स्वामी विवेकानंद: अमृतरस्य पुत्रा



नरेंद्र नाथ दत्त  - १२ जानेवारी १८६३

हे जीवन - जगातील धन, मान, ऐश्वर्य सारे काही क्षणभंगुर आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात, तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात; बाकीचे सारे जिवंत असले तरी ते मेल्यासारखे च असतात. 
-  प.पू. स्वामी विवेकानंद.

       वेदकाळापासून आधुनिक काळापर्यंत सामर्थ्यशाली गुरूंची जी अखंडित परंपरा भारताच्या आध्यात्मिक आकाशात विलसत आहे त्याच मालेमध्ये स्वामी विवेकानंद हे नाव तेजाळत आहे. आयुष्याच्या केवळ चाळीस वर्षांच्या कालावधीत संपूर्ण जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची अमुलाग्र भेट त्यांनी दिली. ज्यांचे अवघे जीवन म्हणजे स्वत्व प्रस्थापनेच्या संकल्पाने धडाडणारा एक यज्ञच होता. १८६३ पासून ते १९०२ पर्यंत हा यज्ञ अखंड धगधगत होता. 
      
         भारत देशातून पश्चिमात्य देशामध्ये जाणारे स्वामीजी पाहिले सन्यासी होते. सकारात्मतेने उत्तुंग भरारी घेणारे ज्यांचे विचार आहेत, ज्यांच्या लिखाणाचे वाचन करून अनेकांचे आयुष्य कल्याणकारी झाले. अश्या स्वामीजींना खऱ्या आयुष्यात मात्र खूप साऱ्या नकारात्मकतेचा सामना करावा लागला. १८८४ साली  स्वामीजींचे पितृछत्र हरवले, तो काळ खूप समस्यांनी भरलेला होता. स्वामीजींच्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण काळ तो होता. आर्थिक खच्चीकरणामुळे कधी कधी त्यांना उपवास करावा लागत असे. त्यांच्यासोबतच त्यांची आई आणि भावंड देखील या परिस्थितीतून जात होते, ते प्रसंग वाचतांना आपल्याही डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होतील इतकी भयंकर परिस्थिती स्वामीजींनी भोगली. मात्र अश्या काळात ही त्यांना त्यांच्या ध्येयाचा, त्यांच्या परमेश्वराचा विसर मात्र कधीच पडला नाही.
    
       स्वामीजींचे त्यांच्या गुरूंवर म्हणजेच श्री रामकृष्ण परमहंस यांच्यावर अत्यंत निष्ठावान, निस्वार्थी प्रेम होते. स्वामीजींनी त्यांचं सर्वस्व त्यांच्या गुरुचरणी अर्पण केले होते. जगाच्या पाठीवर असंख्य प्रवासानंतर केवळ रामकृष्ण परमहंस एकमेव असे मनुष्य होते ज्यांनी स्वामीजींच्या सर्व शंकांचे निरासरन करून स्वामीजींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि ठामपणे सांगितले की हो "मी परमेश्वराला पाहिले आहे". रामकृष्ण परमहंस यांनी स्वामीजींना उपदेश केला की तू एक वटवृक्ष समान आहेस आज जरी तुला तू शक्तिहीन ,बलाहिन वाटत असला तरी तुझ्यात संपूर्ण विश्वाला सम्मेलीत करून घेण्याचे सामर्थ्य आहे. यानंतर स्वामीजींच्या प्रवासाला सुरुवात झाली.

      अठराव्या शतकाच्या अंतकाळात भारत हा संपूर्णपणे नि:सत्व, बलहीन, भग्न आणि खंडविखंड झालेला होता स्वाभिमान शून्य असा बनला होता. धर्माचे पायपुसने झाले होते . भारताने जगाच्या पाठीवर एक देश म्हणून त्यांची ओळख केव्हाच गमवून टाकलेली होती. देशाचा सर्वदृष्ट्या ऱ्हास होत होता. देशातील युवा देखील पूर्ण भरकटलेला होता. भारताची आधुनिक शैक्षणिक पात्रता शून्यात होती. दररोज असंख्य भारतवासी उपाशी झोपत असत , राष्ट्र पूर्ण दरिद्रीच्या दरीत कोसळत चाललेलं होत. 

