@मधुरा डांगे
मनाच्या श्लोकात पहिलाच श्लोक आहे -
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ।।
गणपती आणि शारदेचे स्तवन करून रामदास राघवाच्या पंथावर चालण्याचा सल्ला वाचकाला देतात. राघवाचा पंथ, रामाचा पंथ म्हणजे काय?
राम हा युगपुरुष होता. त्याच्या अंगी असणाऱ्या कर्तृत्वाने, पराक्रमाने आणि त्याग, संयम या वृतींमुळे तो अधिकाधिक मोठा झाला. मात्र रामाचा पंथ म्हणजे केवळ हा गुणसमुच्चय नव्हता. पंथ म्हणजे मार्ग. रामाचा पंथ हा सत्यधर्माचा पंथ आहे. इथे सत्य आणि धर्म या संज्ञा जोडीने वापरल्या आहेत त्याला विशेष प्रयोजन आहे. धर्माचा अर्थ सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीचे कर्म आणि स्वभाव यानुसार त्याचा धर्म ठरतो. रावण धार्मिक होता आणि बिभीषण देखील धार्मिक होता मात्र दोघांच्या धर्माच्या कल्पना भिन्न आहेत. इथे अपेक्षित आहे तो शाश्वत धर्म, सनातन संस्कृतीने सांगितलेला धर्म. या धर्माचे स्वरूप संपूर्ण सत्याचे आहे आणि म्हणून सत्यधर्म असा शब्द वापरला गेला आहे. रामाच्या जीवनात या सत्यधर्माचे मोठे महत्त्व आहे.
मुळात रामायणाचा काळ हा सत्ययुगाचा काळ आहे. या काळात स्वभावतःच सत्याचा मार्ग अनुसरणारा समाज आहे. तरीही रामाचे कार्य अधिक उल्लेखनीय ठरणारे आहे कारण तत्कालिन समाजात असणाऱ्या असत्याचा आणि अधर्माचा संपूर्ण नाश हा रामाच्या हातून घडला आहे.
रामाच्या पंथाचा अभ्यास करत असतांना त्याच्या सत्यधर्म पालनाच्या निष्ठेचा विशेषत्वाने अभ्यास करावा लागतो. रामाने केलेली प्रत्येक कृती ही सत्यधर्माच्या प्रस्थापनेची आहे. त्राटिका वधाच्या प्रसंगी विश्वामित्रांनी रामाला केलेला उपदेश गीतरामायणकारांनी चपखल शब्दांत सांगितला आहे. विश्वामित्र म्हणतात -
जो जना सुखवितो, नारी वध क्षम्यतो
धर्म तुज सांगतो, मानवेन्द्रा
यात आलेले धर्मविधान हे रामाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. राम ती राक्षसीण असूनही तिचा वध करण्यास धजावत नाही कारण नारीवध धर्मसंमत नाही. उत्तर रामचारित्रात राम लक्ष्मणाचा त्याग करतो ते ही धर्माचे बंधन म्हणून. रामाचा जन्म ते अवतार समाप्ती पर्यंतच्या सर्व कथांचा आढावा घेतला तर तो आपल्याला केवळ सत्यधर्माच्या दिशेने घेऊन जाईल.
रामाचा पंथ सत्यधर्माचा आहे हे लक्षात घेतले की त्यातल्या अधिक बारकाव्यांचा विचार करणे आवश्यक होते. हा पंथ सोपा नाही. अनेक नियम आणि स्वतःप्रति असणारे कठोर व्रतपालन यातून सिद्ध होणारा राघवाचा पंथ आहे. समर्थ म्हणतात -
मना रे जनी मौन्यमुद्रा धरावी
कथा आदरे राघवाची करावी
नसे राम ते धाम सोडून द्यावे
सुखालागी आरण्य सेवीत जावे
रामाचा पंथ हा अशा विरोधाभासातून जातो. वास्तविक पाहता हा विरोधाभास नाही मात्र तो वरकरणी तसा दिसतो. अरण्याचा मार्ग सुखाचा आहे असे समर्थ म्हणतात. हा अरण्याचा मार्ग म्हणजे एकांत. चिंतन, मनन करून सुरुवातीला आपल्या अंगी राघवाचे तत्त्व, राघवाचा मार्ग बाणवण्याची ही संधी आहे. पुढे लोकांमध्ये जायचे ते आधी सखोल तयारी करून. एवढी तयारी करून लोकांमध्ये कसे जायचे? तर मौन्यमुद्रा धरून. म्हणजे अवास्तव बोलायचे नाही. राघवाची कथा सांगावी, राघवाचे तत्त्व सांगावे आणि लोकांना राघवाच्या पंथावर येण्यास प्रोत्साहित करावे. वाणीचे एवढेच काम ! याव्यतिरिक्त मौन बाळगावे असे समर्थ या श्लोकातून सुचवतात.
