कृतीनेच शब्दांप्रती मोल येई


@मधुरा डांगे

नाना पालकर रचित 'उठावणी' या पुस्तकात म्हटले आहे -

स्वये कार्य जोमे मनाने करुनी
पुढे ठेव आदर्श आधी रचोनी ।
पहा लोक येती न बोलावताही
कृतीनेच शब्दांप्रती मोल येई ।।

वरील ओळी वाचतांना रामाचा संपूर्ण जीवनपट डोळ्यासोर येतो. कोणत्याही गोष्टीचा रामाने केवळ उपदेश केला नाही तर ती गोष्ट स्वतः अमलात आणली. रामाचे जीवन आदर्श ठरण्यामागे हे मोठे कारण आहे.



पुत्र म्हणून भूमिका बजावत असतांना रामाने आई - वडिलांच्या शब्दांचे मोल राखले. खरे तर रामाला दिलेला वनवास हा त्याच्या सावत्र आईचा हट्ट होता. कौसल्या परोपरीने त्याला न जाण्याविषयी विनवीत होती. ही आज्ञा ज्याने सांगितली तो राजा दशरथ आपले शब्द माघारी घ्यायला तयार होता, संपूर्ण जनमानस या वनवासाच्या विरोधात होते मात्र राम गेला. याची कारणमीमांसा दशरथाने कैकयीला दिलेल्या वचनाने करता येते. राम वनवासाला गेला कारण रघुकुलाची शब्द पाळण्याची रीत टिकावी. आपले वडील, जे अत्यंत सामर्थ्यशाली राजे आहेत; त्यांच्या माथी रघूकुल रीत मोडल्याचा कलंक लागू नये म्हणून राम गेला. इथे प्रजेच्या भावनांचा नाही तर राजघराण्याची परंपरा अबाधित राखण्याचा पुत्र म्हणून असणारा रामाचा अट्टाहास दिसतो. रामाच्या कृतीने परंपरागत वचनांचा मान राखला.

पती म्हणून रामाचे स्थान फार मोठे आहे. अनेकार्थाने विवादित असलेले हे स्थान खरं तर यथायोग्य उलगडले गेलेच नाही असे वाटते. एवढा समर्थ राम सोबत असतांना सीतेचे हरण होते, रावण वधानंतर सीता परत आल्यावर तिची अग्निपरीक्षा होते आणि उत्तर रामायणात राम सीतेचा त्याग करतो हे रामायणातील महत्वाचे विवादित मुद्दे आहेत. मुळात इथे एक विचार करणे अगत्याचे आहे की या कोणत्याही प्रसंगात सीतेची तक्रार नाही, तिच्या मनात रामाविषयी राग नाही. केवळ पत्नी म्हणून आलेली ही मानसिकता नाही. सीता एका उच्च राजकुलात वाढलेली आहे. तिला स्वतंत्र विचार आहेत, स्वतंत्र अधिकार आहेत मात्र तरीही ती शांत आहे, सहनशील आहे. याचे कारण म्हणजे रामाचा आणि तिचा अत्यंत सुसंवाद आहे. वर उल्लेख केलेल्या रामाच्या प्रत्येक कठोर कृतीला सीतेची संमती आहे. म्हणून तर रामाने तिला 'लोकमाय' म्हटले आहे. राम असे वागला नाही तर समाजाला शिस्त लागणार नाही हे तिला कळतं. तो पती म्हणून आणि सीता पत्नी म्हणून अत्यंत यशस्वी आहेत कारण प्रत्येक लोकापवादाचा त्यांनी एकत्रपणे सामना केला. आधी आपणच कठोर कर्म केले म्हणजे समाज नैतिक बंधनांचे पालन करेल हे त्या दोघांनाही ज्ञात आहे. रामाने या कठोर कृती स्वतः स्वीकारलेल्या आहेत.

लोकनेता म्हणून राम सजग आहे. रावणाचा वध करणे रामसारख्या दैवी नेतृत्वाला शक्य नव्हते असे नाही; परंतु राम असे एकट्याने काम करीत नाही. तो सगळ्यांना सोबत घेतो, मार्ग दाखवतो, सगळ्यांच्या सल्ल्यांचा सारासार विचार करतो आणि सगळ्यांना सन्मान देतो. याचा परिणाम म्हणजे रामाचे नेतृत्व सगळे मान्य करतात. केवळ अधिकाराच्या धाकाने नेतृत्व मान्य होत नाही तर लोकनेत्याची कृती तशी असावी लागते हे यातून स्पष्ट होते. पुढे राजा म्हणून सिंहासन ग्रहण केल्यावर देखील रामाचे नेतृत्व असेच राहिले. सुग्रीवाला रामाने आपला पाचवा भाऊ मानले, बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून मोठा आदर दिला. या कृती पुढील पिढीसाठी एक पक्का संदर्श देणाऱ्या ठरल्या.

पिता म्हणून असणारे रामाचे रूप फारसे समोर आले नाही. सीतेच्या त्यागानंतर बऱ्याच काळानंतर रामाच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी लव - कुश या रामपुत्रांची आणि रामाची भेट झाली. यानंतर काहीच काळात सीतेची अवतार समाप्ती झाली. रामाने सीतेच्या अवतार समाप्ती नंतर राज्यकर्तव्य सोडले नाही आणि मुलांची जबाबदारी देखील सोडली नाही. लव - कुश रामाजवळच राजप्रासादात राहिले, त्यांनी यथायोग्य शिक्षण घेतले आणि पुढे त्यांनी राज्य देखील केले. कोणत्याही ग्रंथात त्या दोघा रामपुत्रांच्या मनात रामाविषयीचा दुस्वास दिसत नाही. याचे कारण त्यांचे नाते शुद्ध होते, समजूतदार होते.

रामाच्या आयुष्यातील घटनांचा आढावा घेत असताना असे दिसते की प्रत्येक कठोर प्रसंग रामाने स्वतः पार केला. यात कुठेही स्वार्थ नव्हता. केवळ समाजात काय संदेश जावा याचा विचार होता. समाजाची आणि पर्यायाने राज्याची घडी सुरळीत चालायची असेल तर वैयक्तिक जीवन कठोर करावे लागेल याची जाण ठेऊन रामाने कृती केल्या. रामराज्य पुढे अनेक वर्षे चालले याला कारण रामाच्या त्याच्या काळात केलेल्या कृती होत्या. त्या काळात कदाचित त्या क्लेशकारक ठरल्या; परंतु भविष्यकालीन समाजाने तो आदर्श मानला. आज आपण रामराज्य आणावयाचे म्हणतो म्हणजे रामाच्या या कृतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.

रामजन्मभूमीसाठी लढणाऱ्या लोकांना पूर्ण जाणीव होती की हे एका जन्माचे काम नाही; परंतु ते लढा देत राहिले. थोडे थोडके नाही तर ५०० वर्ष लढत राहिले. आज आपली पिढी जे भाग्याचे क्षण बघते आहे ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे ! आपल्याला मंदिर निर्माण कार्यात सहयोग द्यावा असे मनापासून वाटते हे त्या ५०० वर्ष खपलेल्या पिढ्यांचे यश आहे. त्यांच्या कृतीने त्यांचा शब्द सार्थ ठरवला आहे.

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार
@ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या