@मधुरा डांगे
रामाला दिलेले देवत्व जसे त्याच्या पुरुषार्थाशी निगडित आहे तसे त्याच्या उद्धारक रुपाशी निगडित आहे. रामाचा जन्म अवतारी पुरुष म्हणून झाला. त्याचे उद्धारक रूप हे त्या अवतार कार्याला साजेसेच ठरते. रामाच्या ठायी असणारे साधनेचे बळ आणि योगशक्ती त्याच्या उद्धारक रुपाला अधिक परिपूर्ण करते.
रामायणात रामाचे उद्धारक रूप सांगणारे अनेक प्रसंग आहेत. विश्वामित्रांसोबत मिथिलेला जात असतांना राम अहल्येचा उद्धार करतात. शिळा स्वरूप झालेल्या तिच्या शरीराला रामाच्या पावन पदस्पर्शाने नवसंजीवनी प्राप्त होते. हा रामाचे उद्धारक रूप दर्शवणारा पहिला ठळक प्रसंग रामायणात आपल्याला दिसतो.
पुढे जटायू भेटीचा प्रसंग येतो. रावण सीतेला पळवून नेत असतांना जटायू रावणाशी युद्ध करतो मात्र रावणाच्या मायावी शक्ती पुढे हरतो. रामाची वाट पहात मरणासन्न अवस्थेत पडलेल्या जटायूची रामाशी भेट होते आणि सगळा वृत्तांत सांगून जटायू मरण पावतो. राम आपल्या हातांनी त्याचा अंत्यसंस्कार करतो आणि त्याला मुक्ती देतो. सत्य कार्यासाठी आपले प्राण देणाऱ्या जटायूला प्रत्यक्ष अवतारी पुरुषाच्या हातून मुक्ती मिळते.
चित्रकूट पर्वतावर शबरी आणि रामाची भेट ही याच अर्थाने उल्लेखनीय ठरते. शबरीचे शुद्धत्व तिच्या आणि रामाच्या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त करून देते. ती रामाला चाखलेली बोरे खायला देते तेव्हा लक्ष्मण शंकित होतो. गीत रामायणात हा प्रसंग फार सुंदर सांगितला आहे. शबरी लक्ष्मणाला म्हणते -
का सौमित्री, शंकित दृष्टी?
अभिमंत्रित ती, नव्हेत उष्टी
या वदनी तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा
लक्ष्मणाला आलेली शंका रामाला येत नाही कारण तो तिचे शुद्धत्व जाणतो, मुक्तीच्या मार्गावरचा तिचा अधिकार जाणतो त्यामुळे राम शबरीची चाखलेली बोरे आवडीने खातो आणि तिला मुक्तीच्या मार्गाचा उपदेश करतो. शबरीच्या जीवनाचा उद्धार होतो, तिची अनेक वर्षांची साधना फलद्रुप होते.
चित्रकूट भेटीच्या प्रसंगीच्या गीतात म्हटले आहे -
चित्रकुटा हे चरण लागता
किती पावले मुनी मुक्तता
रामाच्या उद्धारक रूपाचे हे मोठे समर्पक वर्णन आहे. वर्षानुवर्षे तप - साधना करणारे मुनी रामाच्या केवळ चरण स्पर्शाने मुक्त होतात हे रामाच्या सिद्ध उद्धारक रूपाचे लक्षण आहे.
सीतेच्या शोधात वनात फिरत असतांना राम -लक्ष्मणाची कबंध नामक एका विचित्र राक्षसाशी भेट होते. तो शापित आहे आणि रामाच्या हातूनच त्याचा मोक्ष आहे असे रामायण सांगते. राम त्याच्या भुजा छाटून जाळून टाकतो तेव्हा हा राक्षस त्याच्या स्वर्गीय रुपात परत येतो अशी कथा आहे. हाच पुढे रामाला सुग्रीवाशी सख्य करण्याचा सल्ला देतो. अनेक वर्षे शाप भोगत असलेल्या कबंधाला रामाच्याच हातून शापमुक्ती होण्याचा उ:शाप आहे. हे रामाचे अवतारी आणि उद्धारक रूप सिद्ध करणारे प्रसंग आहेत असे स्पष्ट म्हणावे लागेल कारण रामाच्या जन्माच्या आधीच रामाच्या आयुष्याचे कार्य ठरलेले आहे. रामाच्या जन्माला अशा घटनांमुळे एक वेगळे महत्व प्राप्त होते.
