अहिल्यादेवी होळकर

 

महादेवाचे मंदिर आणि त्याशेजारी बारव असे असेल तर आपल्या डोळ्यासमोर एकच नाव दिसते ते म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे. हिंदूत्वनिष्ठ आणि धर्मपरायण असलेल्या अहिल्यादेवी यांचा जन्म माणकोजी शिंदे यांच्या घरी आजच्याच दिवशी १७२५ साली चौंडी येथे झाला. अहिल्यादेवी यांचा विवाह मराठेशाहीचे स्तंभ असलेल्या मल्हारराव होळकर यांच्या पुत्राशी झाला. पण दुर्दैवाने कुंभेरीच्या लढाईत त्यांच्या पतीला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी सती जाण्याचे निश्चित केले पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी तसं करण्यापासून परावृत्त केले. आणि राज्य सांभाळण्यासाठी सांगितले.

११ डिसेंबर १७६७ रोजी अहिल्यादेवी होळकर या माळवा प्रांताच्या महाराणी झाल्या. अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात विविध भागात मंदिरे, अन्नछत्रे, धर्मशाळा बांधल्या. त्यांनी इंदोर या छोट्याशा गावाचे परिवर्तन एका सुंदर शहरात केले. माळव्यामध्ये रस्ते बांधकाम, किल्ल्याचे बांधकाम भरपूर प्रमाणात केले.अहिल्यादेवी होळकर यांनी द्वारका, रामेश्वर, बद्रीनारायण, सोमनाथ, अयोध्या, जगन्नाथ पुरी, काशी, गया, मथुरा, हरिद्वार आणि विविध ठिकाणी प्रसिद्ध व भव्य मंदिरांचे जिर्णोद्धार केले. तिथे त्यांनी धर्मशाळा बांधल्या.

हरवलेली प्रतिष्ठा पुनः स्थापित करताना त्यांनी त्यांच्या पहिल्याच युद्धात गोहाडचा किल्ला जिंकून आपल्या शौर्याचे दर्शन घडवले. धार्मिकतेसोबतच वीरतेचे दर्शन त्यांनी घडवले. देवी अहिल्याबाई होळकर या न्यायाप्रती फार जागरूक होत्या. त्यांनी राज्यात नियमबद्ध न्यायालयांची स्थापना केली. गावात पंचायतींना न्यायदानाचे अधिकार दिले.

अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण करताना विधवा महिलांना त्यांचा अधिकार मिळावा म्हणून कायद्यात बदल केले. विधवांना त्यांच्या पतीची संपत्ती मिळावी यासाठी कायदा केला.अहिल्यादेवी यांनी विधवांना पुत्र दत्तक घेण्याचा नियम केला. त्यापुर्वी विधवांची संपत्ती राजकोषात जमा केली जाई आणि दत्तक विधान करण्याचा अधिकार देखील नव्हता.

राणी अहिल्यादेवी शिवभक्त होत्या. त्यांनी त्यांच्या शासन काळामध्ये शिक्क्यांवर 'शिवलिंग आणि नंदी' अंकित केले.अहिल्यादेवी राजाज्ञांवर हस्ताक्षर करताना स्वतःच्या नावाऐवजी श्रीशंकर असं लिहित.अहिल्यादेवी होळकर यांनी वारंवार आपला अधिकारी वर्ग बदलला नाही. पण तरीही प्रशासनात एकाधिकारशाही होणार नाही याची काळजी घेतली.अहिल्यादेवी यांनी वारंवार युद्ध केले नाही. चंद्रावत याने होळकर शासनामध्ये विद्रोह करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अहिल्यादेवी आणि चंद्रावत यांच्या युद्धात अहिल्यादेवी विजयी झाल्या होत्या.अहिल्यादेवी होळकर यांनी 'शेतकरी सुखी तर देश सुखी' या धोरणाने शेतकऱ्यांवर दडपण येईल असे कर लावले नाही.अवर्षण किंवा दुष्काळ असेल तर कर माफ केला जाई.

१७८३ साली अहिल्यादेवी यांनी महेश्वर पासून पुण्यापर्यंत डाकव्यवस्थेचा प्रारंभ केला. त्याची जबाबदारी त्यांनी पद्मसी नेन्सी नावाच्या कंपनीला देण्यात आली.बद्रिनारायण पासून ते रामेश्वर आणि द्वारका पासून भुवनेश्वर पर्यंत अनेक मंदिरांचे जिर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केले.अहिल्यादेवी होळकर यांनी सामान्य कलाकारांसाठी सुविधा उपलब्ध केल्या. विणकर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, उद्योगांसाठी धन तसेच कपडा विक्रीसाठी व्यवस्था निर्माण केली.

कुशल प्रशासनामुळे प्रजेसाठी त्या देवी समान होत्या. आणि तेव्हापासून आदराने त्यांचा उल्लेख अहिल्यादेवी होळकर असा होऊ लागल्या. अशा कुशल प्रशासक,धर्मपरायण, कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन.

🖋️ मयूर चंद्रकांत लंबे

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या