🪔 नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती 🪔
" सर्वशक्तिमान श्री परमेश्वर..... तथा अपने पूर्वजों का स्मरण कर... मैं प्रतिज्ञा करता हूं कि अपने पवित्र हिंदूधर्म.... हिंदू संस्कृती तथा हिंदू समाज का संरक्षण कर.... हिंदुराष्ट्र की सर्वांगीण उन्नती करनेके लिए.....मैं राष्ट्रीय स्वयंसेवक संघका घटक बना हूं......संघ का कार्य....मैं प्रामाणिकतासे...... निस्वार्थ बुद्धीसे... तथा तन-मन-धन पूर्वक करूँगा.... और इस व्रतका मैं.... आजन्म पालन करूँगा.... भारत माता की जय ! "
आपण सर्वजण या प्रतिज्ञेने बांधलेलो संघाचे स्वयंसेवक आहोत. ही प्रतिज्ञा केवळ शब्दांचे बुडबुडे नसून अंत:करणापासून आलेला भाव आहे. अण्णांचे व्यक्तिचित्र लिहीत असताना त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेचा उल्लेख करणे आवश्यक समजतो कारण जीवनभर त्यांनी या प्रतिज्ञेप्रमाणे आचरण केले. संघाच्या शाखेत एक पद्य म्हटले जाते,
" शपथ लेना तो सरल है, पर निभाना ही कठीन है ।
साधना का पथ कठीन है...
जीवनात व्यक्तिगत पातळीवर संघ कार्यासाठी समर्पित भावनेने कार्य तर अण्णांनी केलेच परंतु आपल्याबरोबर अनेकांना संघ कार्यात त्याच भावनेने जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या साध्या बोलण्यातून वागणुकीतून संघाचे दर्शन होत असे. माझ्या बरोबरीचे अनेक तरुण अण्णांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले होते. त्याकाळात अण्णा आमचे गणशिक्षक होते. शारीरिक विषयात अण्णा विशेष लक्ष देत असत. माझा तृतीय वर्षाचा शारीरिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे श्रेय मी अण्णांना देतो.
माझे तृतीय वर्ष (संघ शिक्षा वर्ग) 1971 मधे प.पूजनीय श्रीगुरुजी हयात असतांना नागपूरला झाले.मी स्वतःला भाग्यवान समजतो,त्यावेळी वर्गाचे सर्वाधिकारी मा.श्री बच्छराजजी व्यास होते.केंद्रीय कार्यकारिणीत असलेल्या सर्वांचे बौद्धिक ऐकण्याचे भाग्य मला मिळाले.तृतीय वर्षाला जाण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य असत,त्यात शारीरिक विषयाबद्दल आग्रह असे. जसे दंड,खडग्,पदविन्यास,व्यायामयोग,संचलनअभ्यास वगैरे. या सर्व गोष्टी माझ्या बरोबर असलेल्या तरुणांच्या तृतीय वर्ष होण्या अगोदरच तयार होत्या.
माझा व अण्णांचा परिचय मी बाल स्वयंसेवक असल्यापासून होता.अण्णांनी कांही काळ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले.ते शिक्षक असतांना अनेक विद्यार्थी संघाचे स्वयंसेवक झालेत.अण्णा विद्यार्थी प्रिय शिक्षक होते,शाळेत इतिहासाच्या तासाला विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत.संघाचा कार्यकर्ता शाळेत शिक्षक असल्यास शाळेचे वातावरण संघमय होते,अण्णामुळे तसे वातावरण शाळेचे झाले होते.
जळगांवला माझ्या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांना त्याकाळात शारीरिकची आवड लावणारे अण्णा जोशी ही ऊत्साही व्यक्ती होती.अण्णा शारीरिक घेता घेता त्यात असलेले बौद्धिकही समजावून सांगत होते.दंड क्रमिका शिकवत असतांना सिध्दमध्ये पहिल्या मोह-या कडे दृष्टी स्थिर ठेवून नंतर ज्या मोह-यावर दंड क्रमिका करायची आहे त्या दिशेला आपली नजर असली पाहिजे.नजर आपल्या प्रतिस्पर्ध्यावर रोखलेली पाहिजे.असे केल्यामुळे आपण अर्धी लढाई नजरेमुळे जिंकू शकतो.इतके सूक्ष्म बारकावे अण्णा आम्हाला शिकवत असत.
