लोकनायक हा आहे राम


@ मधुरा डांगे

रामाचे लोकनायकत्व निर्विवाद आहे. आदि काळापासून जे लोकनायकत्व समाजाने मान्य केले ते रामाच्या ठायी अगदी स्पष्टपणे पाहायला मिळते. रामाच्या आधी असे अनेक राजे, महाराजे होऊन गेले जे पराक्रमी होते, मोठ्या साम्राज्याचे स्वामी होते मात्र रामाचे लोकनायकत्व गौरविले गेले, सर्वमान्य झाले याला कारणे आहेत.



राम लोकनायक असला तरी लोकपाल, लोकसेवक भूमिकेत आहे हे त्याच्या लोकनायकत्वाचे सर्वात मोठे विशेष आहे. राम थोडे थोडके नाही तर तब्बल १४ वर्षे आपल्या राज्यापासून, प्रजेपासून दूर होता तरीही प्रजेने त्याच्या नायक असण्यावर विश्वास ठेवला, त्याचा अत्यंत आनंदाने राजा महणून स्वीकार केला हे त्याच्या उन्नत लोकनायकत्वाचे मोठे यश म्हणावे लागेल. रामायणात राम वनवासातून परत आल्यावर केलेल्या त्याच्या भव्य स्वागताचे आणि राज्याभिषेक सोहळ्याचे सुरेख वर्णन आहे. गीतरामायणकार नगरजनांचा हा आनंद फार भावस्पर्शी शब्दांत सांगतात -

तव दृष्टीच्या पावन स्पर्शे
आज मांडिला उत्सव हर्षे
मने विसरली चौदा वर्षी
सुसज्ज आहे तव सिंहासन,
करी प्रभो स्वीकार...

ही उत्कटता, आतुरता नगरवासियांच्या मनात १४ वर्षानंतर देखील जागृत आहे हे रामाच्या लोकपालक वृत्तीचे यश आहे.

लोकपालक ही लोकनायकाची वृत्ती आहे. हीच वृत्ती रामाचे लोकनायकत्व मोठे करते. त्याच्या राज्यातल्या प्रत्येक नगर वासियाच्या मताला मान आहे. सीतेचा अंतिम त्याग हे रामातील अत्यंत जागृत लोकपालकत्वाचे अगदी जिवंत उदाहरण आहे. राम प्रजेचा पिता होतो आणि त्याच प्रेमाने प्रजेचा सांभाळ करतो. रावणवध झाल्यानंतर राम लंकेच्या नगर वासियांना म्हणतो की 'हे राज्य तुमचेच आहे. केवळ इथे अधर्माचा प्रभाव वाढला होता तो दूर झाला. तुम्ही सुखाने राज्यात राहा .' राम केवळ आपल्याच नाही तर प्रत्येक राज्यातील प्रजेला त्यांचा सन्मान देतो आणि हीच त्यांची लोकपालक वृत्ती आहे. ही सर्वसमावेशक दृष्टी आहे.

विरक्ती हा रामाचा मोठा गुण आहे. त्याला कशाचा लोभ नाही. प्रजेसाठी, राज्याच्या सुखासाठी तो आपले सर्वस्व त्याग करण्यास तयार आहे. रामदासांनी लोकनायकाचे गुण वर्णन करत असतांना या गुणाला मोठे महत्त्व दिले आहे. ते म्हणतात -

येथील येथे अवघेचि रहाते । ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काय घेऊन जाते । सांगाना कां ।।
हे तत्व रामाच्या मनात ठाम आहे.
प्राण ही प्रसंगी देणे, प्रजासुखासाठी ।
हीच ठाम श्रद्धा माझ्या, वसे एक चित्ती ।।

असे राम म्हणतो कारण ऐहिक जीवनातून तो विरक्त झाला आहे. त्याला केवळ राज्य उन्नत करायचे आहे, सत्यधर्म प्रस्थापित करायचा आहे. त्याच्या उद्दिष्टात स्वतःचा रंग नाही, स्वतःचा फायदा नाही आणि म्हणून त्याचे नायकत्व शुद्ध असल्याचे लोकांना कळते आणि हे शुद्धत्व मान्य होते.

विरक्तीच्या बरोबरीने यावा असा गुण म्हणजे नि:स्पृहता.
उत्कट भव्य तेंचि घ्यावे । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
नि:स्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।

असे समर्थ म्हणतात. रामाची वृत्ती यात चपखल बसते. राम उन्नतीचा ध्यास धरतो. ही उन्नती केवळ स्वतःची नाही तर जनांची देखील आहे. राम निजधामाला जातांना अयोध्यावासियांना सोबत नेण्याची विनंती मान्य करतो. या प्रतिकात्मक कथेचा उलगडा केला तर असे लक्षात येते की राम आपल्या पुण्याने, सत्कृत्याने मुक्तीस प्राप्त होतोच पण तो नगरवासियांचा देखील उद्धार करतो, त्यांनाही मुक्तीचा मार्ग खुला करून देतो. हे रामाचे लोकपालक म्हणून असणारे मोठेपण आहे.

रामाच्या लोकनायकत्वाला असणारे अध्यात्मिक अधिष्ठान ही त्याची शक्ती आहे. त्यामुळे त्याचे नायकत्व केवळ सत्ताधीश म्हणून उरत नाही. तो मृदुस्वभावी, मितभाषी आहे, विवेकी आहे, संयमी आहे, प्रसंगी कठोर आहे आणि मुख्य म्हणजे शुद्धमार्गी आहे. रामाच्या नायकत्वाला असलेले हे कोंदण त्याचे नायकत्व अधिक समृद्ध करते, उन्नत करते. मुळात त्याला केवळ राजा म्हणून नाही तर नायक म्हणून स्वीकारले गेले आणि त्यातही 'लोकनायक' म्हणून स्वीकारले गेले यातच त्याच्या प्रजेचा त्याच्यावर असलेला विश्वास सिद्ध होतो.

लोकनायकत्व कमवावे लागते. आपले पूर्वज मोठे राजे होते या परंपरेतून राजा होता येते मात्र लोकनायक होता येत नाही. त्यासाठी प्रजेचे नुसते समर्थन नाही तर प्रेम आणि विश्वास कमवावा लागतो. रामाने आपल्या गुणांच्या बळावर हा विश्वास कमावला आणि लोकनायक ठरला. रामाच्या कुळाची परंपरा ही भगिरथाची उन्नत परंपरा आहे. रामाचे निर्विवाद लोकनायकत्व हे या परंपरेचे शिखर आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये !

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार.

@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या