आचार्य देवो भव !



आज वैशाख शु| पंचमी. या दिवशी आद्य शंकराचार्य जयंती साजरी होते. भारताच्या इतिहासात आजवर ज्या असामान्य कर्तृत्ववान् व्यक्ती होऊन गेल्या, पण ज्यांना शालेय अभ्यासक्रमातून पद्धतशीरपणे वगळण्यात आले, अशांपैकी एक म्हणजे आदि शंकर. त्यांचा सगळ्यात मोठा अपराध हा, की त्यांनी हिन्दू धर्मासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांचे नाव नेहेमीच सरकार च्या 'ब्लॅक लिस्ट' मधे होते. बाकी सर्व धर्मांच्या धर्मप्रमुखांबद्दल विलक्षण कौतुक असणारे सरकार आदि शंकराचार्यांचे नावही टाळत होते. 

आजवर ठरवून अस्पृश्य ठेवलेल्या अशा अनेक महापुरुषांना आता मात्र मान मिळतोय ; आणि ते पाहून गुलाम मानसिकता असलेले सगळे शासकीय/निमशासकीय/अशासकीय विचारवंत संतापाने नुसते जळफळताहेत.
चला, त्यांच्या संतापाला आणखी इंधन पुरवू ...

'आचार्य' या पदवीला आदि शंकर सर्वथा पात्र आहेत.  भारताचा इतिहास ब्रिटिशांनी धूर्तपणे खूप अलिकडे ओढून आणला आणि शिक्षणक्रमात पसरवला. त्यामुळे असे चित्र उभे राहिले की जणू भारताला दोन हजार वर्षांपूर्वीचा काही इतिहासच नाही. मग सगळ्या ऐतिहासिक विभूतींना या २ हजार वर्षांच्या आतच कोंबणे आवश्यक होते. त्यामुळे आचार्यांचा काळ ही आठवे शतक मानला गेला. इ.स. ७८८ साली त्यांचा जन्म झाला असं म्हणतात.
पण अनेक भारतीय विद्वानांनी ( मी 'भारतीय' म्हणतोय ... हबीब अन् गुहा नव्हे!) अभ्यासांती हा निष्कर्ष काढलाय की आचार्य इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात वा त्या ही पूर्वी होऊन गेले. महर्षी दयानंद सरस्वतींनी हे सप्रमाण दाखवून दिले की आचार्य सुमारे २२०० वर्षांआधी होऊन गेले. ( 'सत्यार्थ प्रकाश') पण, साधारणत: भगवे कपडे घालणारा कोणीही विद्वान, अभ्यासू आणि विश्वसनीय असूच शकत नाही ही शिकवण आपल्याला पूर्वापार मिळाली आहे. तिला आपण आजही फेविकोल सारखे घट्ट चिकटून आहोत. परिणामी, इतर अनेक महामानवांप्रमाणे आचार्यांच्या जन्माबाबतही वाद आहेतच! पण त्यावर सखोल संशोधन व्हावं असं आपल्या तथाकथित विद्वानांना वाटतच नाही. परदेशी मंडळी आठवे शतक म्हणतात ना? मग  आम्हीही तेच म्हणणार. जी जी रं जी ....

ते असो. काळ कोणताही असू दे - आचार्यांचे आयुष्य अवघे ३२ वर्षांचे होते, यावर एकमत दिसते. त्यांच्या दैवी चमत्काराच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्या निव्वळ दंतकथा आहेत असं विद्वान अर्थातच म्हणतात. मला सुद्धा वाटतं, की आपणही आचार्यांच्या आयुष्यातील सगळे चमत्कार काढून सध्या बाजूला ठेवू. मग त्या नंतर जो एक साधा 'मानव' उरतो, तो स्वत:च एक चमत्कार ठरतो. तो अतुलनीय आहे.
वयाच्या ८व्या वर्षी हा 'साधा मानव'- हा मुलगा, केरळ मधील आपले गाव सोडून विद्यार्जनासाठी बाहेर पडला- संन्यासी होऊन. गुरूच्या शोधात नर्मदा तीरावर ओंकारेश्वरा पर्यंत गेला. वयाच्या १२ व्या वर्षी सर्व शास्त्रांमधे पारंगत झाला- आचार्य झाला! १६ व्या वर्षी त्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता - ज्यांना "प्रस्थानत्रयी" म्हणतात, त्यावर भाष्ये लिहिली. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तीनदा भारत पायी पालथा घातला. अनेक धर्ममार्तंडांशी वादविवाद केला. त्यांचा तर्कशुद्ध वादात पराभव केला. बौद्ध आणि जैन धर्माला राजाश्रय होता, हिंदू धर्म प्रचंड विस्कळित झाला होता अशा काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. हिंदूंमधील अनेक पंथ-उपपंथ वळवून एकत्र आणले.'अद्वैतवादा'चा पुरस्कार करून तो रुजवला. या प्रवासात अनेक प्रस्थापित धर्माचार्यांशी, पंथप्रमुखांशी त्यांना वैर घ्यावे लागले. त्यात वामाचारी ,उग्र कापालिक सुद्धा होते. अनेकदा जिवाला धोका उत्पन्न झाला. तरीही निर्भयपणे फिरत त्यांनी भारताच्या चार दिशांना - द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ आणि शृंगेरी या ठिकाणी चार मठ स्थापन करून गलितगात्र झालेल्या हिंदू धर्माला अक्षरश: संजीवनी दिली. 

