अप्रसिद्ध असूनही 'युगप्रवर्तक' ठरलेले डॉ. हेडगेवार !

आपल्या कार्याचे स्वरूप व्यक्तिनिरपेक्ष आणि ध्येय सापेक्ष असावे असा अभिनव विचार मांडणारे डॉक्टर हेडगेवार संघ वर्तुळात पूजनीय असले तरी एकूण समाजात त्यांचे नाव फारसे प्रसिद्ध नाही. त्यांच्या जयंती पुण्यतिथीला ना सरकारी कार्यक्रम होतात, ना दूरदर्शनवर त्यांची छबी झळकते. शालेय अभ्यासक्रमात त्यांचे नाव अभावानेच सापडतात.

डॉक्टरांच्या पेक्षा किर्तीवंत नेते आपल्या देशात होऊन गेले आहेत. त्यांच्या काळात कर्तृत्व गाजवलेल्या अनेक मातब्बर नेत्यांचे कार्य त्यांच्यानंतर विराम पावली. कदाचित त्यांच्या व्यक्तित्वाची उंची इतकी अधिक होती की त्याच्या समोर त्यांचे कार्य खुजे ठरले असावे. या उलट डॉक्टरांनी आपले संपूर्ण व्यक्तित्व स्वीकृत कार्यात विलीन करून टाकले होते. त्यामुळे डॉक्टर गेल्यानंतरही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू राहिले. इतकेच नव्हे तर ते क्रमाक्रमाने वृद्धिंगत होत गेले. 

डॉक्टरांचे विभूती महत्व आणि युगप्रवर्तकत्व त्यांच्या व्यक्तिगत अप्रसिद्धीत सामावलेले आहे. दिक्कालाला घेऊन जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या पुरुषाने डॉक्टरांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेत "युगप्रवर्तक कोण" याविषयी विचार व्यक्त केले होते. 

'युगप्रवर्तक' किंवा 'शककर्ते' त्यांच्या काळात त्या पदाला पोहोचत नाहीत. त्यांचे कार्य पुढे चालले नि यशस्वी झाले तरच त्यांचे संस्थापक युगप्रवर्तक व शककर्ते ठरतात. असे भविष्यदर्शी उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुखातून बाहेर पडले आहेत. स्वातंत्र्यवीरांनी सांगितलेल्या या युगप्रवर्तक पदाच्या कसोटीवर डॉक्टर हेडगेवार पुरेपूर उतरतात हे वेगळे सांगायला नको.

डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतः ध्येयनिष्ठ पुढे व्यक्ती निष्ठेला गौन म्हणले आहे त्यामुळे वास्तविक संघाची संघ निर्मात्याची अथवा कोणा महापुरुषांची जुबिली साजरी करण्याची संघाची रीत राहिलेली नाही. म्हणूनच संघाने गुरुपदी व्यक्ती ऐवजी सतत प्रेरणा व संघर्षाचा इतिहास सांगणाऱ्या भगव्या ध्वजाला आपल्या गुरुस्थानी मानलं आहे. त्यामुळे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन संघ स्थापना झाली त्यांची प्रतिमा व प्रथम आणि द्वितीय सरसंघचालक अर्थात पू. डॉ. हेडगेवार आणि पू. श्री गुरुजी यांची प्रतिमाच काय ती आपल्याला संघाच्या कार्यक्रमात दिसून येते. 

तथापि, संघाचा मूलाधार म्हणजे डॉक्टर हेडगेवार आहेत. ज्याला संघ समजून घ्यायचा आहे, त्याला अगोदर डॉक्टर हेडगेवार अभ्यासावे लागतात. त्यांना समजून घ्यावं लागतं. त्याशिवाय संघ कळत नाही. 

डॉक्टरांनी संघाला नुसते जीवनदान दिले असे नाही, तर अक्षरशः आपल्या रक्ताचे पाणी करून त्याला वाढविले. संघाचे ध्येय आणि कार्यपद्धती, संघाचे संकेत आणि व्यवहार हे डॉक्टरांच्या असामान्य प्रतिभेचे आविष्कार आहेत. डॉक्टरांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र जीवनाच्या विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटविला आहे.

लाठी-काठी प्रशिक्षण स्वतः देणाऱ्या, संघ स्वयंसेवकांच्या बौद्धिक विकासासाठी 'राजकीय वर्ग' आणि 'ग्रंथालय' सुरू करणाऱ्या, विशेष प्रसंगी समाजाला उपयोगी पडतील अशी अंतर्गत शुश्रूषा पथके उभारणाऱ्या, संघ कामासाठी खर्च होणाऱ्या पै-पैचा हिशेब ठेवणाऱ्या, समाजातील सर्व स्तरातील लोकांशी अकृत्रिम स्नेहसंबंध जोडणाऱ्या, जातिगत अभिनिवेश सहजपणे दूर करून सामाजिक समरसता कृतीत आणणाऱ्या, मुस्लिमांच्या दंग्यात निर्भयपणे हिंदूंच्या  रक्षणाची व्यवस्था लावणाऱ्या, आपले रुद्र रूप दाखवून मुस्लिम कसायापासून गाईची सोडवणूक करणाऱ्या, परधर्मात गेलेल्यासाठी सुद्धा समारंभ आयोजित करण्यात पुढाकार घेणाऱ्या, भांडवलशाही राष्ट्रांच्या कचाट्यातून जगातील देशांची मुक्तता व्हावी असा ठराव आणणाऱ्या, स्वदेशी वस्तूंची विक्री आणि प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आई-वडिलां प्रमाणे माया देऊन सांभाळून घेणाऱ्या डॉक्टर हेडगेवार यांचे अवघे 50 वर्षाचे जीवन पाहिले की कोणीही मनुष्य विस्मयचकित आणि नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

परम पुज्यनिय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. 

संदर्भ - सांस्कृतिक वार्तापत्र 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या