कोविडच्या संकटकाळात 'भारत' देवासारखा धावून आला; जगाने मानले आभार!

गेल्या वर्षी कोविडच्या महामारीत सुरुवातीला जेव्हा जगभरात करोनाचा हाहाकार माजला होता, तेव्हा भारतातील स्वयंघोषित बुद्धिवादी जमात मात्र भारताचे खच्चीकरण करण्यासाठी आकाश पाताळ एक करत होती. खोट्या आणि अफवानी भरलेल्या बातम्या आणि माहितीला ऊत आला होता. भारत कसा करोना संकटाशी सामना करताना कमी पडत आहे, असे भासवून विदेशी कंपन्यांची औषध व लशीसाठी मदत घ्यावी म्हणून दबाव आणला जात होता. परंतु आता एक वर्षानंतर आपण भारताची कोविड विरुद्धच्या लढाईकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की आपण भारतीय म्हणून खूप नशीबवान आहोत की आपल्या देशाने अतिशय चांगली कामगिरी या संकटकाळात निभावली आहे. यामध्ये सरकार इतकेच योगदान येथील शास्त्रज्ञ, प्रशासन, कोरोना योद्धा व सामाजिक संस्था इ. चे सुद्धा आहे. भारताच्या या यशस्वितेबद्दल आता जागतिक पातळीवर मिळणाऱ्या प्रशंसनेवरून शिक्कामोर्तब झाले आहे. 

भारताच्या मूळ संस्कृती मध्ये वसुधैव कुटुंबकमची संकल्पना आहे, आणि भारतीयांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून वसुधैव कुटुंबकमचा परिचय दिला आहे. कोरोना काळात भारताची ही संकल्पना जगभरातील अनेक देशांसाठी आशेचा किरण होती. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून मानव कल्याण शक्य आहे, हा विचार जगाला वाचू शकतो हे दिसून आले. 

भारताने अनेक देशांना लस तर पाठवलीच होती पण त्यासोबत भारताने १५० देशांना फेस मास्क, हातमोजे, टेस्ट किट, सॅनिटायझर्ससह अत्याधुनिक आरोग्य उपकरणे पाठवली होती. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत भारताने दृढ इच्छाशक्ती ठेऊन लस बनवली व ती फक्त भारतासाठी मर्यादित ठेवली नाही, तर जगभरातील अनेक देशांना दिली. काही देश अश्या संकटकाळात सुद्धा आपला व्यापार आणि फायदा कसा होईल असा उद्देश ठेवून लशींचा बिजनेस करू पाहत होते, परंतु भारताने घेतलेल्या भूमिकेवरून 'विश्व बंधुतवा'ची भारतीय संस्कृती अवघ्या जगाने पाहीली.

२१ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित ७६ व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) सत्राच्या सर्वसाधारण चर्चेत, अनेक  नेत्यांनी उच्च स्तरीय सत्राला संबोधित करताना लस आणि इतर गंभीर वैद्यकीय साहित्याच्या निर्यातीद्वारे केलेल्या मदतीबद्दल भारताचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता त्याची जरा थोडक्यात माहिती पाहू.

चंद्रिका प्रसाद संतोखी हे सुरीनामचे नवे राष्ट्रपती आहेत, ते भारतीय वंशाचे आहे. चंद्रिका प्रसाद संतोखी म्हणाले, "या कोविड साथीच्या विरूद्धच्या लढाईत सुरुवातीच्या टप्प्यावर माझ्या देशाला आणि लोकांना मोलाची साथ दिली आणि एकता दाखवली आणि मोलाचे सहकार्य दिले अशा देश आणि संस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. भारताचे नाव घेऊन घेऊन त्यांनी यावेळी आभार मानले.

