श्रीरामाच्या प्रभू पदाचे श्रेष्ठत्वभाग १० - राजा कसा असावा, याचं परमोच उदाहरण


     परमेश्वराची पूजा, त्याचे अस्तित्व, त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद या सर्व गोष्टी भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच निर्गुण-निराकाराला आपण भारतीय विविध रूपात पाहतो. देव देवतांचे मंदिर, मुर्त्या, प्रतिमा आपल्या संस्कृतीत आहे. भगवान, ईश्वर, परमेश्वर, स्वामी वगैरे विशेषणांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला पटते. जसे भगवान विष्णु, भगवान नारायण, इत्यादी विशेषण आहे तसेच प्रभू या विशेषणाला ही वेगळं महत्व आहे. विष्णूंना आपण प्रभू विष्णू म्हणत नाही किंवा महादेवांनाही प्रभू हे बिरूद लावून प्रभू महादेव म्हणत नाही. प्रभू हे बिरुद केवळ आणि केवळ श्रीरामांना लावले जाते. या प्रभुपदाचे मानकरी श्रीराम होण्यामागची कारण त्यांच्या चरित्रातल्या घटनातून आपण पाहिली.


     माणसाच्या स्वभावातल्या भावभावनांच्या परीसिमा पाहता त्याला काय म्हणावे असा प्रश्न खरंच त्यावेळच्या जनतेला पडला असेल. हे कदाचित म्हणून सर्व विषयात, सर्व भावनात, सर्व वर्तनात, सर्व निर्णयात, सर्व नात्यात, सर्व प्रकारच्या कर्तव्यात, सर्व प्रकारच्या धारणेत आणि मनुष्याच्या सर्व वर्तनातून समजणाऱ्या घटनात उत्कृष्टता, श्रेष्ठता, परमोच्च बिंदू उत्तमता दिसली म्हणून प्रभु हे बिरुद त्यांना देण्यात आले असावे. त्यांच्या आदर्श जीवनातले महत्त्वाचे क्षण बघता यापेक्षा आणखीन पुढचे चांगले काय असू शकते अर्थात नाहीच. यापेक्षा परमोच्च काहीच नाही. जसे हिमालयाच्या एव्हरेस्ट पेक्षा उंच काय आहे, याचे उत्तर काही नाही हे जसे बरोबर आहे तसेच श्रीरामांच्या व्यक्तिमत्त्वातले उत्तमोत्तमत्व प्रभु हेच शकते.

     त्यांच्या चरित्रातल्या काही घटना आपण पाहिल्या. त्यातली आणखी एक घटना पाहू, जी उत्तम राजा म्हणून पाहता येईल. वाल्मिकींनी राम कथा लिहिण्यामागचा हेतू सांगितला, त्यात त्यांनी सांगितले की पुढच्या पिढीला राजा कसा असावा हे समजावे यासाठी मी हा ग्रंथ लिहीत आहे. म्हणून राजाचे एक कर्तव्य असेही असू शकते. यासाठी आणखी एक घटना आपण बघणार आहोत त्यातून राजा या विशेषणाचे त्यावेळच्या काळातले महत्त्व समजेल.

      श्रीरामांचे अवतार कार्य संपल्यावर आता भूतलावर राहण्याचा कार्यभाग संपला आहे, म्हणून परत आपल्या मूळ स्थानी भगवान विष्णू रूपात यावे यासाठी काळ पुरुष रामांना आठवण करुन द्यायला आले होते. त्यांना रामाशी बोलण्यासाठी एकांत हवा होता, म्हणून श्रीरामांनी शस्त्रागारात बसून वार्तालाप करू असे सुचवले आणि त्यावेळी शस्त्रागारात कुणीही येऊ नये यासाठी लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यास सांगितले आणि माझी आज्ञा मोडून जो दार उघडेल त्याला मोठी शिक्षा देण्यात येईल असे सांगितले. शिक्षा म्हणजे शिरच्छेद.

     पण दुर्वास यांच्या आग्रहामुळे आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे लक्ष्मणाने दरवाजा उघडला आणि लक्ष्मणाला शिक्षा देण्याची वेळ आली. राम राजा म्हणून इथे कसे वागले हे आपल्याला पहावयाचे आहे. अनेकांनी लक्ष्मणाच्या वनातील कार्याची ग्वाही देऊन रामांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मणाने इंद्रजीतला मारल्यामुळे रावण वध शक्य झाला, याची देखील आठवण करून दिली. १४ वर्षे त्याने तुमची सेवा केली हे सांगून शिक्षा न करण्याबाबत अनेकांनी सुचवले वशिष्ठ यांनीही शिक्षा न करण्याबाबत विनंती केली. तरीही रामांच्या निर्णयात तिळमात्र फरक पडलेला नाही. पण सर्वांच्या सांगण्याला थोडा मान देऊन रामांनी शिरच्छेदा ऐवजी लक्ष्मणाला इच्छामरणाची सवलत दिली. लक्ष्मणाने त्यावेळी शरयू नदीत आत्मसमर्पण करून रामाचा राजा म्हणून केलेल्या कर्तव्याचा मान राखला.

     इतरत्र कोणत्याही ग्रंथात असे उदाहरण नाहीच. त्यामुळे त्यांना दिलेले प्रभू हे बिरुद अत्यंत सार्थ आहे असे वाटते. आणि अशा श्रीरामांच्या देशात आम्ही रहात असताना त्यांचा आदर्श यापुढे चालू राहावा यासाठी त्या आदर्शाचे स्मारक त्या उत्तमोत्तमत्वाचे प्रतीक या पुरुषोत्तम महत्त्वाची खूण या कर्तव्याचे दर्शन आणि आदर्श राज्याचे चिन्ह म्हणून रामजन्मभूमी अयोध्या येथे राम मंदिर उभे होत आहे. अविस्मरणीय अतर्क्य व्यक्तिमत्वाचे सातत्याने चिंतन व्हावे म्हणून हा पुर्ण भारताचा, भारतीयांचा संकल्प होता तो पूर्ण होत आहे. हे प्रभू श्रीरामांचे मंदिर आहे पण ते खरे म्हणजे राष्ट्र मंदिर आहे. राष्ट्राच्या अस्मितेला जपणारे आहे.

प्रभू रामचंद्रांचा विजय असो.

- सौ. नीला रानडे, धुळे
  मो. 9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या