मै खेलेगा.....वरनभात लोन्चा...



जयंत पवारांच्या कथेवर आधारीत महेश मांजरेकरांनी बनविलेल्या चित्रपटाचा एक टिझर नुकताच प्रकाशित झाला आणि सर्व प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांमधून या विषयी चर्चा सुरू झाली. प्रामुख्याने ही चर्चा या त्यात पौगंडावस्थेतील मुलांच्या तोंडात असलेले संवाद, प्रौढ स्त्री बरोबर त्यांचे लैगिक संबंध ,त्यांचे खुनशी आणि बिभित्स चित्रीकरण यामुळेच होतेय. खरंतर या चित्रपटातून निर्माता, दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे हे कळत नाही आणि जे कळते ते पचत नाही. 
विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’  या चित्रपटात एक संवाद आहे. ‘‘ चित्रपट चालतो तो तीन गोष्टींमुळे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट ’’ . परंतु मांजरेकरांना या चित्रपटातून नेमके काय सांगायचे आहे याचा बोध होत नाही. अरे केहेना क्या चाहते हो?..  संदेश वैगेरे सोडून द्या पण याला एंटरटेनमेंट तरी म्हणता येईल का? शरीरविक्रय करणाऱ्या बायका देखील रस्त्यावर कपडे फेडून बसत नाहीत. खर सांगायचं तर त्या ते स्वखुशीने करत नाहीत तर ज्या समाजव्यवस्थेच्या त्या भाग आहेत त्याच्या त्या अभागी बळी आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली या चित्रपटकर्त्यांनी जे केले आहे ते त्या पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्यांच्या पेक्षाही खालच्या थराचे आहे. कुठेतरी वाचले की चित्रपटकर्त्यांनी म्हटले की सर्व चित्रपट बघून प्रतिक्रिया दिली पाहिजे. हा खूप खर्च करून प्रोमो वैगरे जे दाखवतात ते कशासाठी, तर चित्रपटात काही आहे हे काळण्यासाठीच ना? ते बघून लोकांनी चित्रपट बघायला यावे यासाठीच ना? भाऊ, पब्लिक को येडा समझा है क्या? काही वर्षांपूर्वी देखील गिरणगाव/दगडीचाळ नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यात सुद्धा हाणामारी,सेक्स याचा वापर केला होता. साला, गिरणी कामागार, त्यांचा झालेला संप, त्यातून त्यांची झालेली वाताहात याला फक्त सेक्स,हिंसा,आत्महत्या आणि नाकारात्मकतेची घुसमट एवढीच झालर आहे का?

हे एवढे सगळे वाटण्याचे कारण चित्रपट गिरणीकामगारांची पार्श्वभूमीवर तयार केला आहे. १९८२ साली गिरणी कामगारांचा संप झाला आणि कामगारांचे,त्यांच्या कुटुंबियांचे होत्याचे न्हवते झाले. काहींनी आत्महत्या केल्या, काहींनी कुटुंबाला सांभाळण्यासाठी घरदार विकले,कदाचित काही अभागी गैरमार्गाला ( यात सर्व काही आले ) लागले. पण खूप जणांनी जगण्यासाठी आणि घराला जगवण्यासाठी इथेच थांबून कोणत्याही आड मार्गाला ना जाता संघर्ष केला, फक्त संघर्षच केला असे नाही तर त्यातून यशस्वी मार्ग देखील काढला. त्या वादळात घुसमटलेल्या, गुदमरलेल्या समूहाचा मी सुद्धा एक भाग होतो.  गिरणी बंद पडली तेव्हा मी सहावीत होतो. माझी बहिण दुसरीत आणि सर्वात लहान भाऊ त्या वेळच्या मोंटेसरीत. बाबांची नोकरी हाच घर आणि जीवन  चालविण्याचा एकमेव मार्ग होता. संपाने या सर्वांवर केवळ प्रश्नचिन्हच नाही तर अंधार सुद्धा पांघरला. पण त्यातूनही मार्ग निघाला नव्हे काढला. 
सुरवातीला बिल्डींग खाली नारळ,अंडी, चहा-साखर विक्रीची टपरी सुरू झाली. नंतर कुठल्यातरी मित्राकडून रिक्षा कशी चालवायची हे शिकून बाबा रिक्षा चालवायला लागले आणि आईने टपरीवजा दुकानाची जबाबदारी घेतली. आम्हा सर्व भावंडांचे शिक्षण यातूनच झाले. या संघर्षाच्या काळातच १० ते १२ वर्षे अभाविपचे पूर्णवेळ सामाजिक काम करण्यासाठी मला परवानगी दिली. तेही दिवस गेले. आज सर्व जण ताठ मानेने आयुष्य जगत आहोत.

