सृष्टीचे या चलन राम


@मधुरा डांगे

रामाला एका भजनात 'सृष्टीचे चलन' म्हटले आहे. रामाचे रूप विष्णूच्या अवताराचे असले तरी त्याचा जन्म मानवी आहे, त्याने केलेले सर्व कार्य हे त्याच्या मानवी आयुष्यातील कार्य आहे. मग मानव रुपात, मानव जीवनात केलेल्या कार्याला सृष्टीचे चलन कसे म्हटले? याला एक कारण म्हणजे समाजमनाने मान्य केलेले रामाचे देवत्व हे असले तरी ते एकांगी आहे. केवळ देवत्व म्हटले तर त्याने मानवी रुपात सिद्ध केलेल्या पुरुषार्थावर अन्याय केल्यासारखे होईल. म्हणून दोन्ही बाबींचा एकत्रित विचार होणे सुयोग्य ठरेल.



रामाने सृष्टीतील शाश्वत तत्वांचा स्वीकार आणि अंगीकार केला आहे. संयम आणि स्थिरता हे सृष्टीतील मूलभूत तत्त्व आहे. 'सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ।।' असे समर्थ म्हणतात ते संयमाचे तत्त्व समजावून सांगण्यासाठी. राम ते तत्त्व जगतो. रामाच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग आले. अत्यंत आनंदाच्या क्षणाला गालबोट लागले; पण पदरी पडलेला प्रत्येक प्रसंग रामाने नियतीचे दान म्हणून स्वीकारला. त्याचा संयम आणि स्थिरता कधी ढळली नाही. यातून देखील काहीतरी चांगलेच घडेल हा विश्वास रामाच्या मनात दृढ होता. वसंताच्या अत्यंत बहारानंतर निसर्गात पानगळ होते ती नवा वसंत फुलवायला! हे निसर्गाचे चक्र रामाने स्वीकारले, निसर्गाची लय ही आपल्या जगण्याची लय मानली. म्हणूनच राम शोक करत नाही. तो दुःखी भरताला उपदेश करतांना म्हणतो -

'अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा'
राम शाश्वत सत्याचा स्वीकार करतो म्हणून 'सृष्टीचे चलन' ठरतो.

राम अधर्माच्या, असत्याच्या नाशासाठी शस्त्र उचलतो. राम मुळात क्षत्रिय असला तरी शांत वृत्तीचा आहे. तो शस्त्र उचलतो कारण ते क्षत्रियांचे कार्य आहे. सृष्टीचे हेच चक्र आहे. 'संभवामि युगे युगे' असे गीतेत म्हटले आहे ते ही सृष्टीच्या चक्राचे ध्यान ठेऊनच. सृष्टीचे तत्त्व सहजीवनाचे आहे, परस्परावलंबी जीवनाचे आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार सृष्टीचक्रात आहे; परंतु एखादा घटक अधिक प्रभावी होऊन सृष्टीत असमतोल निर्माण होऊ लागला तर निसर्गाचा प्रकोप होतो. पूर येतात, वादळे येतात, महामारी येते आणि पुन्हा एकदा सृष्टीचे चक्र पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते. तसेच क्षत्रिय वृत्तीचे आहे. समाज सहकार्याच्या, परस्पर स्नेहाच्या भावनेने चालत असतांना त्याचे संरक्षण करणे आणि जेव्हा समाजाचे चक्र विस्कटून असत्याचा पगडा वाढू लागेल तेव्हा सत्याच्या बाजूने शस्त्र हाती घेऊन समाजव्यवस्था सुरक्षित ठेवणे हे क्षत्रियांचे कार्य आहे. रामाने हेच केले. निःशस्त्र व्यक्तीवर त्याने शस्त्र उचलले नाही, स्त्रिया, मुले यांना मारले नाही, दुर्बलांना मारले नाही. तो लढला बरोबरीच्या योद्द्यांशी. त्याने युद्धाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही पण अधर्माला योग्य शासन करून समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे चक्र सुव्यवस्थित केले.
मर्यादा हा सृष्टीचा आणखी एक नियम. सागराने मर्यादा ओलांडली की प्रलय येतो. निसर्ग मर्यादा सांभाळतो. रामाने ही मर्यादा अंगी बाणवली. म्हणून त्याला 'मर्यादापुरुषोत्तम' म्हटले गेले. रामाच्या प्रत्येक कृतीत मर्यादा आहे. सुखाच्या उपभोगात, दुःखाच्या आवेगात, रणभूमीवरील आवेशात, पत्नीवरील प्रेमात, राजप्रासादतील जीवनात सर्वत्र मर्यादा, सर्वत्र संयम! रामाच्या जगण्याची लय सृष्टीच्या लयीशी अशा प्रकारे एकरूप झाली होती.

