शहाद्याचा स्वातंत्र्यसंग्राम: १८५७ चा उठाव आणि खान्देश


१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात खानदेशातील भिल्लांचा लढा हा इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. खानदेशात भिल्लांनी इंग्रजांना "सळो की पळो" करून सोडले. गनिमीकावा युद्धनीती वापरली, खजिने लुटले, इंग्रजांचे प्रशासन पार मोडकळीस आणले. काजी सिंग उर्फ खाज्या नाईक तसेच भीमा नाईक हे भिल्ल सैन्याचे दोन नायक एक झाले व या एकजुटीचा मोठा फटका इंग्रजांना बसला. 

काजी सिंग हा सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीस होता. पण त्याला इंग्रजांनी विनाकारण दोषी ठरवून दहा वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावली पैकी पाच वर्ष त्याची शिक्षा माफ करण्यात आली. पाच वर्षानंतर तो पुन्हा कंपनीच्या नोकरीत होता. त्याच्याकडे सेंधवा ते शिरपूर या मार्गाच्या रक्षणाची जबाबदारी होती. भीमा नाईक त्याला येऊन मिळाला भीमा नाईक हा स्वतःला दिल्लीचा बादशहा बहादूर शाह जफर याचा प्रतिनिधी मानत असे. दोघांकडे एकत्रित पंधराशे लोकांची फलटण होती. त्यांनी गनिमीकाव्याने सेंधवा घाटात इंदोर कडून मुंबईकडे जाणाऱ्या इंग्रजी खजिन्याची लूट केली. ज्यात सात लाख रुपयांचा खजिना होता. यानंतरही अफूने भरलेल्या ६० गाड्या लुटल्या, सरकारी पोस्ट लुटले, सेंधवा घाटातील टेलिग्राफ तारा तोडल्या. या दोघांनाही नगर नाशिककडून भागोजी नाईक या भिल्ल नायकाची मदत मिळू लागली. 

शहादा व सुलतानपूर परगण्यातील इंग्रजी प्रशासनाला या भिल्ल नेत्यांनी त्राहीमाम करून सोडले. अंबापाणीच्या लढाईत(११ एप्रिल १८५८) तर भिल्ल महिलांनीही सहभाग घेतला. त्यामुळे इंग्रजांनी ४०० भिल्ल स्त्रियांना पकडून ओलीस ठेवले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मेजर इव्हान्सने या भिल्ल नायकांबरोबर वाटाघाटीचा प्रयत्न केला. पण त्यालाही यश आले नाही. लढा अखंड सुरूच राहिला.
(क्रमशः)

संदर्भ:
१) khandesh District Gazetteer, vol. XII
२) प्राचार्य डॉ. जी बी शहा, खान्देश मधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास.

लेखन - डॉ. पुष्कर शास्त्री, शहादा

Published by - विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या