मुख्य म्हणजे लोप पावत चाललेल्या 'गुरू परंपरेला' पुनरुज्जीवित केले. स्वत: अद्वैतवादी, निर्गुणमार्गी असूनही त्यांनी सगुण पूजेला कधीही कमी लेखले नाही; उलट, कित्येक सगुण दैवतांवर भक्तीपूर्ण स्तोत्रे रचली आहेत. विश्वास बसणार नाही, पण एवढ्या कमी जीवनकाळात त्यांनी ४०० पेक्षा जास्त लहान-मोठे ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी रचलेली स्तोत्रे  पाहिली तर त्यातील शब्दसंपदा बघून माणूस अवाक् होतो.  खऱ्या अर्थाने भाषाप्रभू ! आचार्यांचे 'नर्मदाष्टक' किंवा 'महिषासुर मर्दिनी स्तोत्र' ऐकले तर त्यातील लयबद्ध शब्दरचना आपल्याला थक्क करते.

आचार्यांनी आपल्या कर्तृत्वाने 'वय' हा मुद्दा निरर्थक ठरवला. त्यांच्या पेक्षा वयाने कितीतरी मोठे असलेले पंडित त्यांचे शिष्य बनले. मंडनमिश्र हे आचार्यांपेक्षा वयाने मोठेच होते! अशा कित्येक वयोवृद्ध, तपोवृद्धांना आपल्या विशुद्ध तर्कबुद्धीच्या सहाय्याने वादात पराभूत करून आचार्यांनी आपल्या परिवारात सामील करून घेतले.
आजचा आठ वर्षांचा मुलगा शाळेच्या सहलीला गेला तरी त्याचे पालक दहा वेळा मोबाईलवर त्याची चौकशी करतात. विचार करा ; दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या जंगलांमधे आठ वर्षांचा शंकर एकटा, शेकडो मैल पायी कसा वावरला असेल? तो दैवी अवतार नसलेलाच बरा. त्याला कोणतीही सिद्धी अवगत नसलेलीच बरी. कारण मग त्याचं अफाट कर्तृत्व एका साध्या माणसाचं कर्तृत्व ठरतं. देवाचा काहीही सहभाग नाही असं म्हटलं तर अशी व्यक्ती स्वत:च 'देवरूप' म्हणायला पात्र ठरते! बुद्धी, धैर्य, जिद्द या बाबतीत आचार्य खरोखरच अतिमानवी म्हटले पाहिजेत. आणि 'मेरु मांदार धाकुटे ..' असं उत्तुंग कार्य करून वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी हिमालयात कोणा अज्ञात स्थळी समाधी घेतली. कशातही गुंतणे नाही, कशाचाही मोह नाही.. आयुष्याचा तर नाहीच नाही.
आद्य शंकराचार्य काय, किंवा २१ व्या वर्षी संजीवन समाधी घेणारे माऊली काय .... काय विलक्षण माणसं आहेत ही! त्यांना दैवी अवतार म्हणावं, तरी नवल; आणि 'साधा माणूस' म्हणावं तर मग आणखीनच नवल !

आदि शंकरांच्या आधी 'आचार्य' हा एक शब्द होता; त्यांनी या शब्दाला एक महान 'परंपरा' बनवलं... अशी परंपरा, जी आजही सुरू आहे- उद्याही राहील.

- सुशील अत्रे

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या