       स्वामीजी एक सन्यासी होते. त्यांना आनंद, दुःख यांच्याशी काहीही एक घेणे देणे नव्हते. जगापासून निराळा असणारा हा मनुष्य संपूर्ण जगाशी नाते तोडून साधनेत लीन झालेल्या ह्या महापुरुषाला एक अत्यंत मोठे दुःख होते...ते "म्हणजे भारताचा होणारा ऱ्हास". "माझ्या देशाचं स्वतःच अस्तित्व नष्ट झालय". ही शोकांतिका त्यांना रात्र रात्र जागवत असे. एकंदरीत काय तर भारत हा संपूर्णपणे विनाशाच्या मार्गावर मार्गस्थ होता. अश्या परिस्थितीमध्ये समोर दोनच पर्याय किव्वा शक्यता होत्या त्या म्हणजे एक तर सर्वकष विनाश घडणे किंवा काही अपूर्व चमत्कारिक घडून पुनरूज्जिवित होणे. अश्या  विनाशकाली वातावरणात संकटक्षणी भारताच्या अंतरीची अध्यात्मिक ऊर्जा पुन्हा एकदा उफाळून जाज्वल झाली, आणि १९ व्या शतकाच्या उत्पत्ती काळात नवजीवणाचा स्त्रोत पुनरपि खळाळू लागला. युगपुरुषाचा सुवर्ण काळ सुरू झाला. भारताला एक नवी दिशा ,नवी ओळख आणि एक सुवर्ण सुरुवात मिळाली. भारतामध्ये जन्मलेल्या ह्या युगपुरुषाने संपूर्ण जगाला स्वधर्माचा , स्वदेशाचे एक भक्कम स्थान आणि ओळख निर्माण करून दिली. शिकागो येथील धर्म संमेलनात भारताला एक नवीन ओळख मिळाली. हिंदु हे नाव साता समुद्राकडे पहिल्यांदा गाजले. सनातन भारताचे ज्ञान आणि शिकवण संपूर्ण जगाने बघितली. धर्म म्हणजे नद्या आहेत त्यांची शिकवण हा त्यांचा मार्ग प्रवाह आहे मात्र शेवटी सर्व नद्या एकत्र येवुन एकच समुद्रात विलीन होतात, त्याच प्रमाणे सर्व धर्मांचा एकच परमेश्वर आहे असे स्वामीजी म्हणायचे.

        स्वामीजी कठीण अश्या बारा वर्षाच्या कालावधीनंतर, अथक प्रयत्ना नंतर परप्रांतात धर्मसम्मेलनामध्ये सनातन भारत सिद्ध करण्यासाठी पोहचले होते. परप्रांतात स्वामीजींना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांच्या भारतीय पेहरावामुळे ते जिथे जात तिथे केवळ त्यांना बघण्यासाठी म्हणून लोक गर्दी करत. कधी त्यांना भूत समजून त्यांच्या मागावर येत तर कधी दीन असल्याकारणाने त्यांची मोठ्याप्रमानावर आर्थिक लूट होत असे. अनेकदा त्यांना खायला अन्न आणि डोक्यावर छत ही नसे, अनेक रात्र स्वामीजींनी कडकडत्या थंडीत काढल्या आहे. इतके सर्व कष्ट, हाल, अपेष्टा, त्याग हे कुणासाठी ? केवळ आपल्यासाठी केवळ सनातन भारतासाठी. अनेकवेळा त्यांना वाटलं पळून जावं.. निघून जावं, स्वदेशी पण त्यांनी हार मानली नाही. शेवटी तो दिवस उगवला ज्या दिवशी स्वामीजींच्या भाषणाने संपूर्ण अमेरिका गाजून उठली एका दिवसामध्ये सर्व चित्र बदलेल होत. सर्व अमेरिका वृत्तपत्रात पहिल्या पानावर केवळ स्वामीजी होते. त्यांची कारकिर्दी सर्वत्र पसरलेली होती. आता स्वामीजींना कसलीच कमी नव्हती, त्यांच्या प्रसिद्धीला  विराम नव्हता. त्यांना आता कुठेही आयुष्यभर आरामात घालवायला सहज जागा आणि पैसा प्राप्त होता.  त्यांना कसलीच गरज किव्वा कमी नव्हती तरी त्यांना ते जीवन नकोसे होते. कारण काय तर त्यांचं त्यांच्या मातृभूमीवर एकनिष्ठ प्रेम होत. 

