🪔 नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती...
माझे दुकान बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असल्यामुळे अनेक मंडळी सहजपणे भेटत असतात.आता वयाने Senior Citizen असल्याने भेटीत जुन्या भूतकाळातल्या गोष्टींवर गप्पा करतांना भर जास्त असतो.एकदा माझे दुकानात जळगांवातील नामांकित पेपर एजन्सीचे मालक(श्री. सदानंद गाडगीळ)गप्पा मारत असतांना सहज विषय निघाला,आज पर्यंत शेकडो मुलांना पेपर वाटप करतांना तुम्ही पाहिले असेल,त्यानिमीत्ताने तुम्ही त्यांच्या(पेपर वाटणा-या मुलांच्या)कुटुंबीयांचा आर्थिक भार कमी केला असेल.हे करत असतांना किती जण गरिबीवर मात करुन पुढील आयुष्यात यशस्वी झाले ? असा प्रश्न मी गाडगीळांना विचारला.
त्यांनी असंख्य नावांचा उल्लेख केला जे आता उच्च पदावर काम करत आहेत.आज देखील गाडगीळांनी भूतकाळात केलेल्या सहकार्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.गाडगीळांनी जी अनेक नांवे सांगितली त्यात गजाननराव कुळकर्णी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
गजाननराव पेपर(वर्तमानपत्र) वाटपाचे काम गाडगीळाकडे करत असत.लहानपणा पासून गरिबीशी संघर्ष करुन शिक्षण घेतले.शिक्षण झाल्यावर सहकार खात्यात नोकरी करत असतांना आपल्या भूतकाळातील गरिबीवर सुडाने (गैरमार्गाने) पैसा कधी जमवला नाही.पापभीरू स्वभाव असल्याने नेहमी दुस-यांच्या अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून जात.चांगल्या लोकांच्या संगतीत असल्यामुळे संघाशी नाते घट्ट झाले.माझ्या भगिनी(गजाननरावांच्या कन्या) सौ.आरती व सौ.भारती(वृषाली)यांनी त्यांच्या मनोगतात गजाननरावांचे जीवन चरित्र मांडले आहे.त्यामुळे पुनरावृत्ती न करता मी येथेच थांबतो.या निष्ठावान संघ कार्यकर्त्यास माझी विनम्र आदरांजली.
- दीपक गजानन घाणेकर
(9423187480)
मनोगत ---
( 1 )
श्री गजानन कुलकर्णी –
(जन्म 20 एप्रिल, 1938 – मृत्यु 16 सप्टेंबर, 2012)
संघाचे स्वयंसेवक, पण तितकेच कुटुंबवत्सल, भिडस्त स्वभाव, दुसऱ्याला बोलवण्यातूनही न दुखावणारे, साधे राहणारे, स्वतःच्या उदाहरणातून चारित्र्याचा आदर्श निर्माण करणारे माझे बाबा आयुष्यभर पुरेल इतकी संस्काराची शिदोरी आम्हाला देऊन गेले. त्यांनी संघकार्य, नोकरी, मोठ्या कुटुंबाचे पोषण अशी तिहेरी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. नातेवाईकांना जपून संघ स्वयंसेवकांना आपलेसे केले.
आपली आवडती व्यक्ती गेल्यावर आपण त्या व्यक्तीला आवडणारी वस्तू, पदार्थ सोडण्याचा संकल्प करतो, पण बाबांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या गुणांपैकी एक तरी गुण धरावा, अंगी बाणवावा असे वाटते.
गजानन कुलकर्णी एक सामान्य व्यक्ती, पद पैसा प्रतिष्ठा यापैकी कशाचेही वलय नसणारे, पण स्वयंसेवक म्हणून जगणारे. गाडी चालण्याकरिता दोन चाकांची गरज असते. तसे दुसरे चाक म्हणजे माझी आई वीणा गजानन कुलकर्णी, जी सदैव बाबांच्या निर्णयाशी ठाम राहिली. बाबा सामाजिक रथ ओढण्याचे काम करत होते, पण त्यांच्या कुटुंबाचा रथ आई ओढत होती. असे प्रेरणा देणारे जोडपे.