राम वनवासात गेला आणि तिथून सत्यधर्माधिष्टीत रामराज्याची पायाभरणी झाली. वनवास सोपा नव्हता. या काळात रामाच्या चारित्र्याची परीक्षा झाली, शौर्याची परीक्षा झाली, अस्तित्वाची लढाई झाली, रामाच्या सत्यनिष्ठेची परीक्षा झाली, सत्याच्या प्रस्थापनेसाठी कष्ट सोसण्याची तयारी झाली, वचन पालनाच्या व्रताची देखील परीक्षा झाली. या काळात रामाने मोठ्या प्रमाणात जनसंघटन केले, धर्मविरोधी शक्तींचा नाश केला. या एकांताच्या काळात रामाची सत्यनिष्ठा अधिकाधिक दृढ झाली आणि जनांत आल्यावर म्हणजे राजा झाल्यावर रामाचे वर्तन त्या दृढ निष्ठेतून आकार घेत गेले. राघवाचा पंथ हा अशा अनेक परिक्षांमधून सिद्ध होतो.
सुरुवातीला सांगितलेल्या श्लोकात समर्थ गमू पंथ आनंत या राघवाचा असे म्हणतात. गमू म्हणजे रमत - गमत जाणे. याचा अर्थ वेळ घालवणे नाही तर तो मार्ग आपल्या मनात, शरीरात मुरवत जाणे असा आहे. राघवाचा पंथ सोपा नाहीच. त्यामुळे त्यावर चालण्याची सिद्धता करणे म्हणजे गमत जाणे, त्या मार्गावर रमत जाणे होय. अजून एक शब्द समर्थ वापरतात तो म्हणजे - 'अनंत'. राघवाचा पंथ अनंत आहे. याला अंत नाही. सत्याचा मार्ग हा शाश्वत मार्ग आहे. युगे बदलतील, राज्ये आणि राज्यकर्ते बदलतील, कालानुरूप समाजाचे स्वभावगुण बदलतील मात्र सत्यपंथाचे अस्तित्व कायम राहील, त्याचे महत्व कायम राहील. हनुमानाचे चिरंजीव असणे हे त्याने स्वीकारलेल्या राघवाचा पंथाचे फलित आहे. 'जोवरी भू वर रामकथानक, तोवरी जन्म असावा' असे मागणे हनुमंत मागतो कारण रामाचे कथानक आणि रामाचा पंथ हा शाश्वत आहे, सत्यधर्माचा आहे हे तो जाणतो.
आपण राघवाचा पंथ स्वीकारायचा म्हणजे सत्यधर्माचा मार्ग स्वीकारायचा. यासाठी आपल्यालाही सिद्ध व्हावे लागेल, अनेक परिक्षांमधून जावे लागेल, परिश्रम करावे लागतील. त्यातून आपली चिकाटी आणि सत्यनिष्ठा टिकली तर राघवाचा पंथ स्वीकारण्यास आपण तयार झालो, सिद्ध झालो. हा पंथ एकट्याचा नाही. समाजाच्या साक्षीने आणि साथीने चालण्याचा हा पंथ आहे. तेव्हा समर्थांच्याच शब्दांत शेवट करायचा झाल्यास -
ऐसा पुरुष धारणेचा
तोचि आधार बहुतांचा
दास म्हणे रघुनाथाचा
गुण घ्यावा ।।
राघवाचा पंथ ही केवळ काळाची गरज नाही तर आपले सामाजिक कर्तव्य आहे आणि हेच रामाचे खरे पूजन आहे !
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार.
@विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या