साधारणतः सव्वा दोनशे वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पुण्यात कवासाजी नावाचा एक कुंभार राहत होता. कवासाजी मातीचे भांडे घडविण्यासोबत शल्यक्रियेतही निपुण होता. 1772 मध्ये टिपू सुलतान व मराठ्यांमध्ये युद्ध झाले होते. ह्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकाचे नाक चक्क मेणाच्या साह्याने त्याने जोडले होते. कवासाजीने मेणाला नाकाचा आकार दिला, व त्या मेणाच्या नाकावर कपाळाची कातडी काढून जोडली आणि त्या नाकाला सजीव आकार दिला. ही सगळी शस्त्रक्रिया इंग्रज डॉक्टर थॉमस क्रूसो आणि डॉक्टर जेम्स फिंडले या इंग्रजी चिकित्सकांनी आपल्या डोळ्याने पाहिली होती. एवढेच नव्हे तर हा पूर्ण प्रसंग त्यांनी चित्रांकित करून त्याचा अहवाल मद्रास गॅजेटमध्ये प्रकाशितही केला होता.
हाच अहवाल 1794 मध्ये "जेंटलमॅन" ह्या लंडनवरून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकामध्येही प्रसिद्ध झाला. सापांचा व गारुड्यांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतात अशी शल्यक्रिया मातीचे भांडे घडविणारा कुंभार करू शकतो ही बातमी पार खळबळ उडवून गेली. हा प्रकार खोटा म्हणावा तर आपल्याच शल्य चिकित्सकाने डोळ्याने पाहिलेला आणि खरा म्हणावा तर भारताचा सन्मान वाढविणारा, अशी इंग्रजांची गोची झाली. पण विश्वास तर ठेवावा लागेल ना. या पद्धतीचा सखोल अभ्यास करून लंडनच्या डॉ.जे.सि.कार्पिओ यांनी 1814 मध्ये ह्या पद्धतीचा उपयोग करून शल्यक्रिया केली,व त्यात ते यशस्वी ठरले.
या प्रसंगांमध्ये कुठेही खोटारडेपणा नाही. शरीराचा तुटलेला अवयव पुन्हा दुरुस्त करत शारीरिक व्यंग दूर करण्याची कला भारतीयांच्या पूर्वजांना आधीपासूनच माहिती होती. आधुनिक काळात हीच शल्यक्रिया "प्लास्टिक सर्जरी" म्हणून ओळखली जाते. ही "प्लास्टिक सर्जरी" कशी करावी याबद्दल आपले आचार्य सुश्रुत यांनी तर "सुश्रुतसंहिता" नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. 1772 मध्ये प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या कवासने अडीच हजार वर्षे जुना असला "सुश्रुतसंहिता" नावाचा ग्रंथ तर नक्कीच वाचला की नाही यात शंका आहे. पण हे ज्ञान त्याला नक्की परंपरागत पद्धतीने मिळाले असावे यात शंका नाही.
ह्या प्रसंगावरून अजून एक गोष्ट सिद्ध होते की ते म्हणजे भारतीय ज्ञानाची परंपरा ही केवळ विशिष्ट जातीपूर्ती मर्यादित नव्हती. तर प्रत्येक योग्य व्यक्तीचा त्यावर अधिकार होता. मग तो कोणत्याही जातीचा असू देत. कवासाजिने जी शल्यक्रिया केली त्याचे तंतोतंत वर्णन "सुश्रुत संहितेमध्ये" आहे. ह्या पद्धतीला आजचे आधुनिक युग फेशियल म्हणून ओळखते. केवळ फेशियल फ्लॅप एवढ्यावरच सुश्रुत संहितेचे जनक आचार्य सुश्रुत थांबत नाही, तर अशा प्रकारच्या बेचाळीस शल्य तंत्राचे व त्यासाठी लागणाऱ्या 121 उपकरणांची माहिती ही आपल्या ग्रंथात देतात. अशा कित्येक शस्त्रक्रियांचे उदाहरण आपले धार्मिक ग्रंथ सुद्धा देतात. उदाहरणार्थ श्री गणेशाचे मस्तक कापल्यानंतर त्या ठिकाणी हत्तीचे मस्तक बसविणे होय.
कावासाजी ने "सुश्रुत संहितेच्या" माध्यमातून केलेली शस्त्रक्रिया ऐकून युरोपातील त्या काळातील तज्ञ डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरीचा जनक केवळ भारत आहे असे एकमुखाने कबूल केले. परंतु आपले 'स्व'त्व हरवून बसलेल्या भारतीयांना याचे कधी अप्रूप वाटलेच नाही. आपल्याकडचे ज्ञान हे सेवा करण्यासाठी आणि दुसऱ्याला ज्ञानी बनविण्यासाठी असते असा भारतीय संस्कार होता. त्यामुळे आपल्याला अवगत ज्ञानाचा पेटंट घेण्याची प्रथा भारतात कधीच नव्हती. इंग्रजांनी जाणीवपूर्वक भारतीयांच्या मनावर ते खूप अडाणी व इंग्रज खूप विद्वान आहेत असा विचार बिंबवला त्यामुळे आजही आम्ही आमच्या गौरवशाली इतिहासाला मान्य करताना धजावत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपला भारतीय गौरव पुनः जागृत करणे हीच आपलीच जबाबदारी नाही का?
संदर्भ :- भारताची उज्वल विज्ञान परंपरा, लेखक - सुरेश सोनी
https://www.tv9marathi.com/health/the-first-plastic-surgery-was-performed-228-years-ago-in-india-439831.html
https://www.ranker.com/list/history-of-the-nose-job/genevieve-carlton
लेखन - राजेंद्र जैस्वाल, नांदेड
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या