श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्व: भाग ६ - राम आणि भरत भेट प्रसंग



     वनवासात भरद्वाज मुनींच्या मार्गदर्शनाने चित्रकूट पर्वतावर राम,लक्ष्मण, जानकी वास्तव्य करीत असताना भरत वास्तव समजल्यावर त्यांच्या शोधात निघाले आणि रामांना भेटले. अर्थातच भेटल्यानंतर भरताने श्री रामासमोर अयोध्येला परतण्याचा विचार मांडला. त्याला श्रीराम नकार देतात, पण भरत आपली बाजू मांडून रामानेच सिंहासनावर बसावे यासाठी आग्रह करतो. अनेक मार्गांनी रामांनी परतावे आणि सिंहासनी बसावे यासाठी हृदयस्थ कळकळ व्यक्त करतो, पण प्रत्येक वेळी राम नकार देतात आणि आपल्या न परतण्याची कारणे देतात यामध्ये रामाने भरताची जी समजूत घातली आहे. त्यातून रामांचे पुरुषोत्तमत्व तर दिसतेच, पण मर्यादानिग्रह, वचनपूर्ती याचेही दर्शन होते. आपल्या वक्तव्यातून आपल्या घराण्याच्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न राम भरताला समजवतात. कोणी एक मनात आणि दुसरं कोणीतरी सिंहासनावर अशी महाराजांची इच्छा नव्हती, तर रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक अशी नावे घेऊन महाराजांना साक्षीला ठेवून मातेने सांगितले आहे हे रामांनी भरताला पटवले. 

     रघुकुळातील वचनाचे महत्त्व सांगून प्रिय भरताला म्हणाले, महाराजांना प्रिय असलेल्या आपल्या वचनभंगाने वडीलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्याची भीती आहे. रीतीप्रमाणे ज्येष्ठ पुत्र सिंहासनावर बसतो हे खरे आहे, पण मी ज्येष्ठ आहे म्हणूनच मी राजा होणार होतो, पण नियतीच्या मनात ते नाही असे अतिशय शांतपणे व सौम्य शब्दात वास्तवाचे वर्णन राम करतात. पत्नीला दिलेल्या वचनामुळे दशरथ महाराजांची घालमेल रामांना माहिती होती. आपल्या वचनपूर्तीसाठी महाराजांनी जे केले ते योग्य होते. भरता मग मी त्यांना दिलेले वचन कसे मोडणार? तुझ्या आग्रहास्तव माझ्या अयोध्येला येण्याने रघुकुळाची आजवरची परंपरा मी कशी मोडू यात महाराजांचाही अपमान होईल. समाज त्यांना बोलेल. वचन भोक्ता समजणाऱ्या राजाने मुलांवर हेच संस्कार केले का, असं लोकांना वाटेल आणि भरता आपल्या जन्मदात्यांना कोणी नावे ठेवलेली आपल्याला तरी सहन होतील का? जीवनाचे तत्वज्ञान अगदी समजेल अशा शब्दात रामाने भरताला समजावले. मी वनात राहून माझे वचन पाळीन आणि तू राजा हो आणि तुझ्या कर्तव्याचे पालन कर. यामुळे आपल्या कुळाचे नाव उज्वल राहणार आहे."

     राम पुढे सांगतात, "समाजाचा त्राता म्हणून तू राज्याचा स्वीकार कर, मी  पितृआज्ञा म्हणून वनवास स्वीकारला आहे. ठरवून दिलेली कामे पूर्ण करून आपण कृतज्ञता प्राप्त करू शकतो. मला तर इथे वनात राहून अजिबात दुःख नाही. मी नसल्याचं दुःख पचवू शकत नाही, हे अयोध्येच्या भावी राजाला शोभेल असे नाही. अशा शब्दात रामाने भरताना समजावले.

