एक बाणी, एक वचनी यानंतर प्रभू श्रीरामाच्या 'एकपत्नीव्रत' या विशेषणाचा आपण या प्रकरणात विचार करणार आहोत. श्रीरामांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी राजा जनकाच्या कन्येशी म्हणजे सीतेशी झाला हे आपल्याला माहीत आहे. एक वचनामागे ज्याप्रमाणे कुलपरंपरा होती तशी एक पत्नी व्रताची परंपरा नव्हती. त्याकाळात राजांनी एकापेक्षा अनेक बायका केलेल्या होत्या. राजा दशरथाला तर अधिकृत तीन बायका आणि अनधिकृत ३५२ बायका होत्या. रामाने मात्र ही परंपरा चालवली नाही. त्याचे काय कारण असेल हे जाणून घेऊ.
गुरुकुलातून शिक्षण घेऊन येईपर्यंत राम बऱ्यापैकी समजदार झाले होते. देशाटनानंतर ते अनेक अनुभवांमुळे आणखीन जागरूक आणि विचारी झाले होते. त्यानंतर त्यांचा बराच काळ राजभवनात गेला होता. त्या दरम्यान दशरथ राजाच्या अनेक बायका असल्याचे त्यांना चांगल्यापैकी कळले होते. त्यामुळे राजाला म्हणजे स्वतःच्या वडिलांना काय काय सोसावे लागत होते तेही रामांनी याची देही याची डोळा पाहिले होते. त्यामुळे तारुण्यात पुत्रप्राप्ती न झाल्याचेही त्यांना समजले होते. राजा म्हणून जबाबदारीशी योग्य न्यायसंगत कृती होण्यासाठी बहुपत्नीत्वाची ही रीत अत्यंत चुकीची आहे याची जाणीव रामांना झाली होती. पण मनाशी संयमित राहून त्यांनी आपल्या मनाचं प्रकटीकरण केलं नव्हतं.
पण जानकीची विवाह पश्चात त्यांनी हे ठरवलं असावं की मी अनेक बायका करणार नाही आणि त्यामागचं मुख्य कारण त्यांनी ठरवलेलं ध्येय हेच होतं. राजवाड्यात राहूनही महाराजांना होणाऱ्या पश्चातापाचे राम स्वतः साक्षीदार होते आणि रामांच्या मनात तर राक्षस निकंदन करण्यासाठी आयोध्या सोडण्याशिवाय आपण आपली ध्येयपूर्ती करू शकत नाही हे पक्कं माहीत होतं म्हणून एकच पत्नी असावी यावर ते अढळ होते.
त्यांच्या एक पत्नी व्रतामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे कर्तव्य हे होते. राजा म्हणून असणारी जबाबदारीही होती. रामांच्या एकपत्नीव्रता मागे त्यांनी किती खोलवर विचार केला असेल याचा अंदाज या व्रताचरणातून दिसतो. कर्तव्य पार पाडताना त्याविषयी मनात विधायक विचार असल्यामुळे त्या कर्तव्याचा त्यांना कधी ओझं वाटलं नाही.
निसर्ग हा सृष्टीतील समतोल राखण्यात कधीच दिरंगाई किंवा आळस करीत नाही या समतोलामुळेच सृष्टीतील दिनक्रम व्यवस्थित चालू असतो. अगदी विविध वृक्षांच्या येणाऱ्या फळांचे ऋतू देखील निसर्गाने ठरवलेले असतात. ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीनंतर अनेक जीवांनी म्हणजे ८६ लक्ष योनी नंतर मनुष्य प्राणी उत्क्रांत झाला. त्यावेळी सृष्टी चालू राहावी यासाठी स्त्री आणि पुरुषांची समान संख्या ब्रम्हदेवाने ठेवली होती.
हाच मुद्दा रामांच्या एक पत्नी व्रताशी निगडित आहे. समाजातील स्त्री-पुरुषांच्या संख्येने पती-पत्नी यांची विभागणी केली होती, पण त्यांच्या ठरवलेल्या नीतीमध्ये माणसाने ढवळा-ढवळ केली. आपल्या सुख भोगासाठी आणि आनंदासाठी काही रूढी समाजात चालू केल्या. एकाने केले त्याचे अनुकरण होत राहिले आणि परंपरा सुरू झाली. मला इथे पुरुषांच्या बहुपत्नीत्व रूढ परंपरेबद्दल सांगायचे आहे.