अण्णांचा जन्म 11 एप्रिल 1942 ला झाला.अण्णांचे वडिल कै. लक्ष्मण अण्णाजी जोशी अमळनेर येथे सब रजिस्ट्रार म्हणून रिटायर होऊन जळगांव येथे स्थायिक झाले.अण्णांचे माध्यमिक शिक्षण ला.ना.सार्वजनिक विद्यालयात जळगांव येथे झाले.बालपणा पासून रा.स्व.संघाशी जोडले गेल्यामुळे संघाची आचार विचार पध्दती आत्मसात केली होती.महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर ला.ना.सार्वजनिक शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते.हे करत असतांना ते बी.एड.झाले.वडिलांची इच्छा अण्णांनी वकील व्हावे.वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अण्णांनी लाॅ चे शिक्षण शिक्षकाची नोकरी करत असतांना सागर विद्यापीठात (मध्य प्रदेश) पूर्ण केले.
अण्णांचे लग्न होण्यापूर्वी ते अध्यात्माकडे आकर्षित झाले होते.पूजनीय गुळवणी महाराज यांचे ते शिष्य होते.पूजनीय गुळवणी महाराजांनी अण्णांना अनुग्रह देखील दिला होता.ध्यान व साधने मुळे त्यांना विरक्ती आली होती.दुसरीकडे संघ शाखेचे आकर्षण होते.समाजाचे संघटन केवळ संघाची विचारसरणीच करु शकेल हा विश्वास होता.त्यामुळे अण्णा द्विधा मनःस्थितीत होते.संघ कामात लक्ष घातले की अध्यात्माकडे दुर्लक्ष होईल आणि पूर्ण लक्ष अध्यात्माकडे घातले तर संघ काम जे समाजासाठी आवश्यक आहे ते करु शकणार नाही.
अशा द्विधा मनःस्थितीत असतांना अण्णांनी पूजनीय गुळवणी महाराजांनाच याविषयी विचारणा केली असता, महाराजांनी अण्णांना संसार करुन संघाचे कार्य करायची सूचना केली.
एक वर्ष नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ते प्रचारक होते. प्रचारक म्हणून थांबल्यावर अण्णांनी वकीली सुरु केली.अण्णांचा विवाह सौ.प्रतिभा यांचे बरोबर झाला.त्या मुलजी जेठा काॅलेज मधे प्राध्यापिका होत्या.अण्णांना दोन मुली व एक मुलगा. सर्वांचे विवाह होऊन सुखाने संसार करत आहेत.अण्णांना दोन भाऊ. ते पुण्यात स्थायिक आहेत.
एक बहीण सौ.उषा शिरपूर ला असते.अण्णा जळगांवला स्थायिक नसल्याने माझा अण्णांचे लहान बंधु दिनेश यांचे शिवाय बाकी कोणाशी परिचय नव्हता.
अण्णा वकीलीचा व्यवसाय करत असतांना जळगांवला भीषण जातीय दंगल झाली होती. ब-याच संघस्वयंसेवकांना ३०२ कलमाखाली अटक झाली होती. दंगलीला रा.स्व.संघ जबाबदार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्ष करत असल्याने ब-याच स्वयंसेवकांना अटक करण्यात आली.सर्व हिंदू बांधवांना मुक्त करण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध वकील व प्रांत संघचालक मा.कै.बाबाराव भिडे यांनी सर्व आरोपींच्या वतीने वकील पत्र घेतले होते व त्यांना सहाय्यक अण्णा जोशी होते.मा.बाबाराव भिडेंच्या अनुभवाचा फायदा अण्णांना झाला.दंगल केस मधे सर्व निर्दोष मुक्त झाले.पुढे अण्णा न्यायाधीशाची परिक्षा उत्तीर्ण झाले व पदोन्नतीने जिल्हा न्यायाधीश होऊन निवृत्त झाले.
मंतरलेले दिवस -
अण्णांच्या सहवासात 55 वर्षापूर्वीचे दिवस आजही उत्साहित करतात.संघ शाखेचे वैशिष्ट्य असे की शाखेत गणशिक्षक जसा वागतो,बोलतो तसे आचरण गणातले स्वयंसेवक अनुसरत असतात.आमच्या भाग्याने अण्णा जोशीं सारखा गणशिक्षक आम्हाला लाभला.