बाबांचा जन्म 20 एप्रिल, 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील नेरी या छोट्याशा गावात झाला. मोठे तीन वडीलभाऊ आणि एक भगिनी. परिस्थिती बेताची. अनेक वेळा जेवणाची भ्रांत असलेले पण कष्टाळू कुटुंब.
बाबांचे शालेय शिक्षण नेरीला झाले. मॅट्रीकला बाबा जळगाव आले. नेरी-जळगाव असा अनवाणी प्रवास सुरू झाला. मग कांही दिवसांनी जळगांवला एका छोट्याशा दुकानात नोकरीला लागले. त्या दरम्यान गुजराती भाषा शिकले. लहानपण पैसे कमवून पोट भरण्यात गेले. कधी जळगांव, रावळगांव, तर कधी मुंबई, जिथे मिळेल तिथे नोकरी स्वीकारत गेले.
13 मे 1969 मध्ये त्यांचे लग्न झाले. जळगांवला सहकार खात्यात नोकरीला लागले आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. तीन मुली, मोठे काका असे सहा जणांचे कुटुंब, भाडयाच्या दोन खोल्यांमध्ये संसार सुरू झाला.
बाबा दिसायला बुटके, गोरा रंग, डोक्याला भरपूर केस, कधी हाताला घड्याळ नाही की, गळ्यात चेन नाही. फक्त पायजमा आणि झब्बा असा पेहराव.
अतिशय सरळमार्गी, पापभीरु, भिडस्त स्वभाव, प्रचंड सहनशक्ती आणि सगळ्याचे चांगले व्हावे हीच मनोकामना. अतिशय चांगले मित्र प्रभाकर कुलकर्णी, दादा म्हणत त्यांना. बाबांना त्यांनी संघ कार्याची गोडी लावली.
बाबा सुट्टीच्या दिवशी प्रभात शाखेत जाणारच, आणि घरी येताना बरोबर दोघा-तिघांना आणणारच, चहा-फराळाचं करायला लावणार आणि आईही न थकता सगळे करायची. घरातले डबे नेहमी लाडू-चिवड्याने भरलेले असायचे. काही दिवस जळगावच्या प्रभात शाखेत बाबा कार्यवाह होते. बाबांनी किती वेळा प्रवास करून रात्री उशिरा येऊनही प्रभात शाखेत जाणे कधीही चुकवले नाही. शाखेत जायला मिळाले नाही, तर संघ कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार. कोणा प्रचारकांची जेवण्याची व्यवस्था होणार नसेल तर लगेच बाबा म्हणायचे, जा, आपल्या घरी वहिनीला निरोप दे. आमचं घर कधीही बंद नसायचं आणि चुलीला कधी आराम नसायचा. घरी येणं कोणाला शक्य नसेल तर घरून डबा जायचा.
बाबांच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा आणि डोक्यावर संघाची टोपी. भाऊबीज, पाडवा यासाठी येणारे काका, भाऊ म्हणायचे “आण बरं बाबांची संघाची टोपी.” बाबा लगेच म्हणायचे “त्यानिमित्यानं गणवेशाचा एक भाग वापराल आणि हळूच संघाचे स्वयंसेवक व्हाल.”
बाबा निवृत्त झाल्यानंतर तर त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले. रोज नियमित शाखा, संपर्क. त्यांची चर्चा सतत सुरू असायची ती विनायक त्र्यंबक कानडेकाकांशी दोघेही सतत संघाविषयी बोलत असायचे. अगदी शेवटचा दूरध्वनी संपर्कसुध्दा या काकांशी झाला.
“निष्ठावंत आणि संघकाम, सामाजिक जबाबदारी आणि सर्व सहजतेने सांभाळावे याचे एक यथार्थ उदाहरण म्हणजे गजानन." बाबांचे संघमित्र तर त्यांना तुकारामाची उपमा देत. "संघ समजून सांगणारा " आणि " संघ जगणारा " असे दोन प्रकारचे स्वयंसेवक घडत असतात. त्यात गजानन संघ जगणारा होता न बोलून कृती करणारा.”
