शब्द सुंदर तेथे राम


@मधुरा डांगे

भारतीय पुराणांनी नवविधा भक्ती सांगितली. नवविधा भक्ती म्हणजे देवाच्या उपासनेचे, पूजेचे नऊ मार्ग आहेत. यातील एक मार्ग कीर्तन सांगितला आहे. कीर्तन म्हणजे विविध गीते,भजने, काव्ये, ओव्या, अभंग यांच्या रुपात देवतेचे गुणगान करणे, तिची स्तुती करणे. विविध देवतांची भजने आपण भक्तीने गातो, देवाची आळवणी करतो. या शब्दांनी देव प्रसन्न होतो आणि मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. याच्या पुढे जाऊन या गीतांमध्ये भक्त इतका तल्लीन होतो की आपल्या गायनातून प्रत्यक्ष देवतेच्या अवतरणाचा भावानुभव घेतो.



राम हे समर्थ रामदासांचे आराध्य दैवत ! त्यांनी रामावर अनेक रचना केल्या. अत्यंत उत्कट भाव आणि गेयता असणाऱ्या या रचना रामदासांची अपार भक्ती प्रकट करतात. दोन रचनांचा ऊहापोह इथे करावासा वाटतो.

करुणाष्टके ही रामाला केलेली अत्यंत आर्त विनवणी आहे, आळवणी आहे. समर्थ रामाला परम दीन दयाळा, कारुण्य सिंधू, सकळ जन सखा, सकळ भ्रमविरामी अशी विशेषणे वापरतात. यातून समर्थ रामाला आळवणी करतात की भक्त म्हणून मला तुझ्या पायी स्थान दे. रामाचे आणि भक्तांचे नाते सांगणारे सुंदर श्लोक यात आहेत. समर्थ म्हणतात -

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥
तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥

अर्थात आईवडिलांची माया लेकरू जाणत नाही, पण लेकराला रागावल्यावर मात्र त्यांना पाणी देखील घशाखाली उतरत नाही. चातक पक्ष्याला जशी पावसाची आतुरता असते तसे माझे तुझ्याविना झाले आहे. तू सगळ्यांचा सखा आहेस, स्वामी आहेस. माझी सर्व माया तुटली आहे, मी सर्व विषयांचा त्याग केला आहे. तेव्हा तू मला जवळ कर. समर्थांची भावोत्कट अवस्था या श्लोकांच्या रचनेतून किती तरलतेने समोर येते !

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥
घडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ।।

रामदासांचे शब्द रामाला केलेल्या विनवणीची, त्याने जवळ करावे म्हणून असणाऱ्या भक्ताच्या तळमळीची किती सुरेख भेट वाचकाला घडवून आणतात.
दुसरा ग्रंथ आहे 'आत्माराम' नावाचा ! यात रामदास म्हणतात -

आतां नमस्कारीन राम । जो योग्याचें निजधाम ।
विश्रांतीचा निजविश्राम । जयें ठायीं ॥ ११ ॥
जो नांवरूपावेगळा । जो मायेहूनि निराळा ।
जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥ १२ ॥
जेथें भांबावला तर्क । जेथे पांगुळला विवेक ।
तेथें शब्दाचें कौतुक । केवीं घडे ॥ १३ ॥
जयाकारणें योगी उदास । वनवासी फिरती तापस ।
नाना साधनें सायास । ज्या कारणें करिती ॥ १४ ॥
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ।
उपमाचि नाहीं निरुपम । रूप जयाचें ॥ १५ ॥

येथे रामाला सर्वात्मा म्हटले आहे. त्याचे सगुण - निर्गुण असे दोन्ही प्रकारचे रूप रामदासांनी वर्णिले आहे. एक ग्रंथात भक्ताची आराध्याला केलेली आर्त विनवणी तर दुसऱ्या ग्रंथात रामाच्या योगी रूपाचे, निर्गुण रूपाचे वर्णन आहे. हे शब्द रामाचे दर्शन घडवतात.

सुंदर शब्दांच्या रचनेतून देवतेची स्तुती, आळवणी, गुणवर्णन ही देवतेची उपासना मानली गेली आहे. एखादा श्लोक हा साक्षात भगवंताचे वचन आहे असे मानून म्हणण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. तेव्हा शब्दातून घडणारे हे देवतेचे दर्शन आहे, शब्दांच्या ठायी असणाऱ्या देवतेच्या अस्तित्वाचे दर्शन आहे.

राम जन्मभूमी अभियान आणि आता मंदिर निर्माण कार्यात झटणारे असंख्य रामभक्त विविध मार्गांनी रामाची सेवा करीत आहेत, उपासना करीत आहेत. प्रत्येकाचे गुण भिन्न, क्षमता भिन्न, कार्यपद्धती भिन्न परंतु त्या सगळ्यांच्या ह्रदयात राम आहे. अनेक घोषणा, अनेक गीते, कविता, लेख अशा विविध माध्यमांनी केला जात असलेला रामनामाचा जागर हे रामाचे शब्दात्म रूप आहे. सुंदरतेत देवाचा वास असतो असे म्हटले जाते. तेव्हा सुंदर मूर्ती, सुंदर कार्य, सुंदर दृश्य, सुंदर शब्द या सगळ्यांमध्ये रामाचा वास आहे. आपल्या सगळ्यांच्या सुंदर अंतरात असलेला राम अनेकविध माध्यमांतून व्यक्त करत हा संपूर्ण देश राममय झाला आहे.

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार
@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या