एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यात नसलेल्या गुणांचं मुद्दामहून प्रदर्शन करून चांगुलपणाची माळ गळ्यात घालून घेणाऱ्यांची संख्या आज भरपूर आहे. पण काहीतरी मिळविण्याचा कोणताही अभिनिवेश नसणाऱ्या रामांच्या मनात समान्यांबद्दल स्नेह आचारातच नव्हे तर त्यांच्या विचारातही होता. वयाची पन्नाशी आली तरी आपल्याला जीवनात निश्चित काय करायचे आहे हे ठरवता न येणारी जनता बरीच दिसते. पण वयाच्या पंधराव्या वर्षीच आपले ध्येय निश्चित करण्याची विचार प्रणाली रामांकडे होती. ठरवलेल्या ध्येयासाठी धाडसाची गरज क्षत्रिय म्हणून हवीच की, तीही त्यांच्याजवळ होती. ठरवलेल्या ध्येया विषयी त्यांच्या मनात कणभरही शंका नव्हती. ते त्यांच्या निर्धारवर अढळ होते. एवढं सगळं असूनही ते विनम्र होते. रामांच्या पुढच्या आयुष्यात त्यांनी बरच काही समाजासाठी केलं.
प्रभू हे बिरुद लोकांनी रामांना का लावलं हेच तर आपण पहात आहोत. जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय आणि त्याचप्रमाणे द्रूढतम कार्य करणे यातून त्यांचे पुरुषोत्तम महत्व देखील प्रखरपणे लोकांच्या लक्षात येऊ लागले होते.
पुरुषोत्तम हे बिरूद त्यांना त्यांच्या आदर्श वर्तनामुळेच समाजाने दिलं. या उत्तमत्वात काय काय होतं तर त्यांचा संयमी स्वभाव, मनाचा मार्दवपणा, मोठ्यांशी आदरार्थी वर्तन, संस्कारांची ग्राहकता, कर्तव्याची जाणीव, समाक्षीलवृत्ती, मनाची स-हृदयता, समोरील व्यक्तीला आपलंसं करण्याची त्यांची भाषाशैली, अहम चा लवलेशही नसणारे विचार, स्वतःकडे कमीपणा घेण्याची मनाची तयारी, परिस्थितीकडे विधायकतेने पाहण्याचा द्रूष्टीकोन, स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान नसणे, नातेसंबंध जपण्याची मनाची धारणा, सत्याचा पाठीराखा, स्वजनांवरील प्रेम, प्रजेबद्दल आस्था, सेवाभावाची जागरुकता, शपथे बद्दल असलेला स्वतःचा विश्वास आणि वचनाप्रमाणे वर्तन अशा कितीतरी गोष्टी या पुरुषोत्तमत्वात अंतर्भूत आहेत. अर्थात या सगळ्याची समाजाला त्यांच्या राजपुत्र अवस्थेत ओळख झाली नव्हती हे उघड आहे.
पण जसजसे वय वाढत होते तसतशी आलेली समज, जागरुकता, नैतिकतेची जाण उत्कृष्ट धनुर्विद्या, सज्जनांसाठी देह कष्टाचेही भान नसणे या गोष्टी उत्तरोत्तर समाजाला समजल्या त्यामुळे आदर्श पुत्र म्हणून ओळखला गेलेला राजपुत्र हा जनकल्याणाची आस असलेला समजला जाऊ लागला तो त्राटिका वधानंतर. शौर्य, धैर्य याबद्दल त्याची प्रशंसा होऊ लागली. अहिल्या उद्धारानंतर रामांची लोकप्रियताही वाढली. त्यामुळे त्यांचे प्रभुपद हे त्यांना १४ वर्षाच्या वनवासानंतर लोकांनी बहाल केले, जे आजतागायत शाबूत आहे. या अशक्य अतर्क्य अचंबित वास्तवाचे पुण्यस्मरण यासाठीच.
@ नीला रानडे, धुळे
मो.9657059784
(श्रीराम चरित्र अभ्यासक, प्रवचनकार
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या