श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्वभाग ९ - त्यागाचं अत्युच्च उदाहरण म्हणजे 'राम'


     भरताला निरोप दिला गेला, रामांनी १३ वर्षे दंडकारण्यात वास्तव्य केले, त्यांना अनेक ऋषींचे मार्गदर्शन मिळाले. अगस्तींच्या मार्गदर्शनानुसार हे तिघे पंचवटीत  पोहोचले. सुवर्णमृगाचे अमिष दाखवून रावणाने सीतेचे अपहरण केले, शोध कार्यात सुग्रीवाशी रामांची मैत्री झाली, हनुमंताशी ओळख झाली, सीतेचा शोध सुरू झाला, सेतू बंधन झाले, रावणवध झाला, सीता मुक्त झाली----हा धावता आढावा.


     पण ज्यावेळी पती-पत्नीची भेट झाली तेव्हा रामाने सीतेला अयोध्येस घेऊन जाण्याचे नाकारले, कारण माझ्या प्रजेला जे आवडणार नाही ते मी करणार नाही. लोकमान्यता हीच लोकनायकाची शक्ती असते आणि एक राजा होण्याआधी पासूनच मला प्रजेचा विचार करायचा आहे असा विचार रामांनी केला. या प्रसंगातून हे दिसते की श्रीरामांचे अवतार कार्य संपलेले असतानाही त्यांनी प्रजेचा विचार केला. पत्नीचा विरह त्यांनी समजून-उमजून स्वीकारला. तिथे रामांचे माणूस म्हणून वेगळेपण जाणवते. श्रीरामांच्या मनातील राजा पती पेक्षा श्रेष्ठ ठरला. रामाने प्रजेला झुकते माप देऊन सीतेचा त्याग केला, प्रभू पदासाठी या घटनेलाही महत्त्व आहे.

     अयोध्येला परतताना आपले जाणे भरताला आवडेल का, तो आता १४ वर्षात राज्यकारभारात झाला असेल. आपण गेल्यावर त्याने आपल्याला सिंहासन द्यावे, माझ्या जाण्याने त्याला त्याचे राजेपण सोडावे लागेल, त्याला त्याचे दुःख झाले तर माझ्या अयोध्येला परत जाण्याचा काय अर्थ काय? असा विचार करून राम हनुमंता करवी भरतासाठी निरोप देतात. चित्रकूट पर्वतावरून परतताना भरत पादुका घेऊन गेला असला तरी तो रामांना सांगून गेला होता की १४ वर्षांच्या अवधीनंतर जर आपण मला दिसला नाहीत, तर मी अग्नी प्रवेश करीन. पण तरीही मनातील शंका निरसन करण्यासाठी रामाने मी येतो आहे असा निरोप पाठवून त्यावरची प्रतिक्रिया हनुमंता करवी मागवली होती. त्यावेळी हनुमंताने शंका विचारली, प्रभू आपल्या मनातील शंका योग्य नाही. पण खरंच आपल्याला जे वाटतंय त्या प्रमाणे घडले तर आपण काय कराल या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रामांच्या प्रभू पदाचा कळसच म्हणावा लागेल.

     मानव जातीत जन्म घेऊन एक माणूस इतकं चांगलं कसं वागू शकतो? रामाने हनुमंताला दिलेले उत्तर ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, श्रीरामावरील प्रेम आणि श्रद्धा निश्चितच वाढेल. राम म्हणतात, "हनुमंता माझ्या येण्याची वार्ता सांगून भरताचा चेहरा तुला वाचायचा आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे की काळजी किंवा त्रागा आहे हे मला भरद्वाज मुनींच्या आश्रमात येऊन सांग आणि जर भरताला माझ्या येण्याने आनंद झाला नसेल तर मी जानकी सह परत वनात जाईन." त्यागाची परिसीमा म्हणतात ती हीच. बंधुप्रेमाची परिसीमा ती हीच. भावाच्या दुःखाने दुःखी होणारा हा भाऊ. अशा या भावाला त्रिवार नव्हे तर शत शत वंदन.

     एक राजपुत्र कोणतीही चूक नसताना वनवासात जातो, पण नंतर केवळ भावाच्या आनंदासाठी जन्मभरासाठी वनवास स्वीकारायला तयार होतो. काय म्हणावं अशा प्रेमाला? कोणती उपमा द्यावी हे न सुचल्यामुळे त्यावेळच्या जनतेने त्यांना प्रभु हे बिरुद लावले. या प्रभु पदात किती अर्थ सामावलेले आहेत. चांगुलपणाचा आदर्शाचा मानवतेचा आणि सहकार्याचा परिपाक म्हणजेच प्रभू!

- सौ. नीला रानडे, धुळे
  मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या