'शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
संभाजीनगर। दि. ०३/१०/२०२१
लेखक भरत आमदापुरे लिखित 'शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला' हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक असून देशाच्या राष्ट्रीयता, अखंडता व लोकशाही समोरील सर्वात मोठा धोका असलेल्या माओवादी शक्तीचा बुरखा फाडणारे पुस्तक आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान केले. देशाची सुरक्षा म्हणून नागरिक मोलाची जबाबदारी पार पाडतात. या माओवाद विरोधातील लढाईतसुद्धा नागरिक म्हणून आपल्याला योगदान द्यावे लागेल, असे आवाहन यावेळी ना. डॉ. भागवत कराड यांनी केले.
माओवादी समस्याचे अभ्यासक भरत आमदापुरे लिखित शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र मेघराजानी होते. तसेच, अधिवक्ता परिषदेचे क्षेत्र संघटक ऍड. श्री भूषण कुलकर्णी, पुस्तकाचे लेखक श्री भरत आमदापुरे, विवेक विचार मंचाचे कार्यवाह महेश पोहणेरकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले, डॉ.महानंदा दळवी यांनी सूत्रसंचालन केले, ऍड. मंगेश मेने यांनी आभार व्यक्त केले.
'नक्षलवादी' आणि 'तालिबानी' यात काहीच फरक नाही - श्री नरेंद्र मेघराजानी
नक्षलवादी व तालिबानी यांच्यात काहीच फरक नाही, भारताची राजसत्ता येनकेनप्रकारे ताब्यात घेऊन येथील लोकशाही संपुष्टात आणायची व हुकूमशाही प्रस्थापित करायची असे षडयंत्र या माओवादी संघटनांचे आहे. आपल्याला नागरिक म्हणून अधिक सतर्क रहावे लागेल, असे वक्तव्य निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र मेघराजानी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक विचार मंचाचे समन्वयक सागर शिंदे यांनी केले. भीमा कोरेगाव दंगलीच्या अगोदर पुण्यात शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत शहरी माओवाद्यांच्या विविध फ्रंट संघटना सहभागी झाल्या होत्या. "लाल किले पर लाल निशान" असा त्यांचा उद्देश असून त्यांना भारतीय संविधान मान्य नाही. त्यामुळे शहरी माओवाद हे भारतीय सुरक्षा व संविधानासमोरील मोठे आव्हान आहे असे ते म्हणाले.
शहरी माओवाद्यांचा नायनाट होत नाही, तोपर्यंत जंगलातील नक्षलवाद संपणार नाही - भरत आमदापुरे
पुस्तकाचे लेखक व विवेक विचार मंचचे कार्यकर्ते भरत आमदापुरे यांनी आपल्या भाषणात माओवाद- नक्षलवाद यांचा राष्ट्रविरोधी चेहरा स्पष्ट केला. नक्षलवादी हे आदिवासी लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं नाटक करतात, परंतु त्यांना आदिवासींसाठी मुळात काही देणेघेणे नाही, तर आदिवासींचा उपयोग करून त्यांना हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे. अभारतीय विचारांनी प्रेरित पांढरपेशा, सुशिक्षित लोकांनी चालवलेली ही चळवळ आहे, असे ते म्हणाले.
भारतावर कब्जा करायचा, तर दिल्ली ताब्यात हवी, म्हणून त्यांनी चीनच्या इशाऱ्यावर सिपीआय या माओवादी संघटनेची निर्मिती केली. जनतेला भुरळ पाडण्यासाठी हे लोक विविध सांस्कृतिक मंडळ व कला मंच उभारून माओवादी विचार पसरवतात व विद्यार्थी, महिला, साहित्यिक, कलाकार अश्या विविध गटांना टार्गेट करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून ते माओचे विचार पेरताहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जोपर्यंत शहरातील या माओवाद्यांच्या नायनाट होत नाही तोपर्यंत जंगलातील नक्षलवाद संपुष्टात येणार नाही असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. अधिवक्ता परिषदेचे ऍड. मंगेश मेने यांनी उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार व्यक्त केले.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या