श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्व भाग ७ - एकवचनी, एक बाणी, एक पत्नी श्रीराम


     श्रीराम प्रभू पदावर पोचण्याचे आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या एकबाणी, एक वचनी, एक पत्नी या विशेषणाचे महत्त्व. धनुर्विद्या शिकून झाल्यावर त्यांना त्यांच्या कुशलतेतून 'एक बाणी' ही उपाधी मिळाली. ज्या लक्ष्यावर बाण सोडायचा आहे ते मिळवण्यासाठी रामांना अनेक बाण सोडावे लागत नव्हते. एका बाणातच त्यांचे काम होत असे. अर्थात ही विद्या कला त्यांना त्यांच्या बाल अवस्थेपासून प्राप्त झाली नव्हती, पण अभ्यासू वृत्तीतून निर्माण झालेले औत्सक्यातून अनुभूती, अनुभुतीतून परिणाम आणि हे परिणाम
त्यांनी मनाशी ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाणारे होते. त्यामुळे एका बाणात ईप्सित कार्य घडवण्याची त्यांची वारंवारिता आणि त्यामुळे ही रामाची ओळख बनली.



     'एक वचनी' या विशेषणाचे महत्त्व आहेच. ज्या इक्ष्वाकु कुळात रामाचा जन्म झाला होता, त्या कुळातील दशरथाच्या आधीच्या अनेक राज्यांच्या चरित्रातून एक वैशिष्ट्य जाणवते की एकदा एखाद्या गोष्टीसाठी शब्द दिला तर पाळलाच पाहिजे. ही मनोधारणा त्यांच्याजवळ होती. मनोधारणा दृढ झाली की तसेच वर्तन करण्यासाठी मनासहित शरीर देखील तयार होते आणि मनापासून शब्द पाळण्यासाठी प्रयत्न होतात. मग त्या प्रयत्नांना यश येईपर्यंत ते प्रयत्न चालू राहतात.

      "प्राण जाये पर वचन न जाये" हे ब्रीद करण्याइतपत पूर्वीचे राजे वचनपूर्तीसाठी प्रयत्न करणारे होते. रामापुढे तर त्यांच्या वडिलांचे डोळ्यादेखत जागते उदाहरण होते. पत्नीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीच तर तिने मागितलेले वर महाराजांना द्यावे लागत होते. अत्यंत प्रिय अशा कामांचा त्याग म्हणजे मृत्यूला आमंत्रण हे माहीत असून त्यांनी वचन पाळले आणि कुळाचं ब्रीद सांभाळलं आणि खरंच "प्राण जाये पर वचन न जाये" हे शब्दश: अमलात आणलं.

     हा प्रसंग पाहून रामांच्या वचनबद्ध कृतीला एक वेगळे वजन प्राप्त झाले आणि शब्द पाळण्यासाठी ते मनाशी दृढनिश्चयी बनले असावेत. त्यांच्या चरित्रातून त्यांचा निश्चय आपल्याला दिसतो. भरताला चित्रकूट पर्वतावर दिलेला शब्द त्यांनी पाळला. सुतिष्णांच्या आश्रमाजवळील ऋषीमुनींना दिलेला शब्द त्यांनी पाळला, राक्षसांचा पूर्ण नाश झाल्याशिवाय मी अयोध्येला जाणार नाही हाच तो शब्द होता. सुग्रीवाला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याची पत्नी त्याला मिळवून दिली. दिलेल्या शब्दाप्रमाणे अंगदला युवराज बनवले. बिभीषणाला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याला लंकेचा राजा बनवले. सीतेच्या शोधाबद्दल दिलेली जबाबदारी स्वीकारून ती महत्प्रयासाने पूर्ण केली. शबरीला दिलेल्या शब्दाप्रमाणे तिला तात्काळ मोक्ष प्राप्त करून दिला. विश्वामित्रांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सती अहिल्येला शापमुक्त केले. मी चौदा वर्षे वनात राहीन हा वडिलांना दिलेला शब्द देखील रामांनी पूर्ण केला. प्रजेसाठी जगणे हे निभावण्यासाठी प्रजेच्या मनातील शंका निरसन करण्यासाठी पत्नीला वनात पाठवले.

      अवतार कार्याशी प्रतारणा न करता माणूस म्हणून आणि  कुळाचा ८० वा राजा म्हणून वचनपूर्ती करीत राहिले. काळ पुरुषाला शब्द दिल्याप्रमाणे अवतार कार्य संपल्यानंतर शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली. वचन पाळणे या कृतीशी अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठ असणाऱ्या रामांना म्हणूनच 'एक वचनी' हे बिरुद मिळाले.

- सौ. नीला रानडे, धुळे
  मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या