रामाचे उद्धारक रूप दर्शवून देणाऱ्या अशा अनेक कथा रामायणात येतात. राम अवतारी पुरुष होता. त्यामुळे जसे रावण वधाचे कार्य हे त्याचे जीवितकार्य होते तसेच अशा अनेक शापित जीवांना मुक्ती देण्याचे कार्य देखील त्याच्या हातून घडावयाचे होते. रामाचा वनवास ,सीतेचे हरण, सिताशोधार्थ राम करीत असलेली भटकंती या सर्व गोष्टींना एक व्यापक अर्थ आहे. तो जसा सामाजिक, राजकीय अर्थ आहे तसा अध्यात्मिक अर्थ देखील आहे. रामाच्या जीवनाची कहाणी जशी त्याच्या पुरुषार्थाशिवाय पूर्ण होत नाही तशीच त्याच्या अवतारी रुपाशिवाय देखील पूर्ण होत नाही आणि हेच अवतारी रूप त्याच्या उद्धारक रुपांतून स्पष्ट होते.
रामाने समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व वर्गातील व्यक्तींचा उद्धार केला, त्यांना मोक्षाचा मार्ग खुला केला. अहल्या ऋषीपत्नी होती, कबंध हा एक महातेजस्वी दनुपुत्र होता, शबरी भिल्ल स्त्री होती तर जटायू पक्षीराज होता. सुग्रीवाचा भाऊ वाली अगदी मृत्यूशय्येवर असतांना राम त्याला म्हणतो -
अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
वानरराज वालीचा वध करणारा राम त्याच्या अंतिम क्षणी त्याच्या मोक्षाचीच कामना करतांना दिसतो. रावणाच्या वधानंतर सर्व वैर बाजूला ठेऊन राम रावणाचा यथोचित अंत्यसंस्कार करावयास सांगतो. रामाचे उद्धारक रूप अशा प्रसंगांतून अधिकाधिक उन्नत होत असल्याचे जाणवते. कारण या उद्धारक रुपात भेद नाहीत. ज्याची जशी साधना तसा त्याला उद्धार हे पक्के तत्त्व यामागे असल्याचे दिसते.
रामाचा अभ्यास आणि उपासना ही रामाच्या प्रत्येक रूपाची उपासना आहे. 'रामही बेडा पार लगाये' असे एका भजनात म्हटले आहे हे रामाच्या उद्धारक रूपाचेच स्मरण आहे. देवता म्हणून रामाचा स्वीकार करत असतांना रामाचे हे रूप सातत्याने समोर येते आणि मान्य होते. राम राज्याभिषेक प्रसंगी हनुमंत रामाला विनंती करतो -
पावन अपुले चरित्र वीरा
सांगू देत मज देव अप्सरा
श्रावणार्थी प्रभू, अमरपणा या दीनासी यावा
हनुमंताची ही प्रार्थना राजा रामाला नसून उद्धारक रामाला आहे. रामाच्या सिद्धयोगी रूपाकडे हनुमंत अमरत्व मागतो आहे.
रामाचे चिंतन, रामाचे गायन, रामाचे काम आणि रामाचे नाम या गोष्टी रामाच्या उद्धारक रूपाचे आपल्याला दर्शन घडवतात. त्याचे देवत्व त्याच्या उद्धारक रुपांतून अधिक आश्वासक वाटते. राम मंदिर निर्माण व्हावे म्हणून अनेकांनी अनेक नियम केले, कुणी व्रते केली, कुणी आपल्या कमाईतून काही भाग रामासाठी राखीव ठेवला, कुणी राम मंदिरात विराजमान रामाचे दर्शन घडावे म्हणून पूजाअर्चा करीत राहिला. गेली अनेक वर्षे समाज राम मंदिर घडावे हे स्वप्न बघत राहिला आणि वेगवेगळ्या रूपाने त्यासाठी प्रयत्न करीत राहिला. या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. यानिमित्ताने समाजाचे चित्त राममय झाले हे रामाचे उद्धारक रूप आहे, समाज आदर्शांच्या दिशेने प्रवास करू लागला हे रामाचे उद्धारक रूप आहे, आज समाजातील प्रत्येक लहान - मोठा घटक राम मंदिरासाठी आपले योगदान स्वयंस्फूर्तीने देतो आहे हे रामाचे उद्धारक रूप आहे. शेवटी उद्धार हा अंतरंगाच्या शुद्धीतून होतो आणि या शुद्धीसाठी समोर एक आश्वासक आदर्श लागतो, एक आराध्य लागतो. हा आराध्य, हा आदर्श म्हणजे राम आहे. रामाच्या निमित्ताने समाज एकत्र येतो आहे, एकत्व अनुभवतो आहे ही समाजाच्या उद्धाराची प्रक्रिया आहे, समाजातील रामाचे उद्धारक रूप जागृत होण्याची प्रक्रिया आहे !
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार.
@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या