सावरकरांची ज्ञानसाधना...



सावरकर एक अमोघ वक्ते होते. वयाच्या 12 व्या वर्षाच्या सुमारास त्यांनी वक्तृत्व कलेवरील दोन पुस्तके वाचली होती. पेशव्यांच्या व छत्रपतींच्या बखरींचीअनेक पारायणे त्यांनी केली, तुकाराम व रामदास त्यांच्या जिव्हाग्री असत.

     जगातील विविध लेखक व तत्त्वज्ञ यांचे ग्रंथ नी ग्रंथ सावरकरांनी वाचले होते. त्यातील काही त्यांच्या मनात घर करून बसले होते. त्या संबंधित एक उदाहरण, मराठीत व्यक्ती नावाचा उल्लेख करताना इंग्रजी आद्याक्षरे वापरण्याच्या सवयीवर सावरकर टीका करीत, हा विषय आपल्या 'भाषाशुद्धी' या पुस्तकात मांडताना ते प्रश्न विचारतात कोणत्याही इंग्रजाने कधीही आपले जॉन स्टुअर्ट मिल हे नाव जॉ. स्टु.मिल असे लिहिलेले दिसते का? इथे उदाहरण देताना सावरकरांना जे नाव आठवले ते एखाद्या इंग्रज सेनापतीचे किंवा पंतप्रधानाचे नाही, तर मिल या तत्त्ववेत्त्याचे आठवले. मिल हा उदारमतवादी इंग्रज तत्त्वज्ञ ,अर्थतज्ञ व लेखक व्यक्ती स्वातंत्र्य व उपयुक्ततावादाचे पुरस्कर्ते , महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा असे संसदेत मांडणारे पहिले ब्रिटिश संसदपटू होते.

       सावरकरांना संस्कृत वांग्मयाची गोडी विद्यार्थीदशेतच लागली" तत्त्व आणि कविता यांची सांगड संस्कृत कवीच घालू जाणत" अशा शब्दात त्यांनी संस्कृत कवींची स्तुती केली आहे. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आयत्या वेळेच्या सूचनेवरून त्यांनी ' कालिदासाची स्त्री दृष्टी' या विषयावर एक व्याख्यान दिले होते. हे व्याख्यान देत असताना कालीदासाचे श्लोकामागून श्लोक जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागले ,तेव्हा त्यांच्या विद्वत्तेविषयी शंका घेणारी मंडळी चकित होऊन गेली. सावरकरांच्या उत्कृष्ट भाषणांपैकी ते एक भाषण होते अशी आठवण श्री अ .सं. भिडे सांगतात.

      सावरकरांचा वेद काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास होता. त्यांच्या वाचनाचा अंदाज त्यांनी लिहिलेल्या 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथातून येतो. हा ग्रंथ त्यांनी खूप उतारवयात व प्रकृतीस्वास्थ्य नसताना लिहिला होता. त्यामुळे त्यात सविस्तर संदर्भ आले नव्हते, ही उणीव या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करणारे श्री श्री. त्र्य. गोडबोले यांनी ग्रंथातील महत्त्वाच्या विभागांना परिश्रमपूर्वक आधार देऊन भरून काढली आहे. श्री गोडबोले यांनी दिलेल्या संदर्भ ग्रंथांची संख्या दोनशेहून अधिक आहे, म्हणजे सावरकरांनी हे ग्रंथ केव्हातरी निश्चित वाचले होते. याच ग्रंथाच्या सुरुवातीला चौथ्या परिच्छेदांमध्ये सावरकर म्हणतात , 'इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनातील नि घटनांतील स्थळ नि काळ ही जवळजवळ निश्चितीने तरी सांगता आली पाहिजेत आणि त्यातील घटनांना परकीय व स्वकीय अवांतर पुराव्यांचे शक्यतो पाठबळ मिळत असले पाहिजे '.म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या या चारशे सोळा पानी ग्रंथातील प्रत्येक घटना वा प्रसंगासाठी त्यांनी अशा प्रकारचे संदर्भ शोधले असतील यावरून त्यांच्या अभ्यासाची आपल्या सगळ्यांना कल्पना येऊ शकते.

       अंदमानच्या सेल्युलर जेल च्या कोपऱ्यातील एक कोठडी. त्यात पस्तीस- चाळीशीचा एक बंदिवान आहे. त्याने गळ्यात घातलेल्या लोखंडी बिल्ल्यावर  सुटकेचे वर्ष 1960 व 'डेंजरस' या अर्थाचे 'डी' असे खोदलेले! कोठडी बदलल्यावर तेथे येणाऱ्याच्या ज्ञानात भर पडावी म्हणून भिंतीवर त्याने जॉन स्टुअर्ट मिलच्या ग्रंथातील व्याख्या कोरून ठेवल्या आहेत, कोलू ओढून व काथ्या कुटून व वर्षानुवर्ष अमानवीय अन्न खाऊन झिजलेलें त्यांचे शरीर रात्री लाकडी फळीवर विसावल्यावर, त्या दिवा  नसलेल्या कोठडीत उपनिषदांचा विचार करीत आहे, हे चित्र डोळ्यासमोर आणले की ,सावरकरांच्या लोकोत्तर ज्ञानसाधनेची कल्पना येईल. खरं म्हणजे उपनिषदांनाही असा साधक कधी भेटला नसेल.
                    
- निलेश खांडवेकर, भुसावळ

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या