इसवी सनापूर्वी ७ - ८ हजार वर्षापूर्वीच्या काळातील परिस्थिती आपण पाहतो आहोत. त्यावेळी अनेक राज्यांनी एकापेक्षा अनेक बायका केल्या. दशरथालाच ३५२ बायका होत्या. म्हणजे बायकोसारखे अधिकार नसायचे, पण बायकोप्रमाणे तिच्याशी प्रणय राजे करीत असत आणि असा रिवाज असल्यामुळे कुणी कुणाला नावे ठेवीत नसत. त्यामुळे ह्या वर्तनाला अयोग्य किंवा चुकीचे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही.
हे सर्व रामांना माहीत होते. रामाच्या अवतार कार्याचे क्षेत्र यापेक्षा वेगळं असल्यामुळे त्यात श्रीरामांनी सुधारणा करावी असाही विषय कोणाला वाटला नाही. समाज न्याय संगत आदर्शवत असावा असे त्यांना वाटत होते. पण त्या परंपरेसाठी त्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही, मात्र या प्रथेमुळे संभाव्य धोके त्यांना दिसत होते. माझी प्रजा कशी असावी यासाठी राम विचार करत होते. त्यासाठी रामांनी एकपत्नीव्रत स्वीकारले होते. 'यथा राजा तथा प्रजा' ही उक्ती अगदी बरोबर आहे आणि याचाच विचार करून स्वतःच्या जीवनातला हा महत्त्वाचा निर्णय रुढीला खो देणारा असा होता आणि हा निर्णय रामांनी घेतला.
रामांच्या विचारांची दिशा
रामांच्या विचारांची दिशा पहा एका व्यक्तीने अनेक बायका करणे हे त्याला आनंद देणारे असेल. कदाचित त्या स्त्रियांचे प्रेम असल्या कारणानेही त्या राज आश्रयाला आल्या असतील. पण नियतीने या स्त्रियांसाठी जे पुरुष नियोजित केले असतील त्यांना बायका कशा काय मिळतील? म्हणजे इकडे राजाला बायका जितक्या तेवढेच पुरुष विवाहाविना राहणार ना हे उघड आहे. अर्थात त्यांच्या भावनांचा होणारा कोंडमारा सहन न झाल्याने सुखलोलुपतेने त्यांचे पाऊल वाकडे पडणार. ज्या स्त्रीला जवळ करतील तिचा विवाह झाला असेल तर तिचा संसार मोडेल आणि मुलाबाळांचे हाल होतील. त्यांच्यावर चांगले संस्कार होणार नाहीत, मग बाप से बेटा सवाई असंही होऊ शकतं. मग मुलालाही तेथेच व्यसन लागणार.
म्हणजे समाजात बहुपत्नीत्वमुळे बऱ्याच संस्कारांना न जुमानता लोक सदाचार विसरतील आणि ज्या समाजात नितीमुल्ये जपली जाणार नाहीत तो समाज इतरांना काय आदर्श सांगणार आणि असं करता करता हे सर्वत्र होत राहील आणि ते रामांना नको होतं. म्हणून केवळ रामाने विचार केला, मीच जर स्वतः एकच पत्नी केली, तर त्या संबंधी मी इतरांना काहीही न सांगता खुपकाही सांगितल्या सारखेच आहे. तो आदर्श ठरेल. पायंडा पडेल. त्यामुळे एक माणूस म्हणून आणि आयोध्येचा राजा म्हणून त्याच्या एक पत्नी व्रताचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
आजमितीला या निर्णयाचे कौतुक कोणीच करणार नाही. कारण सर्वांना एकच पत्नी असते. पण त्या काळात बहुपत्नीत्व पद्धत असूनही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कोणताही धाकदपटशा न करता कोणताही कायदा न करता कोणत्याही शिक्षेची वा दंडाची भीती न दाखवता आपल्या वर्तनातून योग्य परिवर्तनाची दिशा दाखवण्याची अत्यंत स्तुत्य गोष्ट वयाच्या सोळाव्या वर्षी राम करतात आणि त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. रामांच्या चरित्रातील ठळक मुद्यांना धरून त्यांचे व्यक्तिमत्व वर्णन करतानाच त्यांच्या प्रभू पदाचे महत्त्व सांगण्याचा हा एक प्रयत्न.
- सौ. नीला रानडे, धुळे
मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या