अण्णा केवळ गणशिक्षक नव्हते तर उत्तम मार्गदर्शक होते.ते आम्हा तरुण कार्यकर्त्यांशी संवाद करतांना म्हणत असत,"आपण संघाचे काम करतो याचा अर्थ कोणी जर असा काढत असेल,की हे काम रिकाम्या लोकांचे काम आहे,तेंव्हा अशा लोकांना संघात आणण्यात वेळ घालवू नका.आपल्याला राष्ट्र कार्य करायचे असल्यामुळे अशा लोकांची समजूत घालण्यात वेळ घालवू नका."
नवीन पिढीतले तरूण जिज्ञासाने विचारतात, कसे होते तुमचे गणशिक्षक अण्णा जोशी? मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतांना,अण्णा प्रभावी वक्ता होते,तरुणांशी संवाद करुन त्यांना संघ विचारांशी जोडत असत.त्यांच्या बोलण्यात नेहमी उत्साह व सकारात्मकता जाणवत असे,कुठेही निराशा दिसत नसे.तरुण असतांना मनासमोर चित्रपटातला अभिनेता समोर येऊन त्याच्या व्यक्तिमत्वाची एखाद्या व्यक्तीशी तुलना आम्ही करत असू.अण्णांची तुलना आम्ही देवआनंदशी करत होतो.देवआनंद आयुष्यात कधी निराश झालेला नाही,त्यांचे अनेक पिक्चर फ्लाॅप झाले परंतु नैराश्य न येता सतत क्रियाशील राहीले.दुस-यांना आनंद देत देत या जगाचा निरोप घेतला.
संघाची जबाबदारी घेऊन काम करतांना आम्हा तरुण कार्यकर्त्यांना अण्णांच्या मार्गदर्शनाचा उपयोग झाला.संघाचे काम करतांना नेतृत्व गुणांची आवश्यकताअसते त्याचे श्रेय अण्णां कडे जाते
अण्णांचे जीवनही असेच होते.न्यायाधीश असतांना व निवृत्त झाल्यावर संघ विचाराशी कधी प्रतारणा केली नाही.सतत क्रियाशील राहीले.ऊत्साह व प्रेरणा देण्याचे कार्य कधी थांबले नाही.कोवीडच्या महामारीत हाॅस्पीटल मधे असतांना देखील यातून बाहेर पडून परत संघ कार्य करण्यास येईन,असे संभाषण जळगांवच्या प्रभाकरपंत कुळकर्णी यांच्याशी मृत्यू पूर्वी एक दिवस अगोदर केले होते.परंतु परमेश्वराची इच्छा वेगळी होती. 29 नोव्हेंबरला अण्णांची तब्येत जास्त बिघडली. संघ विचाराचे आम्ही सहप्रवासी यांना वंचिका (हुलकावणी) देवून अण्णा अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
दीपक गजानन घाणेकर
( 9423187480 )
मनोगत -
( 1 )
कै. अण्णा जोशी यांचे वडील बंधू श्री. सुरेश लक्ष्मण जोशी ( पुणे )
" ध्येय आपुले विकसित जीवन,
राष्ट्रासाठी व्हावे अर्पण ! "
माझा धाकटा भाऊ प्रभाकर लक्ष्मण जोशी उर्फ अण्णा जोशी याचे संपूर्ण जीवन संघ विचारांनी भरलेले होते. शिक्षणाची एक पदवी घेतल्यावर शिक्षक, नंतर कायद्याची पदवी मिळाल्यावर वकिली, संघ प्रचारक, स्पर्धा परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश आणि निवृत्तीनंतर संघ कार्य, माणसे जोडण्याच्या कुशलतेने परिपूर्ण.