       इंग्लंडहून परत येतांना एका व्यक्तीने स्वामींना विचारले " स्वामी या विलासी, वैभवशाली व सामर्थ्यसंपन्न अशा पाश्चिमात्य देशात चार वर्ष राहिल्यानंतर तुला तुझा मायदेश आता कसा वाटतो?" त्यावर स्वामीजी म्हणाले, "पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करीत असे. आता मात्र  भारतातील धुळही मला परमपवित्र वाटते. तेथील हवा देखील मला आता पवित्र वाटते. भारत आता मला परमपवित्र धाम वाटतो, तो माझ्या दृष्टीने आता तीर्थक्षेत्र होऊन बसला आहे." खरंच किती धन्य तो देह ज्यात ही आत्मा सामावली.

"उठा, जागे व्हा,आणि ध्येय प्राप्ती होई पर्यंत थांबू नका" . असा निर्धार करून स्वामीजी ध्येय  प्राप्तीच्या वाटेवर निघाले.

       अनेक शतके वेगळे पडलेल्या भारताला पुन्हा  आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहामध्ये आणून सोडण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या सारखे अध्यात्मिक गुरु जगामध्ये विरळाच... स्वतः परमेश्र्वराच्या साक्षात्काराने परिपूर्ण असूनही ते सर्वसामान्य स्त्री- पुरुषांमध्ये, दिन दुबळ्या मध्ये वावरले. स्वामीजींचा प्रत्येक शब्दन शब्द मानवाला आत्मविश्वास, नवीन सामर्थ्य देणारा, जीवनदायी श्रद्धा पुरविणारा, विधायक कर्मशिलतेकडे नेणारा आणि खरे अध्यात्मिक आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणारा आहे. म्हणूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, सी. राजगोपालाचारी, राधाकृष्णन, योगी अरविंद, भगिनी निवेदिता, स्वा. वीर सावरकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी थोर मंडळींनी स्वामीजींच्या विचारांचा केवळ गौरवच केलेला नसून ते विचार अंगीकृत करून स्वामीजींना त्यांचे प्रेरणास्थान मानुन ही मंडळी आयुष्य जगत आलेली आहे.

          स्वामीजींनी भारताचे तर नेतृत्व केलेच. सोबतच त्यांनी स्वधर्मासाठी दिलेले योगदान ही अमुलाग्र आहे. स्वधर्म म्हणजे "हिंदु धर्म" विषयी स्वामीजींना खूप अभिमान होता. ते म्हणायचे "गर्व से कहो हम हिंदू है", स्वामीजींनी हिंदुधर्माचा खूप दृढ अभ्यास केलेला होता. त्यांना संपर्ण वेदांचा अभ्यास होता. सोबतच स्वामीजींनी ध्यान साधनेत प्रावीण्य मिळविले होते. ध्यानाची कला, वेदांत विचार, कर्माचे रहस्य, सनातन भारत अशा अनेक विषयांवर त्यांचे सखोल लिखाण आहे. विवेकांदांनी 'वेदांत' म्हणजेच 'उपनिषदांची' तत्वे आणि विचार जगाला सांगितले. त्यामुळे जगाला कळले, कि आपण मानतो तसे हिंदू धर्म दगडांमध्ये म्हणजे सगुण आकारामध्ये अडकलेल नसून, "जग हे नाम मात्रांचे आहे " हे विज्ञानाचे तत्व त्याने मान्य केले आहे, तेच ते सांगतात.

       स्वामीजींची शिक्षण विषयाची मते खूप वेगळी होती ते शिक्षणाची नाड आध्यात्मिकतेशी जोडत असत.

" यथा खरश्चन्दनभारवाही, भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य।"

चंदनकाष्टे वाहणाऱ्या गाढवाला ओझ्याचीच जाणीव होत असते, चंदनाच्या गुणांची नव्हे. 

       शिक्षण व निव्वळ माहिती ही एकच मानली तर ग्रंथालयांना थोर महात्मे व ज्ञानकोशांना ऋषी म्हणावे लागेल. म्हणून आपल्या देशाचे अध्यात्मिक व ऐहिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण आपण आपल्या हाती घेतले पाहिजे आणि शक्यतो ते आपल्याच पौराणिक आणि राष्ट्रीय पद्धतीनुसार दिले पाहिजे. असे स्वामीजी म्हणत. सोबतच अध्यात्मिकता हाच आमचा जीवन प्रवाह असेही स्वामीजी म्हणत.
    