     केवळ जेष्ठ पुत्राच्या अधिकाराने मिळणारे राज्यपद रामांनी अगदी सहजपणे सोडले. तसेच, आपणास आग्रह करून नेणारा भाऊ भेटला तरीही राम सिंहासनावर असा अधिकार सोडतात, म्हणून माणूस म्हणून जन्माला आलेल्या स्वभावतः मोह, लोभ, अपेक्षा, आनंद, सुख-सुविधा हव्याच असतात. त्यात सत्ता, मत्ता, मोठेपण, मानमरातब हे चालून आल्यावर त्यावर आरूढ न होता त्याचा त्याग आनंदाने करणारा पहिला माणूस म्हणजे श्रीराम आहेत.

     भरताला त्यांनी केलेल्या ह्या उपदेशातून एक खरा सच्चा माणूस तर दिसतोच. पण कर्तव्यदक्षताही दिसते. कुलपरंपरा दिसते. वचनपूर्ती करणाऱ्या रामांना शत शत प्रणाम केले तरी कमीच आहेत. सुखासीनतेला दूर सारून वनातले कष्ट त्यांना क्षुल्लक वाटतात, कारण ठरवलेल्या ध्येय मार्गावरून चालण्याची ध्येयपूर्ती करण्याची संधी राम सोडत नाहीत. या त्यांच्या निर्णयामुळेच राम खूप श्रेष्ठ ठरतात.

     भरताला परत पाठवताना त्याच्या मनासारखं आपण वागू शकत नाही त्यामुळे नाराज झालेल्या भरताला राम पाहू शकत नव्हते. पण त्याच्यासाठी काय करावं ह्या विचारात असतानाच भरत रामांच्या पादुकांचा आग्रह धरतो. त्यावेळी किती साधा पण फार महत्त्वाचा विचार त्यांच्या मनात येतो पहा... आपल्याला इतरांनी ऐकावं असं वाटत असतं, त्याचवेळी आपण किती जणांचे ऐकतो याचा विचार कोण करतो? पण यावेळी तो रामांनी केला. आपल्या मनासारखं वागून भरत परत जायला निघाला आहे हे पाहिल्यावर भरताच्या मनासारखं वागण्याची रामांना संधी मिळाली. भरताच्या मागणीला त्यांनी होकार दिला. भरताच्या मनासारखं करून रामाने स्वतःच्या पादुका त्यांना दिल्या. रामाच्या पादुका मिळाल्याचा आनंदामुळे रामसुद्धा आनंदीत झाले.

     जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे राम हे राम चरित्रातील श्रेष्ठ धर्म विचारवंत वाटतात. माणूस म्हणून असलेल्या सर्व नात्यांच्या मर्यादा रामांनी कधीच ओलांडल्या नाहीत. प्रत्येक नात्याला त्यांनी योग्य न्याय दिला आणि जीवन व्यतीत करीत असताना येणाऱ्या संकटांना योग्य बगल देऊन माणुसकी जपली. रामाने आपल्या आयुष्यात त्यागाला फार महत्त्व दिलेले दिसते. त्यांचा आदर्श संभाळण्याचा आजही प्रयत्न होतोय. 'कुटुंबवत्सल राम' आणि 'राजा' म्हणून पुढच्या आयुष्यात जगणारा राम या दोन्ही व्यक्तिमत्त्वातील राजा असलेला राम दरवेळी विजयी झालेला दिसतो. म्हणून राजा म्हणून माणूस म्हणून तो आजही आदर्शवत आहे. जीवनात येणाऱ्या उतारावरून चालताना त्यांनी नशिबाला कधीच दोष दिला नाही. पूर्वसंचितावर त्यांचा पूर्ण भरवसा होता. असे गुणसंचय असणारे श्रीराम प्रभू पदाला पोहोचले यात नवल कमी आणि समाधान जास्त आहे. रामाचे चरित्र नीट मनापासून ऐकणारा वाचणारा त्यांच्या प्रभुपदास हजारदा नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही.

- नीला रानडे, धुळे
  मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या