बाबा कुठल्याही कार्यक्रमाचे, उत्सवाचे निरोप अनेक जणांना देत असत. अगदी शेजारी, नातेवाईक नियमित न येणारे स्वयंसेवक या सर्वांचा समावेश असायचा. दस-याच्या संचलनाचा निरोप नवीन ओळख झालेल्यांना आवर्जून देत असत. संघाचा पूर्ण गणवेश त्यानिमित्ताने होत असे अशी त्यांची आग्रही भूमिका असायची.
बाबांनी नोकरीनिमित्त अनेक प्रवास केले. पेठ-सुरगाणा, चाळीसगाव, पाचोरा, नाशिक, सिल्लोड अशा अनेक गावात फिरले. तिथे भगवा ध्वज कुठे दिसतो आहे का याचा पाठपुरावा करून वेळ मिळल तिथे शाखेत गेले. परिचय वाढत गेले. आयुष्यात एकच खंत - मला गाडी चालवता आली असती, तर अधिक वेळ देऊ शकलो असतो. पण पायी प्रवास करावा बाबांनी. नुसतं चालण्यावरुन बाबांना लोक ओळखायचे.
कुठूनही आले, की अनुभव सांगत घरातील सदस्यांशी चर्चा करायचे. शाखा, उत्सव, कार्यक्रम, लग्न समारंभ काही असो, नेहमी वेळेपूर्वी हजर व्हायचे. लग्न जमविणे हा बाबांचा छंद होता.
1975 मध्ये आणिबाणीच्या वेळेस संघावर बंदी आली. तेव्हा पोलिस खात्यातील काकांनी बाबांना समजून सांगितले. तुझ्या नोकरीचा प्रश्न आहे. आता हे काम थांबव. पण बाबांच्या तोंडी एकच होते, “ हे ईश्वरी कार्य आहे. त्यामुळे जे करेल ते ईश्वरच !” आणि न डगमगता कार्य करीत राहीले. त्यांनी भूमिगत प्रचारकांना स्वत:च्या घरात जागा दिली.
दसऱ्याच्या पथ संचलनाची पूर्वतयारी आम्ही घरातले सगळे मिळून करायचो आणि सर्वजण संचलन बघायला जायचो. तेंव्हा बाबांना ओळखण्याचा प्रयत्न करायचो. सर्वांचा गणवेश सारखा असल्यामुळे हे काम अशक्य व्हायचे. कदाचित परमपूज्य डॉक्टरांना गणवेशातील निर्माण होणारी एकरुपता, समरसता अपेक्षित होती. आम्हा तिघी बहिणींना आयुष्यभर पुरेल इतकी संस्काराची त्यांनी शिदोरी दिली. मला शाखेची विस्तारिका निघण्यापर्यंत प्रेरणा दिली. मी बैठकीला, कार्यक्रमाला निघाले की, बारीकसारीक गोष्टींची आठवण करून द्यायचे आणि परतल्यानंतर तिथल्या बौध्दिकावर चर्चा करायचे. दैनंदिन शाखेची संख्या आवर्जून विचारायचे.
बाबा कुटुंबवत्सलही तेवढेच होते. आम्ही तिघी बहिणी घरी यायचे म्हटले की बाबा आमच्या आवडीचे, आमच्या मुलांना आवडणारे पदार्थ आणून ठेवायचे आणि आमच्याबरोबर गप्पात रमायचे, मुलांच्या संस्कारांवर त्यांचे बारीक लक्ष असायचे.
‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ ही काव्यपंक्ती बाबांनी सार्थ केली. माजी सरसंघचालक सुदर्शनजी त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला जायचा विचार करीत असताना, दुस-याच दिवशी बाबा जणू त्यांना भेटायला गेले.
‘फिरुनी पुन्हा जन्मेन मी’ अशा ओळी ओठी येतात. अशा प्रामाणिक, निष्ठावंत माणसांची आज गरज आहे.
बाबा ---
स्वत:च्या आचरणातून, वागण्या,बोलण्यातून धडे देणारे बाबा ! बाबांवर काय लिहू सूचत नाही. माझं सोडा पण लेखणीलाही काही स्फुरत नाही.