माझी कहाणी सांगण्यापेक्षा मुद्दा हा आहे की असे अनेक शांताराम पाटील या संपात देखील उभे राहिले. ज्यांनी या काळात मानवी स्वभावाच्या सर्व कंगोऱ्याशी संघर्ष करत जगण्याच्या पायवाटा महामार्गात बदलवल्या. परिस्थितीशी झुंजत राहिले, पण हार नाही मानली. अपयश आले तरी उमेद नाही सोडली. मध्यंतरी एका प्रेरणादायी व्हिडीओ मध्ये सचिन तेंडुलकरच्या सुरवातीच्या काळातील संघर्षाची कहाणी बघण्यात आली. पाकिस्तान बरोबरच्या एक मॅच मध्ये १६ वर्षाचा सचिन पाहिले तीन फलंदाज लवकर बाद झाल्यावर मैदानात आला. समोर इम्रान खान, वकार युनूस, वसीम अक्रम सारखे अनुभवी, आक्रमक आणि भेदक गोलंदाज. सचिनच्या उंची एवढी उसळी घेणारे चेंडू. पहिला चेहऱ्या जवळून गेला, दुसरा डोक्यावरून आणि तिसऱ्या चेंडूने चेहऱ्याचा वेध घेतला.सचिन खाली कोसळला. नाकातून रक्त येऊ लागले. संघाचे फिजिओ प्रशिक्षक आणि सहाय्यक धावत मैदानात आले. सचिनला घेऊन जाण्यासाठी स्टेचर मागविण्यात आले. समोरच्या बाजूला असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू ने सचिनला आराम करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानी खेळाडू चेकाळले होते तर भारतीय संघात सन्नाटा. मैदानावरच डॉक्टरांनी सचिनला पेनकिलर दिली आणि त्याला स्टेचरवर ठेऊन रूम वर घेऊन जाण्याची तयारी केली. तेवढ्यात सचिन त्याच्या बारीक आवाजात म्हणाला मै खेलेगा.... मै खेलेगा...आणि त्या नंतरच्या  चेंडूवर पुढे येऊन एक सणसणीत चौकार मारत त्याने इतिहास घडवला...

असे जखमी, जायबंदी आणि रक्तबंबाळ होऊन देखील मै खेलेगा.... म्हणत आयुष्याची टेस्ट मॅच खेळत पुढे इतिहास बनविणारे अनेक गिरणीकामगार आजही जिवंत आहेत. जे स्वतः तर खेळलेच पण आपल्या कुटुंब काबिल्याला देखील त्यांनी एका उंचीवर नेले. अशा घडलेल्या कथांवर देखील चित्रपट बनवता येईल आणि पैसाही कमवता येईल. पण ज्यांनी विकृतीचाच धंदा करायचे ठरवले आहे त्यांना अजून काय सांगणार! 

आपल्याकडे एक म्हण आहे,कंबरेच सोडलं आणि डोक्याला बांधलं!  यांनी तर कंबरेचं सोडून कुठे बांधायचे हे न कळल्याने सगळं काही  फेकूनच  दिले आहे. अश्या नागडयांना बघण्यापेक्षा मैं खेलेगा ... म्हणणाऱ्या तुमच्या आमच्यातल्या सचिनला शोधुया...

- रत्नाकर पाटील, जळगांव

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या