@दिपक राठोड
आज भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. युवाशक्ति मध्ये मोठा परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. युवा पिढीकडे नवीन कल्पना, तार्किक विचार, सर्जनशीलता, ऊर्जा आणि ज्ञान यांचा मोठा साठा असतो. त्यामुळे युवा पिढीवर स्वामी विवेकानंदांची गाढ श्रद्धा होती. युवा पिढी पुढे यईल सिंहासारखा पराक्रम करून देशासमोरील समस्या सोडवतील, असे ते म्हणाले होते.
स्वामीजींनी दिलेल्या तत्त्वज्ञानाने प्रत्येकजण आपल्या जीवनात यथोचित बदल करू शकतो. स्वामी विवेकानंद हे कर्मयोगी होते, त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते प्रत्यक्ष कृतीतून सांगितलं. स्वामीजींच्या विचाराने तरुण मुले व मुली स्वतःच जीवन उन्नत तर करू शकता पण त्यासोबत राष्ट्रजीवण देखील उन्नत करू शकता.
स्वामी विवेकानंदांचे भारताच्या पुनरुत्थानाचे दिव्य स्वप्न होते. आपल्याला ते स्वप्न साकार करायचे आहे, प्रत्येक राष्ट्रभक्तांच्या मनात स्वामीजींचे हे दिव्य स्वप्न असले पाहिजे. स्वामीजींचा युवा पिढीवर, उदयोन्मुख पिढीवर विश्वास होता. राष्ट्र आणि समाज घडवण्यात युवा पिढीचा मोठा वाटा असतो. भारतातील युवकांमध्ये ऊर्जा आहे. ऊर्जेला योग्य दिशा देऊन भारताचे पुनरुत्थान होऊ शकते.
भारताच्या पुनरुत्थानाच्या स्वामीजींच्या दिव्य स्वप्नाचा हा मार्ग अध्यात्मातून, चारित्र्य निर्मितीतून जातो. त्यांच्या मते राष्ट्राला महान बनवायचे असेल तर राष्ट्र महान बनवणाऱ्या नागरिकांना चारित्र्यवान बनवावे लागेल.
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर असण्याबद्दल स्वामीजी बोलत असत. सशक्त आणि सामर्थ्यवान युवकच एक सशक्त आणि सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण करू शकतात, म्हणून स्वामीजींनी नेहमीच तरुणांना आव्हान करत आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू, पोलादी मज्जातंतू हवे आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत चारित्र्य घडविणारे, मानसिक बळ वाढवणारे, बुद्धी विशाल करणारे शिक्षण स्वामीजींना अपेक्षित होते. पूर्वी गुरुकुल असायचे ज्यात वयाच्या २५ वर्षापर्यंत ब्रह्मचर्य शिकवले जायचे, नंतर गृहस्थ आश्रम असायचे, परंतु स्वामीजींच्या काळात आणि आजही ब्रह्मचर्य शिकवले जात नाही. स्वामीजी म्हणत ज्या शिक्षणाने माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो ते शिक्षण आहे. गरीब आणि वंतीतांपर्यंत शिक्षण पोहोचावे अशी स्वामीजींची इच्छा होती.
स्वामीजींनी आत्मविश्वासावर भर दिला आहे, आत्मविश्वास गमावलेल्या भारतीय समाजात स्वामीजींनी आत्मविश्वास जागृत केला आहे. ते म्हणत देशातील लोकांनी स्वतःवरील विश्वास गमावला म्हणून पतन झाला आहे. स्वामीजींनी आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मज्ञान, आत्मसंयम यावर भर दिला आहे. ते म्हणत तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही, प्रत्येक गोष्ट आतून शिकायला हवी, आत्म्यापेक्षा मोठा शिक्षक नाही.