       धर्म ही भारतवर्षाची जीवनशक्ती आहे. आपल्या पूर्वजांच्या ह्या महान वारश्याचे हिंदुजातीला जोपर्यंत स्मरण आहे तोपर्यंत या पृथ्वीतलावावरील कोणतीही शक्ती तिचा नाद करू शकत नाही. भारत हे एक शरीर आहे तर हिंदु त्यातील आत्मा आहे. विना आत्म्याचे जसे शरीर असते तसे विनाधर्माचा हा भारत असेल. सनातन धर्माने संपूर्ण जगाला  एकतेचा संदेश दिला आहे. 
"वसुधैव कुटुम्बकम" अवघे विश्वची माझे कुटुंब अशी शिकवण असणारा हा आमचा सनातन भारत आहे. असे स्वामीजींचे विचाररत्न होते.

        स्वामीजी नेहमी म्हणायचे 'गर्व से कहों हम हिंदू है', मात्र स्वामीजींनी कधीच इतर धर्मियांना कमी ही लेखले नाही किंवा केवळ हिंदूंनीच विश्वावर वर्चस्व करावे जगात केवळ हिंदूंचं असावे असले दळभद्री विचार कधीच स्वामीजींचे नव्हते ते प्रत्येक धर्माचा आदर करत असत त्यांना कुठल्याच धर्माची चीड किव्वा द्वेष नव्हता मात्र स्वधर्माचा अभिमान होता. 'जगा आणि जगू द्या' ह्या विचारांचे स्वामीजी होते. त्यांना धर्मपरिवर्तन या विषयाची खूप घृणा होती. ख्रिस्ती माणसाला हिंदु वा बौध्द व्हावयास नको, अथवा हिंदु वा बौध्दालाही ख्रिश्चन बनण्याचे प्रयोजन नाही. तर प्रत्येकाने स्वतःचे वैशिष्ट्य कायम राखून इतर धर्मातील सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि तद्दद्वार पुष्ट होऊन स्वतःच्या प्रकृतीनुसार समृध्द होत गेले पाहिजे.
असे अमूल्य विचार स्वामीजींचे होते म्हणूनच त्यांना युगपुरुष ही पदवी प्राप्त असावी.

        "झाले बहु, होतील ही बहु, परंतु या सम हा". असे महान जीवात्मा या देशात काय तर संपूर्ण विश्वात पुन्हा होणे नाही. स्वामीजींचे विचार देखील सांगायचे झाले तर वाणीला शब्द अपुरे पडतील इतके तेजोमय आणि अमूल्य त्यांचे सुवर्णविचाररत्न आहेत. सोनेरी पिंजऱ्यात जगण्याची चटक लागलेल्या आत्ममग्न देशाची निद्रिस्त बुध्दी खडबडून जागृत करण्यासाठी सपासप आसूड ओढणारे जाज्वल्ल विचार स्वामीजींनी दिले. असे नरामध्ये नारायण शोधणाऱ्या परमात्माज्ञानी युगपुरुषाच्या १५७ व्या जयंती महोत्सवानिमित्त एक छोटासा प्रयत्न स्वामीजींचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचा.

       आयुष्याच्या जीवन आहुत्या, प्राण आहूत्या ह्या सनातन भारताच्या अस्तित्वाला निर्माण करण्याच्या यज्ञामध्ये दिलेल्या आहे तेव्हा कुठे हा स्वतंत्र आणि स्वबळावर उभा असलेला सनातन भारत आपल्या समोर भक्कम उभा आहे. आपण सर्वांना आपल्या पूर्वजांच्या बलिदांच्या त्यागाची जाणीव आणि कर्तुत्वाचा अभिमान आपल्या रक्तात असणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या केवळ नाम उच्चाराच्य मात्राने रोमारोमात एक धगधगती ज्वाला जाज्वल्ल व्हायला हवी. हीच आपली सनातन भारतीय म्हणून ओळख. देश, धर्माचे आपण देणे लागतो हा भाव सतत हृदयात ठेवून आयुष्य जगायला हवे तर आणि तरच आपण एक जागृत शिक्षित मनुष्य आहोत अन्यथा सर्व जीवनच व्यर्थ आहे.

      तेजोमय, त्यागमुर्ती, देशप्रेमी, एकमेवाद्वितीय परब्रम्ह्याचे , परमेश्वराचे अंश असलेल्या , दिव्य, शाश्वत आत्मा असलेल्या अमृतरस्य पुत्रा: स्वामी विवेकानंद यांच्या १५७ व्या जन्ममहोत्सवाच्या सर्व भारत वासियांना कोट्यावधी शुभेच्छा.

                               -  स्नेहल दिनेश विसपुते.
                                  (शेंदुर्णी , ता. जामनेर)
                          
 Published by ©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या