आधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा वेगळे होते महात्मा बसवण्णा


आज अक्षयतृतीया याच दिवशी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला. लोकशाहीचा पहिला पाया रचणारे महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश..... 

@सिध्दाराम भै.पाटील

या समाजाचे ऐक्य म्हणजे 
येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, 
हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. 
भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप'
ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद
होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता. प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. त्या धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये, ही भावना होती.

भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे. नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषिप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला गेला आहे. यादिवशी बैलांना शेतीकामाला जुंपण्यात येत नाही. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता भाव ठेवून आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याची परंपरा भारतीयांच्या तरल संवेदनेची ओळख करून देण्यास पुरेशी आहे. पशु-पक्षांचे शोषण होऊ नये यासाठी 21 व्या शतकातील मानव कायदे बनविताना दिसतो, परंतु भारतामध्ये प्राणिमात्रांवर दया करणेच नव्हे, तर ईश्वररूपात पाहणेदेखील दैनंदिन आचरणाचा अविभाज्य भाग आहे. 900 वषार्र्ंपूर्वी समाजात समरसता निर्माण करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांना साक्षात नंदीचा अवतार मानले गेले. 

संस्कृतमधील "वृषभ' या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. सन 1131 मध्ये बसवण्णांचा जन्म झाला. (बसवला लोक प्रेमाने बसवण्णा म्हणत) पुढे लोकांनी त्यांना आदराने "बसवेश्वर' हे नामाभिधान दिले. समुद्राला भरती येते, त्यानंतर ओहोटी येते. सूर्य मध्यावर येतो आणि नंतर मावळतोही. समाजाचेही असेच असते. या भूमीने व्यास, कपिल, कनाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेते, चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण केले. समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली. निरर्थक अंगरूढींनी उच्छाद मांडला. स्पृश्य-अस्पृश्यता यांसारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या. दुर्दैव असे की हे सारे धर्माची झूल पांघरून सुरू होते. अशावेळी बसवण्णा यांचा उदय झाला आहे.

आधुनिक सुधारणावाद्यांपेक्षा बसवण्णा वेगळे होते. 19 व्या शतकातील थोर सुधारक स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आधुनिक सुधारणावाद्यांना धर्माची मोडतोड केल्यावाचून सामाजिक सुधारणा करणे अशक्य वाटते. अलीकडच्या काळात असा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला, त्यांना अपयश मिळल्याचे दिसते. कारण त्यांच्यापैकी फारच थोड्यांनी स्वत:च अभ्यास केला होता आणि सर्व धर्मांची जननी असलेल्या आपल्या धर्माचे शिक्षण, त्यासाठी आवश्यक ती साधना तर एकाचीही झाली नव्हती.

समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणून होते. कृष्णा आणि मलापहारी नद्यांच्या संगम ठिकाणी असलेल्या गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्‌मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्‌मयाचा विकास झाला. 
कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.

कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यांतील लोकांच्या जिभेवर आजही बसवेश्वरांची वचने आरूढ झालेली दिसतात. बसवण्णांचे समाजपोषक विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले. सर्वसामान्यांच्या उन्नतीची कामे करण्यात बसवण्णांचा हातखंडा होता. निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रिपदी आरूढ झाले.
सत्ता आणि वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीतिमूल्यांपासून ढळले नाहीत. या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी "अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.

बसवण्णा - मंत्री, प्रभुदेव - तेजस्वी आध्यात्मिक नेते, सिद्धाराम - कर्मयोगी, चेन्नबसवण्णा - प्रकांड पंडित, अक्कमहादेवी - महासाध्वी, माचैया - धोबी, रामण्णा - गुऱाखी, मद्द्य - शेतकरी, रेम्मवे - विणकर, रामीदेव - कोतवाल, कनैया - तेली, संगण्णा - वैद्य, बसप्पा - सुतार, काकैया - चर्मकार, हरळैया - मोची असे विविध क्षेत्रांतील लोक अनुभव मंडपात सहभागी होते.
जातीभेद निर्मूलन, समाज प्रबोधन, प्रशासन या क्षेत्रांतील महात्मा बसवेश्वर यांचे कार्य 900 वर्षांनंतरही तेवढेच प्रासंगिक असल्याचे आजच्या समाजाकडे पाहिल्यास जाणवते. महात्मा बसवेश्वरांनी समाजाला जोडण्याचे, अंधरूढी नष्ट करण्याचे कार्य केले, परंतु गुरूंचा पराभव करणारे शिष्य इतिहासात जागोजागी दिसतात. तसे बसवण्णा यांच्याही बाबतीत पाहायला मिळते. म. बसवेश्वर यांचे नाव घेत "शैव हे हिंदू धर्माहून वेगळे आहेत', "आमचा धर्म वेगळा आहे' असे म्हणणारे अंध बसवेश्वरभक्त पाहायला मिळातात. 
ज्या लोकांना या देशाशी आणि येथील धर्मतत्वांशी काही देणेघेणे नव्हते, त्या परक्यांनी लिहिलेली पुस्तके घोकून पीएच.डी. मिळविणारे आमचे बांधव बसवेश्वरांचा जयजयकार करीत समाजात भेद उत्पन्न करण्याचा प्रयत्न अज्ञानामुळे करीत आहेत. अन्य धर्मीय प्रसारक आपल्या भारतीय धर्मांची लचके तोडत असताना भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य साधणे आवश्यक आहे. 
"एकं सत्‌ विप्रा बहुधा वदन्ति' हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्त्व "जगात ईश्वर एकच आहे, फक्त नावे निराळी आहेत' म. बसवेश्वर यांनी सांगितली. "माझाच धर्म खरा' असा दुराग्रह धरून भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन (धर्म नव्हे) भारतीय धर्मावर आघात करू पाहताना भारतीय आध्यात्मिक पंथांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. 

जातीपातीच्या भिंती पाडून एकरस समाजासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. माझा महात्मा बसवेश्वरांच्या आजच्या युवापिढीला हाच संदेश आहे.

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या