श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्वभाग ५ - वन गमन व औदार्य


     श्रीरामांना प्रभू म्हणून ओळखण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे वन गमन. राजभवनात अभिषेकाची तयारी चालू असताना आधीच्या रात्री महाराज दशरथांनी राज्यभिषेकाबद्दल रामांना सर्व सांगितले आहे आणि अचानक वनात जाण्या संबंधी माता कैकयी वडिलांच्या साक्षीने सांगते आहे. कसा असेल तो प्रसंग? सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय असेल, हे सांगण्याची गरजच नाही. परंतु कोणतीही शंका मनात न आणता, कोणतेही प्रतिप्रश्न मातापित्यांना न विचारता, मनात क्रोधाचा उद्वेगाचा कोणताही विचार येऊ न देता स्वीकारले. रामांच्या मान्यतेमुळे दशरथाला अति दुःख झाले.


     या घटनेकडे पाहिल्यावर रामाने हे का सहन केले? ते चिडले का नाहीत, मी काय गुन्हा केला असा प्रश्न त्यांच्या मनात आला नाही. वनात जाण्यासारखं मी काय केलंय, याचा जाब देखील त्यांनी विचारला नाही. असे प्रश्न आपल्याला पडतात, पण त्यावेळी रामांनी तात्काळ होकार दिला. त्यांच्या मनात विचारांचे काहूर दाटून येण्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्यावर असलेली त्यांची श्रद्धा, विश्वास आणि आदर. त्यांचा शब्द मी त्यांचा मुलगा म्हणून पाळलाच पाहिजे. कर्तव्यतत्परता प्रतिप्रश्न विचारून त्यावर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. अशी मनाची धारणा आणि पुत्र म्हणून त्यांची आज्ञापालन हे पुत्र कर्तव्य याची सुनिश्चित अशी मनात खोलवर रुजलेली जागृकता राजा म्हणून पित्याकडून योग्य तोच निर्णय घेण्याची क्षमता समजून रामांनी वनवास मान्य केला होता.

     ही मान्यता राजपुत्राचा परिवेश टाकून काषाय वस्त्र परिधान करून प्रजेची माफी मागून राज प्रसादातून निघून जाणं हे सोपं होतं का, खचितच नाही. या परिस्थितीतील रामांचे वर्तन हे त्यांना आणखीन उंचीवर घेऊन जाते. समाजाला वाटणारी श्रद्धा आदर त्यामुळे द्वीगुणीत होते. आणि हा वनवास १ किंवा २ वर्षांचा नाही तर १४ वर्षांचा होता. अगदी तारुण्यात काही करून दाखवण्याचे हे दिवस आजच्या दृष्टिकोनातून पंधरा-सोळा वर्षांच्या व यानंतरच मुलांचं वैचारिकतेने सुज्ञ होण्याचे वय असतं. काही विशेष करून आप्तांची मने जिंकून घेण्याचं हे वय असतं. अलौकिक असं घडवण्याचं हे वय असतं, आपण कुणालातरी आवडावं असं वाटण्याचं हे वय असतं, आपल्या लोकांना आपलं कर्तृत्व दाखवण्याचं हे वय असतं आणि अशा वयात असताना रामांना कर्तव्य पालनासाठी राजप्रसाद सोडावा लागला.

     हे आश्चर्य वाटण्यासारखं नाही का आणि या घटनेमुळेच रामाबद्दल फार जवळीक आणि आदर निर्माण होतो. त्यावेळी रामांच्या मनात कोणतीही चिडचिड नाही, त्रागा नाही. आनंदाने सर्वांचा निरोप घेणारे राम मग पुरुषोत्तमच नाहीत तर ते मर्यादशील म्हणूनही प्रभू ठरले.

     देव-देवता यांच्या भोवती फिरणारी आपली संस्कृती अशा संस्कृतीत देवांच्या ओळीत श्रीरामांना लोकांनी नेऊन बसवलं यात त्यांची किंचितही चूक नव्हती. ज्या लोकांनी त्यांना त्यांच्या योग्यतेचे संबोधन दिले त्याचे धन्यवाद आपण मानायला पाहिजेत आणि हा इतिहास पिढ्या पिढ्यांनी स्मरणात ठेवून कलियुगाच्या  दशकापर्यंत पोहोचला.

      याच कारणांमुळे आपल्या वर्तनातून अनेक आदर्श प्रस्थापित करणारे श्रीराम म्हणूनच आपल्याला आदर्शवत आहेत. समाजानं यापुढेही त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्यातील गुणांचे स्मरण करावे आणि वर्तनात आणावे हे अभिप्रेत आहे. असा प्रयत्न पुढे चालू राहावा यासाठी त्यांच्या दर्शनाची सोय म्हणून मंदिर उभारणी होते आहे हे सांगण्याची गरजच नाही, नाही का?

- नीला रानडे, धुळे
  मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या