आज बाबा जाऊन आठ वर्षे झाली, परंतु ते त्यांच्या कार्याने,विचारांनी आजही आमच्या सोबत आहेत. आजही आम्हाला गजाननरावांची मुलगी म्हणून ओळखतात. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा स्वभाव, प्रेमळपणा, त्यांनी कश्या प्रकारे मदत केली, हे आवर्जून सांगतात. त्यावेळी बाब परत नव्याने कळतात. मला तर बाबांचा मुलगाच संबोधायचे.
स्वत:च्या आचरणातून खूप गोष्टी शिकवायचे. एकदा मी आणि बाबा जेवत होतो. दोघांच्या पानात एक-एक पोळी आई वाढत होती. तितक्यात मागणारा (भिकारी) आला, मी पटकन म्हटलं, आई कालची पोळी उरली आहे का? मी अस म्हणताच आई बाबांच्या पानात पोळी वाढत होती, बाबांनी पटकन ती पोळी घेतली त्या मागणा-याला दिली, आणि म्हणाले, तो माणूसच आहे. त्याला गरम पोळी चालते. या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळालं.
बाबा म्हणजे सपोर्ट सिस्टिम, एखादी गोष्ट शांतपणे समजावून सांगणे, बाबांनी कधीच मारलं नाही की रागावलं सुध्दा नाही. स्वत:च्या कृतीतून संस्काराची शिदोरी आमच्यापर्यंत पोहोचवली.
मला बातम्या ऐकायला बिलकूल आवडायचे नाही. बाबांनी बातम्या लावल्या की मी चिडायची, मला सिरीयल बघायला आवडायची आणि रात्री बाबांनी गोष्ट सांगितल्याशिवाय मी झोपायची नाही. मग बाबांनी मला अट घातली की, तु मला रोज दोन बातम्या सांगायच्या मग मी तुला गोष्ट सांगणार. मग काय ही रोजचीच दिनचर्या झाली. मी बाबांना सगळ्याच बातम्या सांगायला लागले. मग बाबा मला त्यामागची पार्श्वभूमी सांगायचे, आम्ही चर्चा करायचो. पुढे तर मी आणि बाबा आवर्जून बातम्या ऐकायला बसायचो. मग त्यावर चर्चा करणं. मग बाबा मला एक विषय द्यायचे लिखाणाकरिता, लिही 10 ओळी, मग लिखाणाची, वाचनाची आवड यामुळेच निर्माण झाली.
लग्न झाल्यानंतर पहिल्यादांच माहेरी गेले. आई-बाबांशी गप्पा मारत असताना बोलता बोलता सासरे मला असं बोलले असे सांगितले, बाबांनी ऐकाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करतां ते म्हणाले, मी तुला काही बोललो तर तू तुझ्या सासू-सास-यांना सांगशील कां ? तर मी म्हणाले, काय बाबा काहीही बोलता... मग बाबा म्हणाले , मग मला त्यांच्याविषयी काही सांगत जाऊ नकोस, खुशाली व्यतिरिक्त. हा आदर्श लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने अंगीकारावा असं माझं वैयक्तिक मत आहे.
डॉ. आचार्य (दादा) यांनी केशवस्मृती सेवा संस्था समूह स्थापन केला होता, तर त्यामध्ये मुलींना नियुध्द शिकावयाचं अशी एक योजना आखली गेली. तर राष्ट्र सेविका समितीच्या वर्गावर नियुध्द हा अभ्यासक्रमाचा विषय आहे हे दादांना कोणी तरी सांगितलं, तर त्यांनी मला बोलावून फक्त मुलींच्या शाळेत जाऊन नियुध्द शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्याचं ते मला मानधन देणार होते. पहिलं मानधन मिळालं. आकडा कमी होता, मी माझी कमाई म्हणून बाबांच्या हातात दिली. बाबांनी सांगितलं, आपण नेहमी समाजाच्या ऋणात असावं, म्हणून मिळकतीतला थोडासा हिस्सा हा समाजाकरता असावा. मग मी गंगाजळी द्यायला सुरवात केली. थोडे पैसे स्वत: खर्चाला आणि भविष्याचा विचार हा नेहमी डोक्यात असावा म्हणून जनता बँकेत अकांऊट ओपन करुन दिले. स्लीप कशी भरायची हे शिकवलं. मुलींनी नुसतं शिक्षणच नाही तर व्यवहार ज्ञान शिकणं सुध्दा तितकंच महत्त्वाचं ही बाबांची शिकवण.
