दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृति दिन !

 १० फेब्रुवारी १९६८.

उद्या दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय जनसंघाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी नुकतेच-अवघ्या ४४ दिवसाआधी अध्यक्ष झालेले दीनदयाळ उपाध्याय हे लखनौ वरून दिल्लीला जाणार. तेवढयात पाटण्यावरून बिहार प्रदेश संघटन मंत्री अश्विनी कुमार यांचा फोन येतो, "क्या आप कल होनेवाली बिहार प्रदेश कार्यकारिणी कि बैठक करके दिल्ली जा सकते है?" आणि दिनदयाळजींनी ११ फेब्रुवारी ला दिल्ली ऐवजी पाटण्याला जायचं नक्की केलं.



नेहमी पॅसेंजरने, थर्ड क्लासच्या डब्यात प्रवास करणाऱ्या दिनदयाळजींनी आता जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे फर्स्ट क्लास ने प्रवास करावा असे इतर कार्यकर्त्यांनी ठरवले.

पठाणकोट-सियालदह एक्सप्रेस चे रिझर्वेशन झाले. रामप्रकाश गुप्त आणि पितांबर दास हे दोघे दिनदयाळजींना स्टेशनवर सोडायला आले. लखनौवरून सायंकाळी सात वाजता गाडी निघणार. रात्री सव्वा दोन वाजता मुगलसरायला पोचणार. आरक्षित डबा आधीच्या गाडीपासून वेगळा होऊन दिल्ली-हावडा एक्सप्रेसला जोडला जाणार. हि गाडी पावणे तीनला रवाना होणार आणि दिनदयाळजी सकाळी पाटण्यात उतरणार.

कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे घ्यायला आले. पाहतो तो डब्यात दीनदयाळजी नाहीत! शोधाशोध सुरु झाली!




तेवढ्यात मुगलसरायवरून बातमी आली- मुगलसराय स्टेशनपासून दीडशे मीटर अंतरावर रुळांना समांतर, दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडलेल्या-डोक्यावर मार लागलेल्या-अंगावर मळकट चादर पांघरलेल्या आणि हातात पाच रुपयाची नोट कोंबलेल्या अवस्थेत एक 'बेवारस' मृतदेह आढळून आला आहे. उत्सुकतेने जमलेल्या गर्दीतील कुणीतरी अचानक ओरडले, "अरे ये तो भारतीय जनसंघ के अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय है!"

मृतदेह दिल्लीला नेण्यासाठी वाराणसी येथे विमानात ठेवला गेला. कुठल्यातरी संघ शिक्षा वर्गासाठी प्रवासात असणारे संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे भाऊराव देवरसांसोबत वाराणसीला आले. घाईघाईने विमानात शिरलेले गुरुजी दिनदयाळजींचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरून पुटपुटले, "इतक्या लवकर निघून गेलात? अजून तर किती काम करायचं आहे?"
एवढ्यात गुरुजींना मागून भाऊरावांच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो- "चला भाऊ! आता रडायला वेळ नाही. अनेक कामं हातावेगळी करायची आहेत" असं म्हणून गुरुजी पुढील प्रवासासाठी निघाले. पुढे चार वर्षे दिनदयाळजींबद्दल जाणीवपूर्वक मौन! दीनदयालजी म्हणजे गुरुजींचे बहिश्चर प्राणच! त्यांच्या जाण्याने गुरुजींवर जो आघात झाला होता, त्याची कल्पना कुणीही करू शकणार नाही; पण नेत्यानेच हातपाय गाळले तर अनुयायांना कोण समजावणार?



अगदी शेवटी १९७२ च्या ठाण्याच्या बैठकीत श्रीगुरुजी म्हणतात, "दिनदयाळजींच्या नसण्याची क्षतिपूर्ती कुणीही करू शकत नाही. उर्वरित सर्वजण मिळूनही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच त्यांच्या नसण्याची उणीव भरून काढू शकतात."

दिल्लीतली बैठक स्थगित करून सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचले. पार्थिव शरीर दिल्लीला आणलं गेलं. दीनदयाळजी दिल्लीला आले की अटलजींना खासदार म्हणून मिळालेल्या ३०, राजेंद्र प्रसाद रोडवरील घरात राहत असत. तिथेच आज त्यांचा निष्प्राण देह ठेवला गेला. देशभरातून लोक दिल्लीला पोहोचू लागले. दुसऱ्या दिवशी दुपारी अंतयात्रा निघाली. चार अश्वारूढ सैनिक शवयात्रेच्या समोर चालत होते. शव रथाच्या समोर जनसंघाचे वरिष्ठ अधिकारी चालत होते. दुतर्फा शेवटच्या दर्शनासाठी आणि पुष्पार्पणासाठी लोकांची गर्दी झालेली. मागे महिला गायत्री मंत्राचा जप करत चाललेल्या.



संध्याकाळी सात वाजता दिनदयाळजींचे मामेभाऊ श्री प्रभुदयाल शुक्ल यांनी अग्निडाग दिला.
दिनदयाळजींच्या निधनानंतर अटलजी म्हणतात, "नन्हादीप बुझ गया, हमें अपना जीवन-दीप जलाकर अंधकार से लडना होगा।
सूरज छिप गया, हमें तारों की छाया मे अपना मार्ग ढुंढना होगा"

- अंबरीश पुंडलीक

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या