नाउरूचे राष्ट्रपती लियोनेल रूवेन एंगिमिया ( Nauru President Lionel Rouwen Aingimea) म्हणाले, "कोविड चा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांना लसीकरण करण्यासाठी त्यांच्या देशाने मोठे प्रयत्न केले. आमच्या सहकारी देशांच्या मौल्यवान पाठिंब्याशिवाय ते शक्य नव्हते. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि चीन प्रजासत्ताक (तैवान) यांच्या सतत पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत. 

नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदु बुहारी ( Muhammadu Buhari) म्हणाले की, "जगभरातील मित्रांकडून मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञ आहे. साथीला सामोरे जाण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे.  आम्हाला फायदा झालेल्या कोव्हॅक्स उपक्रमाला आम्ही पूर्ण समर्थन देतो. आम्हाला लस पुरवल्याबद्दल अमेरिका, तुर्की, भारत, चीन, युरोपियन युनियन आणि इतरांचेही आभार मानतो."

सेंट लुसियाचे पंतप्रधान फिलिप पियरे म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या Insidious स्वभावामुळे ते अगदी मोठ्या प्रमाणात अटकाव घातलेल्या सीमा ओलांडून जगभरात पसरली. "आम्ही कोवॅक्स सुविधा सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि भारत आणि अमेरिका सारख्या आमच्या द्विपक्षीय भागीदारांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी लसींमध्ये आमचा प्रवेश सुनिश्चित करण्यास मदत केली आहे."

आपल्याला हे माहीत हवे की, भारताने अनुदान, व्यावसायिक मॉल आणि कोव्हॅक्स सुविधेद्वारे जवळजवळ १०० देशांना ६६ दशलक्ष लसीचे डोस निर्यात केले आहेत. 

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस म्हणाले, “कॅरिबियन बेटाला कोविशील्ड  लसींच्या त्वरित आणि उपयुक्त भेटीसाठी मी भारतीय प्रजासत्ताक सरकारचे आभार मानतो."

घानाच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपमधील काही देशांमध्ये भारतात तयार केलेल्या कोविशील्ड लसीला युरोपीय देशांनी मान्यता न दिल्याचे 'दुर्दैवी' आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली. 

फिजीचे पंतप्रधान व डॉमिनिकाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री केनेथ डारॉक्स यांनीही भारताचे आभार मानले. केनेथ डोरॉक्स म्हणाले “आम्ही स्वत: ला भाग्यवान समजतो आणि भारत प्रजासत्ताक सरकारकडून लस प्राप्त केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

नेपाळचे नवे परराष्ट्र मंत्री नारायण खडका यांनी जागतिक नेत्यांना संबोधित करताना, जागतिक साथीच्या विरूद्ध लढ्यात मदत केल्याबद्दल भारत आणि चीनचे आभार व्यक्त केले. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, लसींचे लाखो डोस खरेदी करण्यासाठी आम्ही ६२ दशलक्ष पेक्षा जास्त गुंतवणूक करत आहोत. यात आमचे चांगले मित्र अमेरिका, भारत आणि जपान यांच्याबरोबर क्वाड लस भागीदारीद्वारे १०० दशलक्ष डॉलर्सचे योगदान समाविष्ट आहे.  भुतानवसह अन्य राष्ट्रांनीही भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अश्या प्रकारे जागतिक स्तरावर भारताचे गौरव केले जात आहे. भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरण अभियान सुरू आहे. त्यासोबत ज्या देशांकडे लस नव्हती, त्यांनाही भारताकडून लस पुरवण्यात आली. कोरोनावर लस बनवण्यात भारताच्या वैज्ञानिकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, भारताच्या पंतप्रधानांची ही दृढ इच्छाशक्ती होती, आणि भारतीयांचा त्यांना पाठबळ होता ज्यामुळे कोरोना वर लस बनवू शकलो. आज आपण कोरोना विरोधातील लढाई सक्षमपणे लढत आहोत. ही नव्या भारताची सुरुवात आहे, हे निश्चित. 

- दिपक राठोड, संभाजीनगर 
  मो. 9890079925

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या