माझ्या करता " बाबा " हा केवळ शब्दच नाही तर पूर्ण नात्याची ही व्याख्या आहे. बाबा नेहमी एकच सांगत,
उदंड प्रेम करावं,
दुस-यावर विश्वास ठेवावा,
आपली प्रेम करण्याची क्षमता
कधीच कोणी कमी करु शकत नाही.
सौ. आरती राजेश धर्माधिकारी
( 9076189355 )
( 2 )
*माझे बाबा.*
काय लिहू बाबां विषयी, आठ वर्ष झाली बाबांना जाऊन, १ सप्टेंबर २०१२. आठवण आली की डोळे काठोकाठ भरून येतात, अत्यंत संघनिष्ठ, एक साधा संघाचा स्वयंसेवक, खूप प्रेमळ, असं व्यक्तिमत्त्व होतं बाबांचं.
संघ कार्याविषयी प्रचंड तळमळ. कुठलाही संघाचा कार्यक्रम असू दे, माझे बाबा सगळी काम बाजूला ठेवून जाणारच. मग ते पोळ्या गोळा करणं असो वा अन्य काही. संघाच्या शिस्ती बाबत एव्हढे आग्रही नसतील कदाचित, पण प्रचारकांची कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे काळजी घेत असत. विशेष म्हणजे प्रचारकांच्या जेवणा बाबत नेहमी जागरूक असत. ते ऑफिस मधून आले की संघ कार्यालयात जात व आपण स्वतः जेवण्या आधी संघ कार्यालयात विद्यार्थी, प्रवासातून आलेले प्रचारक, कोणी उपाशी आहे का? सगळ्यांची जेवायची चौकशी करत.
आमच्या कडे रोज किमान एक व्यक्ती तरी जेवायला असेच आणि त्याला साथ होती ती माझ्या आईची. कोणी अर्ध्या रात्री जरी आल तरी तिच्या कपाळावर कधी एक आठी सुध्दा आली नाही.
बाबा आम्हाला नेहमी सांगत की संघ कार्य हे ईश्वरी कार्य आहे, आणि संघाचे प्रचारक हे ऋषितुल्य आहेत. आणी-बाणी लागू झाली तेंव्हा अनेक जणांनी सांगितले की गजाननराव तुम्ही काम करू नका, तुमची सरकारी नोकरी आहे. पण त्यांनी आपला खारीचा वाटा उचलला. भूमिगतांना निरोप पोहोचवणे, भेटीगाठी घडवून आणणे, अश्याप्रकरे नोकरी जाण्याची भीती न बाळगता काम सुरू ठेवले.
मला अजूनही माझ्या लग्नाचा प्रसंग आठवतो. माझ्या लग्नाच्या १ महिना अगोदर बाबा खूप आजारी पडले होते, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. लग्न जवळ आलेलं, कसं होणार सगळं ही चिंता होती. तेंव्हा जळगांवला मा. शरद राव ढोले विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते. ते बाबांना भेटायला आले, बाबांनी त्यांच्या जवळ आपली काळजी बोलून दाखवली. ते म्हणाले, गजाननराव कसली काळजी करता तुमची मुलगी ती आमची पण मुलगी, आणि त्या वेळेस संपूर्ण संघ शक्ती बाबांच्या पाठीशी उभी राहिली. संघ बंधूंच्या सहकार्याने लग्न निर्विघ्न पणे पार पडले.
लग्नाला आता २४ वर्षे पूर्ण झाली आणि सासरी आता माझ्या ज्या गुणांचं कोड कौतुक होतं, तो बाबांच्या संस्कारांचाच ठेवा आहे. त्यांनी आम्हाला नेहमी माणसं जोडायला शिकवलं.
अशा माझ्या बाबांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन.
सौ. वृषाली ( भारती ) अतुल तोंडापूरकर, जळगांव.
( 9422230192 )
0 टिप्पण्या