श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्वभाग ४ - शिवधनुष्य भंग आणि ध्येयपूर्तीकडे वाटचाल


     राजा जनकाचा 'पण' जिंकून जानकीशी झालेल्या विवाहामुळे राम समाजात आणखीन प्रसिद्ध झाले. कारण भरतखंडात सर्वदूर स्वयंवराची आमंत्रणे गेल्याने तो 'पण' जिंकण्याची घटनाही सर्वत्र पसरली. ज्या 'सुनाभ कार्मुका'चे खंडन श्रीरामांनी केले ते धनुष्य साधेसुधे नव्हते. तर ते भगवान शिवशंकरांनी एका युद्धानंतर जनकाच्या पूर्वजांकडे दिले होते. म्हणून ते 'शंकरधनु' या नावानेही प्रसिद्ध होते. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध याच धनुष्याने केला होता. जनकराजापर्यंत हे धनुष्य पूजनीय म्हणूनच जपले गेले.



     रामाचा पराक्रम म्हणूनही धनुर्भंगाकडे बघितले जाते. सहज प्राप्त होईल असा हा पण नव्हता. उचलायला अत्यंत जड असलेले शंकरधनु उचलणे आणि त्याला प्रत्यंचा लावणे महाकठीण होते. प्रत्यंचेची दोरी ज्या लांबीची असते त्यापेक्षा जास्त लांबी वर ती दोरी बांधायची असते, त्यासाठी मनगटात प्रचंड ताकद हवी. प्रत्यंचा लावताना आपल्या सहित धनुष्याचा तोल सांभाळण्याची फार मोठी महत्त्वाची भूमिका बजवावी लागते आणि या गोष्टी रामांनी सहजपणे केल्या. यामागचे कारण विश्वामित्रांनी ज्या ज्या विद्या रामांना सांगितल्या होत्या, त्या सर्व विद्यांचा उपयोग करून धनुष्य भंगाच्या वेळी रामाने उपयोगात आणल्या. हे सर्व कार्य जगजाहीर झाले. अर्थात तेव्हापासून त्यांच्या ग्रहणशक्तीचे स्मरणशक्तीचे आणि समयसूचकतेचे कौतुक झाले.

     विवाह हा तसा अत्यंत खाजगी विषय आहे. परंतु तरीही त्यावेळी स्वतःच्या मनात नसताना आधी काहीच निश्चित झालेले नसताना अचानक विवाहाच्या प्रस्तावाला नकार देणाऱ्या श्रीरामांना जानकीशी होणाऱ्या विवाहाची आवश्यकता त्यावेळी विश्वामित्रांनी रामांना समजावून सांगितली. अर्थात ही आवश्यकता रामांच्या खाजगी आयुष्यासाठी नव्हतीच, तर त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी होती. जानकीचा पूर्ण इतिहास रामांना विश्वामित्रांनी सांगितला होता. तिची योग्यता, तिचे गुण, तिचे स्थान सांगून विश्वामित्रांनी असेही सांगितले होते की तुझ्या ध्येयपूर्तीसाठी तुला हिच्याशी विवाह करायला हवा. कारण त्या कार्यात जानकीचे चांगले सहकार्य तुला लाभेल. हे ऐकल्यावरच राम विवाहास तयार झाले आणि म्हणून रामाने शंकर धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न केला.

     समाजाने या घटनेतून काय शिकले पाहिजे? विवाहसारख्या वैयक्तिक घटनेत सुद्धा रामाने आपल्या ध्येयाचा विचार केला आहे. अर्थात समाजाचे कल्याण, सज्जनांचा कैवार, दुर्जनांना शिक्षा यात कुठेही अंतर पडणार नाही या बाबींवर रामाने विचार केला. अर्थात या ध्येयपूर्तीची अनावर ओढ पाहून समाजमनावर राम अधिराज्य करू लागले. अश्या घटनेतून प्रभुपदा च्या पायऱ्या श्रीराम चढत होते.

      हरिणीला कुठे माहीत असते की आपल्या जवळच असलेल्या कस्तुरीचा सुगंध येतोय. काजव्याला कुठे माहीत असतं आपणही प्रकाशमान होतोय आणि रवी मणी दिनकराला तरी कुठे माहित असते आपण आहोत म्हणून ही जीवसृष्टी आहे. अगदी तसंच श्रीरामांना तरी कुठे माहीत होतं की समाज पुढे जाऊन आपल्याला प्रभू ही पदवी बहाल करणार आहे. त्यांनी केवळ आपलं कर्तव्य पूर्ण केलं.

     मानव रुपात जन्म घेतलेल्या रामांनी माणूस म्हणून संस्कारांनी घालून दिलेल्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत. अथांग महाप्रचंड सागराला अशा मर्यादा आहेत तो त्या कधीही सोडत नाही. अनेक नद्यांचे पाणी वर्षानुवर्षे आपल्यात सामावूनही सागर वाढत नाही, लाटांची जास्तीत जास्त मर्यादा असते, त्यापेक्षा सागर पुढे सरकत नाही, त्याप्रमाणेच मर्यादा उल्लंघन याचे प्रसंग अनेक वेळा आयुष्यात येऊनही मर्यादा न सोडणाऱ्या रामांना म्हणूनच 'मर्यादापुरुषोत्तम' या नावाने ओळखले जाते.

@ नीला रानडे, धुळे
    मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या