्वयंसेवक व तपासणीस नेहमीचे असल्याने बाळासाहेब किती शिकलेले आहेत हे त्याने तपासणीसाला सांगितलं. ते ऐकून तो इंग्रजीत बोलुन लागला. त्या नंतर बाळासाहेबांचं इंग्रजी बोलणं ऐकलं आणि खजील होऊन त्यानं क्षमा मागितली.
गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथील एका स्वयंसेवकांच्या घरी सकाळीच दिवस उजाडता उजाडता गेले. कारण एकदा ते शेताला गेले की सायंकाळपर्यंत भेट होणार नाही म्हणून. दिवाळी आसपास असल्याने पती पत्नी गोदावरीवर स्नानाला गेलेले. हे मुख्य दारातुन अंगणात आले. पाहतात तो काय एक बालक गोठ्यात रांगत आलं आणि शेणाने बरबटलेलं. त्यांनी हातातली पिशवी बाजुला ठेवली आणि बाळाला स्वच्छ करायला सुरुवात केली. अनोळखी व्यक्ती असल्याने ते बाळ सुटकेसाठी धडपडत होतं तर बाळासाहेब त्याला स्वच्छ करण्यासाठी. ह्या प्रकारात त्यांचेही अंगावरचे कपडे शेणाने माखले गेले. एवढ्यात गंगास्नान आटोपून आलेलं जोडपं बाळासाबांची ती धडपड पाहून अचंबित झाले. मग लगबगीने त्या बाळाला घेतलं व बाळासाहेबांची पुढची व्यवस्था केली.
एक प्रसंग जिंतूरचा आठवतो.
जिंतूरला शाखा तर लागत होती पण मुस्लीम बहूल (त्या काळी) शहर असल्याने संचलन कधी निघालं नव्हतं. नवरात्रीत अचानक संचलन ठरलं. बाळासाहेबांनीच पोलिस ठाण्यात अर्ज दिला. मोजून नऊ स्वयंसेवकांच संचलन! एकाचा ही पूर्ण गणवेश नाही. बाळासाहेबांनी संचलन काढण्याच धाडस कसं केलं हीच चर्चा. पुढच्याच वर्षी बाळासाहेब बंगाल मधे गेले. तिथे ते 'केष्टोदा' (बाळकृष्ण) ह्या नावाने नावाजले. संघशिक्षा वर्गाच्या निमित्ताने त्यांची भेट होत असे.
दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर मधे खूप वर्षांनी घरी दिवाळी निमित्त आले होते त्या वेळी आमच्या नगरात त्यांच्या हस्ते सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या पत्नीला साडीचोळी, मुलांना कपडे, फटाके व मिठाई वाटप असा उपक्रम घेतला होता. त्या वेळी साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता.
मला घडविण्यात बाळासाहेबांचा बराच वाटा आहे.
ईश्वर बाळासाहेबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देणार ह्यात शंकाच नाही.
"परीसाच्या संगे लोह बिघडले,
लोह बिघडले सुवर्णची झाले..."
अशा गीताच्या ओळी आठवतात.
बाळासाहेब नावाच्या संघ प्रचारकरुपी परीसाचा स्पर्श होऊन पावन झालो. एवढंच ह्या नीमित्ताने.
@ रवींद्र देशपांडे
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या