आजकाल रा. स्व. संघ आणि श्रीगुरुजी यांना दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काही असामाजिक मंडळींकडून सतत चालू असतो. स्वतःला ते दलितांचे कैवारी आणि बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवतात, परंतु समरस समाज निर्मितीच्या पू. बाबासाहेबांच्या स्वप्नाला आपण तिलांजली देत असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. माधव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांनी समरस समाज निर्मितीसाठी अवघे आयुष्य खर्ची घातले आहे. "सब समाज लिए साथ आगे बढते है जाना" अश्या उदात्त विचाराने संघाचे सर्व समाजाला सोबत घेऊन राष्ट्रकार्य सुरू आहे. ते समजून घेण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी सर्व समाजाचे भले होण्याकरिता मोठे पाऊल पडू शकेल.
१९६२ साली डॉ. आंबेडकर यांच्या चाहत्यांनी ७३ व्या आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या गौरव विशेषांकासाठी श्री सुरेश कडलाक (मुंबईच्या भीमराव साहित्य संघाचे अध्यक्ष) यांना दिनांक ६.८.१९६३ रोजी लिहिलेल्या पत्रात श्रीगुरुजींनी लहानसा पण मार्मिक मजकूर लिहून पाठवला होता, त्यात श्री गुरुजी लिहलेले शब्दनशब्द आपल्यासाठी उद्बोधक ठरतात. या पत्रात पूजनीय श्री गुरुजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'या युगातील भगवान बुद्धांचे अनुयायी' असे संबोधले आहे. भगवान बुद्धांना तात्कालिक समाजातील केवळ दोष दूर करायचे होते. धर्माचे स्वरूप विशुद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी तात्कालिक समाज धारणावर टीका केली होती. वेगळे होण्यासाठी नव्हे, असे मत श्रीगुरुजी मांडतात. डॉ. आंबेडकर यांचे कार्य असेच असून त्यामागे आपला चिरंजीव समाज निर्दोष व्हावा, अशी शुद्ध सात्विक भावना त्यामागे होती असे आपले मत त्यांनी मांडले आहे.
श्री गुरुजी यांनी लिहलेला पत्ररूपी अभिप्राय मजकूर-
"वंदनीय डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणे हे माझे स्वाभाविक कर्तव्य आहे. भारताच्या दिव्य संदेशाच्या गर्जनेने ज्यांनी सर्व जगाला हलवून सोडले त्या श्रीमत स्वामी विवेकानंदांनी दीनदुबळे, दरिद्री, अज्ञानात पडलेले भारतवासी हे माझे ईश्वर आहे, त्यांची सेवा करणे व त्यांचे सुप्त चैतन्य जागवून त्यांचे ऐहिक जीवनही सुखपूर्ण व उन्नत करणे हीच खरी ईश्वरसेवा होय, असे सांगितले. आपल्या समाजातील 'शिवू नको' ही अनिष्ट प्रवृत्ती जाणून तीवर व त्या प्रवृत्तीशी संलग्न सर्व रूढींवर कठोर प्रहार केले. सर्व समाजाला पुन्हा नवीन रचना करण्यास्तव जागे करून आवाहन केले. त्याच आवाहनाचा प्रत्यक्ष पुरस्कार अन्य शब्दात अन्य मार्गांनी राजकीय व सामाजिक अवहेलनेने क्षुब्ध होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आवेशाने केला. अज्ञानात, दुःखात खितपत पडलेल्या व अपमानित अशा आपल्या समाजातील एका मोठ्या व महत्त्वाच्या भागाला आत्मसन्मानपूर्वक उभे केले, ही त्यांची कामगिरी असामान्य आहे. आपल्या राष्ट्रावर हे अपार उपकार त्यांनी केले आहेत. त्यातून उतराई होणे समाजाला कठीण. इतका श्रेष्ठ हा उपकार आहे.
श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी श्रीमत शंकराचार्यांची कुशाग्र बुद्धी व भगवान बुद्धाचे परम कारुणिक विशाल हृदय यांचा मेळ घालणारे भारताचा खरा उद्धार होऊ शकेल असे मार्गदर्शन केलेले आहे. बुद्ध मताचा स्वीकार व पुरस्कार करून त्या मार्गदर्शनाचा महत्त्वाचा भाग पुरा करण्याच्या कार्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी चालना दिली आहे, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या विवेचक व कुशाग्र बुध्दीला तत्वज्ञानदृष्ट्या बौद्ध मतातील उणिवा दिसत होत्या. त्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. पण, व्यवहारातील समानता, शुचिता व परस्पर संबंधीची कारुण्यपूर्ण स्नेहमयता या सर्व गुणांतून मिळणारी मानवसेवेची विशुद्ध प्रेरणा हे बौद्ध मताच्या श्रद्धेतून उत्पन्न होणारे लाभ राष्ट्राच्या व मानवाच्या उन्नतीकरिता अगत्याचे आहेत हे जाणूनच त्यांनी आग्रहाने या मताचा पुरस्कार केलेला दिसतो.
पूर्वी समाज सुधारण्यासाठी व धर्माचे स्वरूप विशुद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी तात्कालिक समाजधारणावर टीका केली, वेगळे होण्याकरता नव्हे. आजच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या भल्यास्तव, धर्माच्या हिताकरिता आपला चिरंजीव समाज निर्दोष व शुद्ध व्हावा याच दृष्टीने कार्य केले. समाजातून फुटून निघून वेगळा पंथ करण्याकरता नव्हे, अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून या युगातले 'भगवान बुद्धांचे वारसदार' या नात्याने त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अंतःकरणपूर्वक अभिवादन करीत आहे."
साभार - आपले बाबासाहेब, लेखक - दत्तोपंत ठेंगडी, पृष्ठ क्र. ४३
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या