अंधश्रद्धा, जातिवाद, अस्पृश्यता, सामाजिक रूढींवर त्यांनी जोरदार टीका केली आहे आणि याविरोधात त्यांनी प्रत्यक्ष कृती केली आहे. लिंगभेद त्यांना मान्य नव्हता, ते सर्वत्र ईश्वर आहे असे मानत. स्त्री शिक्षणासाठी ते झटत होते. गरिबी आणि निरक्षरता व अन्य समस्यांवर त्यांनी विचार व चिंतन केले आहे, ह्या समस्या संपुष्टात याव्यात त्यासाठी त्यांनी कार्य केले आहे. किंबहुना या समस्या देशासमोर आजही बघायला मिळतात, या समस्या संपुष्टात आणणे आवश्यक आहे.
चुकीच्या सामाजिक रूढींचा धर्माशी काहीही संबंध नाही, असे स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केले. धर्माच्या नावाखाली जे चुकीचे केले जात आहे ते धर्म नसून कुटील राजकारण असल्याचेही स्वामीजींनी स्पष्ट केले. स्वामीजी धर्माविषयी फक्त बोलले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष धर्माची अनुभूती केली होती. त्याच्यासाठी धर्म हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय होता. स्वामीजी धर्माविषयी म्हटले धर्मामुळे पशूंचे मनुष्यात आणि मुष्याचे ईश्वरात रूपांतर होते. स्वामीजी म्हणत धर्म आणि अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे, धर्मातूनच भारताचे पुनरुत्थान होईल. जोपर्यंत हिंदू त्यांच्या महान पूर्वजांचा वारसा विसरत नाहीत तोपर्यंत भारताला कोणीही नष्ट करू शकत नाही.
आज समाजाच्या प्रत्येक स्तरातून स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे युवक पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी आपले जीवन स्वामीजींच्या कार्यासाठी समर्पित केले आहे.
मात्र दुसरीकडे भारतविरोधी शक्ती युवकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा कट रचत आहेत. भारतविरोधी परकीय शक्तीला भारत विश्व गुरू होऊ नये, भारताचे पुनरुत्थान होऊ नये असे वाटते. भारतविरोधी परकीय शक्ती युवकांचे पतन करण्याचे अगणित षडयंत्र रचत आहेत. या भारतविरोधी शक्तींचे मनसुबे राष्ट्रविरोधी व समाजविघातक आहेत. ते समाजामध्ये पद्धतशीर पणे व्यसनाधीनता, अश्लीलता, हिंसाकता पसरवत आहेत. भाषावाद, प्रांतवाद, जातिवाद अश्या वादांमध्ये ते युवकांना अडकवत आहेत. युवकांच्या मनात निराशा निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार हे भारतविरोधी शक्तींना आव्हान देणारे आहेत. आजच्या ढासळत्या सामाजिक परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान युवकांपर्यंत पोहोचवावे लागेल.
स्वामीजींचे साहित्य अतिशय सोप्या भाषेत उपलब्ध आहे, त्यांच्या या लहानश्या वयातच त्यांचे खूप मोठे चिंतन होते, त्यांचे साहित्य वाचले पाहिजे, आजच्या तरुणाईची वाटेला आलेली निराशा दूर करण्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. स्वामी विवेकानंद काय सांगून गेले आहेत, ते युवकांनी समजून घेतले की युवा पिढीच्या मनात कुजलेले विचार येणार नाहीत, महत्त्वाचे म्हणजे आजची तरुणाई काय ते किड्यांसारखे जगत असलेले जीवन बदलून जाईल.
कसे युवक स्वामीजींचे स्वप्न साकार करतील तर अध्यात्मिक, चारित्र्यवान, सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट. भारताच्या पुनरुत्थान साठी प्रत्येक क्षेत्रात युवकांना आपले पावले टाकावी लागतील कारण युवाशक्ति जागृत झाली की भारताचे पुनरुत्थान होईल, भारत विश्व गुरू होईल. चला तर मग सर्व समाजात जाऊन समरस होऊया, चला चारित्र्य घडवूया. त्याग आणि सेवा बळकट करूया. भारत मातेचे भविष्य उज्ज्वल करूया.
स्वामीजी म्हंटले होते "भारत पुन्हा उठेल - संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने. ध्वंस-विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे, शांति प्रेमाची विजयपताका फडकवीत. एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे ते हे की आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधातलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा."
स्वामीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प सिद्ध होऊया.
- दिपक राठोड, संभाजीनगर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या