सुमंगलाची पहाट राम ...

सनातन भारतीय संस्कृतीने ज्या मूल्यांची, आदर्शांची जोपासना केली त्या सर्व आदर्शांचे मूर्त रूप म्हणजे रामाचे जीवन होय. राम हा एक अत्यंत मोठ्या राज परंपरेचा, धर्म परंपरेचा आणि सामाजिक परंपरेचा वारस होता. वैयक्तिक सुखापेक्षा रामाने प्रजेच्या आणि राज्याच्या हिताला प्राधान्य दिले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाच्या चौकटीत रामाचे जीवन अगदी चपखल बसते.

रामाच्या जीवनाच्या संदर्भात धर्माचरण, कर्तव्य परायणता, संयम आणि मर्यादा या गुणांचे प्रामुख्याने स्मरण आणि विवेचन होणे आवश्यक आहे. 

रामायणाचा काळ सत्ययुगाचा ! या काळातील राजा आणि प्रजा हे अत्यंत धर्मपरायण, सत्शील आणि सत्यवचनी होते. त्यामुळे रामाच्या जीवनात या गुणांचा अंतर्भाव होणे अविभाज्य होतेच; परंतु त्यापुढे जाऊन राम युगपुरुष ठरला तो त्याच्या कर्तृत्वाने ! 

रामाने वनवास स्वीकारला तो पुत्र धर्माचे पालन म्हणून, बालीचा वध केला तो अधर्माला दंड म्हणून. त्राटिका वधाचा रामायणातील प्रसंग वाचनीय आहे. नारीवध धर्मसंमत ठरेल का? हा प्रश्न रामाला पडतो. तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी केलेला नारीवध धर्मसंमत असून क्षम्य आहे असे विश्वामित्र समजावतात. असे अनेक प्रसंग रामायणात आहेत. रामाची प्रत्येक कृती हे धर्मसंमत कार्य आहे.
कर्तव्य परायणता हा धर्माचरणाच्या बरोबरीने येणारा गुण ! मुळात धर्मपालन हेच राजाचे आद्य कर्तव्य मानले गेले आहे. यात भावनेला थारा नाही. राम वनवासात जात असतांना माता - पिता, नगरजन यांचा आर्त विलाप रामाला विचलित करू शकला नाही. म्हणजे राम भावनाशून्य ठरतो का? तर तसे नाही. आपण धर्माचे पालन करतो आहोत, कर्तव्य करतो आहोत तेव्हा भावनेच्या आहारी न जाता संयम बाळगणे हा रामाचा गुण यातून अधोरेखित होतो. 

रामाचा विलाप स्पष्टपणे दिसतो तो सीता हरणाच्या प्रसंगात ! पण तरीही तो सावरतो. सीतेच्या शोधाची आतुरता असली तरी निर्णयाची घाई न करण्याचा संयम त्याच्या ठायी दिसतो. गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांनी रामाचा संयम दाखवणारे फार सुंदर गीत लिहिले आहे. एका गीतात रामाच्या मुखी शब्द आहेत - 

'वियोगिनी सीता रडता धीर आवरेना,
कसे ओलवू मी डोळे? उभी सर्व सेना,
पापण्यांत गोठविली मी; नदी आसवांची ।' 

एक नेतृत्व म्हणून रामाच्या ठिकाणी असलेला संयम यातून किती स्पष्ट मांडला आहे ! 
रामाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले आहे. ही मर्यादा राजकुमार म्हणून, राजा म्हणून रामाने आजीवन पाळली. कैकयी ने रामाला वनवासात पाठवले; परंतु तिचा दुस्वास न करता आई म्हणून तिला सदैव सर्वोच्च पूजनीय मानणे ही धर्माची मर्यादा, रावण वधानंतर त्याचा शास्त्रोक्त अंत्यसंस्कार करण्याची माणुसकीची मर्यादा, लंका विजयानंतर त्या राज्याचा लोभ न बाळगता त्याच कुळाचे मोठेपण जपणे ही नैतिक मर्यादा ! अशी अनेक उदाहरणे आहेत. 

रामाने सत्याच्या प्रस्थापनेसाठी आपले जीवन समर्पित केले. समाजात सनातन आदर्श रुजविण्याचे काम रामाने केले. आधुनिक काळाच्या संदर्भात विचारांची, जगण्याची शैली बदलते तसे जुन्या घटनांचे संदर्भ बदलत जातात; परंतु समाजाच्या पक्क्या श्रद्धा आणि आदर्शांचा गाभा बदलत नाही. काळाच्या संदर्भात अशा आदर्शांची पुनर्स्थापना करणे हे त्या त्या काळातील समाजाचे कर्तव्य असते. याच अर्थाने अयोध्येतील भव्य राम मंदिर हे केवळ धर्मक्षेत्र नसून उन्नत भारतीय संस्कृतीचे आणि सनातन आदर्शांचे चिरंतन स्मरण आहे. ही भारताच्या सुमंगलाची पहाट आहे हे निश्चित..!!

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार 


©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या