आजकाल कोणीही उठून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. काय तर म्हणे छत्रपति शंभुराजांच्या हत्येनंतर मुघलाई यायला पाहिजे होती,मग पेशवाई कशी आली? असे मूर्खपणाचे प्रश्न विचारुन लोक स्वत:चे नाॅलेज किती जनरल आहे,याचे ओंगळवाणे दर्शन समाजाला घडवत असतात.
"शंभुराजांच्या हत्येनंतर मुघलाई यायला हवी होती,मग पेशवाई कशी आली?" या प्रश्नाचे उत्तर इयत्ता सातवीत शिकणारा मुलगाही देऊ शकेल. कारण महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात मराठेशाहीचा इतिहास सांगितलेला आहे.
इ.स. 1689 साली औरंगजेबाने शरियत आणि मुल्लामौलवींच्या फतव्याने छत्रपति शंभुराजांची हत्या केली ,त्यानंतर कुठलीही पेशवाई आलेली नाही. लगेचच छत्रपति राजाराममहाराज हे गादीवर आलेले आहेत. त्यांच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई यांनी संघर्ष केला. इ.स. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यु झाल्यानंतर शंभुराजांचे सुपुत्र थोरले शाहु हे छत्रपति झाले.......हे सगळे काय पेशवे होते का? मग शंभुराजांच्या हत्येनंतर कुठली पेशवाई आली होती?
मुळात "पेशवे" हे हिंदवी स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळातील पद होते. पेशवाई हा मराठेशाहीचाच भाग होता. बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव,नानासाहेब,माधवराव आदी पेशव्यांनी छत्रपतिंच्या आज्ञेनेच मराठेशाहीचा उत्कर्ष केला.
पेशव्यांच्या मुद्रा बघितल्या तरी त्यात आपल्याला छत्रपतिंविषयी विलक्षण आदर दिसून येतो.बाळाजी विश्वनाथ यांची मुद्रा पहा
श्री शाहुराजा नरपति हर्षनिधान l बाळाजी विश्वनाथ मुख्यप्रधान ll
एकदा नानासाहेब पेशवे यांच्यावर छत्रपति शाहुंची नाराजी झाली. त्यांनी पत्र लिहून त्यांना पेशवेपदावरुन हटवण्यात आल्याचे कळवले ,हे पत्र हाती पडताच नानासाहेबांनी त्या पत्राला मुजरा केला आणि आपली पगडी ,शिक्के कट्यार बाजुला काढून ठेवली, अशी त्यांची छत्रपतिनिष्ठा होती.
कालांतराने पुन्हा छत्रपति शाहुंनी नानासाहेबांना पेशवा म्हणून नियुक्त केले.
पेशवे म्हणजे मराठी गादीचे प्रधान. मग इथे मराठा सत्ता आणि ब्राह्मण सत्ता कुठून आली ? जर असं होत तर १८१८ पर्यंत पेशवे छत्रपतींकडून वस्त्रे घेत होते, १७५८ ला पानिपतच्या आधी नानासाहेब "आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य अहो" म्हणतात, १७८९ च्या आसपास कोकणात संभाजीराजांचा वाडा पडताना सवाई माधवराव त्यांना दम देतात, "आमच्या संभाजी महाराजांचा वाडा आहे", १८१८ पर्यंत राजपत्रांवर शिक्के छत्रपतींचे असतात.. मग मराठ्यांचे राज्य आणि ब्राह्मणांचे राज्य हा काय प्रकार आहे का?
नाणेमावळातील महार बंधुनी कर्जपट्टी माफ करावी यासाठी विनंती अर्ज केला असता नानासाहेबांनी त्यांची कर्जपट्टी माफ केली होती.तसा आदेशही काढला होता. ( संदर्भ - बाळाजी बाजीराव रोजनिशी भाग -1, लेखांक - 496)
श्री जेजुरी येथील वाघे मुरळ्या यांची वेठबिगार ( विनावेतन काम ) बंद करावे यासाठी सुभेदार मल्हारराव होळकरांनी पेशव्यांना विनंती करुन ती बंद केली.
भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ,बाजीराव,चिमाजी अप्पा यांचे स्वराज्यरक्षण आणि विस्तारात मोठे योगदान आहे. पानिपतावर जे एक लाख मराठे हुतात्मा झाले ,त्यात पेशव्यांच्या घराण्यातील सदाशिवरावभाऊ आणि विश्वासरावही होते.आमच्या दृष्टीने व्यापक अर्थाने हे सगळे मराठेच आहेत.
छत्रपति शिवरायांच्या नेतृत्वात भगव्या ध्वजासाठी उभा राहिला तो कोणत्याही जातीचा असो,तो मराठाच आहे. याच व्यापक अर्थाने महाराष्ट्रासाठी राष्ट्रगीतात "मराठा" हाच शब्द आला आहे.
उत्तर पेशवाईच्या काळात दुसरा बाजीरावकडुन काही चुका निश्चितच झाल्या ,पण याचा अर्थ सगळेच पेशवे नालायक होते असा होत नाही. पेशव्यांची नियुक्ती ही छत्रपति करत असतात, त्यामुळे पेशवाईला मराठेशाहीपासून वेगळे ठरवणे हा छत्रपतिंचाच अपमान ठरेल.
जातीय दृष्टीकोनातुन बाहेर येत इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
- रवींद्र गणेश सासमकर
संदर्भ - कौस्तुभ कस्तुरे
राज मेमाने सर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या