राम वनवासात गेल्यावर सुमित्रा कौसल्येचं सांत्वन करतांना म्हणते की 'रामाला चराचरातील सर्व शक्ती मदत करतील.' असा विश्वास सुमित्रेला वाटतो कारण राम सृष्टीच्या लयीत जगतो. जे जे म्हणून सृष्टीच्या लयीशी एकरूप होते त्याला सृष्टीतील प्रत्येक घटक मदतरुप ठरतो असा सिद्धांतच आहे. ऋषी - मुनी अरण्यात राहिले. असे म्हणतात की सिद्ध ऋषींच्या आश्रम परिसरात हिंस्त्र श्वापदे देखील शांत होतात, निरुपद्रवी होतात. याचे कारण तेथील साहचर्य भाव त्यांना जाणवतो. म्हणून अशा स्थानांना तपोभूमी म्हटले आहे. रामाचे सृष्टीच्या लयीशी असणारे एकत्व सुमित्रा जाणते म्हणून तिला त्या शक्तींविषयी विश्वास आहे. त्या शक्ती रामाला त्रास देणारा नाहीत हा विश्वास आहे.

राम स्थिर आहे, संयमी आहे, मर्यादाशील आहे आणि हे गुण त्याच्या केवळ आचरणात नसून जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचे ठरल्यावर राम सागराची पूजा करतो आणि त्याला जागा देण्याची विनंती करतो. ही पूजा म्हणजे सृष्टीच्या शक्तीला केलेली विनवणी आहे. शस्त्राबरोबर चालवले जाणारे अस्त्र मंत्र म्हणून चालवले जातात. हे अस्त्र म्हणजे सृष्टीतील शक्तींना केलेले आवाहन आहे. राम मनोभावे पूजा करतो, कार्य सिद्धीस नेण्यास सहाय्यभूत व्हावे म्हणून सृष्टीतील शक्तींना विनंती करतो हा रामाचा भाव सृष्टीतत्त्वाशी एकरूप होण्याचा आहे, त्या तत्त्वांवर हावी होण्याचा नाही.

राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सध्या सुरू आहे. त्यासाठी असणारी पावती पुस्तके आधी पूजा करून नंतर वापरली जात आहेत, अभियानाचा शुभारंभ एखाद्या मंदिरात पूजन, आरती करून होत आहे. असे का करायचे? हे सृष्टीतील सज्जन शक्तीचे पूजन आहे, शुद्ध हेतू अंगी यावा म्हणून सत्य तत्त्वाला केलेली प्रार्थना आहे. आम्ही रामभक्त आहोत आणि हे रामाचे कार्य करीत आहोत हा भाव जागृत व्हावा म्हणून केलेली पूजा आहे. हे संघटनाचे काम आहे, हे रामतत्व अंगी बनवण्याचे काम आहे. यात अहंकार नको म्हणून पूजन! रामाच्या मनुष्यत्वाचा विलोप होऊन त्याला देवत्व आले कारण तो सृष्टीच्या लयीशी एकरूप झाला, सृष्टीच्या तत्वांसमोर विनम्र झाला आणि म्हणून 'सृष्टीचे चलन' ठरला. मनुष्यातून देवात्त्वाकडे जाण्याचा मार्ग सृष्टीशी एकरूप होण्यातून आहे ही चेतना जगविण्याचा हा काळ आहे, समाजाचे शुद्धत्व सिद्ध करण्याचा हा काळ आहे.

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार.
@ विश्व संवाद केंद्र देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या