त्याच्या संघ कार्यात नियोजन हे महत्त्वपूर्ण असते हे संघ स्वयंसेवकांच्या मनात बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न असे. त्याचा आध्यात्मिकतेचा कल दीक्षा देणाऱ्या गुरूंनी वेळीच समाजाभिमुख केल्याने एक बहुश्रुत, विद्वान व निष्ठावान कार्यकर्ता संघ समर्पित झाला. त्याच्या घडण्यात कै. नानाराव ढोबळे, कै. आप्पाजी ओलतीकर, कै. बाबाराव भिडे इ.अनेक थोर विभूतींचा सहभाग आहे. आदिवासी भाग मानपाडा चे संघचालक हे कठीण दायित्व तो यशस्वीपणे पार पाडत होता.
जळगांवचा तो शहर कार्यवाह असतांना अनेक व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या. त्यांच्या मनात अण्णा विषयी नित्य आदर भाव व प्रेम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून प्रगट होत असलेले मी अनुभवले आहे. असा धाकटा भाऊ मिळणे हे माझे भाग्य आहे त्याच्या आत्म्यास मुक्ती मिळो ही परमेश्वरास प्रार्थना आहे.
सुरेश लक्ष्मण जोशी ( पुणे )
( 9850290470 )
( 2 )
कै. अण्णा जोशी यांचे मित्र
श्री. अप्पा चव्हाण ( मुंबई )
अण्णा जोशी आज आपल्यात नाहीत या वस्तुस्थितीवर अजूनही विश्वास बसत नाही. covid-19 झाल्यावर रुग्णालयात असताना आपल्या आनंदी स्वभावाने, गाणी, गप्पा, हास्य विनोदाने इतर रुग्णांच्या मनावरचा ताण सहजपणे दूर करणारी व्यक्ती
अगदी थोड्या अवधीत होत्याची नव्हती झाली. इतक्या अकस्मात ही दुर्दैवी आघात करणारी घटना घडली म्हणून अतिशय वाईट वाटते. मनस्वी दुःख होते. स्वर्गीय अण्णांचा आणि आम्हा जळगांवच्या स्वयंसेवकांचा अगदी जुना म्हणजे 64/ 65 वर्षापासून चा संबंध. दैनिक शाखा, उत्सव, शिबिरे इत्यादी कार्यक्रम म्हणजे आम्हाला आनंदाची आणि उत्साहाची पर्वणीच. या सर्वात नेहमीच अण्णा अग्रभागी असत. अण्णांचे घर म्हणजे संघाचे घर. अतिशय कष्टाने आणि चिकाटीने न्यायशास्त्राचे शिक्षण त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं होतं. मूळच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने, अभ्यासू वृत्तीने त्यांनी वकील म्हणून चांगला नावलौकिक प्राप्त केला होता, जळगांवला झालेल्या दंगली संबंधीच्या खटल्यांमध्ये त्यांना मा.कै. बाबाराव भिडे यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याचा योग आला होता. जीवनातला काही काळ ते नांदेड जिल्ह्यात प्रचारकही होते. न्यायाधीश म्हणून अनेक ठिकाणी अत्यंत यशस्वी आणि प्रभावी कारकीर्द त्यांनी पूर्ण केली.
मुंबईला कुटुंब न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश असताना अत्यंत सहृदयतेने कुटुंब न्यायालय प्रणालीच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. निवृत्तीनंतर ठाणे जिल्ह्यात माननीय संघचालक म्हणून त्यांचेवर दायित्व सोपविले. हा काळ अगदी अविस्मरणीय झाला. संघशरण वृत्तीमुळे, आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे अण्णांनी अल्पावधीतच विशाल असा आप्तांचा गोतावळा गोळा करून शाखा विस्तार केला. घरोघरी, सर्व स्तरात त्यांचा प्रेमाचा संपर्क वाढला. त्यांचे बौद्धिक, संघ अधिष्ठान, विद्वत्ता, विषयाचं सखोल ज्ञान आणि वक्तृत्व या गुणांचा सहज परिचय व्हायचा. बुद्धिमत्तेची चमक अनुभवाला यायची. कांही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यात संघ गीत गायनातही त्यांनी अत्यंत उत्साहात लेकीसह भाग घेतला होता. आमचा नित्य संपर्क असल्याने सुखदुःखाचा संवाद नेहमीच व्हायचा. जिवाभावाचा मित्र, बंध, सखा गेल्याचं दुःख वाट्याला आलं एवढं मात्र खरं. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना.
- अप्पा चव्हाण ( मुंबई )
( 9967533517 )
0 टिप्पण्या